लिरिकलतेचे सर्वात मोठे शत्रू

लिरिकलतेच्या क्षितिजापाशी होणारे अस्त सूर्याला उदासीन पाहून होतात कि चंद्राच्या रुणझुणत्या प्रकाशात पुन्हा दिव्यत्वाची अंघोळ करतात हे इंद्रियांच्या अगोचर आणि अनाचारी खुळखुळ्यांना कळावे कसे ?जमिनीचा पृथ्वीकेंद्रीत मातृ उत्सव आणि तिच्या वाद्याच्या असंख्य तारा सृजनशीलतेचे अगणित पहारे काबीज करून संगीतात अचेतन भिरभिरतात तेव्हा त्वचेच्या सांजपखाली कोठल्या दुःखाचे कोवळे पाणी वाहतात हे नद्यांना कळावे कसे

हे आणि असले आरती प्रभू व ग्रेसवादी प्रतिमाकेंद्री लेखन हे लिरिकलतेचे सर्वात मोठे शत्रू आहे मी असे असंख्य पॅरेग्राफ व कविता पाडू शकतो इथे फक्त एक मासला आणि मसाला दिला अनुभव आणि कल्पनाशक्ती ही कवितेची सोर्सक्षेत्रे आहेत त्यांचे सोसक्षेत्रात रूपांतर झाले कि ग्रेसचा प्रतिमा टाईप करणारा बेबंदपणा जन्मतो
रोमॅंटिसिझमने प्रतिमांचा कल्पनाजन्य वापर इतका बेबंद केला कि पाश्चिमात्य देशात त्याच्याविरोधात वास्तववाद नावाची एक चळवळच जन्मली मराठीत हा बेबंदपणा आरती प्रभूंनी जन्माला घातला आणि ग्रेसने त्याचा सुदूर फैलाव केला अतिवास्तववादाचे ऑटो टेक्निक जन्मले तेव्हा त्यामागे मानसशास्त्र होते आणि वास्तववादाला छेद देण्याची प्रचंड उर्मी होती कारण भांडवलशाही कलावंतालाही कमोडिटी बनवायला निघाली म्हणून सृजनाची स्वायत्तता शाबूत ठेवणे ही काळाची गरज होती

हा इतिहास कळून न घेताच रोमँटिक लोक आटो फिलिंगचे टेक्निक अवलंबतात तेव्हा अनेकदा प्रतिमाबंबाळपणा जन्मतो हा प्रतिमाबंबाळपणा लिरीक्सच्या फॉर्ममध्ये जन्मतो तेव्हा अनेकदा सुसह्य बनतो पण मुक्तछंदात हा  प्रतिमाबंबाळपणा बेबंद झाला कि अनेकदा श्री पु भागवतांची सत्यकथा होते त्याउलट प्रतिमा फक्त कल्पनाशरण न राहता संवेदननिष्ठ किंवा अनुभवनिष्ठही राहतात तेव्हा चांगली कविता जन्मते जशी ग्रेसची आई गेली तेव्हा किंवा आरती प्रभूंची नाही कशी म्हणू तुला किंवा पु शि ची शहनाज

ज्यांना लिरिकल लिहायचं आहे त्यांनी ग्रेस व आरती प्रभूंच्या प्रभावापासून स्वतःला वाचवणे फार गरजेचे आहे
आणि दुसरी गोष्ट प्रतिमाबंबाळपणा टाळणे आवश्यक आहे आणि तिसरी गोष्ट कल्पनाजन्यतेचा अतिरेक टाळायला हवा ती जीवनाशी जोडून घेता यायला हवी अनुभव व इंद्रिय ह्यांच्याशी जोडून घेता यायला हवी थोडक्यात

१ आरती प्रभू ग्रेस ह्यांचा अतिरेकी प्रभाव
२ प्रतिमाबंबाळपणा
३ पोकळ कल्पनाजन्यता

हे लिरिकलतेचे  तीन  मोठे शत्रू आहेत

श्रीधर तिळवे नाईक



Comments

Popular posts from this blog