ग्रेस , बालम आणि रोमँटिक श्रीधर तिळवे नाईक 

बालम गेल्याविषयी फार शोक कुणाला झाला नाही कारण तो काही स्वयंभू प्रज्ञेचा कवी न्हवता ज्यांना स्वतःची कल्पनाशीलता सापडली पण ज्यांना त्या कल्पनाशीलतेचे स्वायत्त दर्शन बनवता आले नाही अश्या ग्रेसच्या सावलीत किंवा रोमँटिक भाषेत सांगायचे तर ग्रेसच्या हंसध्वनित वाढलेल्या कवींच्या मांडणमंडीतला तो एक घायाळ अन उदास पक्षी होता 

मुळात ग्रेसचे कुळ सुरु होते ते पंडिती कविंच्यापासून ! मार्गी व देशी वृत्तांच्यावर कमालीचे प्रभुत्व , अनेक शब्द जोडून नवीन शब्द तयार करण्याचे कौशल्य ह्यांच्या आधारे उभी राहिलेली ही पंडिती शब्दकळा मराठी साहित्यावर अवकळा आणणारी होती व तिचे जीवनाशी नाते तुटलेले होते मराठी संस्कृतीतील उत्तर पेशवाईची बामणी व्रतवैकल्याची पुराणप्रधान कथांची शाळा  मराठी साहित्यातील दरबारी दालनात पेश केली गेली आणि शब्दकळा व प्रतिमाविलास म्हणजे साहित्य समजणारे एक स्कूलच सुरु झाले ह्या स्कूलचे प्रधान अध्यापक कवी मोरोपंत होते पंतपंडित कवींचे सरपंत !

ह्याच काळात थोडेसे उशिराने सुरु झालेले उर्दू व इंग्रजी भाषेचे रोमँटिक स्कुल स्पॉंटनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्ज सांडत घनगर्द आकांताने सर्वांना इमोशनली सेंटीमेंटल बनवत अवतरले त्यातून एमिली डिकन्सचा अंगभूत ख्रिश्चन अध्यात्मपिसारा नर्तन करू लागला , ख्रिश्चन धर्मातील दुःखवैभव , अतिमग्न आत्ममग्नतेची भग्न वाळवंटे आणि त्यांचा मानसिक तळघरातून उभा राहिलेला आकांत ह्या डिकन्सच्या काव्य वैशिष्ट्यापासून अमृता प्रीतमपासून अनेकजण प्रभावित झाले डिकन्स फुलांच्यापासून बनलेली तलवार होती. तिच्यात मराठी पंडित कवींची वैशिष्ट्ये होती पण दरबारीपणा न्हवता . गावात चर्चच्या काठी वाढलेल्या मध्यमवर्गीय धार्मिकतेची व्याकुळता घेऊन दुःखाचे कढ रणथेंबासारखे सोसत ती आयुष्यात झगमगली आणि कवितेत आत्ममग्नली होती  

ह्या दोघांना एकत्र करण्याचा त्यांचा केमिकल लोच्या बनवण्याचा ग्रेसाळ आणि ग्रेसफुल प्रोग्राम मराठीत क्रमाक्रमाने तयार होत गेला आणि त्यातून पॅशेनेट पांडित्य सादर करणारे एक स्कूल तयार होऊ लागले बा भ बोरकर , पु शि रेगे आणि आरती प्रभू ह्यांनी ही बाग तयार केली गोव्यातील कॅथॉलिक वातावरण बोरकरांना भारावून टाकणारे होते आणि पुढे शंकर रामाणींना ! गोव्यातील शैव विरासतीची कत्तल करत खास वैष्णव पांडित्याची भाषा गिरवणाऱ्या बोरकरांनी दोन शब्दांच्यापासून तिसरा शब्द बनवण्याचे कौशल्य पुनर्जीवित केले आणि गोव्यातील धार्मिकतेचे कलम त्यावर चढवले ग्रेस मुळीच अनवट न्हवता असलाच तर बोरकरवट होता आरती प्रभूंची कोकणी धर्मप्रवणता आणि गूढता ह्यांनीही त्यांच्यावर प्रभाव टाकला पंडिती कविता, एमिली डिकन्सन ,मिर्झा गालिब , बा भ बोरकर, आरती प्रभू ह्या साऱ्यांचा एकवट एकजिनसीपणा म्हणजे ग्रेसचे अनुभवपार्श्व ! एकांतातील गांधर्वझरे आणि भयराक्षस माणसाच्या सनातनी मनाला कायमच छळत आलेत आणि हा छळ ग्रेसला अपील देतो ग्रेस ह्या भावनिक सावल्यांचे शरीर अचूक आणि तपशीलवार टिपतो आणि शब्दांनी ओले करतो पंडित कवींना कधीही पॅशन सापडली नाही ग्रेसला ती सापडली आणि ही पॅशन भावमयतेची अभिव्यक्ती ऑथेंटिक करते ग्रेस ही भावमयता जोपर्यंत ऑथेंटिकली जपत होता तोवर अपिलिंग होता राजपुत्र आणि डार्लिंग , चंद्रमाधवीचे प्रदेश ह्यांच्यापर्यंत ती ऑथेन्टिसिटी टिकली आणि पुढे ती आर्टिफिशियल आणि मेकॅनिकल होत गेली मध्यमवर्गीयांच्या कर्मठ भावशीलता अर्वाचीन चेहरा घेऊन ग्रेसमध्ये अवतरल्या त्यामुळे मध्यमवर्गीय भावशीलतेने तिला पेशवाईटाइप दादही दिली  


प्रश्न आहे ह्याची माणसाच्या जीवनात व्याप्ती किती आणि त्यांचा बोभाटा किती ? ग्रेसचं माहात्म्य जेव्हा बोभाट्याकडे जाऊ लागते  तेव्हा त्याच्यावर टीका करावी लागते ग्रेसचे हिंदू महार असणे नसणे हे ह्या संदर्भात दुय्यम आहे ग्रेसने धर्मांतर केले नाही ह्याचाही ह्याच्याशी काही संबंध नाही पण ग्रेसच्या पंडिती असण्याचे काय ? हा पंडितीपणा पंडिती कविंच्यासारखा कोरडा नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष्य करता येणार नाही  बालम केतकरांच्यासारखे अनेकजण ग्रेसट्रॅप झालेत अशावेळी ग्रेसचे इमोशनल अनॅलिसिस परवडणारे नसते समीक्षेचे काम केवळ कवीला बळ देणे वा त्याचा गवगवा करणे नसते तर कठोर समीक्षेने मर्यादा दाखवून पुढील पिढ्यांना त्याच्या प्रभावापासून वाचवणे हेही असते हे घडले असते तर बालम केतकर वाचला असता कारण त्याच्याकडे कल्पनाशक्ती व वृत्तांच्यावर प्रभुत्व ह्या दोन्ही गोष्टी होत्या पण दुर्देवाने त्याला ग्रेसपासून स्वतंत्र करेल असे स्वायत्त दर्शन न्हवते ग्रेसच्या प्रभावक्षेत्रापासून अंतर राखणे त्याला जमले नाही आणि कवी म्हणून ह्या गोष्टीने त्याला मर्यादित केले 

माझी त्याला आदरांजली आणि इतर ग्रेसट्रॅप झालेल्या कवींना इशारा !

श्रीधर तिळवे नाईक 


Comments

Popular posts from this blog