कलावंताचे सामाजिक उत्तरदायित्व , बांधिलकी आणि चौथी नवता  ( SOCIAL RESPONSIBILITY OF THEATRE PERSON )२२ ते २३ सप्टेंबर २०१६ INTERNATIONAL THEATRE  फेस्टिवल )श्रीधर तिळवे नाईक
प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो ,
कलावंताच्या उत्तरदायित्वावर हे चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल मंगेश बनसोड ह्याचे प्रथम आभार तुम्ही गेले काही तास ह्या विषयावर अनेकांचे मौलिक विचार ऐकत आहातच आणि आता  आम्ही फॅकल्टीचे लोक समारोपाचे सेशन  सादर करतो आहोत
मी नेहमीच एक गोष्ट तुम्हाला सांगत आलो आहे ती म्हणजे प्रश्न विचारा कोणी कितीही मोठा माणूस असो श्रद्धा ठेऊ नका  प्रश्न विचारा प्रश्नक व्हा त्यामुळे पहिला प्रश्न हे चर्चासत्र  कशासाठी ?तुम्ही आता सर्वच अभ्यासक्रमानंतर समाजात उतरणार आहात आणि समाज आणि कला ह्यासंदर्भात तुम्हाला एक भूमिका घ्यावी लागणार आहे ही भूमिका घेण्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी तयार करणे हा ह्या चर्चासत्राचा उद्देश  आहे. भूमिका कोणतीही असो ती प्रामाणिक असणे हे फार गरजेचे आहे बनावट भूमिका  बनावट कला निर्माण करतात त्यामुळे बनावट भूमिका घेऊ नका अस्तित्ववाद शिकवताना मी तुम्हाला ऑथेन्टिसिटी विषयी प्रदीर्घ शिकवले आहे कारण भूमिकेपेक्षा भूमिकेची ऑथेंटिसिटी कलेत अधिक महत्वाची ठरते हा माझा अनुभव आहे ऑथेन्टिसिटी नसलेले लोक कलेच्या नावाखाली फक्त राजकारण करत असतात हे माझे निरीक्षण आहे तेव्हा ऑथेन्टिसिटी महत्वाची
आता काही महत्वाचे मुद्दे एका विचारवंताने  इथे एक चुकीचा इतिहास सादर केला त्यासंदर्भात त्यांनी ग्रीक नाटकांचा उल्लेख केला प्रेमानंद गजविंनी सामाजिक बांधिलकीविषयी एक ठोस भूमिका मांडली आणि चर्चासत्र सामाजिक बांधिलकीच्या बाजूने पूर्ण कलंडले इथे जर कुणी विरोधी भूमिका ठोसपणे मांडली असती तर मला अधिक बरे वाटले असते  अनेकदा चर्चासत्रात असे होते . विरोधी पक्ष प्रबळपणे पुढे येत नाही तर असो .
 हा विषय नीट समजायचा असेल  तर चार    संकल्पना आणि त्यांचा इतिहास नीट स्पष्ट झाला  पाहिजे
१ सामीलकी
२ सक्ती
३ बांधिलकी
४  उत्तरदायित्व
मानवी इतिहासाचा अभ्यास करताना अनेकदा कालखंड तयार केले जातात त्याची सुरवात जिआंबटीस्टा विको
Giambattista Vico   ह्या इतिहासकाराने केली . भारतात ब्रिटिश व युरोपियन इतिहासकारांनी भारतीय कालखंडाची विभागणी प्राचीन , मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशी केली आहे त्याला शह दिला तो स्वामी विवेकानंदांनी त्यांनी भारतीय कालखंडाची विभागणी भारतीय पद्धतीने चार युगात केली भारतात चार युगांची कल्पना फार प्राचीन आहे ती त्यांनी आधुनिक करून मांडली ही युगे पुढीलप्रमाणे 
१ ब्राह्मण युग : विवेकानंदांच्या मते जगात प्रथम ब्राह्मण युग अवतरले आणि ह्या युगात सर्वत्र ब्राह्मणांचे राज्य होते
२ क्षत्रिय युग : ह्यानंतर क्षत्रिय युग अवतरले आणि सर्वत्र क्षत्रियांचे वर्चस्व पसरले
३ वैश्य युग : विवेकानंदांच्या मते ते ज्या युगात वावरत होते ते वैश्य युग आहे आणि ह्या युगावर वैश्यांचे वर्चस्व आहे आणि इंग्रजी वैश्यांनी त्यामुळेच भारतावर स्वतःचे वर्चस्व स्थापन केले आहे ते वर्चस्व उधळायचे असेल तर भारताने आधुनिकची कास धरली पाहिजे असे ते म्हणत
४ शूद्र युग : विवेकानंदांच्या मते येणारे युग हे शूद्रांचे व अतिशुद्रांचे म्हणजेच कामगार वर्गाचे असणार आहे .  काही वर्षांनी त्यांची भविष्यवाणी लेनिन व माओने खरी ठरवली
मी विवेकानंदांना अध्यात्मिक समाजवादी म्हणतो ते ह्यासाठीच !

मला ही संकल्पना पूर्ण मान्य नसली तरी तिचे भारतीयत्व मला आवडते मात्र विवेकानंदांची मांडणी  मान्य नसल्याने मी माझी पांच युगांची संकल्पना गेली कैक वर्षे सातत्याने  मांडतो आहे पूर्वी मी ब्राह्मण जाणीव क्षत्रिय जाणीव वैश्य जाणीव आणि दलित जाणीव ह्या संज्ञा वापरून ही युगे मांडत असे पण अनेकांना त्यात जातीयतेचा नसलेला वास येऊ लागल्याने मी संज्ञा बदलल्या भारतात भारतीय पद्धतीने काहीही केले कि ते जातीयच होते आणि त्याचे काय करायचे हा एक प्रश्नच आहे . मराठी विचारवंत हे सर्वाधिक जातीयवादी झालेत असे माझे स्पष्ट मत आहे आणि त्यातूनच ह्या समस्या उदभवल्या आहेत .  असो ही युगे पुढीलप्रमाणे
१ निसर्गयुग
२ विश्वीय युग
३ सृष्टीय युग
४ प्रतिसृष्टीय युग
५ चिन्हसृष्टीय युग
माझ्या मते निसर्गयुग हे ब्राह्मण आणि क्षत्रिय दोघांनी निर्माण केले आहे तर विवेकानंदानी मांडलेली  वैश्य व शूद्र ही दोन्ही युगे प्रतिसृष्टीय युगाच्या दोन बाजू आहेत

ह्या युगांचा आणि कलावंतांवर टाकण्यात येणाऱ्या सामाजिक जबाबदारीचा फार जवळचा संबंध आहे त्यांचा आता तपशीलवार विचार करू .
(थिएटर अकॅडेमी ऑफ मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या कलावंताचे सामाजिक उत्तरदायित्व चर्चासत्रात दिलेल्या भाषणाचा विस्तार  )
(क्रमशः )
कलावंताचे सामाजिक उत्तरदायित्व , बांधिलकी आणि चौथी नवता  श्रीधर तिळवे नाईक
भाग दुसरा

निसर्गयुग सामीलकी आणि सक्ती भाग दुसरा
निसर्गमानव होमो इरेक्ट्सचा विकास झाला  तेव्हा तो प्रथम हात वापरायला शिकला आणि नंतर त्या हातांनी तो दगड उचलायला शिकला आणि हातांची हत्यारे बनवायलाही त्याने सुरवात केली किंबहुना हत्यार हा शब्दच हातापासून तयार झाला आहे हा हात असा उचलला आला नसता तर लेखनासाठी ना हाथ उठले असते ना माणसाची प्रगती झाली असती ना आपले आताचे नाटक अस्तित्वात आले असते पुढे  जेव्हा त्याच्या हातात मेलेल्या माणसांचे सांगाडे हाती लागले तेव्हा तो मृत माणसांच्या हाडांचा वापर हत्यार म्हणून करायला शिकला ह्या हत्यारांच्यामुळे तो शिकार करायला शिकला आणि शिकारीसाठी प्राण्यांच्यामागे पळायला शिकला पळता पळता घाम येऊन त्याचे केस गळायला सुरवात झाली तो जंगले पालथी घालू लागला आणि त्याच्या लक्ष्यात आले कि जंगलांना आग लागते तेव्हा लाकडे जळतात आणि इथेच तो लाकडांचा वापर अग्नी निर्माण करण्यासाठी करू लागला त्यातून शेकोटी तयार झाली आणि शेकोटीभवती बसणारी फॅमिलीही आजही आपण लग्नासाठी सात फेरे अग्निभावती घेतो कारण ह्या अग्निनेच फॅमिली जन्माला घातली आहे हा अग्नी प्रज्वलित ठेवणे हे एक महत्वाचे काम होऊन बसले कधीतरी अपघाताने मांसाचे  तुकडे आगीत पडले आणि मांस बाहेर काढून खाल्ल्यावर ते आधिक सहजपणे खाता येते हे त्याच्या लक्ष्यात आले त्यातून स्वयंपाकाचा शोध लागला ह्यामुळे अन्न चावण्यावर खर्च होणारी ३० % ऊर्जा मेंदूच्या विकासकामाला लागली मेंदू विकास पाऊ लागला  अन्नाच्या भरपूर उपलब्धतेने आणि वेगवेगवेग्ळ्या पद्धतीने अन्न  चावण्यामुळे जबडा विकसित होऊन त्यातून भाषापूर्व ध्वनी अधिक सक्षमपणे बाहेर येऊ लागले आणि शेकोटीभवतीच्या सांकेतिक भाषेला आरंभ झाला आता आपण जेवताना बोलू नका असे म्हणतो खरे पण आपल्या पूर्वजांनी हा नियम पाळला असता तर कदाचित भाषाच तयार झाली नसती हळूहळू ह्या शेकोटीभवती बसणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली आणि भाषाही वाढत गेली आणि ह्या भाषेने होमो इरेक्ट्सचा होमो सेपियन झाला ह्या होमो सेपियनच्या संघटित टोळ्या जंगलभर फिरू लागल्या आणि त्यातूनच एकमेकांची एकमेकात सामीलकी तयार झाली ही इतकी दृढ आणि सहज होती कि ती अस्तित्वात आहे ह्याचीही त्यांना जाणीव न्हवती ह्या सामीलकीमुळे टोळ्यांना एका जमातीचे रूप प्राप्त होऊ लागले आणि जमाती वा ज्यांना आपण आदिवासी कला म्हणतो त्यांची मूळ प्रारूपे उदयाला आली . व पुढे कलांचा उदय झाला

ह्या कला ह्या व्यक्ती ऐवजी एका संपूर्ण जमातीने जन्माला घातलेत असा सर्व जमातीचा अंधविश्वास असल्याने जो ती कला जन्माला घाली तो वा ती समूहातील सामीलकीला ह्याचे श्रेय देई व्यक्तीला मुळात वावच नसल्याने ही सामीलकी आनंदाने स्वीकारली जाई ह्या सामीलकीचा प्रभाव एंगल्सवर प्रचंड पडला होता आणि तो ह्या जमातीला प्रिमिटिव्ह कम्म्युनिझम मानत असे आणि पुढे कम्म्युनिझममध्ये कलावंतांकडून अश्या सामीलकीच्या अपेक्षा ठेवल्या जात कारण मार्क्सला हाताने पछाडले होते . त्याचा ठाम विश्वास होता कि माणूस आज जो काही आहे तो ह्या हातांमुळे आहे त्यामुळेच साम्यवादात मेंदूऐवजी हाताला आधिक महत्व प्राप्त झाले ह्या नादात मार्क्स हे विसरला कि हातांचा कंट्रोल मेंदूकडे होता आणि मेंदू हात तयार करण्याचा प्रयत्न करत होता म्हणूनच हात तयार झाला ह्याच बरोबर मार्क्सला विशेषतः एंगल्सला ह्या आदिम टोळीतील सामीलकी आदर्शवत वाटत होती आणि त्यातूनच कलावंतांनी स्वतःच्या व्यक्तित्वाचा लय समाजात घडवून आदिवासी समाजातील जमातींप्रमाणे कम्म्युनिस्ट समाजात सामील होऊन कलानिर्मिती करावी अशी अपेक्षा ठेवली जाऊ लागली आणि आजही असे अपेक्षा करणारे लोक आहेत हात हा श्रमाचा मूलभूत आधार आहे त्यामुळेच कम्म्युनिस्ट सामीलकीने शास्त्रज्ञ , विचारवंत आणि कलावंतांनाही त्यांनी श्रमिकांप्रमाणे राबावे म्हणून शेतावर व फॅक्टरीत पाठवले  असो

ह्या आदिम काळात कालांतराने सत्तासंघर्ष होऊन टोळ्यांचे राज्यात रूपांतर झाले आणि राज्याच्या नियमनासाठी धर्म नावाची संस्था उदयाला आली वेगवेगळे जमातीय धर्म टकरायला लागले वेगवेगळे देव व धर्मकांडे टकरायला लागली आणि धर्माच्या प्रचारासाठी कलेला वेठीस धरणे चालू झाले आणि त्यातूनच सामीलकीचे रूपांतर सक्तीत झाले आणि सक्ती कलावंतांवर लादण्यात आली कलावंताने धार्मिक वाङ्मयाच्या आधारे कला निर्माण करावी अशी सक्ती झाली आणि त्यामुळेच महाकाव्ये आणि धार्मिक कथांचा वापर करून नाटक लिहिण्याचा आदेश धर्मसंस्थानी दिला त्यातूनच आजची ग्रीक रंगभूमी जन्मली सॉफिकलीझ , युरॅपीडीस ह्यांची नाटके धार्मिक कथांतून जन्मली  त्यांची सविस्तर चर्चा आपण आपल्या वर्गात केली आहेच ह्या नाटककारांना स्वातंत्र्य होते ते अभिव्यक्तीचे पण आशयाबाबत त्यांनी काय व्यक्त करायचे ह्याबाबत त्यांच्यावर कट्टर बंदी होती कथानके आधीच फिक्स होती
इडिपस इलेक्ट्रा मेडिया ह्यांच्या कथा ह्या ग्रीक धर्माच्या तत्कालीन लोकप्रिय कथा होत्या आणि त्यांचे सादरीकरण ग्रीक नाटककार करत आपल्याकडे वैष्णव धर्माने ही सक्ती पुराणे ,रामायण आणि महाभारत ह्यांच्यातील कथा सादर करण्याबाबत केली होती असे दिसते .
कम्म्युनिस्ट राजवटीतही सामीलकीचे रूपांतर असेच सक्तीत झाले कारण हळूहळू कम्युनिझमचे रूपांतरही धर्मात झाले आणि सर्वच कलावंतांच्यावर  ही सक्ती पुढे लागू झाली आणि मायकोवस्की सारखा सामीलकी मानणारा कवीही शेवटी तुरुंगात गेला
त्यामुळेच माझ्या विध्यार्थी बंधू भगिनींनो सामीलकी ''बघताय का सामील व्हा ''म्हणत तुमच्यापुढे आली तर लगेच सामील होऊ नका तिचे सक्तीत रूपांतर होण्याची शक्यता किती आहे ते पहा .
(क्रमशः )
कलावंताचे सामाजिक उत्तरदायित्व , बांधिलकी आणि चौथी नवता  श्रीधर तिळवे नाईक
भाग तिसरा

ह्या धार्मिक सक्तीविरुद्ध बंड केले ते कपिल महावीर आणि गौतम बुद्धाने ! त्यातून भारतात आगमवाद उदयाला आला  विश्वीय युग आले   अनेक संस्कृत नाटककार जे  ह्या युगात लिहीत होते त्यांची नेमकी स्थिती काय होती
कालिदास असो कि भास ह्या सर्वांनी ही धार्मिक सक्ती  फक्त वैष्णव थीमपुरती  पाळलेली दिसते आणि वैष्णव महाकाव्यावर आधारित नाटकेही लिहिलेली दिसतात पण कालिदास काही वैष्णव न्हवता तर शैव होता त्याच्या पार्वती व कालीभक्तीची एक दंतकथा तयार करून ब्राह्मणांनी वाट लावली ते सोडून द्या पण  शैव धम्माने  कलावंतांवर अशी सक्तीची आज्ञा न दिल्याने जेव्हा यक्ष ही शैव कल्पना येते तेव्हा मात्र कालिदास आशयाचे पूर्ण स्वातंत्र्य घेतो साहजिकच त्यातूनच मेघदूत हा मुक्त आशयाकार व अविष्कार दिसतो जेव्हा जेव्हा शैव जैन आणि बौद्ध ह्या आगमांची कला येते तेव्हा तेव्हा हा मुक्त आशयाकार व अविष्कार दिसतो त्यातूनच शैव असलेल्या विशाखादत्ताचे मुद्राराक्षस आणि शूद्रकाचे मृच्छकटिक असे जबरदस्त सृजन पुढे आलेले दिसते ज्यांच्यावर वर्गात आपण चर्चा केलेली आहेच . हर्ष व अश्वघोषाची नाटकेही ही मुक्तता मिरवतात कारण ती वैदिक , ब्राह्मणी , वैष्णव आणि हिंदू ह्या निगमिक  धर्माच्या निगमिक कचाट्यात सापडत नाहीत

मग ह्याचा अर्थ असा आहे काय कि विश्वीय युगातून पुढे आलेल्या धम्मांची कलावंतांकडून काहीच अपेक्षा न्हवती ? तर होती पण ही अपेक्षा सामीलकी वा सक्तीची न्हवती तर ती अध्यात्मिक उत्तरदायित्वाची होती जिची सविस्तर चर्चा मी चौथ्या नवतेच्या संदर्भात माझ्या टीकाहरण ह्या ग्रंथातील ''लेखकाची अध्यात्मिकता व दर्शनता '' ह्या प्रकरणात केली आहे

 ह्या अध्यात्मिक उत्तरदायित्वाचे स्वरूप समजायचे असेल तर ह्या युगातील तीन वर्गांकडे जावे लागेल  ह्या विश्वीय युगात तीन वर्ग दिसतात
१ मुक्त : ह्यात  मोक्षु वा केवली वा बुद्ध येतात
२ साधक : ह्यात मुमुक्षु वा श्रमण येतात
३ गृहस्थ : ह्यात संसार करणारे सामान्य लोक येतात
ह्यातील पहिला वर्ग आपले दर्शन सांगे तर दुसऱ्याकडून मात्र त्याने कलेत निर्वाणाची वा मोक्षाची वा कैवल्यप्राप्तीची केलेली साधना व धम्म साहित्याशी असलेली त्याची तन्मयता प्रकट करावी अशी अपेक्षा असे तर गृहस्थ कलावंतांनी शक्यतो सत्य , अहिंसा , अपरिग्रह , अचौर्य , संयमित शृंगार व प्रेम ह्यांचा मान राखून आपला कला अविष्कार करावा  असे त्याच्यावर  उत्तरदायित्व टाकले जाई ह्या उत्तरदायित्वात सक्ती न्हवती आणि सामीलकी न्हवती पण सत्य , अहिंसा , अपरिग्रह , अचौर्य , संयमित शृंगार व प्रेम ह्या नीतिमूल्यांशी निगडित नीतिमत्तेशी तन्मयता अपेक्षित होती त्यामुळेच शैव मृच्छकटिकात एक ब्राह्मण एका गणिकेच्या प्रेमात पडू शकतो आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार करू शकतो कारण अस्सल संयमित प्रेम हे नैतिक मानले जाई  त्यामुळेच ह्या नैतिकतेशी  शूद्रकाची असलेली  तन्मयता आपणाला संपूर्ण नाटकभर दिसते पण तत्कालीन राजकारणाचे व समाजकारणाचे पडसादही सहजरित्या पडलेले दिसतात . हीच गोष्ट विशाखादत्ताच्या मुद्राराक्षसाची ज्याचे आधुनिक व्हर्जन आपण मनोज जोशींच्या आर्य चाणक्य मध्ये पाहतो आहे .
दुर्देवाने शैव , जैन आणि बौद्ध ह्या तिन्ही धम्मांचा पाडाव होऊन ह्या अध्यात्मिक उत्तरदायित्वाचे दिवस लवकरच संपले आणि वैष्णव आणि हिंदू धर्मांचा आणि त्यांच्या धार्मिक सक्त्यांचा उदय झाला आणि नंतर आलेल्या इस्लाम व ख्रिश्चन धर्माने धार्मिक कलेचा सातत्याने पुरस्कारच केला इस्लाममध्ये जिथे चित्रालाच अनुमती न्हवती तिथे नाटकाला अनुमती थोडी अवघडच होती त्यामुळे नाटकांची धाराही सुकत गेली प्रेषिताने मस्जिद बांधणे आवश्यक मानल्याने आर्किटेक्चरला मात्र इस्लाममध्ये पूर्ण अनुमती होती आणि शब्दकलेचे तर स्वागतच होते प्यार इश्क मोहब्बत ह्यांना धार्मिक मान्यता होती परिणामी इस्लामिक कलेत साहित्य आणि स्थापत्य भरभराटीस आले परिणामी स्थापत्यात ताजमहाल आणि काव्यात गझल मानदंड म्हणून उभी राहिले  प्रेम ह्या संकल्पनेला तर इतके धुमारे फुटले कि  प्रेम फक्त उर्दूतूनच चांगले  व्यक्त होते असा गैरसमज पसरला हे सर्व इस्लामच्या सक्तीत बसणारे होते आणि त्याचा जाच कलावंतांना फारसा वाटला नाही
ही धार्मिक सक्ती ,सामीलकी आणि  अध्यात्मिक उत्तरदायित्व ह्यांच्याकडून जग  बांधिलकीकडे कसे वळले ?
(क्रमशः )
कलावंताचे सामाजिक उत्तरदायित्व , बांधिलकी आणि चौथी नवता  श्रीधर तिळवे नाईक
भाग चौथा
कलावंत , भूमिका , बांधिलकी आणि  सामाजिक बांधिलकी
'' १००० साली कयामत होणार ''असे ख्रिश्चन धर्मगुरूंनी जाहीर केले  खरे पण १००० साली कयामत झाली नाही आणि ख्रिश्चन श्रद्धावंतांना धक्का बसला त्यानंतर अरब संपर्कामुळे व धार्मिक क्रुसेड्स मुळे ग्रीक तत्वज्ञान युरोपात पुन्हा जिवंत झाले आणि हळूहळू धार्मिक श्रद्धेला प्रश्न विचारले जाऊ लागले त्यातच चायनामधून कम्पास आणि प्रिंटिंग युरोपला आयात झाले , गुटनबर्गने प्रिंटिंग प्रेस काढला आणि पुस्तके छापली जाऊ लागली आणि ह्या पुस्तकांनी मौखिक आणि लिखित परंपरा मोडीत काढली पण ह्यातूनच एक विलक्षण घटना घडली ती म्हणजे लिहिणारा आणि वाचणारा दोघांनाही समाजाची गरज उरली नाही दोघेही एकांतात बसून लिहूवाचू लागले आणि ह्यातूनच लिहिणाऱ्याची एकांतता दृढ होत गेली व्यक्तिवादाचा हळूहळू उदय झाला ह्याचवेळी फ्रान्सिस बेकनने नवे तर्कशास्त्र जन्माला घालून विज्ञानाचा पाया घातला तर देकार्तने मी विचार करतो म्हणून मी आहे अशी घोषणा देऊन विचार केंद्रस्थानी आणून ठेवला आणि ह्यातूनच एका नवीन विज्ञानकेंद्रित समाजरचनेचा उदय होऊ लागला ह्या समाजरचना कशा असाव्यात ह्याचे प्रतिपादन करणाऱ्या व ज्ञान म्हणजे काय माणूस म्हणजे काय ह्या प्रश्नांचा धांडोळा घेणाऱ्या विचारप्रणाल्यांचा उदय झाला ह्यातील पहिली विचारप्रणाली ही बुद्धिप्रामाण्यवाद होती (RATIONALISM ) तीने सत्यशोधाबाबतच्या तत्कालीन सर्व धार्मिक संकल्पना कधी धुडकावल्या तर कधी त्यांना बौद्धिक चॅलेंज दिले . ह्या बुद्धिप्रामाण्यवाद्यांना सनातन संकल्पना मान्य न्हवत्या . त्यातून नव्या बुद्धिप्रामाण्यवादी हिरॉइक नायक उदयाला आले हे गॅलिलिओसारखे वैज्ञानिक वा वास्को द गामा , कोलम्बसासारखे नवभूमीशोधक होते
सत्य शोधणाऱ्यांना सत्य शोधण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक होते आणि ते देण्यासाठी धार्मिक राज्याला उखडून टाकणे आवश्यक होते ह्याशिवाय सत्य शोधण्यासाठी आवश्यक असणारी बुद्धिमत्ता कुणाकडेही असण्याची शक्यता होती त्यामुळे ज्ञानाच्या पातळीवर नवी समता आवश्यक होती ह्यातूनच स्वातंत्र्य आणि समता ह्यांना प्रमाण मानणाऱ्या राष्ट्रवादाचा शोध लागला आणि त्याचबरोबर राज्य स्थिर राहावे म्हणून नागरिकांच्यात बंधुता आवश्यक आहे म्हणून बंधुता स्वीकारली गेली
हे सगळे प्रत्यक्षात आणण्यासाठी ह्या मूल्यांचा प्रचार होणे आवश्यक होते आणि पुस्तके लिहुवाचण्यासाठी एकांत !त्यातूनच ज्ञानासाठी ज्ञान विज्ञानासाठी विज्ञान आणि कलेसाठी कला ह्या तीन धारणांचा  उदय झाला आणि पुढे ह्यातून निसर्गवाद आणि स्वच्छंदवाद अश्या दोन विचारप्रण्याल्यांचा विकास  झाला निसर्गवाद निसर्गाशी आणि निसर्गज्ञानाशी बांधिलकी मागत होता तर स्वच्छन्दवाद स्वतःशी आणि स्वतःला प्राप्त झालेल्या सत्याशी ! ह्यातूनच दोन बांधिलक्यांचा उदय झाला त्या म्हणजे
१ विज्ञानबांधिलकी : जी विज्ञान प्रमाण मानत होती आणि जे विज्ञानाने सिद्ध केले आहे तेवढेच सत्य असा जिचा विश्वास होता जिचे प्रतिबिंब  अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामात आपणाला पडलेले दिसते दुर्देवाने भारतीय कलावंतांच्यावर ह्या बांधिलकीचा फार सखोल परिणाम झालाय असे वाटत नाही अपवाद फक्त दलित आणि मार्क्सवादी साहित्याचा आणि नाटकांचा आहे
२ आत्मबांधिलकी : जी व्यक्तीला प्रमाण मानून तिला प्राप्त होणारे सत्य प्रमाण मानत होती विशेषतः कलावंताचे कलात्मक सत्य आणि माणसाचे मानसिक सत्य  असे असते अशी तिची धारणा होती सगळे रोमँटिक साहित्य हे ह्या बांधिलकीतून जन्मते शेक्सपियर ,गडकरी , शिरवाडकर , कानेटकर ह्यांची नाटके ह्यातून जन्मलेली आहेत
ह्या दोन्ही बांधिलक्यांनी युरोपवर अनेक दशके राज्य केले . हे राज्य हलवले ते सामाजिक बांधिलकीने .! ते कसे ?
(क्रमशः )
कलावंताचे सामाजिक उत्तरदायित्व , बांधिलकी आणि चौथी नवता  श्रीधर तिळवे नाईक
भाग पाचवा
विज्ञानाच्या उदयानंतर यूरोपात सामाजिक शास्त्रे उदयाला आली राज्यशास्त्र , अर्थशास्त्र , इतिहास , समाजशास्त्राचा उदय झाला ह्यांनी ज्ञानकेंद्रित समाजरचनेचा स्वीकार केला आणि समाजाचे व माणसाचे शास्त्रीय विश्लेषण शक्य आहे ही भूमिका स्वीकारून आपला आपला अभ्यास मांडायला सुरवात केली ह्यातून चार विचारप्रणाल्यांचा उदय झाला
१ लोकशाहीकेंद्री व्यक्तिनिष्ठ  भांडवलशाही प्रमाण मानणारी उदारमतवादी
२ समाजवादी
३ साम्यवाद
४  लोकशाही समाजवादी डेमोक्रेटिक सोशॅलिझम
पहिली लोकशाहीला प्रमाण मानणारी , व्यक्तीस्वातंत्र्य मानणारी , मला तुझी भूमिका पटत नाही पण तुला तुझी भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे असा उदारपणा स्वीकारणारी आणि कलावंतांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य पूर्णपणे मान्य करणारी होती तिने रोमँटिसिझमचा कलेसाठी कला हा अजेंडा स्वीकारला पण त्या अजेंडाने लोकशाही चौकटीत काम करावे अशी अपेक्षा ठेवली कलावंताचे मोकाट स्वातंत्र्य चुकीच्या पद्धतीने वापरले जाऊ नये म्हणून त्यांना लिबरल सेन्सॉरशिप मान्य होती मात्र अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये हेही त्यांचे धोरण होते म्हणजेच कलावंताने आत्मबांधीलकी मानावी पण ती इतकीही ताणू नये कि त्यामुळे लोकशाहीच धोक्यात येईल अशी ही भूमिका होती


दुसरी  विचारप्रणाली ही  रॉजर बेकनने मांडली  ती प्रचंड ज्ञानकेंद्रित होती !तिचा व्यक्तिवादावर विश्वास न्हवता  माणूस हा समाजाचा एक भाग आहे आणि तो जो काही आहे तो समाजामुळे असतो असा त्यांचा ठाम विश्वास होता त्यांना भांडवलशाही अमान्य होती आणि तिला रिप्लेस करून त्याजागी समाजवादी अर्थरचना आणली पाहिजे ह्याविषयी ती आग्रही होती तिचा परिवर्तनावर आणि प्रगतीवर विश्वास होता आणि ती समाजवादाकडे भांडवलशाहीनंतरचा सामाजिक टप्पा म्हणून पहात होती  उत्पादनाची साधने समाजाच्या मालकीची असावीत असे तिला वाटत होते . सुरवातीला तिचे सारे लक्ष्य ज्ञानाकडे असल्याने तिच्यात कलेचा फार विचार झाला नाही पण हळूहळू कलेचा समाजावर प्रचंड परिणाम होतोय हे लक्ष्यात येऊन तिने  कलेला सामाजिक परिवर्तनाचे हत्यार समजायला सुरवात केली. ह्या विचारसरणीने सामाजिक  बांधिलकीची संकल्पना प्रथम स्पष्टपणे मांडली तुम परचम लहरना साथी मै गीत गाऊंगा अशी भूमिका कलावंताने घ्यावी अशी तिची अपेक्षा होती भांडवलशाही नष्ट केल्यावर लोकशाही आणायची कि हुकूमशाही आणायची ह्याबाबत ती गोंधळलेली होती हा गोंधळ नष्ट केला तो साम्यवादी विचारप्रणालीने !


तिसरी साम्यवादी विचारप्रणाली मांडली कार्ल मार्क्स आणि एंगल्सने आणि पुढे लेनिन माओने  ! तिने जवळ जवळ समाजवादी  विचारप्रणालीला रिप्लेस  केले मार्क्सने तिला नाव दिले  शास्त्रीय समाजवाद ! हात आणि हत्यार ह्यांच्यावर तिचा   विश्वास असल्याने कलावंताचे हात आणि कला ही त्याचे हत्यार हे समाजवादासाठीच  राबले पाहिजे असा त्यांचा विचार होता तुम परचम लहराना साथी मै गीत गाऊंगा हे त्यांना मान्य न्हवते त्यांच्या मते कलावंताने फक्त गाणे गाऊ नये तर परिवर्तनाचा झेंडा हातात घेऊन प्रत्यक्षात प्रोलिटरीयत वर्गाकडून युद्धात उतरावे . त्यांनी बांधिलकीचे रूपांतर सामीलकीत केले ज्याची चर्चा मी सुरवातीला केली  ही एक प्रयोगशाळा होती ज्यात नवीन माणूस आणि नवा कलावन्त तयार केला जाणार होता . ती फेल गेली आणि स्टॅलिनच्या राजवटीने ते स्पष्ट केले

ह्या तिन्ही विचारप्रणालींचे सांगोपांग विश्लेषण करून त्यातील चांगले विकसित करून चौथी विचारप्रणाली पुढे आली ती म्हणजे लोकशाही समाजवाद  ! . विवेकानंद , गांधी , नेहरू , मानवेंद्रनाथ रॉय , आंबेडकर , लोहिया  हे सर्वच ह्या विचारसरणीचे होते त्यांना सामीलकी अमान्य होती साम्यवाद अमान्य होता . त्यांना पहिल्या विचारसरणीतला भांडवलवाद अमान्य होता . त्यांनी पहिल्या दोन विचारसरणीचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय लोकशाही समाजवादाचे आपले आपले मॉडेल तयार केले त्यांनी ''कलेसाठी कला हा अजेंडा स्वीकारावा पण त्या अजेंडाने लोकशाही चौकटीत काम करावे  मोकाट स्वातंत्र्य चुकीच्या पद्धतीने वापरले जाऊ नये म्हणून  लिबरल सेन्सॉरशिप असावी  मात्र अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये  कलावंताने आत्मबांधीलकी मानावी पण ती इतकीही ताणू नये कि त्यामुळे लोकशाही समाजवादच धोक्यात येईल ''अशी  भूमिका घेतली  हिला मी मिश्र सामाजिक बांधिलकी म्हणतो कारण मिश्र अर्थव्यवस्थेप्रमाणे हीही मिश्र व्यवस्था  होती . १९९० पर्यंत भारतात ही मिश्र बांधिलकी पॉप्युलर होती पण ह्या बांधिलकीला पहिला हादरा दिला तो इस्लामिक पुनर्जीवनवाद्यांनी ! त्यांनी जगभर लोकशाही समाजवादातला लिबरलनेस धुडकावून न्हेत पुन्हा एकदा शरीयतवादाचे पुनर्जीवन केले आणि अनेक मुस्लिमप्रधान राष्ट्रात तो लागू केला आणि कलावंतांच्यावर सामीलकी आणि सक्ती लादायला सुरवात केली . त्यातूनच तस्लिमा नसरीनचे प्रकरण घडले कलेच्या इतिहासात अनेकदा बांधिलकीच्या नावाने सक्ती लादली गेली आहे त्याचे प्रमाण ह्यानंतर वाढत गेले काहीवेळा मुस्लिम अनुनयामुळे  डबल स्टॅण्डर्ड उदयाला आले म्हणजे सलमान रश्दीच्या सटेनिक व्हर्सेसवर बंदी घालणारा भारत हा एकमेव देश ठरला आणि मग जो न्याय मुस्लिमांना तो आम्हाला का नाही असे म्हणत बाकीचे धार्मिक सक्तीवादी लोक पुढे आले आणि काही हिंदूंनी अतिरेकाची वाट पकडत हिंदू हा अंतिमतः निगमिकच धर्म आहे हे सिद्ध करण्याचा जणू चंगच बांधला संभाजी ब्रिग्रेडचा अतिवाद त्यातून जन्माला आला . गोविंद पानसरेंसारखे विचारवंत मारले जाऊ लागले तोंडाला काळे फासण्याचे प्रकार वाढले मी लेखक नाही असे सांगण्याची वेळ लेखकांच्यावर आली . धार्मिक सक्तीला शरण जाण्याची ही मानसिकता मतांच्या राजकारणातून जन्मली आणि लोकशाही हा दहशतवादाचा बुरखा होणार का असा प्रश्न निर्माण झाला ह्याला जबाबदार कोण होते ?धर्मवादी बनून मत देणारे मतदार कि धर्माचे राजकारण करणारे राजकारणी ? माझ्या मते दोघेही ! लोकशाहीत जितकी जबाबदारी राजकारण्यांच्यावर  असते तितकीच मत दारांवरही ! ह्याची सुरवात मुस्लिम मतदारांनी केली ही वस्तुस्थिती अनेक तथाकथित पुरोगामी लोकांनी सुरवातीपासूनच ह्याला आळा घालण्याऐवजी उलट ह्या मुस्लिम लांगूलचालनाचे प्रमोशन केले ही वस्तुस्थिती ! लोकशाही समाजवाद्यांनी सुरवातीपासूनच कडक सेक्युलर भूमिका घेतली असती तर हे घडलेच नसते पण मतांसाठी लाळ टपकवणाऱ्या ह्या लोकांनी प्रथम शाहबानो प्रकरणात व नंतर रश्दी प्रकरणात मुस्लिम अतिरेकापुढे लोटांगण घातले ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला संपूर्ण शैव व हिंदू मतदार सेक्युलरवादाबाबत निगेटिव्ह बनत गेला सेक्युलरवाद म्हणजे अल्पसंख्यांक लोकांचे लाड असे समीकरण हिंदूंच्या डोक्यात गेले आणि त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी ह्या दोघांच्याकडे पाठ फिरवायला सुरवात केली ह्याचा पुरेपूर फायदा संधीची वाट बघत असलेल्या वैदिकांनी आणि त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप ह्या दोन संघटनांनी उठवला आणि आज अवस्था अशी आहे कि भाजप पूर्ण बहुमत घेऊन सत्तेवर आला आहे . सुदैवाने सरकारचे नेतृत्व मूळ शैव असलेल्या नरेंद्र मोदींच्याकडे आहे पण त्यांचे वैदिकीकरण व ब्राह्मणीकरण होऊन ते धार्मिक सक्ती लादू पाहणाऱ्या हातांचे बाहुले होणारच नाहीत ह्याची कसलीही खात्री नाही गुजरातमधल्या दंगलीत हे घडले आहे आणि ह्यापूर्वीही इतिहासात  मूळ शैव असणाऱ्या शंकराचार्यांचे ब्राह्मणीकरण झालेले उदाहरण मौजूद आहे त्यामुळे मोदींचा शंकराचार्य होणारच नाही ह्याची खात्री नाही अनेकदा शैवांनी हिंदू धर्मात प्रवेश करून स्वतःच्या विवेकाची हत्या केलेली आहे मोदींच्या विवेकाची हत्या होणारच नाही ह्याची काय खात्री ? मोदींना आपण भाजपमध्ये राहून देश बदलू असे वाटते काही कम्म्युनिस्टांनाही काँग्रेसमध्ये राहून आपण हे करू असे वाटायचे तसेच हे आहे पण हे सहजासहजी शक्य नाही ज्यादिवशी मोदींची निवडणुका जिंकण्याची क्षमता संपेल त्यादिवशी मोदींना हटवले जाईल आणि त्यांच्याजागी एक ब्राह्मण्यवादी नेता आणला जाईल असा माझा अंदाज आहे तसे झाले तर कलावंतांच्यावरची सक्ती वाढत जाईल असा माझा अंदाज आहे हे तसेच आहे जसे शंकराचार्यांचे होते शंकराचार्यांच्या भारतविजयाचा आणि लोकप्रियतेचा फायदा पुरेपूर उठवून वैदिकांनी स्वतःला पॉप्युलर करून घेतले आणि मग सर्व मठात स्वतःची माणसे आणून वैदिक धर्माचे व ब्राह्मणी स्मृतींचे पुनर्जीवन केले . मोदी हे भाजपचे नव्या युगाचे शंकराचार्य आहेत ते शैव राहतात कि शंकराचार्यांच्याप्रमाणे वैदिक ब्राह्मणी होतात हा कळीचा राजकीय प्रश्न आहे गांधी नामक काश्मिरी शैव घराण्याने सेक्युलॅरिझम नीट राबवला नाही आणि मोदींची तर ती इच्छाच दिसत नाही ही एक विलक्षण परिस्थिती आहे आणि तिच्यातून काय निर्माण होईल हे कुणालाच माहीत नाही एक शैवाचार्य म्हणून ह्या दोघांनी माझी विलक्षण गोची केली आहे आणि ही गोची कदाचित समस्त भारतीयांची असू शकते .
अश्या पार्श्वभूमीवर कलावंतांनी काय करायचे तर जो आपल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला पाठिंबा देईल त्याला पाठिंबा द्यायचा आणि जो आपल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला संरक्षण देणार नाही त्याचा पाडाव करायचा येत्या चार वर्षात ह्या संदर्भातील चित्र स्पष्ट होईलच आणि येत्या लोकसभा निवडणुकीत काय करायचे तेही स्पष्ट होईल . असो . आता आपण पुढच्या संकल्पनेकडे वळू .
 (क्रमशः )
कलावंताचे सामाजिक उत्तरदायित्व , बांधिलकी आणि चौथी नवता  श्रीधर तिळवे नाईक
भाग सहावा 
सामाजिक बांधिलकीपुढील ही संकल्पना आहे सामाजिक जबाबदारी ! सोशल रिस्पॉन्सिबिलिटी !सामाजिक बांधिलकी ही विचारप्रणाल्यानी जन्माला घातलेली संकल्पना आहे तर सामाजिक जबाबदारी ही संकल्पना प्रतिसृष्टीने !ह्या  प्रतिसृष्टीने जेव्हा तंत्रज्ञान जन्माला घातले तेव्हा ह्या   तंत्रज्ञानाच्या उदयानंतर मार्क्सने विश्लेषण केलेला कर्मठ व सनातनी भांडवलवाद मागे पडला आणि नव्या कार्पोरेटशाहीचा उदय झाला मार्क्सवादामुळे निर्माण झालेला साम्यवादी क्रांतीचा धोखा टाळण्यासाठी तिने एक नैतिक चौकट जन्माला घातली ती चौकट म्हणजे सामाजिक जबाबदारी  . प्रत्येक नागरिकाने समाजबाबत एक जबाबदारी  स्वतःच्या शिरावर घेऊन समाज आधिक कसा पुढे जाईल ते पाहणे म्हणजे सामाजिक जबाबदारी  . सामाजिक जबाबदारी  कार्पोरेटशाहीला नकार देत नाही पण ह्या कार्पोरेटशाहीने एका नैतिक चौकटीत राहूनच आणि समाजाने केलेले कायदे पाळूनच काम केले पाहिजे अशी मागणी करते आणि असे करणे म्हणजे सामाजिक जबाबदारी  निभावणे  असे मानते . सामाजिक जबाबदारी  प्रगती आणि विकास ह्या दोन्हीवर विश्वास ठेवते  सगळ्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ती  कटिबद्ध आहे स्वातंत्र्य समता बंधुता तिला  मान्य आहे आणि कार्पोरेटशाहीने ही जबाबदारी घ्यायला हवी त्यात योगदान द्यायला हवे असा तिचा  आग्रह आहे . कुठल्याच कार्पोरेटने मग ते अंबानींचे असो कि सहाराचं कि बिल गेट्सचे कि चायनाचे सरकारी असो स्वतःला समाजाच्या वर समजू नये असे ते परखडपणे सांगते . वर्णव्यवस्था , जातीव्यवस्था , अस्पृश्यता , रंगभेद , वंशवाद हे कार्पोरेटशाहीच्या कुठल्याच तत्वात बसत नसल्याने ती त्याला परखड विरोध करते ती माणसाची फक्त गुणवत्ता बघते आणि तिला प्रमोट करणे स्वतःची जबाबदारी मानते सर्व नागरिक कायद्यापुढे समान असल्याने न्यायाबाबतचा कसलाही फेव्हरिटिझ्म तिला मान्य नाही .
आजचा कलावन्त हा ह्या कार्पोरेटशाहीत वावरत असल्याने आणि तिच्यातच कलानिर्मिती करत असल्याने त्यानेही सामाजिक जबाबदारी पाळायला हवी असा सामाजिक जबाबदारीचा आग्रह आहे
(क्रमशः )

कलावंताचे सामाजिक उत्तरदायित्व , बांधिलकी आणि चौथी नवता  श्रीधर तिळवे नाईक

भाग सातवा 

अनेकांच्या डोक्यात हा प्रश्न आहे कि अकादमीने सामाजिक बांधिलकीऐवजी सामाजिक उत्तरदायित्व हा शब्द का वापरला ह्याचा स्पष्ट संबंध हा बदललेल्या नवीन सामाजिक परिस्थितीशी आहे सामाजिक बांधिलकी ही विचारप्रणाल्यानी जन्माला घातलेली संकल्पना आहे ह्या विचारप्रणाल्यांच्यातील स्वातंत्र्य समता बंधुता पुढे घेऊन जाणे ही सर्व कलावंताची नैतिक सामाजिक वा अध्यात्मिक जबाबदारी आहे असे मी मानतो मात्र ह्या जबाबदारीला थोडे अद्ययावत करणे हेही बदललेल्या जगात गरजेचे आहे असे मी मानतो .

काही वर्षांपूर्वी मी लेखकाची अध्यात्मिकता ही संकल्पना मांडली होती ह्या आध्यात्मिकतेचे  सामाजिक प्रकटीकरण  म्हणजे सामाजिक उत्तरदायित्व होय अध्यात्मिकतेत व सामाजिक उत्तरदायित्वात  सत्य अहिंसा अपरिग्रह अचौर्य संयमित कामवासना ह्यांच्याबाबतीतील आध्यत्मिक उत्तरदायित्व , स्वातंत्र्य , समता आणि बंधुता ह्यांच्याशी सामाजिक बांधिलकी आणि कार्पोरेटशाहीतील सामाजिक जबाबदारी ह्या सर्वांचा समावेश होतो.  ह्याशिवाय आत्मपरिवर्तनाचा समावेश होतो

सुहास एकसंबेकरला कोल्हापूरच्या कविता ह्या संग्रहासाठी मी एक टिपण दिले होते त्यात मी म्हंटले होते कि मी दोन्ही प्रकारचे परिवर्तन आवश्यक मानतो आत्मपरिवर्तन आणि सामाजिक परिवर्तन ! कुठलेही सामाजिक परिवर्तन आत्मपरिवर्तनाशिवाय शक्यच नाही लोकांना उपदेश द्यायचा आणि स्वतः कोरडे पाषाण राहायचे ह्याला काही अर्थ नाही स्वतः दारू सोडायची नाही आणि दुसऱ्याला दारू कशी वाईट आहे ह्याचा  उपदेश करायचा ह्याला काही अर्थ नाही तेव्हा ह्या दोन्ही परिवर्तनांचा समावेश सामाजिक उत्तरदायित्वात होतो आत्मबंधिलकी आणि सामाजिक बांधिलकी ह्या दोन्हीचा समतोल ठेवणे आवश्यक आहे असे ते मानते

तुम्ही म्हणाल कि आम्ही असे उत्तरदायित्व का बाळगावे अशी अध्यात्मिकता का पाळावी तर त्याला उत्तर असे कि मी निसर्ग युगाची चर्चा करतांना भाषेचे निर्माण कसे झाले ते सांगितले भाषा हीच मुळी सामाजिक आहे जेव्हा बुद्धही भाषेत दाखल होतो तेव्हा सामाजिक होतो मुक्ती /मोक्ष /निर्वाण भाषेत आणता  येत नाही कारण भाषेचा अंत झाल्याशिवाय ती मिळतच नाही जर बुद्धांची मुक्तांची ही तऱ्हा तर मग बाकींच्याविषयी काय बोलावे ?त्यामुळे आपण सत्याचा आग्रह धरलाच पाहिजे आणि जर तथाकथित बांधिलकी आणि सामीलकी मागणारे लोक जर बांधिलकी आणि सामीलकीच्या आडून सत्य लपवणार असतील तर आपले सत्य आपण त्यांना बाजूला सारून सांगितले पाहिजे सत्य सांगतांना हिंसेचा मार्ग सर्वस्वी वर्ज्य किंबहुना कला ही सत्य सांगण्याचा सर्वात अहिंसक मार्ग आहे जो सामान्य माणसापर्यंतही सहज पोहचतो आपण अचौर्य  अस्तेय पाळले पाहिजे कुणाचीही कलाकृती आपण चोरता कामा नये हा कटिंग पेस्टिंगचा जमाना आहे म्हणून हे आवर्जून सांगतो आहे आपण आपल्या कलेत बलात्कार कामुक दडपशाही ह्यांना निकराचा विरोध केला पाहिजे आणि त्याचबरोबर परिग्रहः इतकाही प्रमोट करू नये कि त्याची शिसारी यावी  कलेत श्रीमंतीचा सन्मान असावा पण तिने कुश्रीमंतीचा कैवार घेऊ नये पैश्यासाठी स्वतःची कला किती लेव्हलला जाऊन विकायची ह्याला लिमिट असावे आणि ते आपण सर्वांनी पाळावे परिग्रहासाठी स्वतःची कला नालायक माणसांच्या वा संस्थांच्या पायाशी रुजू करू नये किंवा कलेच्या नावाखाली कुणाला लुटू नये कलात्मक आध्यात्मिकतेचा हा पाया आहे आणि आपण तो सर्वांनीच जपला पाहिजे

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा तर आपण कट्टर पुरस्कार केलाच पाहिजे पण त्याचबरोबर आशयस्वातंत्र्यही मानले पाहिजे सर्व कलांना समान वागणूक दिली पाहिजे सर्व कलावंताची समान इज्जत केली पाहिजे आणि सर्वच कलावंतांना आणि माणसांना बंधू वा भगिनी प्रमाणे वागवले पाहिजे एखादा चुकत असेल तर त्याचे कान जरूर उपटावेत पण त्यात प्रेम असावे  जर भूमिका पटत नसेल तर वाद घालावा पण निदान कलावंतांनी तरी आपापसातले  वाद शक्यतो कोर्टात न्हेऊ नयेत

कार्पोरेटशाहीत तुमच्या कलेचे प्रॉडक्टमध्ये रूपांतर होणे अटळ आहे पण हे रूपांतर होते म्हणून स्वतःचे रूपांतर कमोडिटीत वा सेमिऑडिटींत करणे गरजेचे नाही बाजारात बसलोय म्हणून स्वतःच बाजार वा बाजारू व्हायचे ह्याला अर्थ नाही . आणि एक गोष्ट सर्वच तुम्हाला खरेदी करायला टपलेले असतात पण आपल्यातले काय विकायचे आणि काय विकायचे नाही हे ठरवण्याचा हक्क आपल्याकडे असतो योग्य ठिकाणी होकार द्या आणि योग्य ठिकाणी नकार द्या सामाजिक जबाबदारी आली तर हात झटकू नका पण सामाजिक जबाबदारीच्या नावाखाली वा झेंड्याखाली सत्वही विकू नका झेंडे अनेकदा कलेचा बळी मागतात सावध राहा आणि तेच करा जे तुम्हाला आतून पटलेले आहे

अध्यात्मिकता म्हणजे काही आकाशातील गोष्ट न्हवे ती इथे जगायची शैली आहे

विद्यार्थी बंधू भगिनींनो तुम्ही ज्या जगात जात आहात तिथे फिल्मी आणि टीव्ही कार्पोरेट्स तुमची वाट पहात आहेत त्यांच्यात राहून तुम्हाला सामाजिक उत्तरदायित्व निभावायचे आहे आणि पोटापाण्यापुरता पैसाही कमवायचा आहे हे साध्य करतांना तुमची तारांबळ उडेल पण घाबरून जाऊ नका हळूहळू तुमचा मध्य तुम्हालाच सापडेल काय करायचे आणि काय टाळायचे हे उमजेल पोटापाण्यासाठी तुम्हाला कमर्शियल काम करावे लागेल पण ते करतांना आपले सामाजिक उत्तरदायित्व विसरू नका शोषणाला उत्तेजन देणाऱ्या कलाकृतीत भाग घेऊ नका . वर्षभरात पांच कलाकृती कराव्या लागल्या तर त्यातील तीन पोटापाण्यासाठी करा आणि दोन स्वतःसाठी सामाजिक उत्तरदायित निभावणाऱ्या करा . जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल किंवा उत्तम बिझनेस वा नोकरी असेल व सामाजिक बांधिलकी कट्टरपणे निभवायची असेल तर पांचही कलाकृती सामाजिक उत्तरदायित्वाच्या करा आणि मेलो तरी सामाजिक उत्तरदायित्व अजिबात सोडणार नाही असे वाटत असेल तर .... तर मग उपाशीपोटी पाचच्या पाच सामाजिक उत्तरदायित्वाच्या करा तुम्ही उपाशी राहू शकता का ते पहा आणि स्वतःच्या कुवतीनुसारच काम करा उगाच कोणीतरी उपाशीपोटी करतो म्हणून आपणही तसे करू असा भ्रम नको
मला वाटते आजच्या दिवशी इतके पुरे !थांबतो !

श्रीधर तिळवे नाईक

(समाप्त )


















Comments

Popular posts from this blog