आंबेडकरवादी , दलित कविता आणि मी श्रीधर तिळवे नाईक

कॉलेज जीवनात आंबेडकरवादी असल्याने आपण दलित कविता लिहिलीच पाहिजे अशी माझी धारणा होती त्यावेळी जातीपातीचे राजकारण जोरात असल्याने सर्व दलितेतर लोकांनी आंबेडकरवाद स्वीकारून दलित कविता लिहल्यास अस्पृश्यतेचा कलंक दूर करण्यास मदत होऊ शकते असे माझे ठाम मत होते १९८० नंतर मला वाटतं हा एक माहोल निर्माण झाला होता आणि अनेक दलितेतर कविंनी आंबेड्करांच्यावर आणि अस्पृश्यांच्यावर कविता लिहल्या दुर्देवाने ह्याचा परिणाम काही लोकांच्यावर फारच विपरीत झाला काही दलित कविंनी व समीक्षकांनी तुम्हाला अनुभव नसतांना तुम्हांला अशी कविता लिहिण्याचा अधिकारच नाही अशी भूमिका घेतली ज्याने दलित जातीत जन्म घेतला तोच फक्त दलित अशी व्याख्या केली त्यामुळे बहिष्कृत केलेल्या आणि गावकुसाबाहेर राहणाऱ्या ज्ञानेश्वर व त्याच्या भावंडांना दलित मानता येणार नाही अशी ठाम भूमिका घेतली गेली ह्याचा एक विपरीत परिणाम असा झाला कि दलितेतर लोकांनी आंबेडकरवादी होणे हे खुद्द दलितांना मान्य नाही असा मेसेज गेला जो तरीही दलितेतर असूनही आंबेडकरवादी आहे त्याला सणकी , मूर्ख अशी विशेषणं चिटकायला लागली हरी नरके असो वा मी आमच्यासारख्यांची दोन्ही बाजूने गोची सुरु झाली आंबेडकर हे सर्वांचे आहेत ही आमची भूमिका हळूहळू मागे पडून साईडलाईन होत गेली आणि अख्खा बहुजनसमाज आंबेडकरवादापासून कोसो मैल दूर गेला काही नवबौद्धांनी धर्मांतर करणार असाल तर आम्ही मान्यता देऊ अशी हिंट द्यायला सुरवात केली जी स्वीकारणे शक्यच न्हवते कारण जिथे धर्मच स्वीकारणे शक्य न्हवते तिथे धर्मांतर काय स्वीकारणार ? २००० नंतर नवबौद्ध अधिकाधिक जन्मवादाकडे झुकत गेला आणि आज हा  जन्मवाद नवबौद्धांच्यात पूर्णच प्रस्थापित झालाय ह्यामागे दोन कारणे आहेत दलित म्हणून मिळालेला सांस्कृतिक अवकाश दलितेतर बळकावतील ही भीती आणि दलितांचे  नेतृत्व आम्हीच करणार ही आकांक्षा ही तृष्णा !

केवळ विचारप्रणालींच्या अंगाने विचार करणारा माणूस मी कधीच न्हवतो. आंबेडकरांनीही कठोर चिकित्सा व्हायला हवी ह्या मताचा मी होतो आणि अशी तयारी नवबौद्धांची न्हवती जे काही नवे आहे ते आंबेडकरवादाच्या चौकटीत बसवण्याचा पुरोहिती प्रयत्न सुरु झाला

माझा ह्याला ठाम विरोध होता आंबेडकर हेही इतर सर्व विचारवंतांच्याप्रमाणे त्यांच्या काळाचे त्यांच्या संस्काराचे त्यांच्या अवकाशाचे प्रोडक्ट होते हे मान्य करायला हवे असे माझे ठाम मत होते व आहे

एकीकडे ही अशी गोची तर दुसरीकडे सवर्ण माझ्याकडे मी आंबेडकरवादी आहे असं म्हंटल कि संशयाने बघत .एक शैव माणूस स्वतःला आंबेडकरवादी कसा म्हणवून घेऊ शकतो असा त्यांचा प्रश्न ! माझे ह्याबाबतचे उत्तर स्पष्ट होते ते म्हणजे बाबासाहेबांच्या जातीशी मला काहीही देणंघेणं नाही . त्या काळात उपलब्ध असलेल्या सर्व विचारप्रणालींच्यात म्हणजे मवाळ काँग्रेसवाद जहाल काँग्रेसवाद रॉयवाद फुलेवाद मार्क्सवाद लोहियावाद ह्या विचारप्रणालींच्यात मला आंबेडकरवाद सर्वात अधिक आधुनिक व अधिक अचूक वाटतो म्हणून मी स्वतःला आंबेडकरवादी मानतो . अनेकांच्या डोक्यातून जात जात नसल्याने अनेकांना हे पटवून घेणे जड गेलं माझं स्वतःचं आजही हे मत आहे आहे कि काळ सर्वाधिक ओलांडून गेलेला २०व्या शतकातला  वाद कोणता अशी स्पर्धा लावली तर आंबेडकरवाद ही स्पर्धा सहज जिंकेल असो

माझ्या ह्या उलथापालथीत माझ्याकडून अनेक दलित कविता आल्या . केशव मेश्राम आणि अरुण कांबळे मला दलित नसलेला दलित कवी ह्या कवितांच्यामुळे म्हणत इथे १९८२ ते १९८७ ह्या दरम्यान लिहिलेल्या काही कविता देतोय ह्या विभागाचे त्या काळात दिलेले अस्पृश्यांच्या कविता हेच टायटल कायम ठेवत त्या इथे देतोय
---------------------------------------------------------------------

माझ्या घराण्यात माझ्या आजोबांनी (त्याचेही नाव श्रीधर तिळवे होते )आपली मुलगी जातीबाहेर दिली म्हणून त्यांना वाळीत टाकले गेले होते व माझ्या आजीचे प्रेत उचलायला गाव आला नाही तेव्हा  ह्या पैतूल आजोबाने  स्वतःच्या खांद्यावरतिचे  प्रेत टाकून स्मशानात न्हेले होते

एक प्रश्न त्यामुळे माझा कायम पाठलाग करत आलाय ही वर्ण जात इतकी कशी चिवट ? आणि ह्या व्यवस्थेचं निर्ल्लज्ज समर्थन आजसुद्धा कसं होतं ? ह्या शोधातून मी आंबेड्करांच्याकडे वळलो .

अस्पृश्यतेविरुद्धचा लढा सातत्याने जर कुणी लढवला असेल तर तो शैवांनी ! लिंगायत शैव धर्माचे संस्थापक बसवेश्वरांचा मृत्यूचं मुळात त्यांनी आंतरजातीय लग्न करायला घेतले त्यात झाला बसवेश्वरांच्या  मृत्यूमुळे  आणि ह्या आंतरजातीय विवाहातील जोडप्याला ठार मारण्यात आल्याने हा प्रश्न विखुरला

बस्वेश्वरांच्यानंतर वर्णजातीचा  समग्र विचार केला  फक्त महर्षी शिंदेंनीच ! " भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न "हा एक त्यांचा महत्वाचा ग्रंथ त्यानंतर अणिहिलेशन ऑफ कास्ट हा आंबेडकरांचा ग्रंथ माईलस्टोन मानावा लागतो अनेक पाश्च्यात्य विचारवंतांनी अस्पृश्यतेवर लिहिले आहे मात्र बाबासाहेबांना तिचा प्रत्यक्ष अनुभव असल्याने जी दाहकता त्यांच्या लिखाणात येते ती इतरांच्या लिखाणात येत नाही

माझ्या मेंदूत हळूहळू स्पर्श ह्या गोष्टीचा विचार सुरु झाला आणि शेवटी त्यातून पुढे अ ड़ॉ हॉ का ब ना सु ना नावाची महाकादंबरी जन्मली त्यात स्पर्श नाहीसा करणारा untouchable नावाचा व्हायरस सगळ्या जगातील कम्प्युटर्सचा ताबा घेऊन सगळे मानवी देह बळकावतो आणि समस्त मानवी जमात स्पर्श करण्याची ताकद गमावते त्यामुळे शैवांचा तिसरा अक्ष काम हाच नाहीसा होतो व हाहाकार माजतो शेवटी ह्या कादंबरीचा नायक आणि आदिवासी जमाती मानवजातीला तिचा स्पर्श परत करतात अशी तिची थिम होती पुढे काही जागा एक्स्प्लोर करायच्या राहून गेल्या म्हणून आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण टचेबल अनटचेबल अँड ट्रान्सटचेबल अशी आणखी एक कादंबरी लिहिली त्यात नायक मानवाचे  दोन प्रकार करतो दैवी मोक्षाचा निर्वाणाचा स्पर्श प्राप्त झालेले टचेबल आणि न झालेले अनटचेबल त्यामुळे बुद्ध सोडले  तर आपण सगळेच अनटचेबल आहोत असे तो म्हणतो

भारत म्हणजे स्पर्शाला घाबरणारा देश होय साहजिकच स्पर्शाच्या अंगाने एक समग्र मांडणी करणे मला आवश्यक वाटली आणि मी ती केली ह्या मांडणीची सुरवात कॉलेजात असतांना लिहिलेल्या कवितांनी झाली होती त्या कविता इथे देतोय

स्पर्शाच्या कविता

स्पर्श 

कितीकाळ टाळाल
कसा काय टाळाल
कुठे कुठे टाळाल
माझ्या ह्या अस्पृश्य शरीराचा स्पर्श

ही हवा जी वाहतीये माझा फुफ्फुसाचा स्पर्श घेऊन
तुमच्या श्वासात मिसळत असेल
ही माती जिच्यावर  उमटवलेत मी माझे गरम पाय
तुमच्या जेवणात माझाही स्पर्श कालवत असेल
हे पाणी जे वाहतंय फक्त तुमच्यासाठी असं तुम्हाला वाहतय
वहात असेल घेऊन मी घाम सोडलेल्या ओंजळीतून
तुमच्यापर्यंत

मी तर माझ्या स्पर्शानं आख्ख जगच उष्ट केलंय
आणि तुम्ही व्यासाच्या जातीयतेच्या महारोग झालेल्या महाभारताची गोष्ट
काय सांगून राहलाय ?

तुमच्या व्यासापेक्षा मोठं आहे माझं वर्तुळ आणि त्याचा स्पर्श

श्वास घ्याल तर त्यात मी असेन
चालाल तर त्यात मी चालेन
खाल तर त्यात मी शिजेन

ही दुनिया फार छोटी आणि गोल गोल हाय भाऊ
इथं प्रेम ठेवायला जाया अपुरी पडतीये
आणि तू कुठं नफरतीसाठी एफ. एस. आय. शोधतोस ?

ये
टाक असा हात माझ्या खांद्यावर
आणि  स्पर्शची दोन पावलं माणुसकीत टाकून
माणसात चालायला सुरवात  कर
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
स्पर्श 


स्पर्शापासून दूर राहिलेले शरीर 
डोळ्यात फक्त जळत रहायचं 
डोळ्यांनी आरती करायची 
डोळे ओवाळून टाकायचे 
आणि डोळ्यात अस्पर्श्यच परतायचे 

आसपास भरधाव धावणारा स्पर्शाचां ट्रॅफिक 
आणि आपल्या शरीरावरुन साधी सायकलही नाही 

आपण टू व्हीलर  फोर व्हीलरची स्वप्नं पहायची 
आणि भर चौकात उभं राहून फक्त न्याहाळत रहायची 
स्पर्शांची ये जा 

किती कठोर आणि निर्जल करून टाकलीये आपण आपली त्वचा 
आणि काळजातलं रक्तही आता वाळत चाललेलं 

ही हवाच उरलीये आता फक्त आपल्या श्वासांच्या मिठीत 
ती सुटली की आयुष्याने वाळीत टाकल्यासारखे 
आपण कायमचे ह्या ट्राफिकमधून बाहेर 

मृत्य सुनसानीत आपली वाट पहात उभा 
आणि आपण तिथेही एका अशा दिलदार त्वचेच्या  शोधात 
जिला आपला मुका कायावाचामने चालेल 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )

***
स्पर्श  
आता स्पर्शांसाठीही जागा मोकळ्या करायला हव्यात 

आता ब्राम्हणाचा स्पर्श सर्वांनाचं खुला व्हायला हवा 
आणि अस्पृश्य ज्यांना कोणी स्पर्श करत नाही 
त्यांना स्पर्श करण्याची सक्ती करायला हवी 

स्पर्शबंदी असलेल्या ह्या देशात 
आता आंतरस्पर्शिय वाटाघाटीच व्हायला हव्यात त्वचांच्या 
आणि स्पर्शाचे स्फोट करणारे अतिरेकी 
आता सर्वत्र पैदा व्हायला हवेत 

आता जनतेला स्पर्श करणाऱ्यांनाच निवडणूक लढवता यायला हवी 
आणि जनता जी मूकी आहे बहिरी आहे 
तिला मतदानात तिचे स्पर्श दान करता यायला हवेत 

आता स्पर्श सार्वजनिक व्हायला हवा 
आणि स्पर्श फक्त वैयक्तिक करणारी बेडरूम 
रस्त्यावर यायला हवी 

आता सर्व स्पर्शांनाच कळायला हवे 
की लोकशाही ही स्पर्शाकडून स्पर्शासाठी स्पर्शातून चालवली जाते 
आणि जिथे स्पर्श नाहीसे होतात 
तिथेच अनटचेबिलिटीची हुकूमशाही सुरु होते 

आता स्पर्श एक गाव एक पाणवठासारखा एक व्हायला हवा 
आणि तो सर्वत्र उगवेल तेव्हा त्याच्या कवेत 
आख्खी पृथ्वी असायला हवी 
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )

***
स्पर्श
गावातल्या गावात वादळ झाले 

एक वावटळ थेट गावकूसात आदळली 
ती सर्वांना दिसली 
त्वचेच्या आतील श्वास जळाला 
पण तो कुणाला दिसला नाही 

मग रातोरात 
घरे जळाली 
ती फोटोत आली 
माणुसकी जळाली 
ती मात्र  फोटोत आली नाही  

शेवटी वादळ शांत झाले 
ते पेपरमध्ये छापून आले 
एक स्पर्श शेवटपर्यंत वाट पहात राहिला 
तो कुठेच छापून आला नाही 

श्रीधर तिळवे नाईक

(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )


===================================================================
आंबेडकरवादी , दलित कविता आणि मी ३  --श्रीधर तिळवे नाईक 

आंबेडकरवादाबाबत माझे पहिले सूत्र पक्के झाले होते ते म्हणजे जिथे जिथे स्वातंत्र्य , समता आणि बंधुता ह्यांचा प्रश्न येतो तिथे भारतातल्या कुठल्याही इतर विचारप्रणालीपेक्षा आंबेडकर काय म्हणतात हे पाहावे

आंबेडकरवादाबाबत माझे दुसरे सूत्र पक्के झाले होते ते म्हणजे त्यांनी केलेला अस्पृश्यतेचा विचार हा आरंभ बिंदू म्हणून घेऊन समग्र स्पर्शाचा समग्र स्पर्शतेचा समग्र अस्पर्शतेचा विचार खोलात जाऊन करायचा आणि त्याचे एक समग्र दर्शन मांडायचे आणि हे करतांना चौथ्या नवतेचा व्यूह आणि जालना सोडायची  नाही मी तो टास्क अडॉ  हॉ का बा ना सु ना आणि आत्मचरित्रातले काल्पनिक क्षण ह्या दोन लेखनकृतीद्वारा पूर्ण केला

तिसरे सूत्र होते आंबेडकरवादी चळवळीचा महाकवी नामदेव ढसाळ ह्याच्यावर एक पुस्तक लिहायचे तेही मी लिहिले

चौथे सूत्र होते बसवेश्वर शैवीझम आणि आंबेडकर ह्यांचा समतोल निर्माण करणे बसवेश्वर ज्या महमानवाने  अस्पृश्यतेविरुद्ध पहिले सामाजिक आंदोलन उभे केले तो आणि आंबेडकर ज्या महामानवाने  हे आंदोलन राष्ट्रीय व्याप्तीचे केले तो ह्यांच्या सीमारेषा एकत्र आणून त्या पेलणे

माझ्या ह्या मांडणीला आंबेडकरवाद्यांचा प्रतिसाद शून्य होता हेही ठीक होते पण सतत माझ्या जातीची चौकशी जेव्हा सुरु झाली आणि दलित नसलेल्या माणसाने असं लिहावंच कशाला असा प्रश्न जन्मवादी दलित विचारू लागले तेव्हा २००५ साली माझ्या आयुष्यातला आंबेडकरवादी कैफ ओसरला

आंबेडकरवादी कैफ ओसरला तरी आंबेड्करांच्याविषयीची आस्था कमी झाली नाही किंवा त्यांच्या स्थानाविषयी कधी किंतु आला नाही

माझ्या एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार आणि  कव्ही ह्या दोन्ही संग्रहात अशा अनेक कविता आहेत ज्या आंबेड्करांच्याशिवाय कदाचित जन्मल्या नसत्या . मात्र माझ्या ह्या कविता आंबेडकरांची पूजा करत नाहीत आंबेडकर आता असते तर त्यांनी कवी असतांना काय केले असते ह्याची संभावना त्या शोधतात एका अर्थाने आंबेडकरांना कॉन्टेम्पररी करण्याचा हा प्रयत्न होता

आज जेव्हा असे का घडले हा प्रश्न मी विचारतो तेव्हा काही गोष्टी स्पष्ट दिसतात शिवांनी जन्माला घातलेली चळवळ ह्या देशात बसवेश्वर गुरुनानकांच्यानंतर उत्तरपेशवाईपर्यंत उत्तम चालली पण पुढच्या टप्पात तिची मुघल राजवटीशी झालेली फाईट तिला दुबळं करून गेली ह्यानंतर महात्मा फुले झाले ते शैव असूनही त्याची राष्ट्रीय मांडणी ते करू शकले नाहीत उलट खंडोबा ज्योतिबा अशा स्थानिक देशी गोष्टींच्यात ते अडकून पडले खरेतर फुल्यांना पायोनियर मानून त्यांची चळवळ पुढे न्हेण्याची जबाबदारी कुणीतरी उचलायला हवी होती पण झाले नाही  नारायण गुरु शैव असूनही पुढे ज्ञानेश्वरांच्यासारखे गांधींच्या नादाला लागून वैष्णवीझमला मिळाले त्यामुळे शैवीझममधून एक महाव्यापक विचारप्रणाली निर्माणच झाली नाही त्यामुळे शैव नसेल तर शैवीझमला जवळ जाणारी विचारप्रणाली मी शोधली आणि ती आंबेडकरवाद होती आज हे स्पष्टच झालंय कि आंबेडकरवादी विशेषतः नवबौद्ध त्यातही पूर्वाश्रमीचे महार  शैवांना स्वीकारणार नाहीत आणि शैवांच्यातले काही कट्टर नवबौद्धांना मित्र म्हणून स्वीकारत नाहीयेत काही तर हिंदुत्ववादाचे कट्टर अनुयायी झालेत अशावेळी दोन्ही बाजूंनी प्रबोधन आवश्यक असते आणि नेमके तेच होत नाहीये

दुसरी गोष्ट आंबेडकरांचे वैचारिक धैर्य त्यांची सत्यप्रियता त्यांचा विवेक मला जबरदस्त मोहिनी घालतात ज्यावेळेला अख्खा भारत गीताधर्म ,राम व कृष्ण ह्यांचा जल्लोष करत होता त्यावेळेला ह्यांच्याविरुद्ध फक्त आंबेड्करच बोलत होते असे दिसते गांधींचा राजकीय कृतिशीलतेचा विवेक आणि आंबेडकरांचा सामाजिक  विचारशीलतेचा विवेक ह्यांचा मला नेहमीच अचंबा वाटत आलाय दोघांनाही मर्यादा आहेत पण त्या तत्कालीन काळाच्या आहेत

गांधी आयुर्वेदिक आहेत समाजावर निसर्गोपचार करतात आंबेडकर ऍलोपॅथिक आहेत ते आवश्यक असेल तर शस्त्रक्रिया करायला मागेपुढे पाहत नाहीत सामाजिक शवविच्छेदनाची आंबेडकरांना भीती वाटत नाही ते डिसेक्शन करतात गांधींचा उपचाराबाबतचा संयम व रिझल्ट्सची वाट बघण्याची प्रतीक्षा आंबेडकरांना परवडूच शकत नाही त्याकाळात राजकीय बाबतीत गांधी व सामाजिक बाबतीत आंबेडकर बरोबर होते असंच सध्याची स्थिती पाहून वाटते त्यामुळेच सामाजिक समता स्वातंत्र्य आणि बंधुतेचा प्रश्न आला कि मी आंबेड्करांच्याकडे वळतो असो आता इथे तीन कविता देतो

करड्या कविता 
उच्चवर्णियांना विसर पडू देऊ नका 
की ते उच्चवर्णीय आहेत 
त्यांच्या मुलांना नातवांना हे कळवत रहा कि 
ते उच्चवर्णीय आहेत 

आणि मग म्हणा कि 
ते कसे स्वतःला उच्चवर्णीय समजतात 

हे चालू ठेवा पिढ्यान पिढ्या 
उच्चवर्णियांना माणूस बनू देऊ नका 
त्यांना तो अहंकार पुरवत रहा 
कि ते उच्च आहेत 

स्वतःच्या मुलांना शिकवत रहा 
कि ते कसे  निच्च आहेत खालचे आहेत 
आणि कसे वंचित 

जणू असे सांगून त्यांचे प्रश्न सुटणार आहेत 

त्यांना हा भ्रम पुरवा 
आणि मग झोपेतही चालताना 
त्यांना स्वतःची जात आठवत राहिली की 
खुश व्हा 

हे असंच चालू द्या 
आकलनाचा दुष्काळ चालू ठेवत 
आरक्षणाच्या काळ्या  छत्र्या पुरवत 

स्वतःच्या गुडघ्यात 
स्वतःच्या हाताने  मेंदू मारून घेणे 
ह्याला म्हणतात
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
-------------------------------------------------आडनाव राहून गेले रावण राहून गेले 
शिव राहून गेले बुद्ध राहून गेले 

सगळे सांगतायत 
आम्ही ह्या देशात राहिलो 
आणि आमची मंदिरं झाली 

आम्हाला आजतागायत कळलेलं नाही 
मंदिरात राहण्याचा आम्हाला फायदा काय 

खरेतर आम्ही मेसेज आहोत 
आम्ही गेलो 
तुम्हीही जाणार आहात ह्याचा 

आणि एकदा तुम्ही गेल्यानंतर 
तुमचं काहीही होऊ शकतं 

अगदी मंदिरही 

तुम्ही अवतारही बनू शकता एखाद्या काल्पनिक गोष्टीचा 

तुम्ही परतू शकत नाही 
त्यामुळे तुम्ही काहीच दुरुस्त करू शकत नाही 

तुम्ही फक्त मंदिरातून पाहू शकता 
माणसांना तुमच्याविषयी निर्णय घेतांना 

आमच्याविषयी निर्णय घेण्याचा हक्क ह्या माणसांना कोणी दिला 

आम्ही प्रश्नही विचारू शकत नाही कुणाला 

आमच्यात आणि इथल्या सामान्य माणसात काय फरक आहे ?
श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )
बदलून 

आडनाव बदलून प्रथम त्यानं घरावरची पाटी बदलली मग सही 
मग मुलांची नावं 
हळूहळू मुलंही स्वतःला ब्राम्हण समजू लागली 

आता ऐकतोय 
की त्यानं सकाळी सत्यनारायणाची पूजा घातली 

संध्याकाळी त्याच्या घरातून 
बाबासाहेब आणि बुद्ध दोघंही बाहेर पडले 
आणि त्या दोघांना त्याच्या घराबाहेर पडताना पाहून 
रात्रीपर्यंत गल्लीतील सर्वांनी त्याची जात ओळखली 

आज त्याच्या घरचा सत्यनारायण अस्पृश्य आहे 
आणि पुरोहित ज्या हातांनी दक्षिणा घेतली 
ते हात दक्षिणेसह गोमुत्राने साफ करतोय 

श्रीधर तिळवे नाईक
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या फाईलमधून )

***








Comments

Popular posts from this blog