दलितांचा पॅन्थर गेला श्रीधर तिळवे नाईक

पॅन्थर गेला खरेतर एकमेवाद्वितीय पॅन्थर गेला अनेकजण गवत खाण्यात धन्यता मानत असण्याच्या काळात पॅन्थर गेला तो जाणार होता अटळ होते वय खुणावत होते पण तरीही त्याचे जाणे मराठी साहित्यासाठी दुःख दायक आहे आता त्याच्यावर खूप छान छान लिखाण येईल पण त्याने काय होणार हयात असतांना आपल्या संस्कृतीनं त्याला काय दिलं ?

सत्यकथा जाळायला काय अक्कल लागते ?घेतली काडी लाव आग !सत्यकथा का जाळायची हे कळायला अक्कल लागते आणि ती अक्कल राजा ढालेंना मोठं करते .  ढालेंनी अगदी सविस्तर सांगितले सत्यकथा का जाळायची ते आणि का जाळली ते !

राजा ढाले नामदेव ढसाळ आणि अरुण कांबळे ह्या तिघांनी दलित पँथरची स्थापना केली हे तर सर्वश्रुत आहे ह्यातील अरुण कांबळे माझे मुंबई विद्यापीठातील PROFESSOR होते माझ्या पाठीमागे ठाम उभे असलेले PROFESSOR !दलित पँथरचा त्यांच्या दृष्टिकोनातला इतिहास त्यांनी मला ऐकवला होता आणि त्यात राजा ढालेंचे स्थान अढळ होते

समाज बदलायचा असेल तर विचार बदलायला हवा आणि विचार बदलण्यासाठी आंदोलन हे त्यांच्या परिवर्तनवादाचे  मुख्य सूत्र होते जे फुल्यांच्यापासून सुरु होत होते त्यासाठी बाबासाहेबांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला लोकांचे विचार बदलण्याचा प्रयत्न केला


दलित पँथरचे आंदोलन अपयशी झाले हे त्यांना मान्य होते आणि त्यांच्या मते

आंदोलन फेल झाले कारण
१ नेते विकाऊ झाले
२ लोक आंदोलनांच्या मागे उभे राहिले नाहीत कारण ते अडाणी अशिक्षित आहेत
३ लोकांची गुलाम हिंदू मानसिकता नष्ट झाली नाही
४ आंदोलनाचे तुकडे तुकडे झाले
५ विचार पोहचलेच नाहीत

त्यांच्या मते हे फक्त दलित पँथरचे झाले नाही तर फुले आणि आंबेडकर ह्यांचेही हेच झाले नैतिकतेबाबत ढाले कमालीचे आग्रही होते आणि त्यांच्या मते नैतिकता हाच फुले आंबेडकर विचारांचा आणि त्यावर आधारित आंदोलनांचा प्राण होता व असला पाहिजे त्यामुळे नैतिकता ढासळल्याने (नेत्यांची आणि आंदोलकांची ) आंदोलन उताराला लागले

साहजिकच राजा ढाले हे फार निगेटिव्ह आहेत असा प्रवाद पसरला त्यातच त्यांनीच आणलेले रामदास आठवले
सत्तेसाठी कुठल्याही पक्षाबरोबर  बसायला तयार झाले

ढसाळांना शांतीवादी मार्गांनी क्रांती आणणे अशक्य वाटायला लागले आणि ते अधिकाधीक मार्क्सकडे झुकू लागले आणि त्यावरूनच वाद सुरु झाले आंबेडकरवाद शांतीने क्रांती आणू पाहतो आणि ढालेंचा त्यावर विश्वास होता ढसाळांनी तरी नंतर काय केले तेही हळूहळू शांतीवादाकडे झुकले मग प्रॉब्लेम काय होता ? भांडलात कशासाठी ?

मला लायक जोडीदार भेटले नाहीत असे ढाले  म्हणत पण मग नामदेव ढसाळ आणि अरुण कांबळेंचे मत तरी काय वेगळे होते ? मग दलित पॅन्थर एकमेकाला लायक नसलेल्या लोकांनी बनवली होती काय ? नाही माझ्या मते आंबेडकरांच्या काळातही दलितांचे नेतृत्व कुणी करायचे ह्यावरून आंबेडकर आणि गांधी ह्यांच्यात वाद झालाच की ! आणि आजही चालू आहे . काँग्रेसही  अनेकदा फुटली पण गांधी घराण्याचे केंद्रीय नेतृत्व स्वीकारल्याने ती फुटूनही जुळत राहिली आणि दलित तिच्यामागे जात राहिले दलित जिथे आंबेड्करांच्याच मागे ठाम उभे राहिले नाहीत तिथे ते पॅन्थरमागे एकगठ्ठा उभे राहतील हा भ्रम आहे खरेतर कुठलाच वर्ग मग तो ओपन असो बीसी असो ओ बीसी असो वा एसटी असो एकगठ्ठा मतदान कुणाच्याच मागे नाही पण आंबेड्करांच्यानंतर दलितांचे केंद्रीय नेतृत्व निर्माणच झाले नाही

ढाले भगवान कृष्णांना अनैतिकतेचे तर भगवान बुद्धांना नैतिकतेचे प्रतिनिधी मानत अनैतिकता शिकवण्यासाठी हिंदूंच्या पुढे  श्रीकृष्ण बसवले जातात असे ते मानत साहजिकच आजच्या जय राम जय श्रीकृष्ण च्या काळात त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्याऐवजी आणखी एक गेला अशी प्रतिक्रिया आली तर त्याचे आश्चर्य मानण्याचे कारण नाही ते हिंदूंना गुलाम मानत आणि बौद्ध धर्माला स्वतंत्र करणारा धम्म ! त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी त्यांना वाळीतच टाकले आणि रामदास आठवलेंना करमणूक करणारा जोकर व हास्यकवी बनवून सत्ताधारी बनवले

साहित्यात ढाले परिवर्तनवादी होते वास्तववाद फक्त वास्तव मांडून थांबतो परिवर्तनवाद हा फक्त वास्तव मांडून थांबत नाही हे वास्तव बदलले पाहिजे अशी कलेतून मागणी करतो  मेरी कोशिश ये हैं कि सुरत बदलनी चाहिये किंवा फक्त बघू नका बदला ह्या परिवर्तनवाद्यांच्या आवडत्या घोषणा आहेत ढाले त्याचे समर्थक होते साहित्याने ललित असता कामा नये दलित असले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता

अरुण कोल्हटकरांच्या कवितेतील ताकदस्थळे आणि भगदाडे ज्यांना माहित होती त्यात राजा ढाले सर्वोत्तम होते फिनिशिंग साधायच्या नादात कविता गुळगुळीत करून बिघडवून घेऊ नका असे अरुण कांबळे मला आवर्जून सांगायचे त्याच्या मुळाशी राजा ढाले होते

राजा ढालेंनी मग दिले काय ? तर साठोत्तरी चळवळीला त्यांनी पोटीवादी आयाम दिला आणि त्याचे तर्कशास्त्रही मांडले सत्यकथेची चळवळ प्रश्नांकित केली आणि अजोड समीक्षेचे काही नमुने दिले साठोत्तरीचा इतिहास राजा ढालेंच्याशिवाय पुराच होऊ शकत नाही

त्यांना माझा अखेरचा जयभीम

श्रीधर तिळवे नाईक



Comments

Popular posts from this blog