आशुतोष दिवाण ह्यांच्या कमेंटवर भाष्य श्रीधर तिळवे नाईक 

आशुतोष दिवाण ह्यांनी एक कमेंट केलीये तिला मी इथे उत्तर देतो आहे 

प्रिय आशुतोष दिवाणजी 

सर्वात प्रथम धन्यवाद !

तुम्ही म्हणताय,

"आपण आणि मकरंद साठे या दोघांबद्दल मला आज मराठीत बहुदा सर्वात जास्त आदर आहे हे मी अनेकदा लिहीले आहे".

श्रीधर तिळवे :मकरंद साठे ह्यांच्याबद्दल मलाही आदर आहे स्वतःचा मध्यमवर्ग झाकण्यापेक्षा तो खोलून ठेवण्यात अधिक अर्थ आहे हे कळलेल्या दुर्मिळ लेखकांपैकी ते एक आहेत मुख्य म्हणजे श्याम मनोहरांची उगाचची अगतिकता त्यांच्या पात्रांच्या ठायी नाही नवमध्यमवर्गाच्या  आंतरिक लालसा आणि त्यांच्यातील साधनशुचितेचा होत चाललेला ऱ्हास  ते प्रभावीपणे मांडतात असो 

तुम्ही म्हणताय, 

"पण आपल्या अश्या कविता वाचल्या की मला काही समजेनासे होते".

श्रीधर तिळवे नाईक : अश्या म्हणजे कश्या ? तश्या म्हणजे कश्या ?आणि तश्या का आवडतात आणि अश्या का आवडत नाहीत 

तुम्ही म्हणताय, 

"एक भयंकर मोठा समाज भयंकर इंटेन्सली पोट भरण्यासाठी,आपले जीवन सुधारण्यासाठी इरेला पडून धडपडत आहे.खूप मोठ्या प्रमाणावर तोंडाने बोलत नसला तरी आपल्या व्यवसायाबद्दलची पैश्यांपलीकडची निष्ठा महत्वाची मानत आहे.म्हणूनच कदाचीत हे जग बरे चालत असावे".

श्रीधर तिळवे नाईक : मी ह्याच्याशी सहमत आहे पण एक प्रश्न असाही येतो कि ह्या लोकांना कलेची आवश्यकता काय ?त्यांना कलेने निर्माण होणाऱ्या हुरूपाची खरोखर आवश्यकता आहे काय ? कलेविना त्यांचा हुरूप अडून बसलाय काय ? माझ्या मते जे असे हुरूपबाज नाहीत त्यांनाच हुरूपी वा हुरूपबाज कलेची जास्त गरज आहे अर्थात इथेही प्रश्न आहेच हुरूपबाज कलेने हे लोक बदलणार आहेत का बदलतात का माझ्या मते आपण प्रयत्न चालू ठेवावेत पण फळ मिळेल अशी अपेक्षा करू नये 

तुम्ही म्हणताय, 

"या सगळ्यांना सोसणारी,समजणारी,दिशा दाखवणारी,हुरुप देणारी वगैरे कला म्हणजे बाळबोध,जुनी,कनिष्ठ असे काहीतरी कलाविश्वाने ठरवून टाकले आहे.तिला पाॅप्युलीस्ट चीप वगैरे ठरवून टाकले आहे.ती जितकी गहन,टाॅरच्यूअस,इसोटेरीक,सटल वगैरे तितकी जास्त महत्वाची,जिवंत,प्रशंसनीय वगैरे म्हटले जाते.सर्वसामान्यांच्या करमणूकीच्या डाव्या कलेला,तमाशा,पवाडे वगैरे तर अगदीच बटीक करुन टाकले गेले आहे".

श्रीधर तिळवे नाईक : लोकांना दिशा देणारी कला हा विचार प्रथम धार्मिक लोकांनी मांडला व धार्मिक कला निर्माण करण्याची सक्ती केली धार्मिक कला आजही राज्य करते आहे (ग्रीक महाकाव्ये किंवा भारतात रामायण, महाभारत भागवतपुराण व शिवपुराण  सर्वात जास्त मराठीत ययाती मृत्युंजय राधेय संत व पंत कवींची महाकाव्ये आख्यानकाव्ये  )तिला कोणीही बाळबोध वा जुनी वा कनिष्ठ समजत नाही रामायण महाभारताचा टीआरपी त्याचा पुरावा आहे 

ह्याला शह म्हणून बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी व इंद्रियप्रामाण्यवाद्यांनी कलेने नवीन वैज्ञानिक ज्ञान व रॅशनॅलिटी लोकांना शिकवली पाहिजे वैग्रे आग्रह धरला आपल्याकडे फुले ह्यांचे साहित्य ह्याचे उदाहरण आहे त्यातूनच पुढे सामाजिक बांधिलकीची कल्पना जन्मली धार्मिक लोकांच्याप्रमाणे मार्क्सवादी लोकांनी त्याची सक्ती केली आणि आजही ही सक्ती जारी आहे 

प्रबोधनयुगात ही कला लोककला होती आणि तिचा प्रभाव थेट शेक्सपियरवर आहे 

तुम्ही म्हणता, 

"गोष्टींचे व्यंग करणे,जे पुर्वी समजा विदुषक करत असे,समजा किंग लियरमधे,तर त्यामधे ते पात्र कलानिर्मीतीमधे धोका पत्करुन वास्तवातले ताण विनोदाच्या माध्यमातून पृष्ठभागावर आणण्याचे काम करत असत".

श्रीधर तिळवे नाईक : ही सर्व प्रबोधनयुगातील लोककलेची वैशिष्ट्ये आहेत आणि त्या काळातील नाटककारांनी त्याचा प्रभावी वापर केला आधुनिक काळात ह्याचा अतिशय प्रभावी वापर बर्टोल्ट ब्रेख्तने केला आहे आपल्याकडे व्यंकटेश माडगूळकरांनी हे केले . आजच्या काळात हा वापर अशक्य नाही किंबहुना देशीवाद्यांनी हा केला आहेच विशेषतः अरुण कोल्हटकर त्यांचा नायक अनेकदा विदूषक बनत चिरीमिरी सादर करत असतो आणि ही चिरीमिरी तुमच्या मॅक्रोसेटपला हादरवत राहते 

आधुनिक रंगमंचाने प्रबोधनवादी रंगमंचाला थिएटरात न्हेले कारण आता विजेचा शोध लागला होता उघड्यावर नाटक करण्याची सक्ती संपली अगदी तमाशाही कनातीतून थिएटरमध्ये शिरला मात्र आधुनिक काळात लोककला बाजारकला बनली मार्केट आर्ट बनली तिने स्वतःचे मार्केट यार्ड उभे केले ह्यातूनच पॉप आर्ट जन्मली उत्तराधुनिकतेने ही पॉप आर्ट डोक्यावर घेतली आपले हिंदी सिनेमे विशेषतः त्यातील संगीत बीटल्स रॉक वैग्रे किंबहुना आपल्या पॉप बॉलिवूड फिल्मा अनेकदा अनेक गाण्यांच्या व्हिडीओजचे एकत्र ओपेरिक सादरीकरण आहे अनेक फोक कलेतील धुना ह्या अनेक संगीतकारांनी पॉप कलेचे रूप देऊन सादर केल्या 

आधुनिक कलावंतांपैकी काहींना पॉप आर्ट उथळच वाटत राहिली आणि त्यांनी आपल्या व्यक्तिगत कलेला जास्त महत्व दिले उदा काफ्का काम्यू जॉईस बेकेट विलास सारंग चि त्र्यं खानोलकर किरण नगरकर पण उत्तराधुनिकतेने त्यांचा पंचनामा केला त्यातूनच आधुनिकवाद आणि उत्तराधुनिकवाद अशा दोन बाजू निर्माण होऊन त्यांच्यात हा संघर्ष निर्माण झाला 

आमच्या काळात हा संघर्षच इर्रिलेव्हन्ट झालाय कारण आधुनिकता आणि उत्तराधुनिकता अनेक असतात हे आम्हा चौथ्या नवतेतल्या लोकांना कळून चुकलंय अनेक प्रतलांचे स्वतःच्या प्रतलात मिठीदिठीकरण आणि आलिंगिनीकरण कसे घडवायचे हा आजच्या कलावंतापुढचा व कलेपुढचा मोठा प्रश्न आहे असे मी म्हणतो माझ्यासारखा मनुष्य त्यासाठी आजच्या वर्तमानाची /चे दीर्घकविता लिहितो वा महाकाव्य लिहितो जे आधीच्या पिढ्यांनी मोठ्या प्रमाणात केले नाही आजचा वर्तमान हा इतका अक्राळविक्राळ आहे कि तुमच्यापुढे तीनच  पर्याय उरतात 

१ एकतर  आत्ताच्या क्षणाची कविता करा कलाकृती करा हा प्रकार कवींना सोयीचा आहे 

किंवा 

२ आजचे वर्तमान कवटाळण्यासाठी अनेकस्तरीय अडाहोकोबानासुनासारखे अक्राळविक्राळ  लिहा हे महाकादंबरीकारांना , वा महाकाव्यकारांना सोयीचे आहे अलीकडे नेमाडे ह्यात हिंदू लिहून दाखल झाले कारण पर्याय नाही 

किंवा 

३ मग काळाचा व अवकाशाचा एक पट्टा निवडून त्यातले बहुस्तरीकरण सादर करा हे कथाकार दीर्घकाव्यकार व कादंबरीकारांना सोयीचे आहे ह्यादृष्टीने सतीश तांबेंची कथा अभ्यासावी अशी आहे 

तुम्ही म्हणताय, 

"या दोन्ही बाजूंच्या कलांमधे,म्हणजे समजा एका बाजूला लाखे सर किंवा चंप्र म्हणतात तशी कला गूढाच्या बाजूने विस्कळीत इर रिलेव्हंट होत जात असताना किंवा मग आपल्या या कविता,काहीसे कुशंकच्या दिशेने क्या फर्क पडता है?,तू तर केवळ एक बुडबूडा आहेस अश्या नास्तीक दिशेने इर रिलेव्हंट होत जातात असे वाटते.

इन आयदर केस ही कला समाजाला रिप्रेझेंट करत नाही,उपयोगी नाही व केवळ चमत्कृतीने क्षणभर जीव गमवण्याची कला आहे की काय? असे वाटत राहते.

याबद्दल माझे प्रबोधन करावे ही विनंती."

श्रीधर तिळवे नाईक : एकतर आपले शरीर म्हणजे ह्या ब्रह्मांडाचा बुडबुडा ,फुगा , माठ किंवा लाट !  ज्यांना ते बुडबुडा वाटते ते ऍब्सर्डिटीकडे जातात ज्यांना ते फुगा वाटते ते गूढवादाकडे आणि धर्मवादाकडे ज्यांना ते जडाचा माठ वा तरंग वाटते ते उपयुक्तता , विज्ञान व तंत्रज्ञानाकडे आणि ज्यांना ते लाट वाटते ते मोक्षाकडे ! अनेकदा गूढवादी हा फेक मोक्षवादी असतो पण कलेत हा फेकपणा चालून जातो . आपण केवळ बुडबुडा आहोत असे वाटणे हे आधुनिक फिलिंग आहे आणि ते प्रत्येकालाच येते आणि कधीकधी दीर्घकाळ टिकते ते इर्रिलेवंट कसे काय आहे ? आयुष्याचा हे फिलिंगही हिस्सा आहे तो नाकारता कसा येईल ? ऍब्सर्डिटी हे फिलिंग कधीकधी जास्त ताणवते इतकेच ! आता ऍब्सर्ड कलेचा उपयोग काय हा प्रश्न विचारता येतो विशेषतः तुम्ही जर उपयुक्ततावादी व्यवहारवादी असाल तर तो जास्तच पडतो आणि व्यापक होत कलेचा काही उपयोग असतो काय असा मोठा होतो आधुनिक जगाच्या दोन मुख्य फिलॉसॉफीज इथे टक्करतात पहिली उपयुक्ततावादी व्यवहारवादी तर दुसरी अस्तित्ववादी अस्तित्ववाद समाजापेक्षा स्वतःचे अस्तित्व महत्वाचे मानतो समाज हा त्याच्यासाठी फक्त इसेन्स आहे एग्झिस्टन्स नाही त्याउलट उपयुक्ततावादी व्यवहारवादी समाज महत्वाचा मानतो त्याच्यासाठी अस्तित्व इसेन्स आहे आणि समाज एग्झिस्टन्स !समाज जी भाषा देतो त्याच भाषेत अस्तित्व बोलते असे त्यांना वाटते त्याउलट अस्तित्ववादी समाजाला नवी भाषा अस्तित्व देते आणि अस्तित्वाने निर्माण केलेली भाषा व गोष्ट ही नंतर समाज स्वीकारतो असे मानतो हा एक सनातन वाद आहे तुमचा कल उपयुक्ततावादी व्यवहारवादी आहे असे दिसते त्यामुळे तुम्हाला अस्तित्ववादी कला समाजाला रिप्रेझेंट करत नाही,उपयोगी नाही व केवळ चमत्कृतीने क्षणभर जीव गमवण्याची कला आहे की काय? असे वाटते आणि हे वाटणे नैसर्गिक आहे 

माझ्या मी हॉस्टेलला असताना लिहिलेल्या कवितेत जे एस हॉल मध्ये आम्ही सर्व विद्यार्थी मेसमध्ये नाष्टा करायला बसलो आहे आणि प्रत्येक विध्यार्थी स्वतःची महत्वकांक्षा सांगतो आहे ही सिच्युएशन आहे ह्यात काहीजण असेही फिल्मी स्ट्रगलर आहेत ज्यांना होस्टेलला ऍडमिशन मिळालेले नाही ह्यांची व्यवस्था वॉर्डनच्या हातात आहे काय तर नाही ती चक्क जे एस हॉलच्या वॉचमनच्या हातात आहे त्यांच्यासाठी देवाच्या दर्शनापेक्षा वॉचमनची मर्जीच महत्वाची ह्यात कुशंक कुठे आहे हे मला कळले नाही ही कला समाजतल्याच हॉस्टेल कल्चरला धरून आहे आणि ती जे आहे त्याला व्यक्त करते ह्यातील निवेदक कुठलेही नैतिक विधान करत नाही तो साक्षी भावाने हे टिपतो आणि जसे आहे ज्या भाषेत आहे तसे व त्या भाषेत सादर करतो 

श्रीधर तिळवे नाईक 

ताजा कलम 

ज्या कवितेच्या संदर्भाने  ही चर्चा आहे ते संदर्भ कळावे म्हणून ती कविता देतो आहे 

आयडियांनी भरलेली लाइफस्टाइल
महेश म्हणतो पत्रकारिता हीच माझी बाईल
मंग्याला लागलंय बॉलिवूडचं येड
हिंदीमे लगाऊंगा ढिनच्यॅक पेड
आल्हादाचा आल्हाद नेमाडेभारी
देशीवाद तारी त्याला कोण मारी
राजेशची कोर्टात दमदार खेटी
हा कायद्याचा बाजार कि कानूनकी खेती
कोंड्याच्या मिशीला सोन्याचे तारण
कळत नाही कुणाला देशमुखी धोरण
ह्याला लपव आणि त्याला काढ
लाड्याची रूम म्हणजे नारळाचे झाड
श्यामसुंदर वाजवी सिरियसनेसची बासरी
प्रोफेसरशिपला कँडिडेट्स पैश्याला पासरी
कुल्याच्या वाकुल्या बापटांच्या थापट्या
सिनेमातले स्ट्रगलर त्यांच्या रोजच्या आपट्या
दारूच्या बाटल्या आणि पिवळी पुस्तके
हस्ताचा पाऊस आणि सिग्रेटीत मस्तके
कशाला लागते देवाचे दर्शन
सगळ्यांना पुरा पडतो जे एस हॉलचा वॉचमन
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीजमधील चॅनेल : वर्ड्स ह्या काव्यफाईलीतून )


Comments

Popular posts from this blog