अस्ताचं युग आणि नवनिर्माणाचे प्रयत्न

मी नागेशी बांदिवड्याचा आहे किंवा कोल्हापूरचा आहे म्हणजे काय आहे ह्या प्रश्नाने माझा न्यू कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यापासून सतत  पाठलाग केला आहे १९८० ते १९८८ हा माझा कालखंड मोक्ष आणि त्यासाठी स्वतःचे संस्कारण म्हणजे कंडिशनिंग तपासणारा आणि तासणारा कालखंड आहे माझ्या मिलिंद गुर्जर , जयसिंग पाटील , बाळकृष्ण शिर्के , महेश पुसाळकर , विश्वजित जाधव , अजय कोंडेकर , शरावती यादव , श्रीराम पचिंद्रे , राजकुमार यादव , निनाद काळे , विलास कांबळे , शेखर जाधव , काशिनाथ मंगल , श्रीनिवास एकसंबेकर , अवधूत भट , विजय पवार अशा अनेक कलावंत वा कलासक्त मित्रांना त्याकाळात कोल्हापूरने भारावून टाकले होते आणि जवळपास दिवसातून एकदा महाद्वार रोडला  किंवा रंकाळ्याला  गेल्याशिवाय दिवस सफल झालाय असं आम्हाला वाटत न्हवते एक अस्तंगत चाललेले कोल्हापूर शेवटचे नागरिक म्हणून जणूकाही आम्ही आमच्या डोळ्यात साठवून घेत होतो हे कोल्हापूर शाहू महाराजांच्या प्रबोधनाचं , गोविंद पानसरेंच्या मार्क्सवादाचं , शैवांच्या अंबाबाईचं , आली रे आली गाडी आली म्हणत गर्जणाऱ्या श्रमिकांच्या शेकाप  चळवळीचं होतं त्यावेळी हे कायम टिकणार असं वाटायचं पण हळूहळू सर्व बदलत गेलं

देशाच्या राजकारणात हा एक विलक्षण धापाधापीचा हा कालखंड होता आणि अनेक साठोत्तरी गोष्टींचा अस्त ह्या कालखंडात होत होता ह्यातील काही अस्त फक्त माझ्यापुरते होते तर काही संपूर्ण कोल्हापूरला लागू होत शहरभर पसरत होते

माझे घर हे शैव आहे आणि आम्ही नागेशी बांदिवड्याच्या रवळनाथ मंदिराचे पुजारी आहोत आणि रवळनाथ हा शंकराचा अवतार आहे  हे मला लहानपणापासून शिकवण्यात आले आहे नागेशीचा मुख्य देव हा नागेशी आहे आणि तो शंकराचा अवतार आहे साहजिकच माझ्या साहित्यात मराठी साहित्यात ओतप्रोत असलेली वैष्णव परंपरा जितकी झिरपायला हवी तितकी झिरपलेली नाही त्यामुळे अटळपणे वैष्णवांच्या जातिव्यवस्थेविरुद्ध आणि वर्णव्यवस्थेविरुद्ध माझ्या कवितेने सातत्याने आवाज उठवला आहे ज्ञानेश्वरवाद , नामदेववाद , एकनाथवाद आणि चक्रधरवाद ह्या चारीही वैष्णव धारा असल्याने माझ्यावर त्यांच्यापेक्षा बसवेश्वरांचा आणि बसवेश्वरवादाचा प्रभाव अधिक पडलेला आहे
भारतीय प्रबोधनाची सुरवात बसवेश्वरांच्यापासून होते त्यामुळे फक्त मोक्ष नाही तर प्रबोधनही हवे हा बसवेश्वरी आग्रह मला पूर्ण मान्यच आहे मात्र मी ज्या काळात जन्मलो त्या काळात ह्या प्रबोधनात्मक चळवळीची वाताहत व्हायला सुरवात झाली होती त्यामुळे ह्या कालखंडात मी काही प्रबोधनात्मक आणि काही चळवळीची आणि राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची वाताहत दर्शवणाऱ्या कविताही लिहिलेत असे दिसते ह्यातील प्रबोधनात्मक  डेकॅथलॉन मधील यूरेकात वाताहत दर्शवणाऱ्या कविता  डेकॅथलॉन मधील अफव ह्या भागात आहेत तर ज्या बसवेश्वरी प्रबोधनात्मक आहेत त्या काही ठिकाणी फारच रॉ आहेत काही वेळा तर पद्यच आहेत  त्यांची मला लाज वाटत असल्याने मी त्या  कविता लपवल्या होत्या पुढे ही लाजही गेली आणि माझ्या ह्या शैव कवितांच्यापैकी काही कविता मी फेसबुकवर टाकल्या होत्या अलीकडे त्या मी डेकॅथलॉन अनकॅटेगरीकल ह्या काव्यफाईलीत संग्रहित करत आहे ह्या काळात मी बस्वेश्वरांवर कथाही लिहिल्या ज्यातील एक माझ्या अमेरिकेचे अध्यक्ष आले तेव्हाची गोष्ट ह्या कथासंग्रहात आहे तर एक कादंबरी आहे जी माझ्या धर्म ह्या कादंबरीचा भाग बनून येतीये आणि एक नाटकही आहे


मराठीत तुम्ही जोवर वारकरी सम्प्रदायाला सॅल्यूट मारत नाही तोवर तुमचं भविष्य कठीण असतं हे मला कालांतरानं कळलं तरी २०१४ पर्यंत मी काही माझं शैवत्व  बदललं नाही ( २०१४ साली सगळ्याचाच लोप झाला ) वैष्णववादाबद्दल मला एक संशय सतत होता तो म्हणजे हा वाद कितीही मानवतावादाच्या गप्पा मारो तो अंतिमतः आतून वर्णजातिव्यवस्था जोपासतोच त्याउलट बसवेश्वरवाद हा वर्णजातिव्यवस्थेला ठाम नकार देतो  मोक्ष मिळवलेल्या निवृत्ती , सोपानदेव , ज्ञानेश्वर , मुक्ता बाई , नामदेव , जनाबाई , गोरा कुंभार , नरहरी सोनार , एकनाथ ,जनार्दन , तुकाराम , बहिणाबाई ह्यांच्याविषयी मला आदर वाटतो पण तो आदर मोक्षाच्या अंगाने आहे धर्माच्या अंगाने नाही आणि माझ्या त्यांच्याविषयीच्या कविताही मोक्षाच्या अंगाने येतात धर्माच्या अंगाने नाही . परंपरेच्या अंगाने तर नाहीच नाही एका अर्थाने  फक्त माझ्यापुरता झालेला हा वैष्णववादाचा अंत होता प्रत्यक्षात तो राम जन्मभूमी आंदोलनाने फोफावला आणि   त्याचे नवनिर्माणही झाले हे नवनिर्माण चांगले कि वाईट हा प्रश्न अनिर्णित आहे आणि त्याचे उत्तर  जो तो आपल्या आईडियालॉजीप्रमाणे ठरवत असतो पण सामान्य हिंदू हा राम मंदिराच्या बाजूने आहे ही वस्तुस्थिती !

माझ्या सुरवातीच्या काळात मीही रोमँटिक होतो आणि त्या वयानुसार गझलेच्या जामच प्रेमात होतो पुढे माझे प्रेम माझे तिळवे भांडार हे दुकान आणि त्याबाबतचे वास्तव हे भट आणि गालिब ह्या दोघांच्या संवेदनशीलतेशी अजिबात मॅच होईना साहजिकच माझ्यासाठी पारंपारिक गझलेचा अस्त झाला आणि मी  माझ्या गझलेचे स्वरूप शोधायला सुरवात केली आणि त्यातून मी मुक्त /आजाद गझलेच्या नादी लागलो ज्यातल्या काही डेकॅथलॉन मध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि अलीकडे त्यातील काही मी फेसबुकवर टाकतो आहे

ह्या काळात सर्वात प्रभाव पाडणारा दुसरा कवी ग्रेस होता मी गोवेकरही असल्याने त्याचा ख्रिस्चन स्पिरिच्युऍलिझ म मला सुरवातीला भावला पण लवकरच त्याचाही अस्त झाला मी ह्या काळात मराठी साठोत्तरी कविंचे काव्यवाचन सुरु केल्याने विठ्ठल आणि बुद्ध ह्यांच्या ज्याम प्रेमात आलो होतो त्यातच विठ्ठल मूळचा शैव होतो हे स्पष्ट कळल्याने विठ्ठ्लाविषयीचा आकसही थोडा कमी झाला होता त्यामुळे ग्रेसच्या शैलीला थोडे विकसित करून स्वतःच्या शैलीत विठ्ठल व बुद्धावर कविता लिहिल्या गेल्या त्याही डेकॅथलॉनमधील गाथा ह्या विभागामध्ये आहेतच एका अर्थाने हे नवनिर्माण ग्रेसचे देशीकरण होते आणि बौद्धिकरणही ! पुढे बौद्ध संवेदनशीलता कशी निर्माण करायची त्याचे तंत्र मला सापडत गेले आणि त्यातूनच काही हायकू आणि कविता जन्मल्या त्यातुन  "डेकॅथलॉन ट्रांसरिअल  "हा काव्यसंग्रह जन्मला जो  उपलब्ध आहे

हळूहळू गांधी व नंतर फुले आंबेडकरवादाचा प्रभाव वाढत गेला आणि मी अधिकाधिक  वास्तववादी आणि परिवर्तनवादी बनत गेलो माझ्या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे तो फुले आंबेड्करांच्याकडून बुद्धाकडे असा झालेला नाही तर  बुध्दाकडून फुले आंबेडकरांच्याकडे असा झालाय त्यामुळे त्याचा आधार कायमच दार्शनिक राहिलाय आयडियॉलॉजिकल नाही मात्र मोक्ष , सामाजिक वास्तवाचे सर्वांगीण भान आणि ते बदलण्याचा प्रचंड आग्रह आणि कळवळा त्यात फार ठाशीव स्वरूपात आहे . ह्या संदर्भातल्या काही कविता एका भारतीय विध्यार्थ्याचे उदगार ह्या कवितासंग्रहात आहेत हा संग्रह पॉप्युलरने १९८५ कि १९८६ साली स्वीकारला होता आणि त्याचे प्रकाशन १९९१ -९२ साली झाले होते ह्याच्या सर्व प्रति संपल्याने हा आता उपलब्ध नाही .तो आता मूळ आकारात प्रसिद्ध करण्याचे घाटत आहे . ह्याच कालखंडात बस्वेश्वरवादाची एक संकल्पना माझा पाठलाग करत होती ती म्हणजे कायक . माझे वडील स्वतःला कायक मानत असल्याने बालपणापासून माझ्यावर तिचा प्रभाव आहे शरीरश्रमाचे माहात्म्य मार्क्सच्याही कितीतरी शतके आधी त्यांनी सांगितले होते आणि आणि माझ्या वडिलांना ते मान्य असल्याने दुकानात  वयाच्या चौथ्या वर्षीच तेलाचे माप भरायला शिकवले  होते  आणि नंतर पोती हलवायला   . लक्ष्मीपुरीच्या बाजारात कुमारपणी मी हमालांना एव्हढे पैसे कशाला द्यायचे असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर ५० किलोचे पोते टाकून ते सायकलवर ठेऊन दुकानात पोहचवायला सांगितले होते आणि मी ते केले होते कॉलेजमध्ये असतानाच दुकानदारी करायला मला कधीही लाज वाटली नाही आणि लोकांच्या टोमण्याचेही कधी दुःख झाले नाही दुकानसफाईपासून संडाससफाईपर्यंत अनेक कामे लहानपणापासून मी करत असल्याने मी जेव्हा गांधी वाचले तेव्हा मला बापच वाचत असल्याचा फील आला होता आणि मी श्रमाच्या प्रतिष्ठेकडे परतलो होतो मार्क्सबद्दल मला प्रेम होते आंणि एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार मी ज्यांना अर्पण केले त्यात मार्क्सही होता पण तरीही प्रभाकर पाध्ये वाचले असल्याने मार्क्स मला कम्म्युनिझमच्या पद्धतीने भारतात आणता येईल असे वाटत न्हवते मुख्य म्हणजे कम्म्युनिस्टांना मोक्ष मान्य नसल्याने तो मला कधीच स्वीकारता येणे शक्य न्हवते . माझ्या ह्यातूनच माझी श्रमवादाची संकल्पना मी विकसित केली  माओ आणि स्टालिनच्या राजवटीचे स्वरूप पुढे आले होते त्यामुळेच १९८३ ला मार्क्सच्या मृत्यूची जेव्हा जन्मशताब्दी आली तेव्हा त्यानिमित्ताने मार्क्सवर जी कॉलेजियन वक्तृत्व स्पर्धा झाली होती तेव्हा त्यात मार्क्सवर बोलताना मी मार्क्सवाद कोसळेल असे भविष्य वर्तवले होते ह्या भाषणाचा विस्तार पुढे मी सौष्ठवच्या परिवर्तनवाद का कोसळला ह्या टायटलखाली  पुस्तक होईल असा प्रकाशित केला होता पुढे हे भविष्य खरे होण्याची चिन्हे दिसू लागली आणि मी प्रचंड अस्वस्थ व्हायला लागलो माझा मार्क्सला विरोध असला तरी त्याचा अस्त मात्र अस्वस्थ करणारा होता त्यातच ह्या काळात परिवर्तनवादाची पुरतीच वाट लागायला लागली ह्या अस्वस्थेतून ज्या कविता जन्मल्या त्या एकत्र करून त्यातून डेकॅथलॉन रिअल जन्मला जो नवता प्रकाशनाने त्याच्या लिखाणाच्या सिल्वर ज्युबिली वर्षात   प्रकाशित केला पुढे खरोखरच मार्क्सवादाचा अस्त पेलण्याची पाळी आमच्यावर आली आणि त्याचा अस्ताकडे चाललेला प्रवास ह्या संग्रहात होता एका अर्थाने पाब्लो नेरूदावादावर हा संग्रह ऍंटीडोस आहे आजही माझा श्रमवादावरचा व कायकावरचा विश्वास हललेला नाही आम्हा पाच भावन्डापैकी तिघेजण हे श्रमिक एक हाऊसवाईफ आहे आणि श्रमिकांची वाताहत मी माझ्या घरी पाहतो आहे तिघांपैकी दोघेजण गेले आणि जो वाचलाय तो फॅक्टरीत काम करतोय आजही माझी भावन्डे मला निरंकुश भांडवलशाही मान्य करू देत नाहीत थोडक्यात काय मी मार्क्सवादी नाही पण श्रमप्रतिष्ठा मानणारा श्रमवादी आहे

मला जसा श्रमवाद मान्य होता तसाच उद्योगवादही  श्रमिकांचे दोन प्रकार असतात पहिला ज्याला आयुष्यभर कसलीही रिस्क न घेता फक्त सुरक्षित ठिकाणी श्रम करायचे असतात दुसरा ज्याला फक्त श्रमिक म्हणून जगायचे नसते आणि जो असुरक्षित राहण्याचा धोखा पत्करून स्वतःचा उद्योग उभा करू इच्छितो . माझे वडील स्वतः घरगडी मग फिल्मलाईनमध्ये आर्ट वर्कर मग नागेशकरांच्याकडे वर्कर होते पण त्यांनी पूर्णपणे तोट्यात चाललेले दुकान लोकांच्याकडून पैसे उसने घेऊन विकत घेतले आणि धोका पत्करून चालवले सुरवातीला दुकानाची सर्वच कामे म्हणजे हमालीपासून सायकलवरून माल आणणे ते माल लावण्यापर्यंत ते एकटेच करत हळूहळू दुकान चालायला लागले आणि काही वर्षातच त्या एरियातील एक नम्बर झाले मला अनेक लोक विचारतात कि तुझा क्लास कोणता मी जन्मलो  तेव्हा वडील टॉपवर होते साहजिकच मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नसलो तरी नक्कीच चांदीचा चमचा घेऊन जन्मलो होतो पुढे आणिबाणीविरुद्ध बोलायला लागले म्हणून सरकारने खोटी केस टाकून त्यांना अटक केली आणि ते खचले ते खचतच गेले त्यातच माझ्या बहिणीच्या म्हणजे त्यांच्या मुलीच्या संसाराची जी वाताहत झाली त्याने ते पुरतेच खचले ज्या वयात वडिलांनी मुलाच्या खांद्यावर हात ठेवायचा असतो त्या वयात मला त्यांच्या खांद्यावर हात ठेवायची वेळ आली आणि एक वर्ष असेही होते ज्यात आम्ही कंगाल होतो त्यामुळे जन्मलो तेव्हा हाय क्लास कुमार वयात मिडल क्लास आणि तारुण्याच्या काळात कंगाल क्लास असे तिन्ही क्लास मी पाहिले आहेत पुढे मुंबईतही ह्याची रिपीटिशन झाली आहे माझ्या आजोबांचेही हेच झाले होते फक्त आणिबाणीऐवजी स्वतःच्या वर्णाबाहेर मुलगी दिल्याने त्यांच्या वाट्याला वाळीत टाकणे आले होते आणि जंगलात जाऊन झाडपाला  खाण्याची वेळ त्यांच्यावर आली होती थोडक्यात माझ्या घरातील प्रत्येकाने तिन्ही क्लास बघितल्याने मला सर्वच वर्गांच्याबद्दल ममत्व आहे आणि माझ्या कवितांत त्याचे प्रतिबिंब पडले आहे

घर आणि बांधकाम ह्याविषयी मला लहानपणापासून  प्रेम आहे मी संन्यासी आणि त्यांच्या दृष्टीने आचार्यही किंवा गुरुजीही असल्याने  साहजिकच मला अनेक वेगवेगळ्या घरातून  मार्गदर्शनासाठी  बोलवले जात असे आणि आजही बोलवले जाते त्यामुळे पूर्वी वेगवेगळ्या घरात माझी उपस्थिती असे आणि घरातल्या कुठल्याही गोष्टी हाताळण्याची मला अनुमती होती व असते मी  संन्यासी पण  जैविक दुसऱ्यांच्या घरात व गृहस्थ आश्रमात अस्तित्व थाटून असायचे /असते आजही अनेकदा दोन दिवस फाईव्ह स्टार हॉटेल दोन दिवस मिडल क्लास घरे आणि तीन दिवस माझे मोतीलाल नगरमधील  गरिबखाना अशी  माझी लाइफस्टाइल चाललेली असते मी फी घेत नसल्याने लोक जे ठेवतात ते मी आवश्यक असेल तर घेतो  अगदी एक रुपयाही ( ह्यामुळे डिमॉनिटायझेशनमध्ये मला चांगलाच फटका पडला होता चक्क मध्ये तीन दिवस उपाशी रहायची पाळी आली होती आणि महेश पवारने आणलेल्या केळ्यांनी माझा उपवास सुटला होता ) कोल्हापुरात असतांनाही हेच होते  झोपडपट्टी , हायफाय घरे आणि हॉटेल ह्यां तिघांशी  निगडित असलेले माझे अनुभवविश्व . त्यातील हायफाय घरांना भिडताना निखळ वास्तववादी स्टाईल मला उपयोगी पडेना आणि त्यातून माझी अतिवास्तववादी शैली विकसित झाली आणि त्या कवितांचा जो संग्रह बनला तो डेकॅथलॉन सररिअल त्याने माझ्यापुरता वास्तववादाचा  अस्त केला

आमच्या पिढीतला कुठलाच कवी देशीवादी बनण्यापासून वाचत नाही पण मी वाचलो त्याचे कारण माझी मोक्षाची आसक्ती ! मोक्ष कॉस्मॉसिक असल्याने त्यात देशीवाद बसवणार कसा मात्र कोल्हापूरच्या लोकल कल्चरला कवितेत निर्माण करणे हे माझ्या वास्तवतावादी संवेदनशीलतेला फार आवश्यक होते मुख्य म्हणजे हे कसेही असले तरी माझे शहर होते साहजिकच ह्या शहराविषयी वाटणाऱ्या माझ्या सर्व भावना कवितांतून उमटत जाणे स्वाभाविक होते ह्या स्वाभाविक कोल्हापुरी कवितांना एकत्र करून मी डेकॅथलॉन : लोकल हा संग्रह निर्माण केला जो माझ्या "आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण" ह्या महाकाव्याचा पहिला भाग बनला आणि तो प्रसिद्धही झाला एका अर्थाने मी देशीवादाचा अस्त पाहिला असला तरी स्थानिकतेचा आग्रह धरून देशीपणाचा आग्रह सुरवातीपासूनच शाबूत ठेवला आहे .



थोडक्यात काय प्रबोधनवाद , सौंदर्यवाद , परिवर्तनवाद , मार्क्सवाद आणि देशीवाद ह्यांचा अस्त मी १९८२ ते १९८७ ह्या कालखंडात पाहिला आणि तो ह्या कालखंडातील कवितांत व्यक्तही झाला पण हे अस्त पोस्टमॉडर्निस्टनप्रमाणे  मी साजरे केले नाहीत उलट त्यातील जेजे चांगले आहे त्याचा विकास कसा करता येईल ते पाहिले त्यासाठी  मराठी साहित्यातील जे उपलब्ध होते ते प्रथम आत्मसात केले आणि नंतर त्यात जे अस्त होऊनही उरते त्याचा पाठपुरावा केला म्हणजे धर्माला ठाम नकार दिला पण मोक्षाचा पाठपुरावा केला आणि साधनाही केली  त्यासाठी बसवेश्वरांचा लिंगायतवाद व प्रबोधनवाद मी कवितेत विकसित करून माझा स्वतःचा शैववाद मांडला प्रबोधनातले क्लासिकल सायन्स नाकारलं पण क्वान्टमचे व क्वान्टम नंतरचे नवे विज्ञान न नाकारता त्यातून काही प्रतिमा उभ्या केल्या आणि अनुभवविश्वही गरज पडली तेव्हा कवितेत वक्र केले

भटांनी  करंदीकरांनी जी गझल दिली तिचे  क्वान्टम रूप मी विकसित करायचा प्रयत्न केला  करंदीकरांनी आजाद गझल आणली असती तर फार बरं झालं असतं पुढील गझलकार  भटांच्या परंपराशरण गझलेच्या इतके आहारी गेले नसते आणि गझलेबाबत अजूनही सौंदर्यवादात अडकलेली मराठी गझल थोडी अधिक मोकळी झाली असती

झोपा काढणाऱ्या किंवा स्वतःवरच खुश असणाऱ्या परिवर्तनवादाला मी थोडे हलवण्याचा प्रयत्न केला

----------------------------------------------------------------------------------------------------------------------


सोशल साईटवर (फेसबुकवर ) लाटा येतात आणि जातात आपण आपला समुद्र शाबूत ठेवावा हे उत्तम
श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog