कविता महाजन गेल्या !काहीश्या अनपेक्षित ! ऐंशोत्तर पिढीतील एक अतिशय दमदार कादंबरीकार गेली माझ्या संपूर्ण आयुष्यात मी त्यांना फक्त एकदाच भेटलो तेही म सु पाटील ह्यांच्यामुळे रुईया कॉलेजवर त्यांच्या  काव्यसंग्रहावर बोलताना ! आमचे वैयक्तिक संबंध फारसे न्हवते आणि फ्रेंडलिस्ट छोटी करण्याच्या माझ्या अतिरेकी प्रोजेक्टमध्ये  माझ्या फ्रेंड लिस्टींतून काही फारच महत्वाच्या व्यक्ती कमी केल्या गेल्या त्यात त्याही असल्याने जो फेसबुकमधून संबंध यायचा तोही गेला त्यामुळे माझ्याजवळ त्यांच्या वैयक्तिक आठवणी नाहीतच पण कलेच्या पातळीवर मात्र मी त्यांच्या सर्व हिकमतींच्या कडे लक्ष्य ठेवून होता

मला व्यक्तिशः त्यांची ब्र ही कादंबरी फार महत्वाची वाटते नेमाडे ह्यांचा देशीवाद आणि अवचटांचा खास मराठी डॉक्युमेंटेशनचा सामाजिक अवतार ह्यांच्या दरम्यान दोन्हीचा समतोल साधणारा एक वास्तववाद आहे ज्याला द्वंद्वात्मक वास्तववाद म्हणता येईल  ज्याची परिवर्तनवादाशी घट्ट नाळ आहे मराठीत दीनानाथ मनोहर , प्रभाकर पेंढारकर , विलास मनोहर ह्यांसारख्या कादंबरीकारांनी तो विकसित केला आणि कविता महाजन ह्या ह्या कुळातील हा वास्तववाद विकसित करणाऱ्या अतिशय महत्वाच्या कादंबरीकार होत्या जग बदलायचंय जग बदलत नाही जग थोडं थोडं बदलतंय पण हवं तसं बदलत नाही हा फील सातत्याने त्यांच्या कादंबऱ्या देतात ऐंद्रिय तपशिलांची त्या रेलचेल उडवत नाहीत किंवा पु शि सारख्या मोजक्या ढळढळीत तपशिलात ठाम रहात नाही त्या दोन्ही टोकाचा सुवर्णमध्य काढतात ह्या सुवर्णमध्यात चित्रकाराची चित्रगति जशी असते तशी कवीची हळवेगिरीही असते आणि हळवी बनू नकोस अशी स्वतःलाच केलेली दटावणीही !

त्या मराठी साहित्यातील दटावणी होत्या आणि अपवादात्मक क्षणी ती टोकालाही गेली तरी त्यातला चांगुलपणा ज्यांना कळायचा त्यांना कळायचा स्त्रीवादी लेखिकांना फालतू टवाळगिरी करून मोडीत काढण्याचा एक ट्रेंड सोकावलाय हा ट्रेंड त्यांच्यावरही आदळला पण त्याला त्यांनी यशस्वी तोंड दिलं .

त्यांचे जाणे हे नक्कीच नुकसानकारक आहे कारण त्या खूप जगतील आणि लिहितील असं वाटलं होत मला खात्री आहे त्या मृत्यूलाही " पुरुष म्हणून येणार असशील तर येणार नाही पण समानता मानत असशील तर येते  "असं काही म्हणाल्या असतील

त्यांना माझा शेवटचा प्रेमपूर्वक नमस्कार !

श्रीधर तिळवे नाईक


Comments

Popular posts from this blog