दिनकर मनवरांच्या कवितेवरून सध्या सुरु झालेला वाद हा केवळ प्रतिक्रिया नाही तर त्यात अस्मितांच्या बोचक्यात मानवता बांधू पाहणाऱ्या मानसिकतेचा झैलझपाटा आहे त्याचा आदर राखूनही मी म्हणेन कि अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी दिनकर मनवरांना पाठिंबा देणे आवश्यक आहे
भारतीय प्रबोधनाचे युग अजून संपलेले नाही किंबहुना त्यातील खरे संघर्ष आता अधिक उफाळून आले आहेत प्रबोधन काय आहे ? प्रबोधनाचा राजकीय प्रोजेक्ट कोणता ? तर हा प्रोजेक्ट आहे नेशन बिल्डिंगचा राष्ट्र निर्माणाचा प्रत्येक व्यक्तीतील साऱ्या अस्मितांचा अंत करून त्याला भारतीय नावाची राष्ट्रीय अस्मिता पुरवण्याचा ! युरोपने प्रथम आपली राष्ट्रे निर्माण करायला सुरवात केली आणि तिथेही अनेक देशांच्या अस्मितेवरून फाळण्या झाल्या आणि स्वातंत्र्यवादी चळवळीही लढल्या गेल्या तिथल्या वांशिक आणि आदिवासी अस्मिता तर राज्यकर्त्यांनी अक्षरशः चिरडल्या आणि ख्रिश्चन धर्माने एकधर्मीयत्व लादून आपल्या आपल्या राजांना प्रचंड मदतच केली
भारतात एकधर्मीयत्वाचा अभाव होता आणि तो भरून काढण्यासाठी सावरकरांनी एकंहिन्दुत्ववादी अस्मिता निर्माण केली तर काँग्रेसने सेक्युलर भारतीय अस्मिता !ह्या दोन्हीही अखिल भारतीय अस्मिता  होत्या आणि दोन्ही अस्मितांना इतर मार्गी देशी पोटी जमाती अस्मिता गिळायच्या होत्या आणि आहेत पण प्रत्यक्षात मतांच्या राजकारणासाठी ह्या देशातल्या राजकारणी लोकांनी सर्वच अस्मितांचे पुनर्जीवन केले आणि प्रबोधनाचा राष्ट्रीय अस्मितांचा प्रोग्राम फाफलला
आधुनिकतेने राष्ट्रीय अस्मितेला चॅलेंज दिले आणि मानव हीच एकमेव अस्सल ओळख आहे असे सांगायला सुरवात केली जे शास्त्रीय होते दिनकरच्या भाषेत पाणी निखळ पाणी आहे हे सांगण्याचा प्रयत्न होता पण प्रत्यक्षात मात्र पाणी निखळ पाणी नाहीये ते अस्पृश्य ही आहे ज्याचा अविष्कार नामदेव ढसाळांनी आपल्या पाणी ह्या कवितेत केला होता पण त्यांनाही निखळ पाण्याचीच आस होती चांगला कवी हा मानवाच्या बाजूने असतो आणि राजकारणी नेहमी मानवाच्या विरोधात असतात निखळ पाण्याच्या विरोधात असतात साहजिकच निखळ पाण्याच्या विरोधात ते अस्मितांचे मोर्चे काढतात कारण त्यांचे पोट अस्मितांच्यावर भरते हे तेच लोक असतात जे पाण्याचे भाग पाडतात उपविभाग पाडतात पोटविभाग पाडतात त्यांना नद्याही मॅपमध्ये गुंडाळून ठेवायच्या असतात आणि सामान्य माणसेही तात्कालिक स्वार्थासाठी काहीवेळा स्वतःला अस्मितांच्या रॅपरमध्ये गुंडाळू देतात

दिनकरची कविता रॅपरमध्ये गुंडाळल्या गेलेल्या अनेक प्रकारच्या पाण्याचे प्रतिमोत्सव सादर करत जाते आणि अंतिमतः निखळ पाण्याचा पुरस्कार करते हे करताना पाण्याच्या नितळपणाचा सृजनोत्सव सांगतांना स्तनांचा प्रतिमा म्हणून केलेला वापर हा वास्तविक आदिवासी संस्कृतीचा गौरव आहे पण त्याला विपरीत करून अस्मितांचे काळे चष्मे मिरवणाऱ्यांना त्यातले जांभुळपण कसे कळणार ? मुळात गोष्टी कळण्याचा प्रश्न नाहीये तर मुद्दाम कळून न घेणाऱ्या आणि अज्ञानाचे सांस्कृतिक राजकारण करून ते वाढवू पाहणाऱ्या मानसिकतेचा आहे

ह्या देशातल्या राजकारण्यांनी एकदा स्वतःलाच विचारावे कि ते भारतीय नागरिक आहेत कि फक्त स्वतःच्या जाती जमातीचे आणि अस्मितेचे नागरिक आहेत ? आणि जर ते भारतीय नसतील तर ते घटनाविरोधी आहेत .

श्रीधर तिळवे नाईक









Comments

Popular posts from this blog