कवितेतील नीरसता आणि रटाळता
मराठीत कविता चांगली कि वाईट हे ठरवण्याच्या ज्या काही मूल्यमापनात्मक कसोट्या आहेत त्यातील एक म्हणजे कविता कशी वाटते सरस कि निरस रटाळ कि इंटरेस्टिंग ? ह्या कसोट्या फिलिंगच्या कसोट्या आहेत आणि कवी असलेले काही वाचक त्यांनाच प्रमाण मानताना दिसतात त्यात काही वैगुण्य असू शकते हे त्यांच्या गावीही नसते वास्तविक ह्या कसोट्या सापेक्ष असतात कशा ते आपण थोडक्यात पाहू
श्रीधर तिळवे नाईक
मराठीत कविता चांगली कि वाईट हे ठरवण्याच्या ज्या काही मूल्यमापनात्मक कसोट्या आहेत त्यातील एक म्हणजे कविता कशी वाटते सरस कि निरस रटाळ कि इंटरेस्टिंग ? ह्या कसोट्या फिलिंगच्या कसोट्या आहेत आणि कवी असलेले काही वाचक त्यांनाच प्रमाण मानताना दिसतात त्यात काही वैगुण्य असू शकते हे त्यांच्या गावीही नसते वास्तविक ह्या कसोट्या सापेक्ष असतात कशा ते आपण थोडक्यात पाहू
सर्वसाधारणपणे वाचकावर कोणत्या कवीचे आणि कवितेचे आणि काव्यपरंपरेचे संस्कार आहेत ह्यावर सरसपण व रटाळपण अवलंबून आहे उदाहरणार्थ रजनीश ओशो हे तत्वज्ञानात अस्तित्ववादापर्यंत सहज पोहचतात पण त्यांनी प्रवचनात दिलेल्या कविता पाहिल्या तर त्यात अध्यात्मिक किंवा रोमँटिक कविताच दिसतात आधुनिक कविता त्यांना आवडत नाहीत त्यांना त्या निरस वाटतात कारण त्या काव्यपरंपरेचे संस्कार नाहीत जर रजनीशांसारख्या खुल्या माणसाची ही अवस्था तर बाकींच्यांबद्दल काय बोलावे ?
दुसरी गोष्ट वाचकाचा रस कशात असेल त्याची संवेदनशीलता नवतेबाबत किती उत्सुक असेल त्यावरही नीरसता व रटाळपणा अवलंबून आहे
सर्वसाधारणपणे उत्तम वाचक हा
१ आपल्या आधीच्या काव्यपरंपरा
२ समकालीन नवता
३ पुढील नवता
ह्या तिन्ही धारांसाठी खुला असतो आणि तो ह्या तिन्ही गोष्टींना दाद देतो उदाहरणार्थ सतीश तांबे मराठीत सतीश तांबेसारखे उत्तम वाचक किती ?
मर्ढेकरांनी आधुनिकतावादी नवता मांडली पण सुरवातीला काय घडले ? तर रटाळ व निरस म्हणून टवाळी झाली पुढे काय झाले तर
मर्ढेकरांच्या ज्या कवितांना निरस व चोथा म्हणून हिनवले गेले त्यांनाच माईलस्टोन म्हणून गणले गेले हे का घडले तर आपल्या आधीच्या काव्यपरंपरांनी जखडल्या गेल्याने अनेक वाचकांना समकालीन आधुनिकतावादी नवता दिसलीच नाही एखादाच पु ल देशपांडे निघाला जो निरस म्हणूनही पुढे चूक सुधारून मर्ढेकरांच्या कवितेचे कार्यक्रम करता झाला
मर्ढेकरांनी फक्त कविताच न्हवे तर सौंदर्यशास्त्र लिहून समीक्षाही प्रतिमाकेंद्री केली आणि आज अवस्था अशी आहे कि अनेकांची काव्यात्मक संवेदनशीलताही प्रतिमाकेंद्री झाली आहे आधुनिकतावादाला आणि सत्यकथेला हे साजेसे होते पण त्याचा फुगा फुटल्यावर त्यालाही आव्हान मिळालंय हेही अनेकांच्या गावी नाही अभिधानानंतर साच्यात अडकले ते ह्या प्रतिमावादामुळे मी त्यातून निसटलो पण अनेकांना हे जमलेले नाही किंबहुना आपण कोणत्या पिंजऱ्यात अडकलोय ह्याचीच अनेक कविंना कल्पना नाही प्रतिमा हे साधन आहे एक्स्प्रेशन नाही
ह्याशिवाय साहित्यिक राजकारणात एखादा कोणत्या ग्रुपच्या वतीने उभा आहे ह्यावरही रटाळपण अवलंबून आहे आपल्या ग्रुपशिवायच्या कविता रटाळ वाटणारे महाभाग आहेतच खाजगीत उत्तम म्हणून दाद देणारे वाचक समीक्षक ग्रुपच्या नादाला लागून ग्रुपबाहेरच्या कविंना सहजरित्या निरस व रटाळ म्हणून बाद करतांना मी पाहिले आहे संपादकाच्या सत्तेचे तळवे चाटणारे अनेक कवी मी पाहिले आहेत आणि तळवेचाटू लोकांच्या साधारण कवितांना असाधारण म्हणणारेही महाभाग मी पाहिलेत सांस्कृतिक अभिरुचीचे राजकारण हा अजूनही मराठी समीक्षेचा चर्चाविषय नाही
ह्यावर उपाय काय ? तीन उपाय असतात १ आपली संवेदनशीलता सतत तासणे व तिला नवे टोक काढणे
२ तिला कुठल्याही ग्रुपकडे गहाण न टाकणे आणि
३लोकमान्यतेची आसक्ती फेकून देणे
सर्वांनाच हे जमते असे नाही असो
Comments
Post a Comment