मतांच्या कॅटेगरीत न बसणारे मतकरी श्रीधर तिळवे नाईक

रत्नाकर मतकरी गेले मराठी समीक्षेला सर्वाधिक गोंधळात टाकणारा आणि दिलीप चित्रेंच्याप्रमाणे अष्टपैलू असणारा साठोत्तरी पिढीतील दुसरा अष्टपैलू गेला जो साठोत्तरी असूनही देशीवादी न्हवता आणि तरीही ज्याने देशी नाटकेही लिहिली मतकरींचा पिंड कलावादी आणि स्वतःला जे योग्य वाटते ते करणाऱ्या लेखकाचा होता साहजिकच झेंडे हातात घेतलेल्या युगात त्यांची कदर जितकी व्हायला हवी तितकी झाली नाही त्यातच गूढकथा लिहिणे म्हणजे लोकप्रिय कथाकार बनणे असा गैरसमज असणाऱ्या मराठी समीक्षेचा गोंधळ त्यांनी त्यात सातत्याने काम करून वाढवला अंधश्रद्धा निर्मूलन समिती जोरावर येत असतांना अंधश्रद्धांच्या आधारे उभा असणारा फॉर्म त्यांनी उत्कृष्ट हाताळला ज्याला लोकमान्यता मिळाली पण विचारवंतमान्यता मिळाली नाही त्यातच ते ज्या काळात लिहीत होते त्या काळात विजय तेंडुलकर सतीश आळेकर आणि महेश एलकुंचवार असे त्याकाळचे सुनील गावस्कर हे ह्या गुंडाप्पा विश्वनाथला सन्मान देत न्हवते ह्यात आणखी एक गोंधळ होता ते मुंबईकर असूनही त्याच्या नाटकात मुंबईचे जे मॉडर्न चित्रण आवश्यक होते ते आलेच नाही ते कुठेतरी सत्यकथा प्रणित मॉडर्निटीत रमून गेले कदाचित मुंबईतील संपूर्ण मराठी समाजच असा होता जो ना कॉस्मो होता ना गावरान हे सर्व कमी पडले म्हणून कि काय २००० नंतर मुंबई विद्यापीठाचा मराठी विभाग हा पूर्णपणे नॉन मुंबईकर मानसिकता असलेल्या  दलित वा देशीवादी प्राध्यापकांच्या ताब्यात गेला ज्याने मुंबईकर लेखकांच्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष्य करायला सुरवात केली हा स्वतःच्या घराशी केलेला द्रोह होता पण देशीवादाच्या आणि फुले आंबेडकरवादाच्या नावाखाली खपवला गेला म्हणजे मुंबईतही आमचेच राज्य आणि मुंबईबाहेर तर आम्ही आहोतच कोस्मोकडे तोंड फिरवणाऱ्या प्राध्यापकांची संख्या वाढायला लागली आणि मुंबईकर म्हणून लिखाण करणाऱ्या लेखकांच्याकडे मुंबई विद्यापीठाने दुर्लक्ष करायला सुरवात केली अपवाद फक्त देशीवादी वा फुले आंबेडकरवादी मराठी लेखक म्हणजे अरुण कोलटकर नामदेव ढसाळ जणू तुम्ही मुंबईकर लेखक असाल तर चुपचाप इंग्लिशमध्ये लिहा नाहीतर देशीवादी व्हा असा हा आदेश होता मतकरी कलावादी असल्याने त्यांनी देशीवादात बसणारी नाटकेही लिहिली गेली आणि समीक्षेत ती प्रमोट केली गेली म्हणजे आरण्यक विठो रखमाय आणि लोककथा ७८
आजही मतकरी म्हंटले कि ही तीन नाटके आठवतात

कुठलीही कलाचळवळ ही प्रायोगिक समांतर व्यावसायिक धंदेवाईक वैग्रे अनेक टप्प्यातून जाते मराठी आधुनिकतेची चळवळ ह्याला अपवाद न्हवती व्यंकटेश माडगूळकर , चि त्र्यं खानोलकर विजय तेंडुलकरांनी आधुनिक मराठी रंगभूमी सेट केल्यावर तिला पुढे घेऊन जाणारे आणि तिची समांतरता प्रस्थापित करणारे चार  महत्वाचे नाटककार झाले महेश एलकुंचवार चेखॉव फ्रॉइडच्या अंगाने गेले सतीश आळेकर अस्तित्ववादी अब्सर्ड अंगाने गेले गो पु मार्क्सच्या अंगाने गेले  तर मतकरी फॉर्मच्या अंगाने गेले साहजिकच आशयाच्या इजममध्ये अडकण्यापेक्षा त्यांना फॉर्म अट्रॅक्टीव्ह वाटत राहिला मग ग्रीक ट्रॅजेडीच्या फॉर्मच्या अंगाने त्यांनी आरण्यक लिहिले तर लोककथा ७८
व विठोरखमाई फोकफॉर्मच्या अंगाने हे टिपिकल सत्यकथीय होते ते दिग्दर्शक म्हणूनच नाटक लिहीत होते काय असाही प्रश्न पडायचा ह्यातील विठोरखमाई आम्ही आमच्या मुंबई विद्यापीठ थिएटर अकादमीतर्फे बसवून सादर केले होते धनगरी बाजाच्या संगीताने ह्या नाटकात येणारी मजा मस्त असायची त्यामुळे अनेकदा पाहूनही हे नाटक पुन्हा पुन्हा ओढायचे लोककथांच्या बाबतीत त्यांनी सातत्य राखले असते तर त्यांनी सहज गिरीश कर्नाडांना  टक्कर दिली असती पण फॉर्म आजमावल्यावर थांबायचे नाही ह्या मतकरींच्या वृत्तीने हे सातत्य दिले नाही शिवाय कर्नाड हे मुळात आशयाच्या सनातन तत्वांना लोक आकारात शोधत होते बसवत होते मतकरी आशयाबाबत कर्नाडांच्याइतके सिरीयस न्हवते

त्यांच्या गूढ कथा मात्र पक्क्या व्यावसायिक कलाटण्यांनी ठासून भरलेल्या व खिळवून ठेवणाऱ्या होत्या  मतकरींनी ह्या फॉर्मला अभिजात दर्जा प्राप्त करून दिला आजही ह्या फॉर्ममध्ये त्यांच्या आसपास जाणाराही कोणी नाही

त्यांच्या कादंबऱ्या मी फारश्या वाचलेल्या नाहीत त्यामुळे त्यावर बोलणे योग्य न्हवे त्यांची बालरंगभूमीही मला फारशी माहीत नाही त्यामुळे नो कॉमेंट

त्यांच्या जाण्याने नाटकाच्या फॉर्मवर मनस्वी प्रेम करणारा आणि स्वतःच्या अभिव्यक्तीला अनेक तऱ्हा देणारा एक प्रभावी नाटककार निघून गेला आहे

फार कमी कलावंतांना त्यांचा वारसा चालवणारी फॅमिली मिळते मतकरींच्या सुदैवाने त्यांना अशी फॅमिली लाभली आहे त्यांच्या दुःखात मी सामील आहे त्यांना माझी आदरांजली


श्रीधर तिळवे नाईक



















Comments

Popular posts from this blog