बाकीबाबच्या आठवणीत अर्थात पंडित कवी , रोमँटिसिझम आणि बा भ बोरकरांची कविता  श्रीधर तिळवे नाईक

मराठी कवितेच्या इतिहासात पंडित कवितेचं एक स्कूल आहे त्यात अनेक पंडितांच्या स्वयंवरकविता आणि हरणकविता येतात ह्या पंडितांनी रामायण महाभारताचे मराठीकरण घडवून ते मराठी घराघरात न्हेले ह्या पंडितांच्यात दोन प्रवाह होते
१ ब्राम्हणी संस्कृतीधार्जिणी मार्गी कविता ज्याचे सर्वोत्कृष्ट प्रतिनिधित्व मोरोपंतांच्यात आढळते
२ देशी पंडिती  मराठीधार्जिणी आख्यानक कविता जी क्षत्रियांचे प्रतिनिधित्व करते विशेषतः वैष्णव क्षत्रिय ज्याचे प्रतिनिधित्व स्वामी श्रीधर ब्रम्हानंद नाझरेकर ह्यांच्या कवितेत आढळते अनेक गावात श्रीधरांच्या आख्यानक कवितांची पारायणे मी ऐकली आहेत

मार्गी पंडिती  कविता वृत्तकेंद्री आणि शब्दकळा केंद्री तर देशी पंडिती  कविता ही वृत्तकेंद्री पण आशयकळाकेंद्री ! मोरोपंतांनी मीटर वापरले तेही आर्या जे संस्कृत होते आणि फक्त ब्राम्हणांनाच तेही संस्कृत येणाऱ्या कळायचे  त्यामुळेच संस्कृत ब्राम्हणांच्यात मोरोपंतांची लोकप्रियता वाढली तर देशी ब्राम्हण (उदा देशस्थ व कऱ्हाडे ब्राम्हण) व ब्राम्हणेतरांच्यात  श्रीधर अधिकाधिक लोकप्रिय होत गेला श्रीधरच्या पांडवप्रताप सारख्या ग्रंथांची पारायणे हा मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होता आणि गावात अगदी १९५० पर्यंत सर्वाधिक लोकप्रिय कविंच्यात ज्ञानेश्वर नामदेव  एकनाथ आणि तुकारामांच्या बरोबर श्रीधरही प्रचंड लोकप्रिय होता घरोघरी मातीच्या चुली सारख्या ओळी श्रीधर सहज लिहून जात हा बदल टार्गेट ऑडियन्स मराठी ठेवल्याने घडला होता त्यांना खऱ्या अर्थाने मराठी श्रोत्यांसाठी आपली आख्याने लिहायची होती आणि नाझरे गावाचे कुलकर्णी असल्याने त्यांचा बहुजन समाजाशी चांगला संबंध होता ते मोरोपंतांच्यासारखे दरबारी न्हवते मूळ खिडकीचे असले तरी सोल्हापुरातील गावात आल्याने ते पुण्याच्या  पूर्ण पेशवाई माहोलपासून तुटले व देशी बनले

पंडित कवीलोकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी वृत्तांच्यावर मिळवलेले गाढे प्रभुत्व पंडितांचे आशय हे चाकोरीबद्ध होते आणि चालत आलेल्या महाकाव्य पुराणातून ते निर्मिती करत असल्याने पारंपारिकही होते पण त्यातही श्रीधरांनी अनेक मराठी सर्वसामान्य आशयरेखा भरल्या सीतेचं दुःख प्रत्येक स्त्रीचं दुःख झालं युधिष्ठरात प्रत्येकाला आपला नैतिक पेचप्रसंग दिसू लागला श्रीधरांनी साध्या भाषेत हे बसवले मात्र ओरिजनॅलिटीच्या नावाने बोंब होती तत्कालीन मराठी ब्राम्हण धार्मिक समाजात अभिजातवाद हाच सर्वमान्य वाद होता आणि अभिजातवाद हा क्लासिकचे अनुकरण करण्यात धन्यता मानण्यात धन्य होत असल्याने पंडित क्लासिकच्या परंपरेत लिहीत होते
श्रीधर ह्याला अपवाद न्हवते

महात्मा फुलेंना हा अभिजनवादी अभिजातवाद मान्य होणे शक्यच न्हवते ते बुद्धीप्रामाण्यवादी  असल्याने त्यांनी संतवाङ्मय आणि शाहिरी वाङ्मय ह्यांच्याशी नाते जुळवून बुद्धिप्रामाण्यवादी  नवता मांडली

केशवसुतांना त्यांच्या अभ्यासक्रमात सौंदर्यवादी कविता असल्याने ते ब्रिटिश रोमँटिसिझमच्या प्रभावात वाढले इंग्लिश परंपरेत  बुद्धिप्रामाण्यवादी कविता निर्माणच झाली न्हवती आणि जी झाली तिचा समावेश त्यांनी सिलॅबसमध्ये केला न्हवता कारण त्यांना इथे साम्राज्य टिकवायचे होते त्यांनी ब्रिटिश रोमँटिक कविंनी जशी आपल्या परंपरेत मीटर्स शोधली तशी आपल्या पंडित व संस्कृत परंपरेत मीटर्स शोधली सुनीतासारखा युरोपियन फॉर्म वापरला (त्यांच्याआधीच तो अनेकांनी मराठीत आणला होता ) जो पुढे विंदा करंदीकरांनी मुक्त सुनीते लिहून मोकळा केला

बालकविंनी केशवसुतांच्या रोमँटिसिझमला अस्सल दुःखाचा चेहरा दिला उदासीला पाया दिला आणि निरागस आनंदाचे कारंजेही उडवले तर सावरकरांनी ह्या केशवसुती रोमँटिसिझमला अस्सल देशभक्तीवादी  चेहरा दिला ह्याचवेळी बहिणाबाईंनी अस्सल देशी बाजाच्या रोमँटिक कविता लिहिल्या ह्या तिघांनीही ब्रिटिश परंपरेतून रोमँटिसिझम मोकळा केला

निरागस अहिंसक बालकवी आणि सशस्रवादी सावरकर हे दोन परस्परविरोधी ध्रुव आणि ह्यापासून शेतीत कृषिवादी बहिणाबाई हा तिसरा ध्रुव मराठी रोमँटिक नवतेत एकाचवेळी निर्माण व्हावेत हे अजिबोगरीब म्हंटले पाहिजे पीक विरुद्ध  फुले आणि ज्वाला ह्यांचा हा अविष्कार होता जो पुढच्या पिढ्यात ना घ विरुद्ध बोरकर पु शि रेगे विरुद्ध कुसुमाग्रज  असा कंटिन्यू झाला

ह्या सगळ्या पंडिती परंपरेला आणि केशवसुती रोमँटिसिझमला पचवून जी तिसरी फळी निर्माण झाली त्यात चार   कवी अग्रगण्य होते
१ बा भ बोरकर
२ वि वा शिरवाडकर
आणि
३ पु शि रेगे
४  ना घ देशपांडे

तर दुसरीकडे बा सी मर्ढेकर जे ह्या तिघांच्यापेक्षा १ ते ४ वर्षांनी मोठे  होते  आधुनिक नवता घेऊन येत होते
ज्यावेळी मराठीत उत्तम  दर्जाची रोमँटिक कविता लिहिली जाऊ लागली त्याचवेळी मर्ढेकर ह्या आपल्या समकालीन कविंच्याविरुद्ध आधुनिकतेची लढाई लढत कोर्टातही आपल्या कवितेच्या बाजूने  लढत होते तत्कालीन समीक्षा ही मर्ढेकरांच्या बाजूने कमी आणि ह्या तिघांच्या बाजूने जास्त होती परिणामी ज्ञानपीठ मर्ढेकरांना मिळण्याऐवजी शिरवाडकरांना मिळाले

पुढे देशीवादी नवतेत हाच संघर्ष ना धो महानोर एका बाजूला तर चित्रे नेमाडे कोल्हटकर दुसऱ्या  बाजूला तर ढसाळ परब काळसेकर तिसऱ्या  बाजूला असा झाला ह्यातील ढसाळांच्यावर मी स्वतंत्र पुस्तक लिहिले आहे कारण मी ज्वालांच्या बाजूने आहे मात्र पीक आणि फुलांची मी उपेक्षाही केलेली नाही तिन्हींना  समग्रपणे पेलून सम्यक काम करणे हे मोक्षवादी असल्याने माझी अपरिहार्यता झाली

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर  बा भ बोरकरांची कविता आपण जर पाहिली तर ती कुठे उभी आहे हे सहज कळावे कुसुमाग्रजांनी जेव्हा क्रांतीचा जयजयकार करणारी कविता लिहिली तेव्हा तिला उत्तर म्हणून बोरकरांनी शांतीचा जयजयकार करणारी कविता लिहिली हा केवळ योगायोग न्हवता शेवटी हा ज्वाला विरुद्ध फुले असा संघर्ष होता
ज्यात शिरवाडकरांना सशस्त्र क्रांतिकारकांच्याविषयी जास्त आकर्षण होते तर रेगे बोरकरांना गांधींचे त्यामुळे कम्युनिस्ट सुर्वेही शिरवाडकरांना जाऊन मिळतात परिवर्तनवादाच्या लढाईत शिरवाडकर जास्त रिलेवंण्ट असल्याने १९६० नंतर शिरवाडकरांची लोकप्रियता वाढत गेली तर बोरकर मागे पडत गेले देशीवादी नवतेला विशेषतः चित्रे नेमाडे कोल्हटकरांना रेगेंच्यात अस्सल देशीवाद आढळल्याने त्यांनी पु शि रेगे जास्त प्रमोट केला त्यामुळे बोरकरांचे समकालीन असलेले रेगे लोकप्रियतेत बोरकरांच्यावर मात करते झाले थोडक्यात परिवर्तनवाद्यांनी कुसुमाग्रज शिरवाडकर तर देशीवाद्यांनी पु शि रेगे प्रमोट केल्याने बोरकरांची कविता इतिहासात खिळून राहिली प्रश्न असा आहे कि बोरकरांच्या लोकप्रियतेच्या ओहोटीला फक्त हे घटक जबाबदार होते का ? तर नाही ! ह्याशिवाय दोन घटकही जबाबदार होते

नेमाडेंनी व चंद्रकांत पाटील ह्यांनी जे पंडिती काव्याविरुद्ध बंड केले त्याचा फटका बोरकरांना प्रचंड बसला आणि त्यांच्या कविता न वाचताच लोक त्यांना पंडिती कवी समजू लागले मुळात देशीवाद्यांनी तरी खरोखर पंडिती कविता किती वाचली होती ह्याबद्दलच मला शंका आहे पंडिती कवी शब्दांशी खेळायचे तर सत्यकथेतले कवि प्रतिमांशी हा फरकच देशीवाद्यांना कळला नाही त्यांनी सरसकट दोन्ही खेळांना पंडिती खेळ म्हणायला सुरवात केली बोरकर पंडिती परंपरेप्रमाणे शब्दांशी खेळत पण सत्यकथेत जो प्रतिमांचा अतिरेकी आकृतिवादी खेळ खेळला गेला तसा खेळ बोरकर खेळत न्हवते तरीही पंडिती कवी असा शिक्का त्यांच्यावर बसलाच पंडिती काव्यातही श्रीधर नावाचा कवी वेगळा प्रपंच मांडतोय हे देशीवाद्यांना कधीच कळले नाही श्रीधरसकट सर्वच पंडिती काव्याचा मुख्य प्रॉब्लेम हा आहे कि ते धर्माच्या प्रभावाखाली येऊन महाकाव्ये पुराणात रमतात आणि त्यातील आशयाची उसनवारी करतात नवीन आशय शोधत नाहीत हा आहे बोरकर अशी आशयाची उसनवारी करतात असे वाटत नाही ते त्यांचा स्वतःचा आशय शोधतात केशवसुतांच्याप्रमाणे ते केवळ आपला अभ्यासक्रम मराठीत ट्रान्सलेट करत नाहीत तर स्वतःच्या अनुभवातून आशय निर्माण करतात तो कवितेत सिद्ध करतात उदाहरणार्थ बोरकरांची सर्वात गाजलेली कविता जपानी रमलाची रात्र ही एक अत्यंत ओरिजनल कविता आहे ती पुढीलप्रमाणे  सहज भाषा आणि ओघवत्या प्रतिमा ह्या कवितेला तुम्ही पंडिती म्हणूच शकत नाही



जपानी रमलाची रात्र
तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात
रतीरत कुक्कुट साकुंडीवर आरोहूनी माड
चोच खुपसुनी फुलवीत होता पंखांचे झाड
अद्भुत पंख्यासम भिंतीवर आंदोलुनी छाया
लावित होत्या ताप जगाचा नकळत विसराया
धूप ऊसासत होता कोनि रजताच्या पात्री
विचित्र रेशिमचित्रे होती रसावली गात्री
तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला
मनात गुंफित स्पर्श-सुखांच्या स्वप्नांचा झेला
अन् म्युसेची कवने होती माझ्या हातात
प्रतिचरणाला करित होती धूम्रवेल साथ
जळत ऊसासत होते त्यासह अंतरात काही
होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पायी
तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ
आलीस मिरवीत जाळीमधुनी नागिणीचा डौल
करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पांच उकळता याही रंगलेले
अभिष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडवियले काठ
सुरेहुनी तु गडे भाजिले ओठांनी ओठ
स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा
मज सम त्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा
गंधर्वांच्या दुहिता जमल्या करित पुष्पवृष्टी
हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी
पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पा-यासम अंगातील वासे
आणि तरंगत डुलु लागली नौकेसम शेज
तो कांतितुन तुझ्या निथळले फेनाचे तेज
नखे लाखिया दात मोतिया वैडूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र
कात सोडिल्या नागिणिचे ते नवयौवन होते
विळख्याविळख्यातुनि आलापित ज्वालांची गीते
गरळ तनुतील गोठुन झाले अंतरात गोड
कळले का मज जडते देवा नरकाची ओढ
डोळे बांधुन खेळत होते जीवन मायावी
अंधपणातच वितळत होते भूत आणि भावी
तुझ्या जपानी भाषालिपिसम अगम्य सुन्दरता
असुनि हाती उरली दुर्लभ आली ना हाता
आजही तुज शोधता कधी ती रमलाची रात्र
पाठितुनि जंबिया मधाचा घाली काळजात!
__ बा. भ. बोरकर
 सहज भाषा आणि ओघवत्या प्रतिमा ही ह्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत ह्या कवितेला तुम्ही पंडिती म्हणूच शकत नाही बहुदा ही रमल औरंगाबादची नसून जपानची आहे ह्याचा देशीवाद्यांना राग आलेला असावा असो


दुसरा घटक त्यांच्या स्कूलचा आहे ते अस्तित्वात आलेच नाही असा एक प्रवाद आहे पण  वस्तुस्थिती अशी आहे कि बोरकरांचे स्कूल पुढे खानोलकर (आरती प्रभू )पाडगावकर ग्रेस शंकर रामाणी ह्यांनी चालवले पण पाडगावकरांचा अपवाद वगळता ग्रेस रामाणी प्रभुतींनी कधीही आपल्या कवितेवर बोरकरांच्या असलेल्या प्रभावाची चर्चा केली नाही ह्यातील ग्रेस ह्यांनी तर ह्याबाबत भुक्कडगिरी केली मी कवितेचे नवीन स्कूल निर्माण केले हा भ्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या कवितेच्या बापालाच कापले ग्रेस ह्यांच्या कवितेची शैली ही बोरकरांच्या शैलीचा पुढचा टप्पा आहे पण ग्रेस ह्यांनी हे कधीच मान्य केले नाही आणि आपल्या समीक्षकांनीही ग्रेसच्या रोमँटिक भ्रमांना सत्य मानले

बोरकरांच्या कवितेची काही वैशिष्ट्ये आहेत

१  दोन शुद्ध शब्दांचे जोडकाम करून त्यातून एक नवीन जोडशब्द तयार करणे
२ प्रतिमाबाजी
३ भावनिक तीव्रता

ग्रेसनी बोरकरांच्या तिन्ही वैशिष्ट्यांचा अतिआग्रह आणि अतिरेक करून स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली एका अर्थाने बोरकरांच्या लँडफोनचे ग्रेस स्मार्टफोन मध्ये रूपांतर करतात बोरकरांची लॅण्ड ही गोवा आहे ते म्हणतातच


​माझ्या गोव्याच्या भूमीत
   

माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे !!

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास
फ़ुली फ़ळांचे पाझर
फ़ळी फ़ुलांचे सुवास!!

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी!!

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा!!

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा!!

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले
भोळा भाबडा शालिन
भाव शब्दाविण बोले!!

माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात!!

माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी
आथित्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी!!
ही जी षड् रसांची नांदी आहे त्यांच्या कवितेत नांदतेच कोकणची भूमी हा बोरकरांच्या कवितेचा पाया आहे ते ह्या पायातून आपले  पाय कधीही काढून घेत नाहीत त्यामुळेच गोव्याच्या दूधसागर धबधब्यावर सहज कविता लिहून जातात

ग्रेस ही निश्चित भूमी नाकारतात आणि आपणाला एका अमूर्त भूमीत न्हेतात आणि पायाशुन्य आणि पायशून्य करतात त्यामुळे अनेकदा आपण कविता वाचतांना अपंग होत जातो  किंवा पायचीत होऊन कवितेतून परततो बोरकरांची कविता अशी अमूर्त होत नाही ती एका निश्चित जमिनीवर उभी असते

जोडशब्द तयार करणे ही बोरकरांची खासियत ह्या दृष्टीने स्पर्श ही त्यांची  कविता पहा

स्पर्श

फुलल्या लाख कळ्या
स्पर्शसुगंधा घन अंधारी फुटल्या ग उकळ्या

ध्वनिकंपित तनुच्या शततंत्री
बंदी मन रतीमोहमंत्री
लय लागुनिया नाचु लागल्या स्वप्नीच्या पुतळ्या

धूप जळे तिमिराचा पवनी
विनिद्रनयना व्याकुळ अवनी
पिकुनी लावल्या नक्षत्रांच्या द्राक्ष लता पिवळ्या

भुई वाळुची संगमरवरी
तीवर काळ्या फेनिल लहरी
व्यथेतुनी सुख मंथित ग्रंथित झाल्या मधुर निळ्या

सुटल्या अवचित जटिल समस्या
फुटला रव स्मरकुटिल रहस्या
जननांतरिच्या स्मृतिच्या ज्योती पाजळल्या सगळ्या

द्रवली नयने, स्रवली हृदये
दो चंद्राच्या संगम-उदये
दुणी पौर्णिमा, रसा न सीमा, उसळ्यांवर उसळ्या

इथे संगमउदय स्मरकुटील विनिद्रनयना स्पर्शसुगंध रतिमोहमंत्री असे अनेक सुंदर जोडशब्द येतात ही शैली मोरोपंतांची पण बोरकर श्रीधरांच्याप्रमाणे ती सुगम करून घेऊन येतात त्यामुळे ती अतिदुर्बोध होत नाही ह्यातील उसळ्यावर उसळया ही खास श्रीधरी शैली आहे 

धूप जळे तिमिराचा पवनी म्हणजे वाऱ्यात अंधाराचा धूप जळतो आहे विनिद्रनयना व्याकुळ अवनी  म्हणजे झोप न येणाऱ्या डोळ्यांची पृथ्वी व्याकुळ झालेली आहे हा प्रतिमाविलास पाहण्याजोगा आहे शेवटी दोन पौर्णिमा होतात एक चंद्राची तर दुसरी तिच्या शरीराची त्यांच्या संगमाचा उदय होतो त्यामुळे रसाला सीमा रहात नाहीत आणि तो उसळयावर उसळ्या घेत राहतो 

बोरकरांची सर्वात गाजलेली व वर दिलेली कविता  जपानी रमलाची रात्र मध्येही  


दीप-राग , रतीरत रेशीमचित्रे प्रतिचरण  धूम्रवेल असे मोजके जोडशब्द येतात ते कवितेत अपरिहार्य वाटतात 

भेटे जे जे त्यात भरे
अशी लावण्याची जत्रा

असे खुद्द बोरकरांनी म्हंटले आहेच त्यामुळे बोरकर लावण्ण्याची जत्रा कवितेत भरत  जातात 

बोरकरांच्या ह्या जोडशब्द शैलीचा थेट प्रभाव ग्रेसवर पडलेला आहे

बोरकरांच्या बाबतीतली सर्वात वादग्रस्त मुद्दा हा भावनिक तीव्रतेचा आहे ही भावनिक तीव्रता कृत्रिम कि नैसर्गिक असा हा प्रश्न आहे माझ्या मते जपानी रमलेची रात्र सारख्या कवितेत ती कमालीची नैसर्गिक आहे पंडिती शैली आणि सहजता ह्या दोन्ही गोष्टी एकाच कवितेत साध्य करण्याची श्रीधरी किमया ही श्रीधरनंतर शिरवाडकर बोरकरांनाच साधली शिरवाडकर फारच सामाजिक होत जातात तर पु शि शारीरिक बोरकर ह्या दोन्हींचा मध्य साधतात जो आजच्या पिढीच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे  गांधीवादी असूनही ते हा मध्य साधतात हा विशेष ! कुठे ना कुठे ह्याचे मूळ रविंद्रनाथ टागोरांच्या प्रभावात आहे मात्र कधी कधी ते पंडिती शैलीत घुटमळायलाही लागतात आणि कृत्रिम कविता तयार होते शांतीचा जयजयकार ह्या दृष्टीने पाहावी ती कृतक कविता वाटते वरील स्पर्श ह्या कवितेतही एक अवघडलेपण जाणवते अनेकदा ते गांधींच्यासारखे अतिउपदेशी बनतात तेव्हाही त्यांच्या कवितेचा बॅण्ड वाजतो पण आश्चर्याची गोष्ट अशी कि त्यांच्या सर्वात गाजलेल्या ओळी 
दिव्यत्वाची जिथे प्रचिती 
तिथे कर माझे जुळती 

ह्या उपदेशी पण चांगल्या कवितेतील आहेत त्याउलट कळत जाते तसे ही कविता पहा 


कळत जाते तसे

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?

कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते?

कळत जाते तसे कशा मूर्ती सार्या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?

कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात?

कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?

कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?



अत्यंत साध्या सहज भाषेत इथे भावनिक तीव्रता वाढतच जाते बोरकरांच्या अश्या पन्नास एक कविता सहज निघतील 

प्रत्येक नवतेत जे घडते त्याला रोमँटिक नवता अपवाद न्हवती  केशवसुत पायोनियर असल्याने खूप चाचपडत कविता लिहीत होते हे चाचपडणे बालकवी बहिणाबाई सावरकरांनी सम्पवले आणि मग मराठीचा स्वतःचा असा स्वयंभू सौंदर्यवाद निर्माण झाला आणि त्यात बोरकरांच्या वाटा खूप महत्वाचा होता पुढे ह्या रोमँटिसिझमचा आरती प्रभू ग्रेस ना धो महानोर शंकर रामाणी असा प्रचंड विस्तार होत गेला पाडगावकरांच्यासारख्या कविंच्यावरचा त्यांचा प्रभाव उघड आहे तर ग्रेससारख्या कविंच्यावरचा सूक्ष्म सदानंद रेगेंच्यासारखे कवी जे त्यांच्या प्रभावाखाली अक्षरवेलसारखा कवितासंग्रह लिहीत होते ते पुढे अस्तित्ववाद व अतिवास्तववाद ह्यांच्या प्रभावाखाली वेगळे लिहायला लागलेले दिसतात 

ज्यांचा पिंडच रोमँटिक आहे त्यांच्यासाठी आजही बोरकर रिलेवंट कवी आहेत आणि पुढेही राहतीलच मी अर्धा गोवेकर आणि अर्धा कोल्हापूरकर होतो आणि कोल्हापूरने माझ्यावर बोरकरांचा प्रभाव पडू दिला नाही मात्र गावात गेलो कि बोरकरांच्या माझ्या गोव्याच्या भूमीत सारख्या कविता ओठावर कधीकधी यायच्या 

बोरकरांनी कोंकणीत लिहिलेल्या कविता ह्या मला मराठीइतक्या दर्जेदार वाटल्या नाहीत त्यामुळे त्यांच्यावर लिहिलेले नाही मात्र एखाद्या कोंकणीवादी किंवा देशीवादी कवी समीक्षकाला त्या मराठीपेक्षा दर्जेदार वाटू शकतील मला वाटल्या नाहीत ही माझी मर्यादा 

आज बोरकर नाहीत पण त्यांच्या जापानी रमलाची रात्र , माझ्या गोव्याच्या भूमीत सारख्या काही दर्जेदार कविता आपल्या सोबत आहेत त्यांच्यावर कधीतरी लिहायचेच होते त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त लिहिले बाकीबाब माझा नमस्कार स्वीकारणार नाहीत पण हॅट्स ऑफ म्हंटले तर नक्कीच अभिवादनासाठी हात हलवतील ह्याची खात्री वाटते 
श्रीधर तिळवे नाईक





देशीवाद्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या पण त्या करता करता काही वाईट गोष्टीही केल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय इतकंच



बोरकर मलाही आवडत न्हवते बोरकर जाऊ द्या मला विसाव्या शतकातला एकही कवी आवडत न्हवता  कारण सगळे मला फेक स्पिरिच्युअल वाटतात पण मेडिटेशनमुळे संस्कार लावून न घेणे मला जमतं होतं त्यामुळे माझ्यासाठी आवड निवड हा कधी मुद्दाच न्हवता आणि नाही मी तो कधी आणत नाही मी वैयक्तिक आवडीनिवडी बाजूला ठेऊन विश्लेषण करतो

अनेकदा कोण चांगला कोण वाईट ह्याचे संस्कार आपल्याआधीची पिढी करते बोरकर वाईट हे कुणी ठरवलं ? मला नेहमीच असं वाटतंकी ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला देऊन टाकावं दुसऱ्याचं श्रेय लाटण्याचं पाप केवळ राजकारणीच न्हवे तर कवीही करतात आणि काही तर फक्त आपल्या गोतावळ्याचीच वकिली करतात अशावेळी आपल्याला काय वाटते ते आपण सांगावे आपलीही चूक होऊ शकते तशी झाली असेल तर ती मान्य करावी

तुम्ही म्हणता तसे असेल तर मी माझी चूक कबुल करतो मी एकतर ती वाचलेली नसावी किंवा माझ्या स्मरणात ठसली नसावी ग्रेस ह्यांचे घराणे कधीच रेगे ह्यांचे न्हवते पण आपण बोरकर घराण्यातील आहोत हे मान्य करणं त्यांना जड जात असावं बहुप्रसवतेमुळे कवी बोअर होतो हा मुद्दा गैरलागू आहे तुकारामाने चार साडेचार हजार कविता लिहिल्या म्हणून तो बोअर झाला काय कवीची वाढ सतत होणे हे मुख्य आहे रोमँटिसिझमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे कि तो अनेकदा वाढ बंद करतो किंवा खुंटवतो खुद्द ग्रेसही चांद्रमाधवीचे प्रदेश व राजपुत्र आणि डार्लिंग नंतर बोअरच व्हायला लागले शेक्सपिअरसारखा दिग्ग्जही उतारवयात कच्ची नाटकं लिहायला लागला पु शी रेगेही अनीह मध्ये बोअर व्हायला लागले संतांना लोक मरेपर्यंत संघर्ष करायला लावतात किंवा सरळ मारूनच टाकतात त्यामुळे बहुप्रसव असूनही त्यांच्या अखेरच्या कविताही बोअर करत नाहीत 





















Comments

Popular posts from this blog