ओबीसी साहित्याची चळवळ आणि देशी संस्कृती श्रीधर तिळवे
ओबीसी साहित्याची (ओसा )चळवळ ही साठोत्तरी साहित्यात उदयास आलेल्या
१ ग्रामीण साहित्याची चळवळ
आणि
२ देशीवादी चळवळ
ह्या दोन साहित्यिक चळवळीच्या पुढचे पाऊल आहे . अनेकांच्या मनात १ ग्रामीण साहित्याची चळवळ
आणि २ देशीवादी चळवळ ह्या दोन चळवळी ऑलरेडी अस्तित्वात असतांना ह्या चळवळीची आवश्यकता काय असा प्रश्न येऊ शकतो . अनेक ओबीसी साहित्यिक हसतखेळत देशीवादी झालेले असतांना तर हा प्रश्न आधिकच सार्थक वाटू शकतो पण सध्याच्या देशी संस्कृतीचे ज्यांना भान आहे त्यांना देशीवाद हा देशी संस्कृतीच्या संदर्भात आऊटडेटेड झालाय हे कळणे अवघड नाही एकतर देशी संस्कृतीतील शासक समूहाने हा देशीवाद अमेरिकेतून आयात केलाय आणि आणि त्याची अंतिम परिणीती भाजपला सत्येवर आणण्यात झालीये . परंपरेचे भान किती ताणवायचे ह्याचे भान परंपरेकडे कधीच नसते परंपरा आपसुखपणे काहीच करत नाही परंपरा चांगल्या गोष्टीचे रक्षण करते आणि वाईट गोष्टी फेकते हा एक भ्रम आहे वस्तुस्थिती अशी आहे कि परंपरा ही नेहमीच परस्परविरोधी हितसंबंधात अडकून पडलेली असते आणि अनेक लोक तिला स्वतःच्या हितसंबंधासाठीं वापरत असतात . हितसंबंधांना स्वतःचा फक्त स्वार्थ असतो आणि त्यांना विवेक नसतो त्यामुळेच ओबीसी साहित्यिकांना परंपरा विवेकाने वागते आहे कि नाही ह्यावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी लागते . सत्ता ही एक अशी गोष्ट आहे जी स्वतः तर आंधळी असतेच पण जी व्यक्ती तिला धारण करते तिलाही ती आंधळी करते त्यामुळेच सत्तेचा कल परंपरेचा आंधळेपणाने वापर करण्याकडे असतो .परंपरेला नवे डोळे देण्याची जबाबदारी साहजिकच मग जे सत्ताधारी नसतात पण ज्यांचा प्रभाव समाजावर असतो त्यांच्यावर येते आणि अशा प्रभावक्षम लोकांच्यात कलावंत येतात . देशी संस्कृतीत परंपरेला नवे डोळे देण्याची आणि परंपरेत नसलेले नवे डोळे मॅनुफॅक्चर करण्याची जबाबदारी प्रामुख्याने ओबीसी कलावंतांच्यावर येते हे करतांना अनेकदा संस्कृतीरक्षकांच्या विरुद्ध लढण्याची तयारी ठेवावी लागते . त्यासाठी देशीवादाचा त्याग अपरिहार्य ठरतो .
देशीवादाची हाळी ही अनेकदा देशी संस्कृतीतील सत्ताधारी पक्ष देत असतो आणि देशीची व्याख्या ठरवण्याचा अधिकारही स्वतःकडे ठेवतो . त्यातूनच देशीवादी कॅनन्स तयार होत जातात आणि देशी दारूसारखे ते परंपरेने सारखे भरलेही जातात ही दारू पिऊन भारावलेले साहित्यिक मग मार्गीला आंधळा विरोध करायला लागतात पण मुळात देशी लोक इतके शहाणे असतात कि ते मार्गितील सेक्सुअलिटीपासून कम्युनिकेशनपर्यंतचे सर्व आयाम नव्याने शिकतात . असे लोक ओबीसीत सर्वाधिक असतात कारण हजारो वर्षे तंत्रज्ञानाशी खेळण्याची परंपरा त्यांच्यात चालत आलेली असते त्यामुळेच देशी संस्कृतीतील असे लोक व ओबीसी साहित्यिक मार्गीचा द्वेष करत नाहीत तर तिच्यातील नवे आत्मसात करत मार्गीलाही काही देशी इफेक्ट पुरवतात
अनेकदा ओबीसी शहरात जातात तेच मुळात नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान शिकण्यासाठी ! त्यातील काही मार्गी संस्कृतीत स्थिरावतात आणि मार्गी आणि देशी ह्यांचा समतोल साधत नवे लेखन करतात तर काही देशी संस्कृतीत परततात . हे परतलेले ओबीसी गाव बदलण्याच्या मागे लागतात त्यातून गावातील परंपरेशी त्यांचा कधी संघर्ष होतो तर कधी परंपरेतील काही गोष्टी नव्याला साजेश्या आहेत हे कळून ते त्यांचा नवा समन्वय घडवतात . ह्या त्यांच्या समन्वयाचे आणि संघर्षाचे कलात्मक चित्रण करण्याची जबाबदारी ओबीसी साहित्यिकांवर पडते
देशी संस्कृती म्हणजे बॉलिवूडमधले ठाकूर व मराठीतील पाटील आणि त्यांच्यासाठी प्राण देणारे ओबीसी नव्हेत तर देशी संस्कृती म्हणजे ओबीसींनी विज्ञान , तंत्रज्ञान आणि चिन्हतंत्रज्ञानाचा स्वतःच्या अवकाशाला साजेसा वापर करत सळसळत ठेवलेले जगण्याचे नवचैतन्य ! जे ह्या नवचैतन्याला , त्यातील संवादाला विसंवादाला आणि कधीकधी झालेल्या संवादलोपाला पकडते ते ओबीसी साहित्य !
मला खात्री आहे भविष्यातील पिढ्या हे काम टोकदारपणे करतील .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment