गडकरी, संभाजी आणि राजसंन्यास श्रीधर तिळवे नाईक
चिन्हसृष्टीयतेचा सर्वात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे चिन्हसृष्टीयतेत कधीकधी चिन्ह , प्रतिमा , प्रतीक आणि ब्रँड ह्यांना मिळणारे अवाजवी महत्व , त्यांचे होणारे अपवाचन आणि त्यातून मुद्दाम घडवून आणि घडून जाणाऱ्या अपकृती . राम गणेश गडकरी ह्यांचा राजसंन्यासमधील लिखाणामुळे हलवला गेलेला पुतळा हे त्याचे उत्तम उदाहरण होय . प्रतिसृष्टीत उत्तराधुनिकतेने इतिहास हे एक रचित असते अशी मांडणी केली आणि इतिहास हा कायमच उघडा (ओपन ) असतो अशी मांडणी केली . ह्या मांडणीमुळे इतिहास हवा तसा रचू पाहण्याऱ्यांना सैद्धांतिक आधार मिळाला ह्याला प्रतिशह मिळाला तो चौथ्या नवतेकडून ! पण परंपरेत अडकलेल्या उत्तराधुनिक मानसिकतेने इतिहासातील व्यक्तींना प्रतीक बनवून अस्मितेचे राजकारण खेळायला सुरवात केली आणि पुराव्यांचे उत्तर पुराव्यांनी द्यायचे सोडून अपकृती करायलाच सुरवात केली
वास्तविक कुठलाही कलावंत त्याला उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे ऐतिहासिक नाटक लिहितो आणि इतिहासकारांच्या प्रमाणे काही वेळा ऐत्याहासिक चुकाही करतो . शेक्सपिअरने ज्युलियस सीझर , अँटनी , क्लिओपात्रा ह्यांच्याबाबत अनेक ऐत्याहासिक चुका केल्या आहेत पण कुणी शेक्सपिअरचे पुतळे उखडत नाही कि हलवत नाही . त्यांच्याकडे नाटक म्हणूनच पाहिले जाते खाडिलकर आणि गडकरी ह्यांच्या ऐतिहासिक नाटकांच्याकडे आपण नाटक म्हणून म्हणूनच पाहायला हवे अन्यथा एक दिवस असा येईल कि नाटककार ऐतिहासिक नाटके लिहिणे बंद करतील .
साहित्याच्या प्रवाहात इतिहासाच्या प्रवाहाप्रमाणे नेहमीच ऐतिहासिक विषय अपडेट होत असतात . गडकऱ्यांच्या संभाजीला अपडेट करत पुढे वसंत कानेटकरांनी इथे ओशाळला मृत्यू हे नाटक लिहिलेच की . गडकऱ्यांनी राजसंन्यास ह्या नाटकात तत्कालीन स्वच्छन्दवादी प्रवृत्तीला अनुसरुन एक खास स्वछंदी ऐतिहासिक भाषा विकसित केली होती जिचा प्रभाव शिवाजी सावंत ह्यांची मृत्युंजय रणजित देसाई ह्यांची स्वामी खांडेकरांची ययाती आणि वसंत कानेटकरांनी शिवकालीन नाट्यत्रयी ह्यांच्यावर पडलेला दिसतो .
स्वच्छन्दवादी नाटकात नायक भावनेच्या अतिरेकात जेव्हा स्वतःला कोसतो तेव्हा तो स्वतःला अक्षरशः खलनायक बनवत स्वतःची पिसे काढतो संभाजीचे आक्षेपार्ह वाटणारे संभाषण हे ह्या स्वच्छन्दवादी कोसण्यातून आले आहे आपण स्वतःला शिव्या घालतो तेव्हा कधी कधी वाईट तऱ्हेने शिव्या घालतोच ना ! हे संभाषण हे त्या पद्धतीचे आहे . मला स्वतःलाही ते विलक्षण खटकले होते कारण त्यात इतिहासाचा प्रचंड विपर्यास होता पण ज्या काळात ते लिहिले गेले होते त्याकाळात हे आक्षेपार्ह वाटले न्हवते . त्यातच ह्या नाटकातील संभाजीत तत्कालीन इंग्रजांना जाऊन मिळालेला ब्राहमण वर्ग स्वतःला शोधत होता हा एका अर्थाने सेल्फ कॅथर्सिस चा प्रकार होता इंग्रजांची चाकरी करणारे ब्राह्मण आणि इंग्रजांच्या विरोधात लढणारे ब्राह्मण ह्यांच्यात त्याकाळी एक सुप्त संघर्ष होता (गडकऱ्यांच्या नाटकात कायमच हा संघर्ष सुप्तावस्थेत चाललेला दिसतो एकच प्यालातही दारू हे फक्त व्यसन नाही तर पाश्चिमात्य संस्कृती आहे तिची तत्कालीन नशा आहे तळीराम त्या नशेला पूर्णच कवटाळून बसलाय आणि पुरता निर्ल्लज झालाय ब्रिटिश राज्य म्हणजे स्वर्ग मानण्याऱ्यांचा तो प्रतिनिधी आहे सिन्धु भारतीय वैदिक संस्कृती आहे आणि कुठे जावे हे न कळणारा सुधाकर सिंधुबाबत गिल्ट बाळगत व्यसनी बनत चाललाय देवदास आणि सुधाकर हे तत्कालीन ग्रेट इंडियन भद्र मध्यमवर्गाचे प्रतिनिधी आहेत )ब्राह्मण वर्ग आणि लेखकही किती आत्ममग्न असावा त्याचा गडकरी हा ढळढळीत पुरावा आहे साहजिकच गडकऱ्यांचे राजसंन्यास हे नाटक ब्राह्मणी इतिहासकारांच्यावर नको तितके विसंबून राहते. त्याचे उट्टे कधी ना कधी निघणारच होते पण ते काढतांना केली गेलेली कृती विध्वंसक आहे त्यामुळे मी तिचा निषेधच करतो . प्रश्न असा कि मग करायला काय हवे ? तर शिवशाहीची नीट मांडणी करणारी तीन नवीन नाटके लिहून ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवायला हवी . संभाजी ब्रिग्रेडने हे काम केले तर ते नावाला साजेसे झाले असते . संभाजी महाराज स्वतः कलेचे उत्तम जाणकार होते आणि सहिष्णूही !आपल्यावर होणाऱ्या आरोपांमुळे ते प्रचंड व्यथित होते दुर्देवाने गडकऱ्यांनी ही व्यथा दाखवण्याऐवजी जणू ह्या घटना सत्य आहेत असे मानून नाटक लिहिले . मात्र पुढील भागात ते संभाजीला प्रचंड पॉझिटिव्ह दाखवणार होते पण ते अकाली गेल्याने नाटक अपूर्ण राहिले आणि गडकरी नेमके काय करणार होते हे गुलदस्त्यात राहून गेले .
Comments
Post a Comment