सौष्ठवला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून लेख चौथा चौथी नवता आणि चार भारत भाग १
श्रीधर तिळवे नाईक 


इंडियात चार भारत आहेत ही चौथ्या नवतेची सुरवातीपासून भूमिका आहे . हे चार भारत पुढीलप्रमाणे
१ मार्गी भारत
२ देशी भारत
३ पोटी भारत
४ जमाती भारत
मार्गी भारत

हा भारत शैव संस्कृतीत आकार घ्यायला लागला आणि नगरे निर्माण व्हायला लागली आणि मोहंजदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या उत्खननातून त्यांचे स्वरूपही स्पष्ट झाले ह्या नगरांची मार्गी संस्कृती नेमकी काय होती हे पुरेसे स्पष्ट झालेले नाही
पुढे वैदिकांनी विजय मिळवला खरा पण त्यांच्या नगरांचे खरे स्वरूप काय होते ते आजतागायत कळलेले नाही
पुढे आगमवादाने उचल खाल्ली आणि भारतातील पहिले साम्राज्य नंदानी उभे केले ज्याचे रूपांतर चंद्रगुप्त मौर्याने मौर्यसम्राज्यात केले पण चंद्रगुप्त येण्यापूर्वीच पाटलीपुत्र सारखी नगरे तयार झाली होती
नंतर वैदिकांनी वैष्णव नावाचा धर्म पुढे करत शैवांना गिळायला केली आणि नंतर शंकराचार्यांना पुढे टाकत बौद्ध आणि जैनांची वाट लावली नेमाडेंनी बौद्ध धम्म हा नागरकेंद्री असल्याने नष्ट झाला असे प्रमेय मांडले ज्याचे निवारण मी केले होते
ह्यानंतर आलेल्या इस्लामने तर  शैव बौद्ध जैन अशी संगळ्यांचीच वाट लावली आणि हे सगळे बॅकफूटवर गेले उरले फक्त ब्राह्मणांनी स्पॉन्सर केलेले वैष्णव , हिंदू , वैदिक आणि ब्राह्मणी धर्म इस्लामने नगर संस्कृती पुन्हा केंद्रावर आणली दिल्ली औरंगाबाद हैदराबाद आग्रा लखनौ ह्या सारख्या शहरांना मुस्लिम चेहरा दिला मराठ्यांना शहरे नीट उभा करता आली नाहीत कारण त्यांचा पिंडच देशी होता अपवाद बडोदे कोल्हापूर ग्वाल्हेर पुणे ह्यासारखी मोजकी शहरे आणि ही शहरे विकसित झाली कारण ती राजधानीची शहरे होती आरमार बुडवणाऱ्यांना शहरांचे महत्व कळणे कठीणच आजही शहरांची सर्वाधिक खिल्ली महाराष्ट्रात उडवली जाते हेही मराठी मानसिकतेला धरूनच आहे
पुढे इंग्रजांनी भारतात मुंबई कोलकत्ता मद्रास ह्यांना व्यावसायिक शहरे म्हणून विकसित करायला सुरवात केली मी पूर्वी पुण्याला ब्राह्मण सिटी कोल्हापूरला क्षत्रिय सिटी आणि मुंबईला वैश्य सिटी म्हणायचो कारण पुणे ब्राह्मणांनी तर कोल्हापूर मराठ्यांनी आणि मुंबई व्यापारी वैश्य इंग्रजांनी जन्माला घातलेत इंग्रजांच्या शहरांची प्रवृत्ती जितकी राजधानीची होती त्याहून अधिक व्यापारी होती पुढे ह्या शहरांचे रूपांतर महाशहरात झाले आणि नगरपालिका जाऊन महानगरपालिका आली .
नेमाडेंनी देशीयता मांडताना ह्या महाशहरांना चॅलेंज दिले आणि समस्त मराठ्यांचा आनंद गगनात मावेना कारण त्यांना असा कुणीतरी परंपरेचा जयघोष करणारा आणि महाशहरांना चॅलेंज देणारा हवाच होता ह्या महाशहरातला फालतूपणा दाखवणारा व त्यांना उथळ समजणारा भाऊ पाध्ये साहजिकच देशीवाद्यांनी डोक्यावर घेतला तर त्यातील कोंडी दाखवणारा नंतरचा अरुण कोल्हटकर देशीवादाला पूरकच होता पुढे अरुण कोल्हटकरांनीही आपली निष्ठा देशीवादाच्या पायांपाशी रुजू केली आणि अरुण कोल्हटकरांच्या डंका अधिक मोठेपणाने वाजला मग ''अरुण कोल्हटकरांच्या कविता'' ह्या संग्रहातील  ९०% कविता मार्गी असूनही ह्या  संग्रहातही देशीवाद शोधला गेला आणि ते इंग्रजीत लिहितात तेव्हा कसे पातळ होतात तेही इराणी ह्या कवितेच्या दोन भाषेतील तर्जुम्यांच्या साहाय्याने दाखवले गेले ह्यानंतर महाशहरी साहित्याची अधिकाधिक गोची करण्याचे धोरण सुरु झाले

राजीव गांधींच्या धोरणामुळे हळूहळू का होईना चिन्हसृष्टी अनालॉगस स्वरूपात का होईना अवतरायला लागली आणि मग बिल गेट्सने घडवलेली क्रांती भारतातही दाहवा खल झाली सॉफ्टवेर हॅडी झाले आणि मग इंटरनेटने सगळे जग एक जाळे बनवून टाकले आणि दुनिया बोटांवर नाचू लागली शहरांचे रूपांतर जालरात झाले आणि महाशहरांचे महाजालरात ! ही झगमगणारी जालजालणारी महाजालरे व जालरे  कलेत सादर करणे हे चौथ्या नवतेपुढचे फार मोठे आव्हान होते आम्ही ते स्वीकारले ह्या स्वीकारलेल्या आव्हानांचा पहिला हुंकार सौष्ठव होते
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
सौष्ठवला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून लेख चौथा चौथी नवता आणि चार भारत भाग २
श्रीधर तिळवे नाईक
सौष्ठव सुरु करण्याआधीच अ डॉ हॉ कॉ बा ना सु ना निम्म्याहून अधिक लिहून झाली होती आणि लिखाण चालू होते निर्वस्तुवादी कविता किंवा बांधकाम चालू आहे उत्तरार्ध सारख्या कविता लिहून झाल्या होत्या आणि लिखाण सुरु होते आणि हे सर्व  लिहीत असतांनाच मार्गी म्हणजे काय आणि देशी म्हणजे काय हे प्रश्न  होते पॉप्युलर प्रकाशनाने कोल्हापुरात आयोजित केलेल्या चर्चेची धुळवड कोल्हापुरात उडाली होती आणि आमचे मित्र दिलीप धोंडो कुलकर्णी ह्यांच्या प्रश्नांची नीट उत्तरे नेमाडेंनी दिली कि नाही ह्याची चर्चा मार्क्सवाद्यांच्यात  चालू होती ह्या चर्चेचे पुढे पुस्तक झाले खरे पण त्याने मार्गी काय आणि देशी काय हे पुरेसे स्पष्ट न होताच नेमाडेंना निर्विवाद विजय बहाल करण्यात आला होता आणि तो गो मा पवार आणि म द हातकणंगलेकर ह्यांनी बहाल केला होता  माझ्या मते ह्या चर्चेत नेमाडेंना कुणी नीट क्रॉस एक्झाम केलेच नाही सर्वात वाईट म्हणजे ह्या चर्चासत्रानंतर काही वर्षातच मार्क्सवाद्यांनीच नेमाडेंच्यापुढे गुडघे टेकले आणि पुढे दलितांनीही ! आणि त्याची सुरवात ह्या चर्चासत्रात झाली होती .  साहजिकच लोकवाङ्मयगृहातून देशीवादाला प्रोत्साहनच मिळाले आणि लढाई पूर्ण संपली. ह्याला जबाबदार रशियातील मार्क्सवादाचा अस्त होता वास्तविक ह्या अस्ताची चाहूल आधीच दिसत होती (माझा डेकॅथलॉन रिअल हा कवितासंग्रह ह्या काळातल्या मार्क्सवादाच्या आणि परिवर्तवाद्यांच्या पडझडीचा संग्रह आहे  ) पण भारतीय कम्युनिस्ट झोपलेलेच राहिले आणि प्रत्यक्षात जेव्हा हे घडले तेव्हा तो शॉक होता
ह्या सर्व चर्चासत्रात नेमाडे ह्यांची एक स्ट्रॅटेजी होती जे मराठीने  विकसित केले आहे ते देशी आणि जे परदेशी वा उर्दू  संस्कृत आहे ते उधार घेतले कि त्याचे देशीकरणाच्या नावाखाली समर्थन ! ह्या स्ट्रॅटेजीच्या आधारे जगातल्या प्रत्येक गोष्टीला देशी म्हणता येते पण जेव्हा देशीकरण होते तेव्हा ज्याचे देशीकरण होते त्याचे काय?  ते तर मार्गीच असते ना कि तुम्ही देशीकरण केले कि ते देशी होते ? म्हणजे मुक्तछंद तम्ही आपनवला कि तो देशी होतो का ?किंवा गझल किंवा सॉनेट ? किंवा अस्तित्ववाद ?किंवा देशीवाद ?किंवा टूथब्रशपासून प्लास्टिकपर्यंत ? सिमेंटपासून टीव्हीपर्यंत ?किंवा कमोडपासून ऍलोपथीपर्यंत ? किंवा कॉम्प्युटरपासून फेसबुकपर्यंत ? सगळं देशी होतं ? केवळ तुम्ही म्हणता म्हणून ? तुमच्या रोजच्या जगण्यातल्या नव्वद टक्के वस्तू देशीकरण करून येत असतील तर तुमची संस्कृती कितपत देशी ? फेसबुकवर मराठीत लिहिले म्हणून फेसबुक देशी ? आणि असेल तर कितपत देशी ?आणि इंग्रजीचे काय ? इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या घटनेचे काय ? कि घटनेचे इंग्लिश देशी ? तुम्ही म्हणता म्हणून ?

बरं तुमची महान टिकलेली देशी वस्तू कोणती तर वर्णव्यवस्था ,  जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता ! तिला आम्ही स्वीकारायचे काय ? आणि स्वीकारून काय करायचे ? जगभर निर्यात करायची ?

वस्तुस्थिती अशी आहे कि धम्म आणि धर्म सोडले तर विज्ञान , तंत्रज्ञान आणि आता चिन्हविज्ञान ह्यातील किमान ९०% भाग देशी संस्कृतीतला नाही आहे आणि तो स्वीकारावा लागतो म्हणजेच मार्गीपणा आणि मार्गीयता स्वीकारावी लागते . मार्गीकरण स्वीकारावे लागते आणि म्हणुनच मार्गी आणि देशी ह्यांच्यातले जे जे उत्तम आहे जागतिक आणि वैज्ञानिक कसोटीला उतरणारे आहे त्यांचा सन्मान करून त्यांच्याविषयी सम्यक विवेक बाळगुन त्याला आपल्या जगण्यात स्वीकारावे लागते आणि कलेत त्याचा अविष्कार घडवावा लागतो हा सम्यक विवेक हे सम्यक भान म्हणजे चौथी नवता !

श्रीधर तिळवे नाईक
*********************************************************८

सौष्ठवला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून लेख चौथा चौथी नवता आणि चार भारत भाग ३
श्रीधर तिळवे नाईक
माझे , चौथ्या नवतेचे आणि सौष्ठवचे सर्वात मोठे सुदैव (किंवा दुर्देवं ) कोणतं ?

कुठल्याही नवतेला जशी पूर्वी युरोप अमेरिकेची मॉडेल्स उपलब्ध होती म्हणजे मराठी प्रबोधनात्मक नवतेपुढे थॉमस मान , फ्रान्सिस बेकन (ह्याचा खरेतर आधिक प्रभाव पडायला हवा होता )वैग्रेंची रॅशनल विचारसरणी किंवा रोमँटिक नवतेपुढे  व्हॉल्टेर , स्पिनींझो ह्यांची रोमँटिक विचारसरणी आणि शेक्सपिअर  बायनेर शेली गौथे ह्यांच्या कविता व साहित्य वा आधुनिक नवतेपुढे बॉदलेर , रिल्के , इलियट ह्यांचे साहित्य किंवा देशीवाद्यांपुढे अमेरिकन नेटिविस्ट व फ्रेंचमधील व लॅटिन अमेरिकेमधील साहित्य तसा कोणताही आयता साचा माझ्यापुढे न्हवता त्यामुळे शैवाचार्य म्हणून लाभलेल्या शैव परंपरेचं उत्खनन करत बौद्ध जैन ते थेट जे कृष्णमूर्ती ओशो , गांधी आंबेडकर  ह्यांच्यापर्यंत उपसाउपशी करत आणि स्वानुभवांना प्रमाण मानत वाटचाल करावी लागणे अटळ होते अमेरिकन व युरोपिअन उत्तराधुनिक साचे चौथ्या नवतेसाठी कामाचे न्हवते पण त्यातून काही नव्या पाऊलखुणा सापडण्याचा शक्यता होत्या पण इंटरनेट आलेले न्हवते त्यामुळे तो मार्ग तितकासा खुला न्हवता अश्यावेळी तुम्ही तुमचे मार्गी आणि देशी साचे पुन्हा नव्याने घासून ते वितळवून वापरता येतील का हे पाहत राहता.  मी हे केले .

मराठीतला प्रत्येक अव्हेलेबल फॉर्म मी अनेक पद्धतीने वितळवत नव्या प्रकारे वापरला मग तो अभंग असो कि गाथा सप्तशतीतले तुकडे असो कि गझल असो कि सॉनेटस असो कि पादाकुलक असो जिथे जिथे फॉर्म लवचिक करण्याची शक्यता होती तिथे तिथे मी फॉर्म लवचिक केला ह्याशिवाय स्वैर छंद आणि मुक्त छंदाचा युरोअमेरिकन फॉर्म होताच जो मराठीने वापरला होता त्यालाही मी भारतातल्या संस्कृत भाषेतल्या श्लोकातून दिसणाऱ्या वर्णनात्मक ढाच्यात वितळवले आणि नवे रूप दिले  ह्याशिवाय माझ्या आधीच्या पिढीतल्या लोकांनी मुक्तछंदात निर्माण केलेले फॉर्म चौथ्या नवतेत वितळवून ते समकालीन केले निर्वस्तुवादीसारखे काही नवे फॉर्मही निर्माण केले नागेशी बांदिवडे आणि कोल्हापुरातून उगवलेल्या  माझ्यासारखेला हे सहज शक्य होते मला उत्सुकता होती मुंबईत जन्मलेला आणि वाढलेला  कवी काय करेल हा सस्पेन्स संपवला नव्वदोत्तरी पिढीतील मन्या जोशीने अभिजित देशपांडेने त्याची ओळख करून दिली मन्या माझा अपोझिट ध्रुव होता मी गावरान तो पूर्ण कास्मो मी गावरान आणि व्यापारी संस्कृतीत वाढलेलो तर मन्या मुंबईच्या नवश्रीमंत उच्चंमध्यमवर्गात ! त्याच्या कवितेत त्याच्या वर्गाची पॉश ओळख होती मला वाटले होते हेमंत माझ्या मार्गाने जाईल कारण तो माझ्यासारखाच शहापूरातून उगवला होता पण तो गेला मनोजच्या वाटेने कारण त्याचा बदललेला वर्ग ! पुढे अनेकजण मनोज आणि हेमंतच्या वाटेने गेले ह्याचवेळी पुण्यातून सलील वाघ उगवला आणि त्याने पुण्याचे जालर म्हणून सादरीकरण सुरु केले जे अभूतपूर्व होते ही चौथ्या नवतेची तिसरी वाट होती ह्या वाटेवर सचिन केतकर आणि निवि कुलकर्णी अत्यंत यशस्वीपणे वाटचाल करू लागले वास्तविक सचिन माझ्यासारखाच कोल्हापूरसारख्या असलेल्या बडोदा शहरातून उगवला होता पण तरीही त्याने जी वाट सुरवातीला पकडली ती सलील सारखी होती पण चमत्कारिकरित्या तीही वेगळी होऊन शेवटी मनोजला जाऊन भिडली आणि सलील वाघापेक्षा वेगळी झाली (कदाचित प्राध्यापकांचे नव्या अर्थव्यवस्थेत जे वर्गांतर झाले (म्हणजे मध्यम वर्गाकडून उच्चं नवमध्यमवर्ग ) त्यामुळेही असेल ) कॉस्मोत न जगता  कास्मो होण्याची ही शिकस्त माझ्यासाठी कायमच कोडे होती आणि आहे . महाजालरातून  उगवलेली संजीव खांडेकरांची कविता मात्र आश्चर्यकारक आहे ती ह्यासाठी कि जे काम मनोज जोशीने तरुणपणी करायला हवे होते ते उत्तरभांडवलशाहीचे बाजारीकरण पेलण्याचे काम संजीव खांडेकरांनी पोस्टमार्क्सिस्ट पद्धतीने केले .

आम्ही पकडलेली जालऱे आणि महाजालरे काय दर्जाची होती ह्याचा फैसला नवीन महाजालरी  पिढीने करावा  नितीन वाघ , अजित अभंग , संतोष पवार, स्वप्नील शेळके  प्रणव सुखदेव , ओंकार कुलकर्णी , शर्मिला रानडे, संदीप देशपांडे ह्या सारख्या सर्व अव्वल दर्जाच्या कवींनी वा कादंबरीकारांनी कोणती कविता स्वीकारली आणि कोणती  कविता साईडलाईन केली  आणि का केली ह्याची चर्चा त्यांच्या पिढीनेच करायची आहे आणि ही निवड आपण आनंदाने  मान्य करावी  कारण मला नेहमीच वाटते कि योग्यता आपल्या हातात असते आणि पात्रता इतरांनी ठरवायची असते .

माझ्यापुढचे प्रश्न असे होते   कि जालरांचा आणि महाजालरांचा महाजालपणा आम्हाला  किती पेलला ?एक संक्रमण आमच्या डोळ्यादेखत झाले ते सर्व अंगांनी आम्ही पेलले का कि चौथ्या नवतेची कलई करून आम्ही दुसऱ्या नवतेची आधुनिकतेची भांडीच  घासली ? मनोज जोशीसारखा कवी पुढे भेलकांडत न वाढता अरुंद  का होत गेला ? कि मनोजची वाट स्वभावानेच अरुंद आहे ? मनोज जोशी अरुंद होत असताना  गझल अंक काढणारा  हेमंत दिवटे पुढे कसा सरकत गेला ? त्याच्या ह्या सरकण्याचे स्वरूप सपाट आहे कि
असपाट आहे ? अडचणींत आणणारे प्रश्न अनेकांना नकोसे वाटतात  पण असले प्रश्न मला कायमच पडायचे आणि इतरांनाही ते पडत असतील
साठोत्तरी कवितेत नामदेव ढसाळ हा एकमेव कवी असा होता ज्याने मुंबई (हे महाशहर) रांड आहे म्हणत  आपल्या कवितेत तिला सवाष्ण करत नांदवली . आम्ही पुणे , मुंबई ही महाजालरे अशी नांदवली ? कि आम्ही चौथ्या नवतेची फक्त ऍक्टिंग केली ?
श्रीधर तिळवे नाईक
***************************************************************************
सौष्ठवला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून लेख चौथा चौथी नवता आणि चार भारत भाग ४

श्रीधर तिळवे नाईक

भालचंद्र नेमाडेंनी मुंबई विद्यापीठात मी पीचडी करत असतांना मला एकदा ''तू गावचा असून हे काय करतो आहेस ?'' असे विचारले होते . माझे उत्तर असे होते कि मी ज्या गावातून आलोय त्या गावाचे भले करण्याचा मार्ग चिन्हसृष्टीकरणातून जात असल्याने मी हे करतो आहे . चौथी नवता म्हणजे मार्गी भारत हे समीकरण मी कधीही मांडले नाही उलट गावरान आणि कॉस्मो अश्या दोन्ही संवेदनशीलता एकत्र आल्या तेव्हा तश्या येऊ दिल्या कला ही खुली ठेवली तरच ती खुलते आणि प्रयोगांना नकार न देता हे करता येते असे मला वाटते

आज माझ्या गावात जवळ जवळ सगळ्यांच्याकडेच संगणक आणि दुचाकी वा चारचाकी आहेत आणि हे कधी ना कधी घडणार ह्याचा अंदाज मी फ्यूचरिस्ट असल्याने मला आधीच आला होता त्यामुळेच अरुण व भुजंगने मला कितीही उलटी गंगा पाजायचा पाजायचा प्रयत्न केला तरी मी त्यांना आज ना उद्या तुम्हालाच चौथ्या नवतेची गंगा प्यावी लागेल असे सांगत राहिलो त्यांना शेवटपर्यंत हे पटले नाही आणि जागतिकीकरणाला ते ठामपणे विरोध करत राहिले

इंडियातील जो देशी भारत आहे तो अतिशय गुंतागुंतीचा आहे आणि नेमाडेंनी त्याचा कैवार सातत्याने घेतला आहे साहजिकच हा भारत नेमाडेंचे शक्तिस्थळ आहे  . जवळ जवळ १८५० पर्यंत तो शेतीप्रधान होता आणि शेतीवर आधारित अशी अलुतेदार बलुतेदार ह्यांची सांगड त्याने गावाशी घातली होती प्रश्न असा आहे कि त्याचे अंतिम स्वरूप काय आहे ? एकवेळ उद्योगधंदे नष्ट होतील पण शेती नष्ट होणार नाही जोवर अन्नाचे रसायनीकरण होऊन कृत्रिम अन्न तयार होत नाही तोवर ! अ डॉ हॉ कॉ बा ना सु नात  मी पृथ्वीवर शेवटी कृत्रिम अन्नाच्या टॅब्लेट्स तयार होतात असे दाखवले होते . पण हे होत नाही तोवर शेतीच महत्वाची हे तर उघडच आहे . मग प्रश्न असा कि शेतीचा अंतिम ताबा कोणाकडे ? निसर्गिय युगात सर्वच सिव्हिलायझेशनमध्ये हा ताबा राजाकडे वा सरदारांकडे होता असे दिसते जिथे प्रत्यक्ष ताबा न्हवता तिथे अप्रत्यक्ष ताबा होता असे दिसते भारतच कदाचित अपवाद कारण भारतात ह्या काळात उदयाला आलेली गणशाही ! आणि तिने निर्माण केलेली गांवरचना ! हळूहळू तिचा ताबा त्या त्या गावातील क्षत्रपांकडे गेला असे दिसते . विश्वीय युगात कपिल , महावीर आणि बुद्ध ह्यांनी ह्या भारताचे काय केले ? ह्याचे पुरेसे चित्र जोवर आपण देत नाही तोवर देशी भारताचा इतिहास अंधूकच राहणार
एक गोष्ट नक्की ह्या शेतीप्रधान भारताचे प्रश्न उद्योगप्रधान भारताच्या प्रश्नापेक्षा निश्चितच वेगळे होते
नेमाडेंनी ह्या शेतीप्रधान समाजाचे चित्रण हिंदूत केले आहे आणि अलुतेदार बलुतेदारांचेही ! मात्र हे करताना त्यांच्या घरातला शासक समूह पुन्हा पुन्हा उभारतो आणि ते नैसर्गिक आहे कारण ते ह्या शासक समूहात जन्मले आहेत आणि वाढले आहेत

महानगरात जसा मनोज जोशींसारख्यांचा शासक समूह आहे तसाच गावातला हा नेमाडेंचा हा शासक समूह आहे प्रश्न असा आहे कि ह्या शासक समूहाचे चित्रण संपूर्ण देशी भारताचे चित्रण मानता येईल का ? चौथी नवता ह्याचे उत्तर ठामपणे नाही असे देते .






नगरप्रधान  , शहरप्रधान , महानगरप्रधान , महाशहरप्रधान , जालप्रधान , महाजालप्रधान
देशी भारत गांवप्रधान गांवप्रधान , कस्बाप्रधान , तालुकाप्रधान ,
जमाती भारत जंगलप्रधान
पोटी भारत वरील भारतातील
दास पोटियता गुलाम व दास
स्थानसंतुष्ट पोटियता
असंतुष्ट पोटियता
अराजकी  पोटियता
स्वतंत्रवादी पोटियता

Comments

Popular posts from this blog