कवितेचा थाट श्रीधर तिळवे नाईक

मराठीला पु शि रेगे ह्यांच्या ज्या काय देणग्या आहेत त्यातील एक म्हणजे स्वतःच्या कवितेवर कसं काम करायचं ह्याचा त्यांनी घालून दिलेला आदर्श पाठ पारंपारिक वृत्तावर कसं काम करायचं हे आपणाला बोरकर कुसुमाग्रज करंदीकर मर्ढेकर ह्यांनी दाखवून दिलं आणि पुढे ग्रेस व आरती प्रभू ह्यांनी पण मुक्तछंदावरही काम करायचं असतं ह्याची पहिली तीव्र जाणीव रेगे आणि करंदीकर ह्यांनाच होती असे दिसते ह्यातील रेगे ज्याला ठाणमंडित थाट म्हणता येईल तो सतत विकसित करतांना दिसतात त्यासाठी ते पाश्च्यात्य कविंचे थाटही कसे मराठीत विकसित करतात हे मी कमिंग्ज ची एक थाटरचना त्यांनी मराठीत  पक्षी जे झाडावर गाणे गातो असते झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात वैग्रे मध्ये कशी आणली ते मी सप्रमाण सिद्ध केले होते आपल्याकडे ह्याला चोरी म्हणणारे मूर्ख आहेत वास्तविक ही एक आवश्यक आयात असते आणि एखादा कवी त्या थाटाचे मराठी रूपांतर कसे करतो हे महत्वाचे असते गाथा सप्तशतीचे सौष्ठव तर ज्या तर्हेने पु शि नीं नवीन मराठीत आणले त्याला तोड नाही
अरुण कोल्हटकर हे पु शिंच्या खांद्यावर उभे असलेले कवी आहेत १९४० ते १९६० मध्ये अमेरिकन व युरोपियन कविंनी विकसित केलेले अनेक थाट त्यांनी नंतर मराठीत आणले दिलीप चित्रेंनी ऑकटोविया पाझचा सगळा थाट गोतावळा असाच मराठीत आणला स्वतःच्या जनसमुदायाची अभंग ओवी मीटर्स आपण नवी कविता लिहितांना वापरली पाहिजेत ही जाणीव अस्पष्टपणे केशवसुत व स्पष्टपणे मर्ढेकरांची पण काही आंधळ्या कोलटकर भक्तांना कोलटकरांच्याशिवाय काही सुचत नसल्याने हे लोक उठसुठ कोलटकर म्हणून गदारोळ उठवत असतात मुळात कोलटकर ही विद्या  शिकले तिकडच्या पन्नासोत्तरीकडून !

मी मुक्तछंदाचे अनेक थाट वापरले कधी कधी माझीही परीक्षा झाली उदाहरण घेऊन सांगायचे तर मार्क्सवादी कविंच्या थाटाचे घेता येईल मार्क्सवादी डायलेक्टिक पेलणारी कविता कशी लिहायची हा प्रश्न विसाव्या शतकातल्या अनेक मार्क्सवादी कविंच्यापुढे उभा होता ह्याचे पहिले सशक्त उत्तर मायकोवस्कीने शोधले त्याने मार्क्सवादी कवितेचा थाट शोधला भाषेची इलेक्ट्रीफायिंग विद्युतचपळता कशी ओळीत खेळवायची ह्याचे तंत्र त्याने तयार केले ब्रेश्टने ते जर्मन परंपरेत राहून विकसित केले

दुसरे उत्तर व्हिटमनच्या स्वछंदी नज्मरूपातले भारतात फैजने नज्म रूपातून त्याचे भारतीय प्रारूप शोधले जे आपल्याकडे नारायण सुर्वेन्नी व्हाया साहिर लुधियानवी वापरले

तिसरे उत्तर शोधले ते मुक्तिबोध ब्रदर्सनीं कसबा कल्चरच्या तऱ्हा मुक्तछंदात कशा ओतायच्या ह्याचा एक भारतीय थाट त्यांनी तयार केला विशेषतः गजानन मुक्तिबोधांना ह्या बाबत कमालीचे यश मिळालेले दिसते आपल्याकडे तुळशी परबने हा थाट आणखी विकसित केला

चौथा मार्क्सवादी थाट अवतरला तो पाब्लो नेरूदाच्या अंगाने !वॉल्ट व्हिटमनचा लिरिकलनेस कायम ठेवत त्याला मार्क्सवादी बाज देण्याची अद्भुत किमया नेरुदाने साधली ह्याला मी लॅटिन मार्क्सवादी थाट म्हणतो

मी जेव्हा १९८२ -८३ ला लिहायला बसलो तेव्हा हे सगळे मार्क्सवादी थाट "थाट" म्हणून प्रस्थापित झाले होते साहजिकच ह्या थाटात मार्क्सवादी कविता लिहिण्याचा शॉर्टकट मला उपलब्ध होता पण माझा प्रॉब्लेम हाच होता कि मी संशयी होतो मार्क्सवादाबाबत असणारे असमाधान व्यक्त करणे हा ह्या काळात गुन्हा होता मार्क्सवादी राजवटी कोसळणार हे चायनाने १९७३ साली आर्थिक धोरण बदलले तेव्हाच स्पष्ट व्हायला सुरवात झाली होती त्यामुळे मार्क्सवादाचे वैभव आमच्या पिढीच्या वाट्याला आले नाही आमच्या पिढीच्या वाट्याला आली ती मार्क्सवादाची पडझड

ही पडझड टिपायची कशी ?

ह्या काळातील कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या अनेक घुसमटी मी टिपायला धडपडत होतो डेकॅथलॉनच्या युरेका भागात त्या कविता प्रकशित झालेत पक्ष आणि कार्यकर्ते ह्यांच्या संबंधावरच्या ह्या कविता आहेत

युक्रांदची चळवळ ह्या काळात फार्मात येता येता रोडावायला लागली  हे असे का झाले ?

कम्युनिस्टांनी श्रमिकांची फसवणूक केली का ?

माझ्या आसपासचे हे ढवळून काढणारे वातावरण टिपायचे कसे ?

मी चारही थाट वापरून पाहिले पण मला जी घुसमट आणि वाताहत व्यक्त करायची होती ती व्यक्त होत न्हवती

आयडियॉलॉजीचा एन्ड मला व्यक्त करायचा होता का ? कदाचित हो कदाचित नाही ! स्वातंत्र्य समता बंधुता शाबूत ठेऊन मला आयडियॉलॉजीचा शेवट आणि त्याविषयीचा शोक व्यक्त करायचा होता का ? कदाचित हो !

आणि मग अचानक मला माझा थाट सापडला हा थाट आधीच्या मार्क्सवादी थाटांच्या खांद्यावर उभा होता मार्क्सवादाचा शोकात्म अंत सादर करणारा थाट !

मायकोवस्कीने सुरु केलेल्या कामाला हा मी दिलेला पूर्णविराम होता का ? माहीत नाही .

ह्या सर्व कविता डेकॅथलॉन : रिअल ह्या काव्यसंग्रहात आहेत

कवितेची सृजन प्रक्रिया ही कधीच आकाशातली असत नाही कवितेच्या थाटाचा कसा विचार करायचा ह्याचा आदर्श रेगेंनी घालून दिला पण स्वयंस्फूर्तीच्या रोमँटिक मॉडेलमध्ये अडकलेल्या मराठी कविंना त्यांचे काय ? बरं ह्या तथाकथित स्वयंस्फूर्त कविंनी एखादा जरी स्वतःचा थाट शोधला असता तर काही विचार तरी केला असता पण ह्यांचे योगदान शून्य ! कवितेवर कसे काम करायचे असते त्याची जाणीवच नाही , संगीतातला रियाज ह्यांना मान्य पण कवितेत रियाज ? अबब ! पाप ! पाप !

मराठी समीक्षाही अशीच ! कविंच्या रोमँटिक खाटांवर झोपणारी !आता खाटांवर झोपणारे थाट कसा शोधणार ?

श्रीधर तिळवे नाईक


Comments

Popular posts from this blog