दिलीप चित्रे गेले तेव्हा



                                   दिलीप चित्रे ह्यांचे १० डिसेंबर २००९ रोजी झालेले निधन हा मला वैयक्तिक धक्का होताच पण त्यांच्या निधनाने आमच्या पिढीशी ज्यांचा सुसंवाद आणि वाद दोन्ही चालू होते असा एक साहित्यिक निघून गेला ह्याचे दुःखद फीलिंगही होते


                                       आमच्या दोघांचे संबंध अलीकडे काहीसे  तणावग्रस्त झाले असले तरी एकमेकाविषयीचा आदर कायम होता  संस्कृतीचा विचार मराठी संस्कृती म्हणून व्हायला हवा असा त्यांचा आग्रह होता इंग्रजी भाषेत लिखाण करणे हे मराठी संस्कृतीला कसे काय उन्नत करते हा माझा प्रश्न होता. मी ह्या अंगाने त्यांच्यावर संधीसाधूपणाचा आरोप केल्याने ते व्यथित झाले होते पण माझ्या मते एकतर देशीवादाचा  आग्रह धरा किंवा देशीवादावर टीका करून मराठी ही जागतिक संस्कृतीचा एक भाग आहे हे स्वीकारा चित्रे हे ह्यातील काहीही करत नव्हते, त्यांना मराठी संस्कृतीचे इंग्रजी प्रवर्तक व्हायचे होते आणि इंग्रजी संस्कृतीचे मराठी प्रवर्तक 
( ब्रिटिश नव्हे ) भारतीय माणसाच्या दुभंगलेपणाचे ते टिपिकल उदाहरण होते इंग्रजीतून ते भारतीय संस्कृतीच्या  मार्गी धारेला समृद्ध करत होते  तर मराठीतून ते मराठीपणा , मराठीच्या मराठी ओळखी ( marathi identity ) चा मराठी आधुनिकतेचा शोध घेत होते नेमाडे देशीवादी होते आणि आधुनिकतेची टर उडवत होते चित्रे देशीवादी होते पण त्याचबरोबर आधुनिकतावादीही होते त्यामुळे त्यांनी कधी आधुनिकतेची टर उडवली नाही उलट ते आधुनिकतेचा मराठी चेहरा शोधत होते आणि हा चेहरा देण्यासाठी परंपरा आवश्यक वाटत असल्याने ते परंपरेकडे वळले होते नेमाडेंचा आधुनिकतेला असलेला विरोध त्यांना मान्य न्हवता किंबहुना आधुनिकतेला मराठी चेहरा देण्यासाठी परंपरा आणि परंपरेचे सातत्य टिकवण्यासाठी परंपरेतूनच निर्माण होऊ शकेल अशी आधुनिकता हा त्यांच्यातला आणि नेमाडेंच्यातला फरक होता आणि सौष्ठव व नंतर अभिधाला ह्या दोन्ही दृष्टिकोनात चित्रेंचा आधुनिकतेवर असलेला भर ध्यानात आल्याने चित्रे अधिक जवळचे वाटले . चित्रे आणि नेमाडे दोघेही देशीवादी असले तरी चित्रेंना दिसणारा डोळा हा आधुनिकतेचा होता तर नेमाडेंना दिसणारा डोळा हा परंपरेचा होता त्यामुळेच जेव्हा नवा विशेषांक काढायचा ठरले तेव्हा मी चित्रेंची निवड केली आणि मग मी आणि हेमंत दिवटे आम्ही दोघांनी मराठीतला पहिला दि पु चित्रे विशेषांक काढला ह्या अंकाने अभिधाचे प्रस्थ निर्माण होईल हा माझा अंदाज अचूक निघाला मात्र चित्रे ह्यांच्या कवितेची ताकत आणि दोष दोन्ही दाखवणारी समीक्षा जी अपेक्षित होती ती झाली नाही इतरांनी ताकत दाखवण्यातच समाधान मानले आणि मग माझा लेख औचित्याला धरून न्हवता अशी टीका मला ऐकावी लागली आणि त्यातून मग औचित्य न पाळणारा कवी अशी माझी प्रतिमा निर्माण करण्याची संधी इतरांना प्राप्त झाली जणू विशेषांक आरती ओवाळण्यासाठीच निर्माण करायचे असतात . मला हे मान्य नसल्याने माझा भर दोष दाखवण्यावरही होता त्याकाळात साठोत्तरीच्या प्रभावातून मराठी साहित्य बाहेर काढण्यासाठी हे आवश्यक आहे असे मला वाटत होते मात्र माझ्या ह्या औचित्यभंगानंतरही चित्रे पॉझिटिव्हच राहिले. 

आम्हा दोघांच्यात निगेटिव्हिटी आली ती माझ्यावर झालेल्या केसने ! ज्यावेळी सर्वांनी पाठ फिरवली तेव्हा त्यांनी आम्हाला आधार दिला धैर्य दिले माझे परंपरेविरुद्ध उभे ठाकणे त्यांना तितकेसे मान्य न्हवते पण तुझा विचार मला मान्य नाही पण तुझे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य मला मान्य आहे तुझ्या ह्या स्वातंत्र्याच्या आड कुणी येत असेल तर तुझ्या विचार मांडण्याच्या हक्कासाठी मी प्राणही द्यायला तयार आहे असा त्यांचा वैचारिक बाणा होता आणि तो त्यांनी निभावला पण ह्या घटनेच्यावेळीच एक विलक्षण घटना घडली ती म्हणजे त्यांनी ज्ञला दिलेली ऑफर ! त्यातच भर म्हणून त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने ज्ञ ला प्रपोज केले मी तिच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे हे माहित असून ! त्या व्यक्तीला त्यांनी पाठिंबाच दिला म्हणजे आश्रयाला आलेल्या व्यक्तीच्या संसाराला आग लावण्याचाच हा प्रकार होता ही सात्रच्या नाटकातील अस्तित्ववादी सिच्युएशन होती एकीकडे राजकीय व पोलिसी सत्ता ह्यांना चुकवणे दुसरीकडे ह्या गोष्टीमागे हेमंत दिवटे हाच आहे अशी एका मित्राने माझ्या डोक्यात घातलेली शंका त्यामुळे मित्राबरोबर मित्र म्हणून राहणे आणि सावधही राहणे तिसरीकडे ज्ञचे दबावाखाली येऊन आपल्यावरील प्रेम कमी होऊ नये म्हणून काळजीचा समतोल राखणे आणि चौथीकडे चित्र्यांनी निर्माण केलेल्या अभूतपूर्व सिच्युएशनात्मक पेचाला सहन करणे असा एक चौफेर अस्तित्व ताणणारा आणि माझ्या अध्यात्माची परीक्षा घेणारा हा काळ होता मी तो शांत डोक्याने हाताळला ज्ञच्या प्रेमात पडणारे प्रियकर हा काही मला अनोळखी विषय न्हवता पण ह्या सिच्यूएशनमध्ये तो नकोसा होता सुदैवाने हेमंतबाबतची शंका खोटी निघाली आणि एक साईड तात्पुरती वाचली तात्पुरती मी ह्यासाठी म्हणतो कारण ह्या काळात प्रत्यक्षात ज्ञ माझ्याच एका मित्राच्या प्रेमात पडल्याचे निष्पन्न झाले आणि माझी अक्षरशः ठासली गेली प्रेयसी , समाज , मैत्री ह्या तिन्हींकडून मिळालेल्या स्टॅबींगमध्ये चित्र्यांनी गुरूतुल्य असणाऱ्या माणसाने गा मारणे ही एक चौथी मिती टाकली मुंबईत एकट्याने जगणाऱ्या कंगाल माणसासाठी  हे आयुष्याचा चोळामोळा आणि चेंदामेंदा करणारे होते मी ते कवितेच्या आणि धर्म नावाच्या कादंबरीच्या साहाय्याने पेलले अर्थात माझी मोक्षाविषयाची साधना ह्या घटनांच्या मुळे अधिक गहन झाली खरेतर मी आता ह्या सर्व स्टॅबींगविषयी संबंधित सर्वांचा प्रचंड ऋणी आहे ह्यांनी माझा मोक्ष सोपा केला मोक्षासाठी माणूस आतून  मरणे फार आवश्यक असते आणि अशा घटना आतून माणूस मरायला मदत करतात असो . पण ह्या घटनेनंतर आपण काय केले ह्या आत्मपरीक्षणाऐवजी चित्र्यांनी स्वतःचे आत्मसमाधान केले आणि मग माझे त्यांच्या शत्रुस्थानी जाणे अनिवार्यच होते मी मात्र त्यांच्याबाबतची माझी भूमिका तटस्थ ठेवली आणि मौनही पाळले बहोत बेअब्रू होकर तेरे कूँचेसे हम निकले हे सांगणार तरी कुणाला ? 

चित्र्यांच्या साहित्याविषयी खरेतर तपशीलवार लिहिणे फार आवश्यक आहे पण ह्या वैयक्तिक कारणामुळे ते लांबणीवर पडत गेले पुढे हेमंत दिवटे त्यांचा पट्टशिष्य बनला आणि त्याने चित्रेवाद अतिशय उत्तमरीत्या अभिधानानंतरच्या माध्यमातून पुढे न्हेला नियतकालिकांबाबत आणि अनियतकालिकांबाबत दिलीप चित्रेंचा सर्वसामावेशकवाद मला कधीच मान्य न्हवता बंड ज्यांच्या कवितेविरुद्ध करायचे त्यांचीच कविता तीही अनुकरणात्मक सोबत ठेवायची हे मला अमान्य होते देशीवादी कविताच सोबत घ्यायची असेल तर ती किमान देशीवाद पुढे न्हेणारी आहे ह्याची खातरजमा करावी आणि सत्यकथावादी आणि स्वच्छंदवादी कवितेला आपण सपशेल नकार द्यावा असे मला वाटत होते चित्र्यांनी स्वतः सर्वसामावेशवादी भूमिका घेऊन अनियतकालिकांची चळवळ पातळ केली होती आणि हेमंतद्वारे चित्रे तेच करतायत असा माझा आरोप होता जो चित्रे ह्यांना अमान्य होता पुढे जेव्हा क व्ही ह्या काव्यसंग्रहाची वेळ आली तेव्हा प्रस्तावनेचा प्रश्न आला आणि त्यातून आम्हां दोघांच्यातला कडवटपणा अधिकच वाढला ह्याविषयी मी चौथी नवता ह्या पुस्तकात लिहिले असल्याने त्याची उजळणी करत नाही 

  ह्या सर्व पार्श्वभूमीवरही माझे चित्रे ह्यांच्या साहित्यावर असलेले प्रेम कधी कमी झाले नाही माझ्या आवडीनिवडीत मी कधीही वैयक्तिक अनुभव घेऊन येत नाही अनेक कवी माणूस म्हणून उत्तम असतात पण त्यांच्या कविता भीषण असतात तर काहीवेळा उत्तम लिहिणारे माणूस म्हणून भीषण असतात माझ्याबाबत काही चुका केल्या असल्या तरी चित्रे माणूस म्हणूनही उत्तम होते माणसांविषयी त्यांना असलेला जिव्हाळा ऑथेंटिक होता आतिथ्यशीलतेत ते छान होते त्यांचा सूक्ष्म विनोद हा कमालीचा शिरच्छेद करणारा होता तो ना अत्र्यांच्यासारखा उघडा आणि थुलथुलीत होता ना पु ल देशपांडेंच्यासारखा अतिसभ्यता पाळणारा ! तो दोघांचा समतोल होता . त्यांची प्रतिभा ही साठोत्तरी पिढीतली सर्वश्रेष्ठ प्रतिभा होती नवकाळाचे प्र के अत्रे हे सर्वसंचारी अष्टपैलू प्रतिभा असलेले जसे व्यक्तिमत्व होते किंवा सत्यकथावादी पिढीत पु ल देशपांडे जसे सर्वसंचारी आणि अष्टपैलू व्यक्तीमत्व होते तसेच साठोत्तरी पिढीचे ते सर्वसंचारी प्रतिभा असलेले अनेक कलात गती असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व होते साहित्याइतकेच त्यांना चित्रकला आणि संगीतकला ह्यांच्यातही प्रतिभातत्व लाभले होते मलाही थोडा सर्वसंचार आवडत असल्याने त्यांच्या आणि रविंद्रनाथ टागोर , अत्रे आणि पुल देशपांडे ह्यांच्या  व्यक्तिमत्वाची माझ्यावर मोहिनी होती साहजिकच साठोत्तरी पिढीत जरी मी त्यांना झोडीत होतो तरी ते मला सर्वाधिक प्रिय होते एकांगी विचार करणारी लोकं मला कधीच पटत नाहीत सर्वांगवाद मला आवडतो आणि तो आयुष्यात फुलवणारी व्यक्तिमत्वेही ! चित्रे सर्वांगता फुलवणारे होते . 

चित्र्यांची अविष्कारवादी चित्रे ही थोर नसली तरी काबिलेतारिफ होती तुकारामाला अमूर्त शैलीत पकडण्याचा त्यांचा प्रयत्न योग्य होता रंगलेपनाची सपाट पण जाडेपणा जपणारी त्यांची शैली मराठी आधुनिकतेला जोपासणारी होती गोदामला त्यांनी दिलेले पार्श्वसंगीत हे कंट्री म्युझिकला जवळ जाणारे होते तरी भारतीय होते कुमार गंधर्व हा आम्हा दोघांच्यातला वादाचा विषय असला तरी अनेक बाबतीत आमच्या तारा जुळत होत्या ते चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांच्यातल्या साहित्यिकाएवढे थोर नसले तरी अनेक तथाकथित दिग्दर्शकापेक्षा उजवे होते 

ते नाटककार म्हणून चांगले होते त्यांची नाटके रंगभूमीवर गाजायला हवी होती पण त्यांच्या समकालीन नाट्यकारांच्या इतके ते ऍक्टिव्ह नसल्याने सुतक आणि मिठू मिठू पोपट ही त्यांची अतिशय महत्वाची प्रायोगिक नाटके दुर्लक्षित राहिली . ह्यातील सुतकचीच मरणोत्तर जीवनाची थिम पुढे सतीश आळेकरांच्या महानिर्वाणमध्ये अधिक प्रभावीपणे प्रकटली मराठी नाटकातला देशीवाद हा पुणेरी देशीवाद असतो त्यामुळे मराठीत एकतर बोल्ड आधुनिक नाटके प्रायोगिक ठरतात किंवा पुणेरी देशीवादी त्यामुळे चित्र्यांच्या ( आणि वृंदावन दंडवतेँच्या ) देशी प्रायोगिक नाटकातली मुंबईकरी कॉस्मोपोलिटिन प्रायोगिकता मराठीच्या पचनी पडली नाही ही नाटके रंगमंचावर सादर करण्यासाठी तुमची मानसिकता मुंबईकरांची असावी लागते अशी मानसिकता मुंबईत आयात झालेल्या दिग्दर्शकांकडे नसल्याने ती कशी खेळवायची हे त्यांना कळत नाही आणि आतातर मुंबईकर दिग्दर्शक थेट बॉलिवूडकडे जातो त्यामुळे ह्या नाटकांचे प्रयोग जवळ जवळ अशक्यच ! 

चित्र्यांचे साहित्य म्हणजे प्रतिभेला आलेला सर्वांगीण फुलोरा होता चित्रे ज्या काळात जन्मले तो काळ विलक्षण होता  १८०० ते १९४७ ह्या कालखंडात युरोपियन लोकांनी भारतीय संस्कृती अनेक जागी पंक्चर केली आणि १८०० ते १९४७ साली सारे भारतीय विचारवंत भारताचे स्वातंत्र्य , भारताची भारत म्हणून ओळख भारत नावाच्या राष्ट्राची शक्यता ह्या राष्ट्राच्या नवनिर्माणाचा आराखडा ह्यासारख्या अनेक विचारप्रणालीनिष्ठ संदर्भात झोकून देऊन काम करू लागले . परलोकावरची भारतीय नजर हटवून इहलोकनिष्ठ विचारप्रणालीचा पाया ह्या काळातच घातला गेला ह्या काळातील भारतीय अध्यात्मही परलोकाला प्राधान्य देणारे नव्हते ह्या सगळ्या गोष्टींचा साहित्यावर परिणाम होणे अटळ होते. त्यातून सामाजिक समतेचा पुरस्कार करणारा बहुजनवाद , साहित्यात धर्माच्या दादागिरीला विरोध करून नव्या अध्यात्माचा पुरस्कार करणारा नवा  अध्यात्मवाद , विज्ञानाला प्रमाण मानणारा सौदर्यवाद , नुसत्या वास्तवाची मांडणी करून काय होणार हे वास्तव बदलले पाहिजे आणि भाषिक कृतीने ह्या बदलाच्या प्रकियेला हातभार लावला पाहिजे असं मानणारा परिवर्तनवाद असे चार प्रवाह उदयाला आले दिलीप चित्रे ह्यांची जडणघडण ह्या चार प्रवाहात झाली मात्र ह्या चारही प्रवाहांशी त्यांचे तितकेसे कलावंत म्हणून पटले नाही सृष्टीयतेचा बुद्धीवाद हा हळूहळू यांत्रिकी होत गेला आणि १८५० नंतर जे नवे विज्ञान तंत्रज्ञान जन्माला आले त्याने  ह्या पारंपरिक विज्ञानाला आव्हान द्यायला सुरुवात केली हळूहळू विज्ञानाचे महत्व कमी होऊन तंत्रज्ञानाची वाढ व्हायला लागली प्रतिसृष्टीचा प्रचंड पसारा सर्वत्र अवतरायला लागला आणि  क्रयवस्तूंचे प्रचंड ढिगारे मानवी अस्तित्वावर आदळायला लागले क्रयवस्तूचे  नवे संरचन शोधणारे संशोधक नव्या नव्या क्रयवस्तू शोधायला लागले आणि ह्या संशोधकाच्या पावलावर पाऊल ठेऊन नव्या नव्या कलावस्तू जन्माला घालणारे कलावंतही कळत नकळत वाढू लागले कला ही प्रथमच इंडस्ट्री बनली तर कलावस्तू ही प्रॉडक्ट बनली कमोडिटी बनली पहिली कमोडिटीचे संशोधक हे स्वतःचे आयुष्य पणाला लावून निर्मिती करत होते त्यांची पॅशन अजोड होती त्यातील एडिसनसारखे संशोधक तर फिनॉमिना होते साहित्यात ह्याच जातकुळीचे काही लेखक चित्रकार झाले चित्रे हे ह्या जातकुळीतील देशी अस्तित्ववादी लेखक होते जरी त्यांची सुरवात युरोपियन अस्तित्ववादापासून झाली होती तरी ! मात्र कोसलानंतर नेमाडेंनी जशी आधुनिकतेकडे पाठ फिरवली तशी त्यांनी पाठ फिरवली नाही ते आणि अरुण कोलटकर ह्यांनी नेमाडे ह्यांचा कट्टर देशीवाद आणि सत्यकथेचा आधुनिकवाद ह्यांच्या दरम्यानचा प्रदेश स्वतःच्या अस्तित्ववादी आशयाने आणि अविष्कारवादी , अतिवास्तववादी अभिव्यक्तीने व्यवस्थित पेलला एका अर्थाने हा मराठी आधुनिकतेचा शोध होता आणि चित्रे मी हा शोध करावा म्हणून माझ्याकडे सातत्याने आग्रह धरून होते माझे म्हणणे असे होते कि हे मिशन देशीवाद्यांचे आहे आणि त्यांनीच ते पूर्ण केले पाहिजे माझा आग्रह चौथ्या नवतेचा आहे आणि तो आजन्म राहणार ह्यावर त्यांचे म्हणणे असे होते कि साहित्य हे काही गणिती  हिशेबाने बदलत नाही ह्यावर माझे म्हणणे असे होते कि साहित्यातला प्रत्येक हिशेब हा नवतेने सुरु होतो मग हा हिशेब गणिती असो वा नसो . माझा दुसरा प्रश्न  असा होता  कि देशी आधुनिकतेचा शोध शब्दवेधची मंडळी घेतायत सौष्ठव  वा अभिधा ह्यांनी  हे काम का करावे  पुढे अभिधाने आपली भूमिका बदलली आणि शब्दवेध प्रमाणेच सर्वसमावेशक म्हणजेच सर्वांनाच सामावून घेण्याची भूमिका घेतली जी चित्र्यांच्या भूमिकेशी अतिशय सुसंगत होती आणि पुढे सौष्ठवची क्रांतिकारी भूमिका ही मागे पडत गेली आणि काळाने आणि मराठी संस्कृतीने लोकप्रियतेची आणि मान्यतेची मोहर ही शब्दवेध आणि अभिधानानंतर ह्यांच्यावर उमटवून चित्रे हे माझ्यापेक्षा द्रष्टे होते मी हटवादी आणि  हेकेखोर असल्याचे सिद्ध केले चित्रे ज्या निष्ठेने अभिधानंतरच्या मागे उभे राहिले ते नक्कीच काबिलेतारीफ होते पुढे दोनहजारोत्तर पिढी शब्धवेध , खेळ आणि  अभिधानंतरच्या वळचणीला जाऊन उभी राहिली आणि मी च्यू असल्याचे सिद्ध झाले  हा चित्र्यांचा मोठाच विजय होता अर्थात तरीही मी माझा आग्रह सोडला न्हवता आणि नाहीये . माणसाने संपूर्ण जग वा संस्कृती जरी त्याच्या विरोधात गेले तरी स्वतःला पटलेली भूमिका सोडता कामा नये असे मला वाटते अशावेळी  एकट्याने स्वतःची पायवाट तुडवत जावे लागणे अटळ असते मी ती आजही तुडवतो आहेच

                   चित्र्यांचे साहित्य समजून कसे घ्यायचे हा एक विलक्षण कूटप्रश्न आहे मी टिकाहरण लिहिले तेव्हा दूधपिता बच्चा असलो तरी मी चित्र्यांच्याविषयी त्यात जे लिहिले होते ते चित्र्यांना चांगलेच झोंबले होते त्यांनी टीकाहरण वाचून चक्क रात्री फोन केला होता आणि माझी खरडपट्टी काढली होती वास्तविक त्यात काही चांगली निरीक्षणेही होती म्हणजे चित्रे हे मराठीतील बाईच्या शरीरात नाक खुपसणारे पहिले कवी आहेत वैग्रे पण मी केलेली टीकाच त्यांना जास्त झोंबली होती मी काही बदल करून मगच टीकाहरण प्रकाशित करावे असा त्यांचा सल्ला होता जो मी धुडकावला पुढे आणखी एका कवीने तेच सांगितले एकंदरच त्यामुळे वातावरण गढूळ होत गेले आणि पुस्तक पॉप्युलरकडून सतीश पाध्येंच्या शब्दवेल प्रकाशनाकडे द्यायची वेळ आली . अर्थात तरीही माझी चित्र्यांच्या कवितेविषयीची आस्था कमी झाली नाही . आणि चित्रेही "तू मराठी आधुनिकतेची नवी मांडणी करू शकतोस तू ती कर " हे सांगायचे थांबले नाहीत माझे स्वतःचे लक्ष्य कायमच चौथ्या नवतेकडे असल्याने चित्र्यांना होकार देणे मला शक्यच न्हवते मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ह्या गोष्टीकडे नीट पाहता येईल असे वाटते 

                  मराठीच्या साहित्यशास्त्राची नवी ओळख निर्माण करायची असेल तर ज्ञानेश्वर , चक्रधर , नामदेव , एकनाथ ह्या चारही कवींच्या तंत्रशास्त्राची जडणघडण नीट तपासायला लागते ह्यातील ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे चित्र्यांचे फेव्हरेट होते मात्र प्रत्यक्षात त्यांचे साहित्यशास्त्र हे ज्ञानेश्वरवादी होते ज्ञानेश्वर हे प्रज्ञा आणि भाव ह्यांचा समतोल साधत लिखाण करत कधी ज्ञानेश्वरीसारखे प्रज्ञालक्ष्यी तर कधी अभंगासारखे भावलक्ष्यी लिहीत ते प्रतीकांच्या भाषेत खूपदा बोलत आणि ही प्रतीके मोगरा , कावळा , चोळी अशी अत्यंत मराठी होती .इंद्रियाकरवी अतींद्रिय भोगवीन ही त्यांची प्रतिज्ञा होती जी अनेक तऱ्हेने प्रकट झाली  ज्ञानेश्वरी हे त्यांचे मोक्षापूर्वीचे लिखाण असल्याने त्यात परंपरेचे आदेश प्रमाण मानण्याची वृत्ती जास्त आहे तर अनुभवामृतमध्ये मोक्ष मिळाल्यानंतरचा शैववाद झळाळताना दिसतो अभंगात मात्र त्यांना विठाई ही स्थानिक देवता केंद्रीभूत करावीशी वाटली हे शैवीझमला धरूनच होते एका अर्थाने कृष्ण , शिवशक्ती  आणि विठ्ठल ही ट्रिनिटी त्यांनी वारकऱ्यांना दिली असे म्हणता येईल प्रत्यक्षात वारकऱ्यांनी शिवशक्ती  बाजूला काढून विठ्ठल कृष्णरुप  करून वैष्णव धर्म स्वीकारला आणि ते पूर्णच हिंदू झाले ही हिंदू ओळख विठ्ठलामुळे एका अर्थाने मराठी ओळख बनत गेली चित्रे नेमाडेंनी ही मराठी हिंदू ओळख आयुष्यभर मिरवली आणि चित्र्यांनी तर इंद्रियाकरवी अतींद्रिय भोगवण्याच्या ज्ञानेश्वरी प्रतिज्ञेचा मराठी साहित्यात कल्लोळ उडवला आणि ह्या भोगाची सूक्ष्मता अत्यंत बारकाईने बारकाव्यांसहित प्रतिमजडित पद्धतीने सादर केली 

अर्थात ज्ञानेश्वरवाद आधुनिकतेच्या संदर्भात मांडणारे ते पहिले न्हवते . बा सि मर्ढेकरांनी ओवी हा फॉर्म इतका जबरदस्त रीतीने वापरला कि त्याच्यामुळे ज्ञानेश्वरवादाचे खऱ्या अर्थाने आधुनिकीकरण झाले असे आपण म्हणू शकतो मात्र मर्ढेकरांचा ज्ञानेश्वरवाद अनुभवामृताकडे फारसा वळलाच नाही आणि त्यामुळे चित्र्यांना चांगलीच संधी प्राप्त झाली चित्रेंनी शक्तीवर खूप कविता लिहिल्या विंदा करंदीकरांनी अनुभवामृताचे केलेलं अर्वाचिनीकरण चित्र्यांच्या कवितेत चांगलेच फळले एका अर्थाने स्वतःच्या काव्यगुरुला दिलेली ही गुरुदक्षिणा होती त्यांचे गद्य मात्र एका अर्थाने काश्मिरी शैवागमच्या परंपरेला गद्य रूप कसे द्यायचे ह्याचा वस्तुपाठ होता हे गद्य एका अर्थाने मराठीचे साहित्यिक शक्तीपीठ आहे दुर्देवाने त्याची ताकद भुक्कड मराठी समीक्षकांना ओळखता आली नाही हे शक्तीपीठ निर्माण करताना त्यांना जी अविष्कारवादी शैली सापडली तिचे मूळ फ़्रेंच इम्प्रेशनिस्ट आणि जर्मन एक्सप्रेशनिस्ट ह्यांच्यात होते ज्याचा प्रभाव ओक्टोव्हिया पाझ वर पडला होता आणि पाझचा प्रभाव चित्र्यांच्यावर पडला .

नामदेव हा मराठीतील पहिला वास्तववादी वारकरी कवी होय भाव आणि वास्तव ह्याची त्याने घातलेली अप्रतिम सांगड नामदेववाद निर्माण करती झाली आणि ह्या नामदेववादाला तुकारामाच्या रूपाने महारूप सापडले . ज्ञानेश्वरांची कविता ही मोक्ष मिळालेल्या कवीची कविता आहे नामदेवाची कविता तशी नाहीये ती प्रथम एका साधकाची कविता आहे आणि इंद्रियाकरवी साधना भोगवेन ही त्यांची प्रतिज्ञा आहे ह्या अर्थाने नामदेववाद हा मोक्षाची साधना करणारा साधनावाद आहे कवीने त्याचे जगणे , त्याची मोक्षाची साधना आणि त्यामुळे जगण्यात होणारी उलथापालथ त्याच्या  जगण्याची जीवनशैलीजगण्यासाठी तो करत असलेला व्यवसाय त्या व्यवसायाची हत्यारे आणि त्या व्यवसायाची व्यवसायशैली स्वतःच्या कवितेत जशीच्या तशी उमटवावी ही नामदेवाची दीक्षा चित्र्यांना कळली तरी फारशी फळली नाही  ह्याचे कारण ते करत असलेले व्यवसाय तितकेशे ठाम न्हवते शिवाय चित्र्यांना वास्तववादाचे थोडेसे वावडे होते त्यामुळेच नामदेववादी असलेल्या संत तुकारामांचे (ज्यांनी साधनवादात प्रपंच आणून तो साधनाप्रपंचवाद  वा प्रपंचसाधनावाद म्हणून प्रोजेक्ट केला ) ते कवी म्हणून अफाट कौतुक करत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या कवितेचा वास्तववादी पिंड त्यांनी आपल्या कवितेत जोपासला नाही ह्याबाबतीत ते अखेरपर्यंत ज्ञानेश्वरवादीच राहिले १९८० नंतर मात्र देशीवादी ग्रामीण कविंनी वास्तवनिष्ठ नामदेववाद आणि त्याचा तुकारामी अवतार प्रपंचसाधनावाद आपल्या कवितेत अक्षरशः उत्सवासारखा साजरा केला तुकारामाने नामदेवाप्रमाणे केवळ साधनाच न्हवे तर अख्खा प्रपंच इंद्रियाकरवी भोगवत तो शब्दात साजरा केला त्यांची प्रपंचविद्या ह्या कविंनी मास्टर करायचा केलेला प्रयत्न हा देशीवादाचा फार मोठा विजय आहे असो 

एकनाथवाद हा मराठीत कधीच आदराचा विषय न्हवता कारण एकनाथांची तंत्रता आणि प्रायोगिकता ! ती आत्मसात करून कविता लिहिणे हे अनेकांना कृत्रिम वाटते प्रत्यक्षात कविता पुढे जाते ती प्रायोगिकतेमुळे ! एकनाथवादाला जर तुकारामासारखा कोणी महारूप देणारा कवी लाभला असता तर कदाचित मराठींचे काव्यशास्त्र अधिक समृद्ध झाले असते मराठीला त्यामुळे एकनाथवादाची दीक्षा मिळायला विंदा करंदीकर उगवण्याची वाट बघायला लागली विंदांनी एकनाथवादाचे आधुनिकीकरण तर केलेच ( ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी जशी एकनाथांनी पुन्हा शोधली तसे ज्ञानेश्वरांचे अनुभवामृत विंदांनी पुन्हा शोधून त्याचे अर्वाचिनीकरण केले )पण  प्रयोगधर्मी कविताही  लिहिली . एकनाथांची नावड असणाऱ्या लोकांनी  त्यामुळे एकनाथांची आणि नंतर करंदीकरांची टर उडवणे हे स्वाभाविक होते विशेषतः नेमाडे आणि कधीकधी चित्रेहीपुढे  अरुण कोलटकरांनी एकनाथवाद किती अस्सल रूपात प्रयोगधर्मी होऊ शकतो ह्याचे अनेक अस्सल नमुने पेश केले हे एकनाथवादाचे केवळ पुनर्जीवन न्हवते तर नवा देह जन्माला घालणे होते आणि हा देह एकनाथांपेक्षा अधिक अस्सल , जिवंत आणि रसरशीत होता त्यामुळे नेमाड्यांनाही स्वतःचे करंदीकरांच्याविषयीचे मत काही प्रमाणात बदलून घ्यावे लागले विंदा करंदीकरांना आपला वारस अरुण कोलटकराच्या रूपात जिवंतपणीच सापडावा ह्याला काव्यभाग्यच म्हंटले पाहिजे 

मराठीत चक्रधरवाद स्वतःच्या मठात कैद झाल्याने अनेक शतके गायब झाला तरी नेमाडेंच्या रूपाने जेव्हा त्याला वारस सापडला तेव्हा तो सर्वाधिक झळाळला ह्याचे कारण त्याचे गद्यवैपुल्य ! चक्रधरवादाचे कृष्णपरंपरेवरचे (पंचकृष्ण वैगरे )स्वभवतालावरचे , देशावरचे , वास्तवावरचे आणि गद्यावरचे प्रेम मराठीत नेमाडेंच्या रूपाने फळले चित्र्यांच्या गद्यावर चक्रधरवादाचा काहीच फरक झाला नाही कारण मी गायब असलेला चक्रधरी वास्तववाद त्यांच्या मीधर्मीपणाला मानवणे शक्यच न्हवते 

थोडक्यात काय चित्र्यांनी तुकारामाच्या नावाने कितीही गळा काढला तरी प्रत्यक्षात त्यांची कविता ही ज्ञानेश्वरवादीच राहिली आणि काही अपवादात्मक कवितांत त्यांनी एकनाथवादी प्रयोगधर्मीता प्रकट केली असली तरी कोलटकरांच्याप्रमाणे तो कधीच त्यांचा पिंड झाला नाही त्यांचे अभंगही ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांचा योग्य समतोल आहे 


चित्र्यांची समीक्षा ही वारकरी परंपरा , अस्तित्वभान आणि मराठी आधुनिकता ह्या तीन गोष्टींचा धांडोळा घेते  जो अजूनही मराठी समीक्षेला पेललेला नाही युरोपियन काव्यपरंपरेची उत्तम जाण ते प्रकट करतात त्यांचे ह्या संदर्भातले सात छेद त्यांच्या समकालीन  कवींनी नीट समजून घेतले असते तर बरे झाले असते . युरोपमधल्या चवथ्या नवतेविषयी त्यांना माहिती न्हवती पण पहिल्या दोन नवता विशेषतः आधुनिक नवता त्यांनी खोलवर जाऊन तपासली होती

थोडक्यात काय प्र के अत्रे , पु ल देशपांडे ह्यांच्या तोडीचा देशीवादी पिढीचा मराठीतील तिसरा अष्टपैलू खेळाडू काळाआड गेला आहे पहिल्या दोन अष्टपैलू खेळाडूंना जो मानसन्मान मिळाला तो त्यांनी कच्चे खेळाडू प्रमोट केल्याने मिळाला नाही पण म्हणून त्यांच्या अष्टपैलूत्वाचे आणि अष्टपैलू प्रतिभेचे महत्व कमी होत नाही . ते अफलातून खेळले (माझ्याविरुद्धही खेळले) पण मन लावून खेळले त्यांच्या ह्या खेळीला मनापासून मानाचा मुजरा !

मला चित्र्यांचे बोल ऐकू येतायत '' श्रीधर माजोरडेपणा कमी कर '' आणि मी म्हणतोय '" तो मी मेल्याशिवाय किंवा मोक्ष मिळाल्याशिवाय जाणार नाही चित्रे मला तुमच्याप्रमाणे तुकारामासारखी कविता लिहायची नाहीये मला थेट मोक्षच हवा आहे मला कोलटकरांच्याप्रमाणे व्हाया तुकाराम विठ्ठलाला भेटायचे नाहीये मला थेट विठ्ठलाला भेटायचंय  "

श्रीधर तिळवे



















Comments

Popular posts from this blog