मार्क्सवादी कवी आणि प्रकाशनशीलता श्रीधर तिळवे नाईक

IGNATIUS DIAS ह्यांच्या वॉलवर प्रकाश जाधव ह्यांच्या संदर्भात एक पोस्ट पाहिली त्यात लिहलंय

'दस्तखत' हा संग्रह 1977 साली प्रकाशीत झाला होता. त्यानंतर काही वर्षांपूर्वी 'खेळ' मध्ये प्रकाश जाधव यांच्या काही कविता एकत्रीत प्रकाशीत करण्यात आल्या होत्या. खेळमूळे मला आणि माझ्या समवयीन कवीमित्रांना प्रकाश जाधव ह्यांच्या कवितेची ओळख झाली. 2010 की 11 मध्ये एक स्मरणपूस्तिका काढण्यात आली होती त्या पुस्तिकेत त्यांच्या काही निवडक कविता छापण्यात आल्या होत्या. त्याचवेळी त्यांचं दुसरं पुस्तक 'दस्तखतनंतरच्या कविता' या नावाने प्रकाशीत करणार असं कॉ. सुबोध मोरे यांनी जाहीर केलं होतं. तो दुसरा संग्रह आजतागायत आलेला नाहीये. कारण काय हे फक्त कॉम्रेड स्वत:च सांगू शकतील.
दस्तखत प्रकाशीत होऊन 40 वर्षे होऊन गेलीयेत. त्यानंतरच्या त्यांच्या मराठी आणि हिंदी दोन्ही मिळून दीड-दोनशे कविता अप्रकाशीत आहेत. असं असूनही या कविता संग्रहरूपात येऊ नयेत ही बाब अत्यंंत दुर्दैवी आणि पिडादायक आहे.
हे लिहीण्याचं कारण विनायक येवले याच्या वॉलवर आज वाचलेली प्रकाश जाधव यांची ही कविता.
पुढे त्यांनी कविता दिलीये

प्रकाश जाधव हा माझा आवडता कवी मराठीत प्रबोधनवादी नवतेत आणि रोमँटिक नवतेत थोर म्हणावेत असे मार्क्सवादी कवी झाले नाहीत तरी आधुनिक नवतेत शरदचंद्र मुक्तिबोध आणि नारायण सुर्वे हे अनुक्रमे वरून वर्गातून आलेले व खालून वर्गातून आलेले असे महत्वाचे कवी निर्माण झाले ह्याशिवाय लोकशाही समाजवादाशी थेट बांधिलकी सांगणारे व मार्क्सबद्दल ममत्व असणारे विंदांच्यासारखे कवीही होतेच मात्र मायकोवस्की किंवा पाब्लो नेरुदा ह्यांच्या तोडीची आधुनिक मार्क्सवादी कविता मराठीत झाली नाही हिंदीत मात्र गजानन माधव मुक्तिबोधांनी अव्वल दर्जाची खास भारतीय वाटेल अशी मार्क्सवादी कविता निर्माण करून एक पायवाटच पाडली ज्यावरून अनेक हिंदी कवीही चालत गेले दुसरी पायवाट निर्माण केली शमशेरने आणि त्यावरूनही पाशसारखा पंजाबी कवीही चालत गेले मराठीत मात्र शरदचंद्राच्या कवितेचा विकास करत कोणी का आला नाही ? कि शरदचंद्रांची कविता गजानन मुक्तिबोधांच्या तुलनेत दर्जाच्या बाबतीत कमी पडल्याने हे घडले ?

कवितेबाबत माझी काही पक्की मते आहेत त्यातील एक म्हणजे जो श्रमिकांच्याबाबत संवेदनशील नाही तो कवीच न्हवे
अशी संवेदनशीलता आपणाला नारायण सुर्वेंच्यात जबरदस्त दिसते कामगार मास्तर बनत जाण्याची ती यात्रा आहे मात्र त्यात एक ढोबळपणाही आहे जो पुढे अनेकांनी मिरवला मार्क्सवादी कवितेत मार्क्सवाद हा आरंभ असला पाहिजे आणि ज्याला शरदचंद्र मानुषपणा म्हणतात त्यात तिचा शेवट झाला पाहिजे ह्या आरंभ व शेवट ह्यांच्या दरम्यान अनेक ठिकाणी आवश्यक असलेली सूक्ष्मता सुर्वेच्यात मिसिंग आहे तरीही सुर्वेंच्यावरच्या प्रेमापोटी मी एकमेव साहित्यसंमेलन भाग घेऊन अटेंड केले होते जेव्हा ते अध्यक्ष झाले कारण सुर्वे प्रोलिटरेट कवितेची सुरवात होती आणि सुरवातीत अनेकदा सूक्ष्मता मिसिंग असते मग वाद कोणताही असो

सूक्ष्मता आणण्याचे काम नंतरच्या पिढीचे असते साहजिकच श्रमिक सूक्ष्मता पेलणारे कवी मी साठोत्तरीत शोधत राहिलो आणि ते तुळशी परब , सतीश काळसेकर , प्रकाश जाधव ह्यांच्यात काही प्रमाणात सापडत गेले विशेषतः तुळशी परब आणि प्रकाश जाधव काळसेकरांची कविता नारायण सुर्वे मुक्तिबोध आणि तुळशी परब व प्रकाश जाधव ह्यांना जोडणारा पूल आहे आणि टिकाहरणमध्ये मी त्यांच्यावर लिहिले आहे

ऐंशोत्तरी पिढीत दिलीप धोंडो कुलकर्णी हा सर्वात थोर मार्क्सवादी कवी झाला पण त्याच्या कविता कोल्हापूरकरांनी अक्षरशः दाबून टाकल्या शरदचंद्र मुक्तिबोधांच्या शैलीला देशीपणाची जोड देत चांगली कविता कशी निर्माण करता येते त्याची मिसालच दि धो ने पेश केली होती ह्याशिवाय सुहास एकसंबेकरापासून किरण खेबूडकरांच्या पर्यंत अनेक मार्क्सवादी कवी दि धो ने निर्माण केलेले मार्क्सवादाचे खास कोल्हापुरी स्कूल डेवलप करत राहिले पण जी हालत प्रकाश जाधवांची आहे तीच दि धोंची आहे आणि प्रश्न तोच आहे महाराष्ट्रातला मार्क्सवाद आपल्या कवींच्याबद्दल प्रकाशनाबाबत इतका उदासीन कसा ? कि त्याची कवितेबाबतची प्रकाशनशीलता मरून गेली आहे ? पॉप्युलर प्रकाशनाने नारायण सुर्वेंच्या कवितांची जशी काळजी घेतली तशी काळजी लोकवाङ्मय गृहने दिधो वा प्रकाश जाधवबाबत का घेतली नाही ?

दि धो व प्रकाश जाधवांची बांधिलकी थेटपणाने व्यक्त होतेच असं नाही पण मग पाब्लो नेरूदाच्या कवितेत तरी ती कितीवेळा थेटपणे व्यक्त होते ? साठोत्तरी मार्क्सवादी साहित्यशास्त्र हे कलेबाबत बाळबोध अपेक्षा करत नाही श्रमाचे सौंदर्य सिद्ध करतांना किंवा समाजाचे डायलेक्टिक्स अधोरेखित करतांना कलावंताला ढोबळता परवडणारी नसते हे उत्तरमार्क्सवादाला मान्य आहे त्यामुळेच दारिया फोची नाटके मार्क्सवादी असूनही फक्त मार्क्सवादी असत नाहीत ती मानुषीकरणाच्या अधःपतनाविषयी आणि शोषणाच्या सूक्ष्म तऱ्हांच्याविषयी भाष्य करतात प्रकाश जाधवांची कविता ही ह्या सूक्ष्म तऱ्हांच्याकडे पाऊल टाकणारी कविता आहे त्यामुळे ती लवकरात लवकर प्रकाशित करावी ही विनंती शेवटी प्रकाशनशीलतेचा प्रकाश पडल्याशिवाय कवी प्रकाशित होत नाही आणि सामाजिकही हे मार्क्सवाद्यांना आम्ही सांगायला हवं असं नाही बाकी अंधेरा चारो तरफ है ही !

श्रीधर तिळवे नाईक



















Comments

Popular posts from this blog