सागर तळाशीकर दुराव्यातून जिव्हाळ्याकडे श्रीधर तिळवे नाईक


सागरची आणि माझी पहिली भेट नेमकी कधी झाली हे आता आठवणं कठीण आहे इतकी ती जुनी आहे भेटल्यापासून हे नाते अंतर ठेवून जिव्हाळा राखणे ह्या कॅटेगरीतील आहे ह्याला आम्ही दोघेही जबाबदार आहोत
माझी स्वतःची जीवनशैली म्हणजे जो ज्या समूहातील आहे त्याला त्या समूहाच्या अंगाने भेटणे कविंना कवी म्हणून संन्याश्यांना संन्याशी म्हणून शैवांना शैवाचार्य म्हणून इतिहासकारांना इतिहासकार म्हणून भविष्यावैज्ञानिकांना भविष्यावैज्ञानिक म्हणून ज्योतिष्यांना ज्योतिषी म्हणून समाजशास्त्रज्ञांना समाजशास्त्री म्हणून फिल्म नाटकवाल्यांना फिल्म नाटकवाला म्हणून ! सागर मला भेटला तो नाटकवाला म्हणून ! साहजिकच आमच्या भेटी नाटक , सिरीयल आणि फिल्मच्या पार्श्वभूमीवरच होत राहिल्या

तो सुरवातीला एक मितभाषी , माझ्या तथाकथित सिनियॉरिटीचा आदर ठेवणारा म्हणून भेटत असला तरी लवकरच आमची भेट मित्र म्हणून व्हायला लागली त्याने त्यावेळी आंतरमहाविद्यालयीन नाट्यकात काम करायला सुरवात केली होती आणि तो लॉचे शिक्षण घेत होता

त्यावेळीही  तो स्वतःचे लाईफ कधीच उघड्यावर आणायचा नाही किंवा त्याचे वैयक्तिक दुःख लोकांत आणायचा नाही किंबहुना खाजगी आणि सार्वजनिक ह्यांच्यातील फरक तो आईच्या पोटातून शिकून आला होता कि काय असं वाटावं इतकी गुप्तता तो सहज पाळत असे . बोलताना त्याचे लक्ष्य कायमच संबंधित कामाकडे असे आणि कुठल्याही कामाचा व्यवहार त्याला चटकन कळे .

पहिल्या भेटीत मला तो विलक्षण आत्मकेंद्रित वाटला होता पण हळूहळू माझ्या लक्ष्यात आलं कि हा आतून विलक्षण संवेदनशील आहे आणि "स्वतःचे मन दुखावले जाऊ नये " म्हणून सेफ डिस्टन्स राखतो जोवर समोरचा माणूस काय आहे ते समजत नाही तोवर तो सहजासहजी खुलत नाही

पुढे मी मुंबईला आलो आणि आयुष्य जगता जगता नागरी निवारा परिषदेत पोहचलो आणि इथेच एका वळणावर मी , राजू जोशी आणि सागर तिघेही रूममेट झालो . सुरवातीला मी आणि राजू आम्ही दोघे एकत्र राहायचो आमच्यापैकी कोणीच सेटल न्हवता आणि एकट्याने भाडे देण्याची कुवत कुणातही न्हवती . ज्यावेळी राजाने मला सांगितलं कि सागर येतोय त्यावेळी माझी प्रतिक्रिया निगेटिव्ह होती कारण ह्यावेळी माझी एक फिल्म एका मराठी अभिनेत्याने त्यावेळी चोरली होती आणि ती थेट ऑस्करपर्यंत पोहचली होती साहजिकच ह्या फिल्डबाबत माझा माइण्डसेट पॉझिटिव्ह न्हवता आणि दुसरं अभिनेता म्हणजे दारूच्या रोज पार्ट्या असं समीकरण माझ्या डोक्यात होतं आणि त्या आपल्या खोलीत व्हाव्यात असं मला वाटत न्हवतं
ह्याबाबतीतील ग्यारंटी राजानं  घेतली आणि मग मी सागरला वेलकम दिलं आम्ही काही महिने एकत्र राहिलो आणि तो एक मस्त काळ होता .

आम्हा तिघांच्यात सर्वाधिक आळशी मी होतो तर सर्वाधिक कामसू राजू जोशी होता खरं सांगायचं तर ह्या काळात राजू जोशीनं मला आणि सागरला सांभाळून घेतलं असं म्हणायला हरकत नाही आम्ही दोघेही जेवण बनवण्याबाबत मुलखाचे आळशी होतो तर राजू त्यात एकदम तरबेज !! हॉटेलचं खाणं त्याच्या जीवावर यायचं साहजिकच तो घरगुती जेवणाबाबत आग्रही असायचा . तो आल्या आल्या इतक्या फास्ट जेवण बनवायचा कि मी थक्क व्हायचो सागर आल्यावर मला एक नवीन शोध लागला तो म्हणजे सागरही कमी वेळा पण जेवण चांगलं बनवतो तो त्या काळात हेमंत देवधर च्या गँगशी अटॅच झाला होता तरीही वेळ मिळाला आणि गरज पडली कि तो जेवण बनवायचा घरातल्या कामाची विभागणी हा पुरुषांच्या एकत्रित राहण्यामधला एक रुटीन प्रॉब्लेम मात्र राजू जोशी हा प्रॉब्लेम मोठा होऊ द्यायचा नाही हळूहळू तिघांच्यात जिव्हाळा निर्माण व्हायला लागला आणि तो आजतागायत टिकून आहे

राजू जोशी आणि मी आम्हां दोघांनाही वाटायचं कि सागर सुपरस्टार झाला पाहिजे कारण आमच्या मते त्याच्याकडे अभिनय होता आणि पर्सनॅलिटीही होती साहजिकच "डान्स शिक बॉडी बनव मार्शल आर्टस् शिक " असा माझा ससेमिरा सागरच्या मागे सुरु झाला मी त्याकाळात हिंदी फिल्म इंडस्ट्री त्याच्यापेक्षा जास्त बघितली असल्याने ह्या गोष्टींची सागरला आवश्यकता अधिक आहे असे मला वाटे . एक दिवस राजू जोशीनं मला त्याच्या आयुष्यात चाललेल्या वैयक्तिक संघर्षाबद्दल सांगितलं आणि मी गप्प गप्प झालो सागर स्वतःच्या वैयक्तिक भावना आर्टिक्युलेट करत नाही आणि कधी कधी हे फार आवश्यक असते त्याकाळात तो हे सगळं धीरोदात्तपणे हाताळत होता ह्याचे आता कौतुक वाटते

आर्थिक तंगी ही सर्वांच्या खिश्यांची पर्मनंट स्थिती असली तरी त्याबद्दल फारशी वाच्यता न करता एकमेकाला सांभाळून घेऊन आम्ही तिघांनी वाटचाल केली असे आता दिसते

सागरचा एक अतिशय महत्वाचा विशेष म्हणजे त्याचा कॉमिक सेन्स ! त्याचे हसणे मला आजही आवडते . त्याचा विनोद हा पुणेरी आणि कोल्हापुरी राऊडी ह्यांचे अजिबोगरीब मिश्रण आहे . त्यात त्याची बुद्धिमत्ता दिसतेच पण आयुष्याचा विरोधाभास टिपण्याची सूक्ष्म निरीक्षणशक्तीही दिसते खोलीत अनेकदा आम्ही तिघेही एकत्र भरपूर हसलो आहोत आणि त्यात सागरचा वाटा महत्वाचा आहे मुख्य म्हणजे अतिशय सिरीयस सिच्युएशन खेळकर करण्यात सागर वाकबगार आहे आमचा राजू जोशी म्हणजे चालता बोलता इमोशनल पॉझिटिव्हिझम जिवलग मैत्री करावी ती राजानेच त्याला सागरच्या ह्या कॉमिक सेन्सने अजोड जोड दिली आणि हे अत्यंत कठीण दिवस
हसतेखेळते झाले

माझी सेन्सॉरशिप लागू असल्याने मांसाहार आणि दारू ह्यांना थोडा चाप बसला असला तरी रविवार मी मोकळा सोडला होता साहजिकच ह्या काळात महफिली चालल्या अरुण नलवडेपासून एकदाच आलेल्या  जितेंद्र जोशीपर्यंत अनेक त्यावेळचे स्ट्रगलर जे पुढे मराठीत मोठे झाले त्यावेळी धमाल उडवत ह्या महफिलीत सर्वाधिक शांत अरुण नलवडे असत आणि मग सागर तळाशीकर !दुः ख आणि सोशिकपणा , बिलंदरपणा आणि कलंदरपणा सर्व त्याच्या डोळ्यात एकत्रच नांदत असे .

कुठल्याही चांगल्या गोष्टीला शेवट असतो ह्या भागीदारीत तो आला माझ्या भाचीच्या मुंबईला येण्याच्या निर्णयामुळे ! तिला सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आल्याने एकतर मी स्वतंत्र होणे किंवा राजाने स्वतंत्र होणे अपरिहार्य होते आणि आमच्या वाट वेगळ्या झाल्या

मी सिरियल्स बघत नाही पण सागर अभिनय करतो म्हणून त्या काळात एक हा असा धागा सुखाचा आम्ही पाहत असू त्याचे ह्या काळातील एक नाटकही बहुदा स्मिता सरवदे बरोबरचे आम्ही झेलले . त्याला खरी भूमिका भेटली ती कोपेनहेगेनमध्ये हायझेनबर्गची ! मी पाहिलेला आणि ज्याची कल्पना मी रूममेट म्हणून केली होती तो अभिनेता सागर तळाशीकर ह्या नाटकात भेटतो . त्याला एकदा गमतीनं मी  सागर तळाशी जाऊन अभिनय कर म्हणजे सागर तळाशीकर हे नाव सार्थ होईल असे म्हणालो होतो ह्या नाटकात त्याने खरोखरच हायझेनबर्गच्या व्यक्तिरेखेच्या  तळाशी जाऊन अभिनय केला

ह्या नाटकात एका सिनमधून दुसऱ्या सीनमध्ये सहज सातत्याने होणारा प्रवेश भुताडिया (नील्स बोहर )आणि सागर तळाशीकर ( हायझेनबर्ग )  हे दोघेही केवळ पॉज आणि पॉइज ह्यांच्या समतोलाने  लीलया करून दाखवतात हायझेनबर्गने हिटलरला शेवटपर्यंत अणुबॉम्ब तयार करू दिला नाही आणि त्यामुळे जग वाचले पण जर्मनी मेली आपल्या राष्ट्राच्या पराभवाचा शोक हायझेनबर्गच्या बाजूने व्यक्त होतो खरा पण त्यावर रडावे कि हसावे हे कळणे कठीण होऊन बसते आपण आपल्या देशाशी द्रोह केला ही त्याची बोचरी जाणीव या नाटकात सागरने अतिशय उत्तम रीतीने सादर केली आहे . शरद भुताडियांच्या बरोबर काम करणारे सर्वचजण शरद भुताडिया होऊन जातात हा माझा आजवरचा अनुभव हे अपवादात्मकवेळा घडले तरी ह्यावेळी सागर तळाशीकरने भुताडियांना तोडीस तोड टक्कर दिली हे मान्य करावयास हवे रंगमंचावर भुताडिया असले कि बाकीचे दिसत नाहीत ह्या नाटकात  हे घडलेले नाही सागर तळाशीकरने स्वतःचे काम स्वतः घडवले असावे असे वाटण्याइतपत त्याचा रंगमंचावरचा वावर स्वतंत्र वाटला आणि हे त्याच्या अभिनयाचे फार मोठे यश मानावयाला हवे इंटरमहाविद्यालयीन पासून किंग लियरपासून सुरु झालेली माझ्या ह्या मित्राची वाटचाल आता एका मुक्कामावर पोहचली आहे हे नक्की

माझा हा मितभाषी सतत संयम पाळणारा मित्र आता नवीन काय करेल ह्याची मला उत्सुकता आहेत्याला ह्यापुढे ह्याहून अधिकाधिक सशक्त रोल आणि आरोग्यवान आयुष्य लाभावे अशी मनापासून शुभेच्छा !


श्रीधर तिळवे नाईक






































Comments

Popular posts from this blog