अस्ताचं युग आणि नवनिर्माणाचे प्रयत्न श्रीधर तिळवे नाईक 

मी नागेशी बांदिवड्याचा आहे किंवा कोल्हापूरचा आहे म्हणजे काय आहे ह्या प्रश्नाने माझा न्यू कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यापासून सतत  पाठलाग केला आहे १९८० ते १९८७ हा माझा कालखंड मोक्ष आणि त्यासाठी स्वतःचे संस्कारण म्हणजे कंडिशनिंग तपासणारा आणि तासणारा कालखंड आहे माझ्या मिलिंद गुर्जर , जयसिंग पाटील , बाळकृष्ण शिर्के , महेश पुसाळकर , विश्वजित जाधव , अजय कोंडेकर , शरावती यादवश्रीराम पचिंद्रे , राजकुमार यादव , निनाद काळे , विलास कांबळे , शेखर जाधव , काशिनाथ मंगल , श्रीनिवास एकसंबेकर , अवधूत भट , विजय पवार अशा अनेक कलावंत वा कलासक्त मित्रांना त्याकाळात कोल्हापूरने भारावून टाकले होते आणि जवळपास दिवसातून एकदा महाद्वार रोडला  किंवा रंकाळ्याला  गेल्याशिवाय दिवस सफल झालाय असं आम्हाला वाटत न्हवते एक अस्तंगत चाललेले कोल्हापूर शेवटचे नागरिक म्हणून जणूकाही आम्ही आमच्या डोळ्यात साठवून घेत होतो हे कोल्हापूर शाहू महाराजांच्या प्रबोधनाचं , गोविंद पानसरेंच्या मार्क्सवादाचं , शैवांच्या अंबाबाईचं , आली रे आली गाडी आली म्हणत गर्जणाऱ्या श्रमिकांच्या शेकाप  चळवळीचं होतं त्यावेळी हे कायम टिकणार असं वाटायचं पण हळूहळू सर्व बदलत गेलं 

देशाच्या राजकारणात हा एक विलक्षण धापाधापीचा हा कालखंड होता आणि अनेक साठोत्तरी गोष्टींचा अस्त ह्या कालखंडात होत होता ह्यातील काही अस्त फक्त माझ्यापुरते होते तर काही संपूर्ण कोल्हापूरला लागू होत शहरभर पसरत होते मुळात ह्याची सुरवातच धार्मिक दहशतवादाने सुरु झाली खलिस्तानचे आंदोलन सुरु झाले आणि आमच्या पिढीच्या समोर एकाधिकारशाहीची हत्या दहशतवादाने केली आणि मग वेगवेगळ्या सांस्कृतिक हत्या , मर्डर आणि अस्त आमच्या पदरात पडत गेले कवितेवर ह्याचा परिणाम अटळ होता 

माझी मातृभाषा हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे आणि तो माझ्या गोवन पार्श्वभूमीशी जोडला गेला आहे माझे पूर्वज कन्नड होते आणि तुळू संस्कृती ही आपली मूळ संस्कृती हे मला सांगण्यात आले असले तरी माझी मातृभाषा कन्नड नाही कन्नड येणारे माझे वडील हे शेवटचे माणूस होते आश्चर्याची गोष्ट अशी आहे कि लहानपणी माझ्या कानावर कोकणी पडण्याची कसलीही काळजी माझ्या आईवडिलांनी घेतलेली नाही त्यामुळे घरात फार प्राचीन मूळं नसलेल्या मराठी आणि हिंदी अश्या दोन भाषांत मी वाढलेलो आहे आमच्यावर इंग्रजांनी राज्य केलेलं नाही तर पोर्तुगीजांनी केलेलं आहे त्यामुळे माझ्यावरचे ख्रिस्चन संस्कार हे प्रोटेस्टंट नाहीत तर कॅथॉलिक आहेत आणि त्यामुळेच कॅथॉलिसिझमशी मी जास्त निकराने लढलेलो आहे इंग्रज आणि पोर्तुगीज ह्यांच्यातील हा फरक मराठीतील अनेकांच्या लक्ष्यात येत नाही माझ्या वडिलांना पोर्तुगीज येत होती आणि दत्तादादा हा आमच्या घरातला पोर्तुगीज येणारा शेवटचा भाषिक होता ह्याचा अर्थ माझ्या संस्कारात  मी कन्नड आणि पोर्तुगीज ह्या दोन भाषांचा अंत पाहिलाय मात्र ह्या पोर्तुगीजांच्या राजवटीमुळेच युरोपियन काँटिनेंटलिझम आणि ब्रिटिश अनालिस्टिसिझ्म ह्यांच्यातील तीव्र फरक मला नीट कळला असावा असे वाटते .  स्कोलॅस्टिसिझ्मचा अभ्यास हीही  मला पोर्तुगीज लोकांनी दिलेली देणगी आहे 

मी विचाराने दाक्षिणात्य आहे हे मी कधीच लपवलेले नाही मात्र उत्तरी भारताचाही मी बरा अभ्यास केलेला आहे कोल्हापूर हेही माझ्या मते दाक्षिणात्य शहर आहे आणि ते अधिकाधिक दाक्षिणात्य होत जाणे अटळ आहे 

माझे घर हे शैव आहे आणि आम्ही नागेशी बांदिवड्याच्या रवळनाथ मंदिराचे पुजारी आहोत आणि रवळनाथ हा शंकराचा अवतार आहे  हे मला लहानपणापासून शिकवण्यात आले आहे  नागेशीचा मुख्य देव हा नागेश आहे आणि तो शंकराचा अवतार आहे आणि हेही मला शिकवण्यात आलेलं आहे  साहजिकच माझ्या साहित्यात मराठी साहित्यात ओतप्रोत असलेली वैष्णव परंपरा जितकी झिरपायला हवी तितकी झिरपलेली नाही त्यामुळे अटळपणे वैष्णवांच्या जातिव्यवस्थेविरुद्ध आणि वर्णव्यवस्थेविरुद्ध माझ्या कवितेने सातत्याने आवाज उठवला आहे तुकारामवाद  , नामदेववाद , एकनाथवाद आणि चक्रधरवाद ह्या चारीही वैष्णव धारा असल्याने माझ्यावर त्यांच्यापेक्षा बसवेश्वरांचा आणि बसवेश्वरवादाचा अधीक आणि ज्ञानेश्वर शैव असल्याने ज्ञानेश्वरवादाचाही प्रभाव थोडा  पडलेला आहे ज्ञानेश्वर फार अल्पवयात गेले ते अधिक काळ जगते तर त्यांचेही आकलन बसवेश्वरांच्या दिशेने झाले असते हे माझे मत मी अनेक ठिकाणी मांडले आहेच . अर्थात  मी इथेच थांबलो नाही ज्यांच्यामुळे माझ्या अध्यात्म्याची सुरवात झाली त्या विवेकानंदांच्यामुळे मी त्वरित सायंटिफिक झालो. आणि पुढे निघून आलो बसवेश्वर , ज्ञानेश्वर , विवेकानंद आणि रामकृष्ण हा माझा अध्यात्मिक आरंभ होता असे मी आता म्हणू शकतो . 

भारतीय प्रबोधनाची सुरवातही  बसवेश्वरांच्यापासून होते त्यामुळे फक्त मोक्ष नाही तर प्रबोधनही हवे हा बसवेश्वरी आग्रह कित्येक पिढ्या माझ्या घरात लावून धरण्यात आलेला आहे आणि तो मला पूर्ण मान्यच आहे मात्र मी ज्या काळात जन्मलो त्या काळात ह्या प्रबोधनात्मक चळवळीची वाताहत व्हायला सुरवात झाली होती ह्या काळातील बस्वेश्वरवाद ह्याला अपवाद न्हवता बस्वेश्वरवाद हा तीन प्रवाहात विभाजित आहे 
१ बसवेश्वरी 
२ लिंगायत 
३ वीरशैव 

ह्यातील बस्वेश्वरी आणि लिंगायत ह्या दोन्ही बंडखोर ओळखी होत्या त्यातील बसवेश्वरी ओळख स्वतःला प्राचीन सिंधू संस्कृतीची वारसदार मानते आणि तुळू संस्कृती ही भारतातील एकमेव संस्कृती सिंधू संस्कृतीला टिकवून आहे असं मानते ही स्वतःला सिंधू संस्कृतीवादी हिंदू मानते पण वैदिक मानत नाही ती शंकराचार्यांना तुळू मानते  तिच्या मते हिंदू धर्म हा वैदिक व वैष्णवांना सामावून घेण्यासाठी शैव शंकराचार्यांनी निर्माण केला आणि हा प्रयत्न उलटा पडला  म्हणून बसवेश्वरांनी लिंगायत धर्म निर्माण केला ही ओळख हिंदू धर्मियांना शैव मानते आणि लिंगायत हा धर्म शैव धर्माचा भाग मानते 

 लिंगायत ही ओळख मागची शैव ओळख पूर्णपणे पुसून टाकून बसवेश्वरांनी पूर्णपणे नवीन धर्म निर्माण केला असं मानते ही ओळख फक्त बसव अण्णांची वचने प्रमाण मानते साहजिकच ती वेदविरोधी आहे आणि अवैदिकही !

ह्यातील पहिली ओळख ही मोजके शैव ब्राह्मण सोडले तर नाहीशी झाली आहे आणि आता लिंगायत आणि वीरशैव ह्या दोन ओळखीचं शिल्लक उरलेत

१९८० नंतर  ब्राम्हण्याने बस्वेश्वरवाद  पूर्णपणे बळकावयाचा प्लॅन सुरु केला  परिणामी  माझ्या गल्लीत जो मुख्य मंडप होता त्या  अक्कमहादेवी  मंडपात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात स्वतःला लिंगायत म्हणवण्याऐवजी वीरशैव समाज म्हणवून घेणे सुरु झाले  आणि बसवेश्वरी आणि लिंगायत ह्या दोन्ही   ओळखी पुसून टाकण्यात आल्या  आणि वीरशैव समाज ही हिंदू ओळख पूर्णपणे प्रस्थापित करण्यात आली जी वेदांना मान्यता देते आणि स्वतःला वैदिक म्हणवून घेते माझे पूर्वज हे बसवेश्वरी असल्याने एका व्यापक अशा शैव ओळखीचे ते पुरस्कर्ते होते जी वेदांना , ब्राम्हण्याला आणि ब्राम्हणी ग्रंथांना ठाम नकार देते त्यामुळेच तिने कर्नाटकातल्या लिंगायत राजाला कोणी आश्रय देईना तेव्हा आपल्या गावात आश्रय दिला आजही हा राजा आणि राजवाडा तुम्हाला नागेशीच्या तळ्यापाशी उभा असलेला दिसेल पण हा राजाही आता लिंगायत राहिलेला नाही तर वीरशैव झाला आहे बसवेश्वर वादाची ही वाताहात  सार्वत्रिक आहे त्यामुळे ही वाताहत काळजाला बोचणे  अटळ होते
त्यामुळे ह्या कालखंडात मी काही प्रबोधनात्मक आणि काही चळवळीची आणि राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांची वाताहत दर्शवणाऱ्या कविताही लिहिलेत असे दिसते ह्यातील प्रबोधनात्मक वाताहत दर्शवणाऱ्या कविता डेकॅथलॉन मधील यूरेकात तर कार्यकर्त्याची वाताहत दर्शवणाऱ्या कविता  डेकॅथलॉन मधील अफवा  ह्या भागात आहेत तर ज्या बसवेश्वरी प्रबोधनात्मक आहेत त्या सुरवात असल्याने काही ठिकाणी फारच रॉ आहेत काही वेळा तर पद्यच आहेत  त्यांची मला लाज वाटत असल्याने मी त्या  कविता लपवल्या होत्या पुढे ही लाजही गेली आणि माझ्या ह्या शैव कवितांच्यापैकी काही कविता मी फेसबुकवर टाकल्या होत्या अलीकडे त्या मी डेकॅथलॉन अनकॅटेगरीकल ह्या काव्यफाईलीत संग्रहित करत आहे ह्या काळात मी बस्वेश्वरांवर कथाही लिहिल्या ज्यातील एक माझ्या अमेरिकेचे अध्यक्ष आले तेव्हाची गोष्ट ह्या कथासंग्रहात आहे तर एक कादंबरी आहे जी माझ्या धर्म ह्या कादंबरीचा भाग बनून येतीये आणि एक नाटकही आहे इथेही मी बस्वेश्वरांपाशी थांबलो नाही फुल्यांच्याकडे वळलो फुल्यांचे घराणे हे शैव असावे आणि सावित्रीबाई ह्या तर उघडउघड शैव होत्या हे मी एका निबंधात सिद्ध केले आहेच . फुल्यांनी मला सामाजिक जमिनीवर आणले आणि त्याचे पडसाद माझ्या ह्या कालखंडातील अनेक कवितात आहेत 


मराठीत तुम्ही जोवर वारकरी सम्प्रदायाला सॅल्यूट मारत नाही तोवर तुमचं भविष्य कठीण असतं हे मला कालांतरानं कळलं तरी २०१४ पर्यंत मी काही माझं शैवत्व  बदललं नाही ( २०१४ साली सगळ्याचाच लोप झालावैष्णववादाबद्दल मला एक संशय सतत होता तो म्हणजे हा वाद कितीही मानवतावादाच्या गप्पा मारो तो अंतिमतः आतून वर्णजातिव्यवस्था जोपासतोच किंवा चक्रधरांसारखा गूढ गढीत जाऊन बसतो त्याउलट बसवेश्वरवाद हा वर्णजातिव्यवस्थेला ठाम नकार देतो  मोक्ष मिळवलेल्या निवृत्ती , सोपानदेवज्ञानेश्वर , मुक्ता बाईनामदेव , जनाबाई , गोरा कुंभार , नरहरी सोनार , एकनाथ ,जनार्दन , तुकाराम , बहिणाबाई ह्यांच्याविषयी मला आदर वाटतो पण तो आदर मोक्षाच्या अंगाने आहे धर्माच्या अंगाने नाही आणि माझ्या त्यांच्याविषयीच्या कविताही मोक्षाच्या अंगाने येतात धर्माच्या अंगाने नाही . परंपरेच्या अंगाने तर नाहीच नाही एका अर्थाने  फक्त माझ्यापुरता झालेला हा वैष्णववादाचा अंत होता 

माझ्या भोवतालच्या समाजात मात्र प्रत्यक्षात तो राम जन्मभूमी आंदोलनाने फोफावला आणि  आजही  त्याचे पुनर्जीवन  झाले कि नवनिर्माण हे चांगले कि वाईट हा प्रश्न अनिर्णित आहे आणि त्याचे उत्तर  जो तो आपल्या आईडियालॉजीप्रमाणे ठरवत असतो पण सामान्य हिंदू आणि खरेतर सामान्य मुसलमानही  राम मंदिराच्या बाजूने आहे ही वस्तुस्थिती !

माझ्या सुरवातीच्या काळात मीही रोमँटिक होतो आणि त्या वयानुसार गझलेच्या जामच प्रेमात होतो पुढे माझे प्रेम माझे तिळवे भांडार हे दुकान आणि त्याबाबतचे वास्तव हे भट आणि गालिब ह्या दोघांच्या संवेदनशीलतेशी अजिबात मॅच होईना साहजिकच माझ्यासाठी पारंपारिक गझलेचा अस्त झाला आणि मी  माझ्या गझलेचे स्वरूप शोधायला सुरवात केली आणि त्यातून मी मुक्त /आजाद गझलेच्या नादी लागलो ज्यातल्या काही डेकॅथलॉन मध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि अलीकडे त्यातील काही मी फेसबुकवर टाकतो आहे

ह्या काळात सर्वात प्रभाव पाडणारा दुसरा कवी ग्रेस होता मी गोवेकरही असल्याने त्याचा ख्रिस्चन स्पिरिच्युऍलिझ मला सुरवातीला भावला पण लवकरच तो एमिली डिकन्सनच्या फार पुढे जात नसल्याने हळूहळू त्याचाही अस्त झाला मी ह्या काळात मराठी साठोत्तरी कविंचे काव्यवाचन सुरु केल्याने विठ्ठल आणि बुद्ध ह्यांच्या ज्याम प्रेमात आलो होतो त्यातच विठ्ठल मूळचा शैव होता  हे स्पष्ट कळल्याने विठ्ठ्लाविषयीचा आकसही थोडा कमी झाला होता त्यामुळे ग्रेसच्या शैलीला थोडे विकसित करून स्वतःच्या शैलीत विठ्ठल बुद्धावर कविता लिहिल्या गेल्या त्याही डेकॅथलॉनमधील गाथा ह्या विभागामध्ये आहेतच एका अर्थाने हे नवनिर्माण ग्रेसचे वारकरीकरण  होते आणि बौद्धिकरणहीपुढे बौद्ध संवेदनशीलता कशी निर्माण करायची त्याचे तंत्र मला सापडत गेले आणि त्यातूनच काही हायकू जन्मले आणि कविता जन्मल्या त्यातुन   "डेकॅथलॉन ट्रांसरिअल  "हा काव्यसंग्रह जन्मला जो  उपलब्ध आहे

माझ्या आयुष्यातला एक विचित्र विरोधाभास म्हणजे एकीकडे आजोबांच्यामुळे शैव नकुलीश कुळाचे संस्कार , दुसरीकडे माझ्या आईचा कट्टर ईश्वरवाद तर तिसरीकडे माझ्या वडिलांचे गांधीवादी असूनही टिकलेले  निरीश्वरवादीत्व आणि त्याचे संस्कार !
निरीश्वरवादाचे दोन प्रकार असतात  
१ जहाल  निरीश्वरवाद  
२ मवाळ  निरीश्वरवाद  
जहाल निरीश्वरवादी  इतरांच्या श्रद्धांचा अजिबात स्वीकार करत नाही तर मवाळ निरीश्वरवादी इतरांच्या श्रद्धांचा मान ठेवतो समोरच्याला बरे वाटावे म्हणून प्रसाद घेणे वैग्रे प्रकार करतो माझे वडील मवाळ निरीश्वरवादी ! इतरांच्या श्रद्धा दुखवायच्या नाहीत आणि स्वतःच्या हृदयात  पाळायच्या नाहीत हे त्यांचे तत्वज्ञान माझ्यात सहज झिरपलं माझे वडील खानदानी गणपती बनवणारे त्यामुळे आईच्या श्रद्धेपोटी गणपती आणतांना आमच्या दोघात चर्चा गणपतीच्या मूर्तिकलेवर आणि रंगकामावर ! माझे वडील कुणाचा गणपती घेतात ह्याची  त्यामुळे अख्ख्या कुंभार गल्लीत उत्सुकता असायची ह्यातील काही नवे सुरवात करणारे तर आवर्जून वडिलांना नमस्कार करून सुरवात करणारे  असायचे !  साहजिकच कलात्मक निरीश्वरवाद व  गांधीवाद फार सहजरित्या माझ्या आयुष्यात आला पण मी गांधींच्यापाशी थांबलो नाही हळूहळू  फुले आंबेडकरवादाचा प्रभाव वाढत गेला आणि मी अधिकाधिक  वास्तववादी आणि परिवर्तनवादी बनत गेलो माझ्या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे तो फुले आंबेड्करांच्याकडून बुद्धाकडे असा झालेला नाही तर  बुध्दाकडून फुले आंबेडकरांच्याकडे असा झालाय त्यामुळे त्याचा आधार कायमच दार्शनिक राहिलाय आयडियॉलॉजिकल नाही त्याकाळात माझे काही लिंगायत मित्र मला लिंगायत बौद्ध म्हणायचे अर्थातच हा प्रवास  फक्त आंबेडकर बुद्धापाशी थांबला नाही ज्यांना मी उत्तराध्यात्मिक बुद्ध म्हणतो त्यां जे कृष्णमूर्तींच्या कडे तो वळला त्यामुळेच ह्या काळातील कवितांत  मोक्ष(निर्वाण ) , सामाजिक वास्तवाचे सर्वांगीण भान आणि ते बदलण्याचा प्रचंड आग्रह आणि कळवळा  फार ठाशीव स्वरूपात आहेह्या संदर्भातल्या काही कविता एका भारतीय विध्यार्थ्याचे उदगार ह्या कवितासंग्रहात आहेत हा संग्रह पॉप्युलरने १९८५ कि १९८६ साली स्वीकारला होता आणि त्याचे प्रकाशन १९९१ -९२ साली झाले होते ह्याच्या सर्व प्रति संपल्याने हा आता उपलब्ध नाही .तो आता मूळ आकारात प्रसिद्ध करण्याचे घाटत आहे .

ह्याच कालखंडात बस्वेश्वरवादाची एक संकल्पना माझा पाठलाग करत होती ती म्हणजे कायक . माझे वडील स्वतःला कायक मानत असल्याने बालपणापासून माझ्यावर तिचा प्रभाव आहे शरीरश्रमाचे माहात्म्य मार्क्सच्याही कितीतरी शतके आधी बसवेश्वरांनी  सांगितले होते आणि आणि माझ्या वडिलांना ते मान्य असल्याने त्यांनी मला दुकानात  वयाच्या चौथ्या वर्षीच तेलाचे माप भरायला शिकवले  होते  आणि नंतर पोती हलवायला   . लक्ष्मीपुरीच्या बाजारात कुमारपणी मी हमालांना एव्हढे पैसे कशाला द्यायचे असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर ५० किलोचे पोते टाकून ते सायकलवर ठेऊन दुकानात पोहचवायला सांगितले होते आणि मी ते केले होते आणि त्यानंतर हमालांना वडील का पैसे देतात त्याचे उत्तर कायमचे काळजात कोरले गेले होते आठवी नववीपासूनच शाळेत  शिकत असतानाच दुकानदारी करायला मला कधीही लाज वाटली नाही आणि लोकांच्या टोमण्याचेही कधी दुःख झाले नाही हमालीपासून मालामाली पर्यंत दुकानसफाईपासून संडाससफाईपर्यंत अनेक कामे लहानपणापासून मी करत असल्याने मी जेव्हा गांधी वाचले तेव्हा मला बापच वाचत असल्याचा फील आला होता आणि मी श्रमाच्या प्रतिष्ठेकडे परतलो होतो मार्क्सबद्दल मला प्रेम होते आंणि त्यामुळेच एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार मी ज्यांना अर्पण केले त्यात मार्क्सही होता पण तरीही प्रभाकर पाध्ये वाचले असल्याने मार्क्स मला कम्म्युनिझमच्या पद्धतीने भारतात आणता येईल असे वाटत न्हवते मुख्य म्हणजे कम्म्युनिस्टांना मोक्ष मान्य नसल्याने तो मला कधीच स्वीकारता येणे शक्य न्हवते .  ह्यातूनच माझी श्रमवादाची संकल्पना मी विकसित केली  ह्याचवेळी माओ आणि स्टालिनच्या राजवटीचे स्वरूप पूर्णपणे पुढे आले होते त्यामुळेच १९८३ ला मार्क्सच्या मृत्यूची जेव्हा जन्मशताब्दी आली तेव्हा त्यानिमित्ताने मार्क्सवर जी कॉलेजियन वक्तृत्व स्पर्धा झाली होती तेव्हा त्यात मार्क्सवर बोलताना मी मार्क्सवाद कोसळेल असे भविष्य वर्तवले होते ह्या भाषणाचा विस्तार पुढे मी सौष्ठवच्या परिवर्तनवाद का कोसळला ह्या टायटलखाली  पुस्तक होईल असा प्रकाशित केला होता पुढे हे भविष्य खरे होण्याची चिन्हे दिसू लागली आणि मी प्रचंड अस्वस्थ व्हायला लागलो माझा मार्क्सला विरोध असला तरी त्याचा अस्त हा श्रमवादाचा अस्त होण्याची शक्यता असल्याने तो  अस्वस्थ करणारा होता त्यातच ह्या काळात परिवर्तनवादाची पुरतीच वाट लागायला लागली ह्या अस्वस्थेतून ज्या कविता जन्मल्या त्या एकत्र करून त्यातून डेकॅथलॉन रिअल जन्मला जो नवता प्रकाशनाने त्याच्या लिखाणाच्या सिल्वर ज्युबिली वर्षात   प्रकाशित केला पुढे खरोखरच मार्क्सवादाचा अस्त पेलण्याची पाळी आमच्यावर आली  त्याचा अस्ताकडे चाललेला प्रवास ह्या संग्रहात आहे  एका अर्थाने पाब्लो नेरूदावादावर हा संग्रह ऍंटीडोस आहे आजही माझा श्रमवादावरचा कायकावरचा विश्वास हललेला नाही आम्हा पाच भावन्डापैकी तिघेजण हे श्रमिक एक हाऊसवाईफ एक मी संन्यासी आहे आणि श्रमिकांची वाताहत मी माझ्या घरी पाहतो आहे अलीकडे तिघांपैकी दोघेजण गेले आणि जो वाचलाय तो फॅक्टरीत काम करतोय आजही माझी भावन्डे मला निरंकुश भांडवलशाही मान्य करू देत नाहीत थोडक्यात काय मी मार्क्सवादी नाही पण श्रमप्रतिष्ठा मानणारा श्रमवादी कायकवादी आहे ह्या कायकवादामुळेच मी संन्यासी असूनही मेहनत करतो आणि आयते बसून खाणाऱ्या संन्यासाची सवय झालेल्यांना अनाकलनीय होतो ह्यांना हे कळत नाही कि मोक्षप्राप्तीनंतर शिवजी घरी परतले होते तर बसवेश्वरांनी मोक्ष मिळाल्यानंतर एका राजाकडे मंत्री म्हणून काम केले होते शैव संन्यास आयते बसून खाणाऱ्यांचा संन्यास नाहीये . कायकवाद संन्यासालाही लागू आहे . 

मला जसा कायकवादी श्रमवाद मान्य होता तसाच उद्योगवादही  श्रमिकांचे दोन प्रकार असतात पहिला ज्याला आयुष्यभर कसलीही रिस्क घेता फक्त सुरक्षित ठिकाणी श्रम करायचे असतात दुसरा ज्याला फक्त श्रमिक म्हणून जगायचे नसते आणि जो असुरक्षित राहण्याचा धोखा पत्करून स्वतःचा उद्योग उभा करू इच्छितो . माझे वडील स्वतः घरगडी होते मग फिल्मलाईनमध्ये आर्ट वर्कर मग नागेशकरांच्याकडे वर्कर होते पण त्यांनी पूर्णपणे तोट्यात चाललेले दुकान लोकांच्याकडून पैसे उसने घेऊन विकत घेतले आणि धोका पत्करून चालवले सुरवातीला दुकानाची सर्वच कामे म्हणजे हमालीपासून सायकलवरून माल आणणे ते माल लावण्यापर्यंत ते एकटेच करत हळूहळू दुकान चालायला लागले आणि काही वर्षातच त्या एरियातील एक नम्बर झाले मला अनेक लोक विचारतात कि तुझा क्लास कोणता मी जन्मलो  तेव्हा वडील टॉपवर होते साहजिकच मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नसलो तरी नक्कीच चांदीचा चमचा घेऊन जन्मलो होतो पुढे आणिबाणीविरुद्ध बोलायला लागले म्हणून सरकारने खोटी केस टाकून त्यांना अटक केली आणि ते खचले ते खचतच गेले त्यातच माझ्या बहिणीच्या म्हणजे त्यांच्या मुलीच्या संसाराची जी वाताहत झाली त्याने ते पुरतेच खचले ज्या वयात वडिलांनी मुलाच्या खांद्यावर हात ठेवायचा असतो त्या वयात मला त्यांच्या खांद्यावर हात ठेवायची वेळ आली आणि एक वर्ष असेही होते ज्यात आम्ही कंगाल होतो त्यामुळे जन्मलो तेव्हा हाय क्लास कुमार वयात मिडल क्लास आणि तारुण्याच्या काळात कंगाल क्लास असे तिन्ही क्लास मी पाहिले आहेत पुढे मुंबईतही ह्याची रिपीटिशन झाली आहे माझ्या आजोबांचेही हेच झाले होते फक्त आणिबाणीऐवजी स्वतःच्या वर्णाबाहेर मुलगी दिल्याने त्यांच्या वाट्याला वाळीत टाकणे आले होते आणि जंगलात जाऊन झाडपाला  खाण्याची वेळ त्यांच्यावर आली होती थोडक्यात माझ्या घरातील तीन पिढ्यांनी  तिन्ही क्लास बघितल्याने मला सर्वच वर्गांच्याबद्दल ममत्व आहे आणि माझ्या कवितांत त्याचे प्रतिबिंब पडले आहे श्रीमंत फार सुखी असतात असा एक फार मोठा गैरसमज सद्या वाढीस लागला आहे पण गरिबीइतक्याच विवंचना श्रीमंती निर्माण करते हा माझा अनुभव आहे 

घर आणि बांधकाम ह्याविषयी मला लहानपणापासून  प्रेम आहे त्याचे कारण माझ्या बाळपणी माळी गल्लीत माझ्या घराला लागूनच सुरु झालेली दोन बांधकामे आणि काचांचा कारखाना असा कारखाना सुरु करायचा एकेकाळी मी खूप विचार केला होता लक्ष्मीपुरीतील सुतारांच्याकडे जाऊन बसणे हा माझा लहानपणाचा फेवरीट टाईमपास होता  ( त्यातूनच माझी बांधकाम चालू आहे ही कवितामालिका जन्मली आहे ) मी संन्यासी आणि तथाकथित दृष्टीने आचार्यही किंवा गुरुजीही असल्याने  साहजिकच मोक्षसाधना , करिअर गायडन्स , भविष्यविज्ञान आणि बिझनेसचे भविष्य  , ज्योतिष , वैवाहिक व प्रेम सल्लागार अश्या अनेक अंगांनी मला अनेक वेगवेगळ्या घरातून  मार्गदर्शनासाठी  बोलवले जात असे आणि आजही बोलवले जाते मुंबईतही मी रोज किमान तीन नव्या आणि दोन जुन्या लोकांना भेटतो त्यामुळे  वेगवेगळ्या घरात माझी उपस्थिती असते आणि पूर्वीही असे आणि घरातल्या कुठल्याही गोष्टी हाताळण्याची मला अनुमती होती असते मी  संन्यासी पण  माझे जैविक दुसऱ्यांच्या घरात गृहस्थ आश्रमात अस्तित्व थाटून असायचे /असते माझे सामाजिक जग हे रोज भेटणाऱ्या ह्या लोकांच्यापलीकडे जात नाही वर्षाला केवळ हजार नवीन लोकांना भेटून समाज कळतो असे मला वाटत नाही त्यामुळे कवितेत सहज असणारा मी प्रत्यक्षात सामाजिक भाष्य करतांना खूप सावध असतो लोक अत्यंत मनमोकळेपणाने त्यांची रहस्ये मला सांगतात आणि मी ती सांभाळतो दिसणारा माणूस असणारा माणूस ह्यांच्यातील फरक मी रोजच अनुभवत असतो आजही अनेकदा दोन दिवस फाईव्ह स्टार हॉटेल दोन दिवस मिडल क्लास घरे आणि तीन दिवस  मोतीलाल नगरमधील  गरिबखाना अशी  माझी लाइफस्टाइल चाललेली असते मी फी घेत नसल्याने लोक जे ठेवतात ते मी आवश्यक असेल तर घेतो भविष्याविषयक तरतूद एका आठवड्याची असली कि घेत नाही त्यामुळे  अगदी एक रुपयाही मी आनंदाने घेतो ( ह्यामुळे डिमॉनिटायझेशनमध्ये मला चांगलाच फटका पडला होता चक्क मध्ये तीन दिवस उपाशी रहायची पाळी आली होती आणि महेश पवारने आणलेल्या केळ्यांनी माझा उपवास सुटला होता ) कोल्हापुरात असतांनाही हेच होते  झोपडपट्टी , हायफाय घरे आणि हॉटेल ह्यां तिघांशी  निगडित असलेले माझे हे अनुभवविश्व मी सारख्याच तटस्थेतेने पाहतो आणि पहात होतो 

कोल्हापुरातील गरिबांची घरे माझ्या कवितेत वास्तव पद्धतीने सहज उमटली पण  हायफाय घरांना भिडताना निखळ वास्तववादी स्टाईल मला उपयोगी पडेना आणि त्यातून माझी अतिवास्तववादी शैली विकसित झाली आणि त्या कवितांचा जो संग्रह बनला तो डेकॅथलॉन सररिअल होय .त्याने माझ्यापुरता वास्तववादाचा  अस्त केला ह्या कविता मी का लिहिल्या हे मला आजही पूर्ण कळलेलं नाही . 

आमच्या ऐंशोत्तर पिढीतला कुठलाच कवी आधुनिकतावादी वा देशीवादी बनण्यापासून वाचलेला नाही पण मी वाचलो त्याचे कारण माझी मोक्षाची आसक्ती ! मोक्ष कॉस्मॉसिक असल्याने त्यात देशीवाद बसवणार कसा मात्र कोल्हापूरच्या लोकल कल्चरला कवितेत निर्माण करणे हे माझ्या  संवेदनशीलतेला फार आवश्यक होते मुख्य म्हणजे हे कसेही असले तरी माझे शहर होते साहजिकच ह्या शहराविषयी वाटणाऱ्या माझ्या सर्व भावना कवितांतून उमटत जाणे स्वाभाविक होते ह्या स्वाभाविक कोल्हापुरी कवितांना एकत्र करून मी डेकॅथलॉन : लोकल हा संग्रह निर्माण केला जो माझ्या "आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण" ह्या महाकाव्याचा पहिला भाग बनला आणि तो प्रसिद्धही झाला एका अर्थाने मी देशीवादाचा अस्त पाहिला असला तरी स्थानिकतेचा आग्रह धरून देशीपणाचा आग्रह सुरवातीपासूनच शाबूत ठेवला आहे .



थोडक्यात काय प्रबोधनवाद , सौंदर्यवाद , परिवर्तनवाद , मार्क्सवाद आणि देशीवाद ह्यांचा अस्त मी १९८२ ते १९८७ ह्या कालखंडात पाहिला आणि तो ह्या कालखंडातील कवितांत व्यक्तही झाला पण हे अस्त पोस्टमॉडर्निस्टनप्रमाणे  मी साजरे केले नाहीत उलट त्या अस्तांचे दुःखच माझ्या कवितेत जास्त प्रकट झालेले दिसते अर्थात अस्तांपाशी थांबणारा माणूस मी नाही  उलट त्यातील जेजे चांगले आहे त्याचा विकास कसा करता येईल ते पाहिले त्यासाठी  मराठी साहित्यातील जे उपलब्ध होते ते प्रथम आत्मसात केले आणि नंतर त्यात जे अस्त होऊनही उरते त्याचा पाठपुरावा केला म्हणजे धर्माला ठाम नकार दिला पण मोक्षाचा पाठपुरावा केला आणि साधनाही केली  आयडियॉलॉजीला नकार दिला पण त्यातील स्वातंत्र्य समता बंधुता व लोकशाही ह्यांचा पाठपुरावा केला  त्यासाठी बसवेश्वरांचा लिंगायतवाद  प्रबोधनवाद मी कवितेत विकसित करून माझा स्वतःचा शैववाद मांडला प्रबोधनातले क्लासिकल सायन्स नाकारलं पण क्वान्टमचे क्वान्टम नंतरचे नवे विज्ञान नाकारता त्यातून काही प्रतिमा उभ्या केल्या आणि अनुभवविश्वही गरज पडली तेव्हा कवितेत वक्र केले

भटांनी  करंदीकरांनी जी गझल दिली तिचे  क्वान्टम रूप मी विकसित करायचा प्रयत्न केला  करंदीकरांनी आजाद गझल आणली असती तर फार बरं झालं असतं पुढील गझलकार  भटांच्या परंपराशरण गझलेच्या इतके आहारी गेले नसते आणि गझलेबाबत अजूनही सौंदर्यवादात अडकलेली मराठी गझल थोडी अधिक मोकळी झाली असतीअसे मला वाटले म्हणून ते काम मीच केले 

झोपा काढणाऱ्या किंवा स्वतःवरच खुश असणाऱ्या परिवर्तनवादाला मी थोडे हलवण्याचा प्रयत्न केला एका अर्थाने ह्या काळातील माझा परिवर्तनवाद हा जास्त रिअल होता असे म्हणता येईल 

मला प्रश्न पडतात कि नामांतर चळवळीमुळे ह्या काळातला आंबेडकरवाद हा अत्यंत जोशपूर्ण होता  त्या पार्श्वभूमीवर माझा आंबेडकरवाद हा थंडगार होता कि काय ? कि बस्वेश्वरांच्यामुळे तो संयमित झाला ? कि मोक्ष केंद्रीय असल्याने तो अलिप्त होता ?

किंवा जर मी डेकॅथलॉन सररिअल लिहिला नसता तर मी निर्वस्तुवादी कविता लिहू शकलो असतो काय ?

किंवा अस्तांचे युग सगळ्या जगभर होते म्हणून ते माझ्याही कवितेत झिरपले काय ?

आधुनिक पिढी पांडूंची देशीवादी पिढी गांडूंची असेल तर आमची पिढी मांडूंची म्हणजे फक्त मांडणाऱ्यांची आणि मांडवली करणाऱ्यांची होती काय ?

तुम्ही म्हणाल मी १९८१ ते १९९० ह्या दशकाचा इतिहास का सांगतोय ? कारण उघड आहे कुठेतरी ह्या दशकाचा आणि २०११ ते २०२० ह्या दशकाचा एक आंतरिक संबंध आहे असे वाटते त्याकाळी इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीवर लिहिलेल्या कविता मोदींना लागू पडतायत कि काय अशी शंका येतेय प्रबोधनाच्या प्रोजेक्ट्ची जी वाताहत आम्ही त्या दशकात पाहिली ती आता रिपीट झाली कि काय असे वाटते परिवर्तनवादाचा घोडा पुन्हा त्याच दशकात परतला कि काय असा प्रश्न पडतोय संदर्भ बदललेत पण त्यांच्या त्वचेचे स्पर्श ओळखीचे वाटतायत असे नसेल तर उत्तम आहे पण असे असेल तर ते भीषण आहे नामांतर , मंडल आणि राम मंदिरासारखी केवळ त्वचेवर रेंगाळणारी आंदोलने ह्यातून जन्मणार असतील तर हा देश बदलणार नाही गरिबी हटाव मग इंदिरा हटाव ह्यांसारखे मोदी हटाव असे एक कलमी सूत्र घेऊन क्रांती घडेल असे ज्यांना वाटते त्यांनी ह्या दशकाकडे अधिक खोलवर नजरेने पाहावे कदाचित हे दशक त्यांचे डोळे अधिक उघडेल आणि परिवर्तनवादाचा रस्ता आधिक व्यापक होईल नाहीतर ही इलेक्शन मोदी जिंकतील किंवा हरले तरी इंदिरा गांधींच्या प्रमाणे पुन्हा परततील 

श्रीधर तिळवे नाईक 







Comments

Popular posts from this blog