मोदी आणि समकालीन देशीवाद श्रीधर तिळवे नाईक 

कुठल्याही नवतेत चार कालखंड निर्माण होतातच आणि ह्या चार कालखंडांचे  त्यांचे त्यांचे आरंभबिंदू असतात कुठलीही नवता प्रथम मार्गी मग देशी मग पोटी आणि शेवटी जमाती अशी झिरपत जाते मार्गी जी वैश्विक नवतत्वे घेऊन येते ती नीट प्रस्थापित होणे फार गरजेचे असते भारतात नैसर्गीय आणि विश्वीय अशा युगात हे नीट घडले पण भारतात सृष्टीय प्रबोधनात्मक युगात मात्र विज्ञान प्रस्थापित होऊन राजाराम मोहन रॉय आर्य समाज प्रार्थना समाज महात्मा फुले ह्यांची  प्रबोधनात्मक नवता प्रस्थापित होण्याआधीच देशी रोमँटिक राष्ट्रीय नवता उदयाला आली आणि तिने राष्ट्रीय आंदोलन उभे केले

पोटी प्रबोधनवाद उभा केला तो बाबासाहेब आंबेडकरांनी ! त्यांनी विज्ञानवाद पुन्हा कवटाळून एक समग्र विचारसरणी उभी करून टिळक सावरकर गांधी च्या देशीवादाला चॅलेंज दिले जमातीतून मात्र एक समग्र विचारवंत येईल असं वाटलं होतं तो अजूनही आला नाही

वैश्विक विज्ञाननिष्ठ नवतत्वे जोपासणाऱ्या  प्रबोधनवादाला आजही  भारतात नीट आकार प्राप्त झालेला नाही आणि काही ठिकाणी तर त्याचा अतापत्ताही  नाही काही ठिकाणी तर  त्याची पीछेहाट झाली आहे

भारतात प्रबोधनवाद  प्रस्थापित होण्याआधीच प्रतिसृष्टीय आधुनिकतावाद आला त्याचा मार्गी आधार तंत्रज्ञान होता आणि त्याने औद्योगिक समाज जन्माला घातला इंडस्ट्रियल सोसायटी जन्माला घातली मराठी साहित्यात त्याची मार्गी नवता आली ती मर्ढेकरांच्या मुळे आणि वाढीला लागली ती करंदीकर मुक्तिबोधांच्यामुळे  तिला देशी व पोटी शह मिळणे अटळ होते आणि तो मिळाला नेमाडे आणि कोल्हटकरांच्यामुळे आणि  ह्याचवेळी समांतर आंदोलन निर्माण करणाऱ्या पोटी कामगार श्रमिक दलित वर्गातून आलेल्या  ढसाळ सुर्वेच्यामुळे  पुढे भुजंग मेश्रामने जमाती रचना पुढे आणली आणि प्रतिसृष्टीय वर्तुळ पूर्ण झाले आजही ह्या वर्तुळात ९९ टक्के साहित्यिक काम करतायत

साधारण १९८० नंतर अवतरली ती चिन्हसृष्टी अप्रानेट अधिक डेवलप करत  पर्सनल कम्प्युटर जगभर पसरवत मायक्रोसॉफ्ट ऍपलचे साम्राज्य वाढवत !राजकीय पातळीवर राजीव गांधी , नरसिंहराव , अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग ह्या चारी पंतप्रधानांनी ही चिन्हसृष्टीय मार्गी नवता मस्त वाढवत न्हेली मी सावधपणाने ह्यावेळी नवंतांचा इतिहास माहित असल्याने मार्गी देशी पोटी आणि जमाती ह्यांची समग्र मांडणी केली कारण देशी पोटी आणि जमातीने मान्यतेसाठी संघर्ष करत त्यात वेळ घालवू नये आधीच्या लोकांनी ज्या चुका केल्या त्या आपण करू नयेत असे मला वाटले होते पण काही नतद्रष्टांनी पुन्हा एकदा तोच खेळ खेळून देशी कलाकार मार्गी बनतील आणि अनेक आनंद यादव तयार होतील ह्याची खबरदारी आधीच घेतली संतोष पवार हा आमचा मित्र ह्यात ट्रॅप होता होता वाचला दिलीप चित्रे ह्या गेमचे पायोनियर त्यांनी प्रथम सत्यकथेच्या बाजूने हा गेम खेळून पाहिला पण नेमाडे शहाणे निघाल्याने त्यांनी उपजत शहाणपणानें देशीवाद वाचवला पुढे रंगनाथ पाठारेंना दिलेल्या मुलाखतीत आपण कसे देशीवादी नाही आहोत हे सांगण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला त्यात तेच उघडे पडले आणि माझी अटकळ सिद्ध झाली

२०१४ ला मोदी निवडून आलेत आणि हा निगमी  हिंदू देशीवादाचा विजय आहे आता चिन्हदेशीवादाला पुन्हा भरभराटीचा काळ आला आहे कलाक्षेत्रात ह्याचे प्रतिबिंब पडणे अटळ साहजिकच नितीन वाघांसारख्यांची जबाबदारी आता डबल होते त्यांच्याकडे आंबेडकरवादाची पोटी विरासत आहे पण ती चिन्हसृष्टीयतेच्या संदर्भात अँप्लिकेबल होते का होते तर कशी आणि जर होत नसेल तर का ह्यासारखे अनेक प्रश्न पोटियतेपुढे आहेत मी माझी काही उत्तरे दिली आहेत पण ह्या पिढीची उत्तरे वेगळी निघण्याची शक्यता आहे राहुल बनसोडसारखे अनेकजण ह्याची उत्तरे शोधतायत

मोदींना कसे हाताळायचे हा जितका राजकीय प्रश्न आहे तितकाच कलात्मक प्रश्नही आहे कारण मोदी हे ह्या निगमीं हिंदू देशीवादाचे महाप्रतीक आहेत त्याच्या पोटात शैव आहे कि वैदिकब्राम्हणी  वैष्णव आहे हे अजूनही स्पष्ट नाही आमचे निरागस ओबीसी शैव त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत त्यांना वाटते कि मोदींची राजवट ही ओबीसींची शैव राजवट आहे जी वैश्य शूद्र दलित आणि आदिवासी ह्यांचा एकत्र विकास करणार आहे त्यांना मोदींच्यात नवीन महात्मा गांधी दिसतायत जे सर्वांना सोबत घेऊन चाललेत पत्रकारांना आणि तत्कालिक विचारवंतांना जसे गांधी कळाले नाहीत  तसे मोदीही कळत नाहीयेत अशी त्यांची पक्की खात्री आहे ते मोदींच्या शैव मंदिरांच्या भेटीवर खुश आहेत ते केदारनाथच्या मेडिटेशनवर खुश आहेत मोदींच्यावरची टीका जशी मोदींच्या अंगाला लागत नाही तशी ती शैवांच्याही अंगाला लागत नाही काँग्रेसने खिजगिणतीतही न गणलेल्या आदित्यनाथ योगी , जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीं ह्या सारख्या मठप्रमुखांना तिकिटे मिळतांना ते पाहतायत आणि त्यांना भरभरून मत टाकतायत काँग्रेस ही आता ब्राम्हण क्षत्रियांची संघटना झालीये आणि तिथे फक्त राजपुत्र राजकन्या आणि नातेवाइकांनाच जागा आहे असे त्यांना वाटते काँग्रेसमध्ये सतरंज्या टाकण्यात त्यांना रस नाही काँग्रेसचा देशीवाद हा फक्त क्षत्रियांच्या हितसंबंधापासून सुरु होतो आणि त्यांच्याच हितसंबंधापाशी संपतो असे त्यांना वाटते भाजपचे दोन्ही पंतप्रधान आणि अडवाणी हे पंतप्रधानपदाचे दावेदार हे कार्यकर्त्यापासून प्रवास करत सर्वोच्च स्थानी पोहचलेत हे त्यांना स्पष्ट दिसते आपणालाही भाजपमध्ये अशी संधी आहे अशी त्यांची धारणा आहे एक दलित राष्ट्रपती एका ओबीसी पंतप्रधानाला पंतप्रधानपदाची शपथ देतोय हे दृश्य त्याला सुखावतंय फडणीसांनी तिकीट दिलेलं नसलं तरी रामदास आठवलेंनाच घेऊन उद्धव ठाकरेंना अभिनंदनाचे स्वीट दिलंय हे त्याला सुखावतंय

आत्ताचा ओबीसी समाज हा भारतातला सर्वाधिक गुंतागुंतीचा समाज आहे त्याने महात्मा गांधींच्या प्रेमापोटी व नेहरूंच्या कळकळीपोटी काँग्रेसला साथ दिली होती इंदिरा गांधींनी प्रथम त्याची धूळधाण उडवायला सुरवात केली  इंदिरा गांधींच्या काळात त्याच्या  प्रेमाचा परतावा नीट झाला नाही इंदिरा गांधींनी बहुजन समाजातल्या मुख्यमंत्र्यांचे कसेकसे अपमान केले आणि सोनिया गांधी राहुल गांधी ह्यांनी ही अपमान करण्याची विरासत कशी सांभाळली हे उडत उडत त्याने ऐकलेले आहे नेमाडेंच्याप्रमाणे हा देशीवाद क्षत्रियांचा नाहीये तो ओबीसींचा आहे आणि तो कलेत पेलणे सोपे नाही यशवंतराव चव्हाण हे जर नेमाडेंच्या देशीवादाचे प्रतीक असेल तर मोदी हे ह्या आत्ताच्या देशीवादाचे प्रतीक आहे आणि कधी न्हवे तो हा देशीवाद  सत्तर वर्षात  प्रथमच दिल्लीत बसलेला आहे नाहीतर आत्तापर्यंत दिल्लीत मार्गिवादी आणि राज्यात देशीवादी असा मामला होता आता तसे नाही त्यामुळे मार्गींच्याविरुद्धचे सोपे बंड जसे शक्य होते तसे सोपे बंड आता शक्य नाही कारण प्रथमच केंद्रात देशीवाद मुख्य सत्ताकेंद्र बनलाय आणि त्याला चक्क ब्राम्हणवादाचा पाठिंबा आहे हे पूर्वी फक्त महात्मा गांधींच्याबाबत घडले होते त्याच्याशी भांडायचे असेल तर त्यासाठीसुद्धा ओबीसींच्या पोटात शिरायला हवं आणि भारतीय विचारवंतांना हे शक्य होत नाहीये ते आधी निष्कर्ष ठरवतायत आणि मग इंटरॅक्शन करतायत हे वैचारिक शीर्षासन आहे त्याने मोदी नीट दिसणे शक्य नाही

मोदींचा हा देशीवाद ब्राम्हणवादाचा देशीवादी मुखवटा आहे कि खरोखरच ओबीसीचा चेहरा आहे हे ह्या साडेचार वर्षात स्पष्ट होईलच

भाजपने अमित शहा आणि नितीन गडकरी हे दोन्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार तयार करायला सुरवात केलीये वाजपेयी अडवाणी , मोदी शहा ह्या जोडगळीनंतर शहा गडकरी ही जोडी आलटून पालटून सादर केली जाईल आणि भाजपचा भविष्यातील पंतप्रधानपदाचा उमेदवार हा ह्या दोघांपैकीच  एक असेल फैसला अर्थात जनता करेल ते प्रथम अमित शहांना उभे करतील आणि जनता त्यांना निवडून देते कि नाही ते पाहतील जर जनतेने त्यांना नाकारले तर गडकरींना किंवा तत्सम कुणाला चान्स देतील

ह्या निवडणुकीतच मोदींना मागच्यावेळेप्रमाणे दुसरा सेफ मतदारसंघ भाजपने दिला नाही कारण जनता निवडून देत असेल तरच तुम्ही पंतप्रधान असा हा गेम होता मोदी जर पडले असते आणि भाजप जिंकला असता तर मोदींचाही अडवाणी झाला असता आणि अमित शहा पंतप्रधान झाले असते भाजप हरला असता तर नितीन गडकरी विरोधी पक्षनेते झाले असते आणि शहांचे अध्यक्षपद कायम ठेवण्यात आले असते ओबीसी शैवांनी मोदींच्या बाजूने कौल दिला आणि मोदी पंतप्रधान झाले

भविष्य नेमके काय वळण घेईल हे अद्याप अस्पष्ट आहे मोदींनी निवडून आल्यावर शैव मंदिराला भेट दिलेली नाही तर भेट दिलीये शैवांचा अपमान करण्यासाठी वाढवण्यात आलेल्या गुरुवायूर वैष्णव मंदिराला ! मोदींच्या मंत्रिमंडळात ओबीसी मंत्री जवळजवळ नाही हा मोदींचा खरा चेहरा असेल तर मोदीं हे नेमाडेंच्याप्रमाणे केवळ ओबीसींना गुंडाळायला निर्माण करण्यात आलेला शैव मुखवटा आहे हे सिद्ध होईल आणि जर हे केवळ तात्पुरते ब्राम्हणवादाला खुश करण्याचे राजकारण असेल तर वाट पाहावी लागेल मोदी जर ह्या देशातील बहुजन जनतेचा कायापालट करण्यात आणि त्यांचा आर्थिक विकास करण्यात यशस्वी झाले तर आणि तरच त्यांना सन्मानाचे स्थान मिळेल अन्यथा  ब्राम्हणवादाने जन्माला घातलेला ओबीसींची फसवणूक करणारा आणखी एक शैव मुखवटा असे त्यांचे स्थान निश्चित होईल

इतिहासाने मोदींना संधी तर दिलीये ह्या संधीचे काय करायचे हे मोदींना ठरवायचे आहे

कलावंतांना मात्र ह्या देशीवादाला कलेत सादर करतांना किंवा त्याला विरोध करताना  त्याची झडती घेतांना कलेत फार झाडाझाडी करावी लागेल ह्याबद्दल शंका नाही नाहीतरी चौथ्या नवतेची देशी अभिव्यक्ती ही फार चॅलेंजिंग गोष्ट आहे हे मी सुरवातीपासून सांगतो आहेच

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog