अर्बन लिरिकॅलीटीच्या शोधात  श्रीधर तिळवे नाईक 

गीतात्मकता (लिरिकॅलीटी)ही कवितेतली एक अपरिहार्य गोष्ट आहे आणि अक्षरवृत्त आणि मात्रावृत्तात लिहिणाऱ्या लोकांना ती माहित असतेच मात्र प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा तुमचा एथॉस अरबन असतो सुदैवाने ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुरवातीलाच सापडले -स्वच्छन्द आणि अर्बन स्लॅन्ग ! माझा कवितेचा झटका तेव्हाही एका फ्लो मध्ये वीस पंचवीस कविता लिहणारा होता आणि अर्बन लिरिकॅलीटीबाबत हेच घडले 

चालले आहे xx माझे कुमारीशी xx भोग करायला बहरून 

तुमची काही नैतिक हरकत बाप म्हणून बाप म्हणून 

अशी सुरवात होऊन ही अर्बन लिरिकॅलीटी सुरु झाली आणि 

कर डिस्को 

हो फियास्को 

कुठले न बंधन काचू दे 

देह अवघा नाचू दे 

अशी रचना करत ती संपली ह्यातील चालले आहे एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार मध्ये आहे तर कर डिस्को डेकॅथलॉन मध्ये ! कोल्हापुरी स्लॅन्गचा वापर अटळ होता तो झाला काही गझलांच्यातही अर्बन लिरिकॅलीटी मेंटेन झाली आता ह्या कवितांच्याकडे बघताना जाणवते कि चालले आहे ही लॉन्ग ओळींची तर कर डिस्को शॉर्ट ओळींची आहे चालले आहे ला माझ्या बापाने केलेल्या मनाईची पार्श्वभूमी आहे तर कर डिस्को ला खुद्दार चित्रपटातील डिस्को ८२ ची !

पुढे लवकरच मन्या ओक वाचला आणि अर्बन लिरिकॅलीटी काय असते त्याचा बंबया प्रत्यय आला विशेषतः हे प्रियतम अंधार मधली अर्बन लिरिकॅलीटी थक्क करणारी होती पुढे हेमंत जोगळेकर ह्यांची होड्या ही कविता अशीच पुणेरी लिरिकॅलीटी मस्त रूपात सादर करणारी ग्रंथालीच्या दशकांच्या कवितेत वाचली र कृंच्या कविताही अशाच विशेषतः तुझं माझं काही नाही !

मर्ढेकरांच्या मी एक मुंगी तू एक मुंगी व विंदांच्या तुझी माझी धाव आहे दातांपासून दातांकडे पासून सुरु झालेली ही अर्बन लिरिकॅलीटी ट्रॅडिशनल लिरिकॅलीटीला छेद देत आणि ग्रामीण लिरिकॅलीटीला आव्हान देत आजही वाढते आहे 

मी मुंबईत आलो तेव्हा माझ्या अर्बन लिरिकॅलीटीला मुंबैचाही वारा लागला हा वारा शहरे शहरे ह्या कवितेत आहे ही कविता कव्ही ह्या संग्रहात आहे बाबरी मस्जिदीनंतर झालेल्या दंगलीवर दंगा नावाची कविता मी लिहिली तेव्हा इतक्या भीषण अनुभवावर अशी लाईट लिरिकल कविता लिहिणे योग्य आहे का असा प्रश्न मला माझ्या काही मित्रांनी विचारला होता पुढे सौष्ठवाच्या पहिल्या अंकात पोस्टर पोएट्री म्हणून ती टाकली आणि आता ती कव्ही ह्या संग्रहात आहे 

पु शि रेगे ह्यांनी निर्माण केलेल्या गाथासप्तशतीमधील प्राचीन लिरिकॅलीटीचे अर्वाचिनीकरण करणाऱ्या अनवट आणि अर्वाचीन लिरिकल स्टाईलचे अर्बन  लिरिकॅलीटीत काय करायचे असा एक प्रश्न मला सुरवातीपासून पडला होता दिलीप चित्रेंनी ही पुशी पुशी पुशपुशीत लिरिकलीटी उत्सवासारखी साजरी केली तरी दुर्देवाने ती पुशिंच्याप्रमाणे सनातनच राहिली मुंबईत राहूनही चित्रेंना हा मागासलेपणा साधावा हे थोरच म्हंटले पाहिजे . मोक्ष ही नित्यनूतन घटना आहे आणि तो वर्तमानातून वर्तमानात प्राप्त होतो ह्याचा पडलेला विसर हा ह्याला जबाबदार आहे 

कवितेतले बरेचसे प्रश्न हे कवितेतच सोडवले जातात आणि अनेकदा ते कविताच सोडवते हा माझा अनुभव आहे माझाही  प्रश्न सोडवला एका कवितेने ही कविता पुढीलप्रमाणे 

साबणाळलेली त्वचा तुझी  अत्तरलेले नाक 

काजळलेले डोळे तुझे आयुष्याचा काढतात बाक 


लिपस्टीकलेले ओठ तुझे शाम्पूळलेले केस 

क्रिमाळलेल्या अंगावरती वासनेचा एरियल फेस 


ऍडवळणाचा देह तुझा चिन्हाळलेली काया 

कल्पनेतच संभोग , गेला आयुष्याचा कंडोम वाया 

(क . व्ही .प्रकाशन वर्ष २००४  पॉप्युलर प्रकाशन  ह्या चॅनेल सिरींजमधील पहिल्या  प्रकाशित काव्यसंग्रहातून )

असो 

माझ्या ऎंशोत्तरी पिढीने अर्बन लिरिकॅलीटीचे काय केले हे खरेतर एकदा खोलात जाऊन कुणीतरी तपासलं पाहिजे माझ्या पिढीने अर्बन लिरिकॅलीटीच्या कविता खूप कमी लिहिल्या वास्तविक मर्ढेकरांच्या अनेक कविता अर्बन लिरिकॅलीटीत असूनही हे घडले आहे म्हणजे उदा फ़लाटदादा तिच्यातून मराठी कवितेला सोडवले ते मन्या ओकने आणि काही प्रमाणात अरुण कोल्हटकरांनी ! मन्या ओकने अर्बन लिरिकलीटीत अधिक कविता लिहायला हव्या होता असे राहून राहून वाटते भाऊ पाध्येंच्या वासू नाकाच्या पार्श्वभूमीवर त्याचा अभाव अधिकच खटकतो मन्या ओक हा लैंगिकतेबाबत टिपिकल ब्राम्हणी सोवळा होता काय अशीही  शंका येते 

पुढे नव्वोदत्तर पिढीत अचानक भेटलेला अर्बन लिरिकॅलीटीचा कवी म्हणजे मन्या जोशी ! बंबैय्या स्लॅन्गचा परफेक्ट वापर आणि अस्सल मुंबईकरांच्या वाट्याला येणाऱ्या अर्बन अनुभवांची लिरिकल विलसिते हे त्याच्या अर्बन लिरिकॅलीटीचे वैशिष्ट्य ! त्याच्या ज्याम मजा ह्या काव्यसंग्रहात ह्या बंबैय्या लिरिकॅलीटीची अनेक उदाहरणे आहेत मी सौष्ठवमध्ये त्यातल्या काही कविता टाकल्या होत्या अनेकदा अभंग अनुष्टुभ आणि पादाकुलक ह्यांना सैल करत ही अर्बन लिरिकॅलीटी अवतरते मन्याची कविता त्याचे उत्तम उदाहरण आहे 

ह्याच पिढीतून पुणेरी लिरिकॅलीटी मिरवत आलेला दुसरा कवी सलील वाघ विशेषतः दुसऱ्या कवितासंग्रहापासून ही पुणेरी अर्बन लिरिकॅलीटी त्याला मानवलेली दिसते अर्बन लिरिकॅलीटीत अनेकदा गंभीर अनुभव हा खूप लाईट मूडमध्ये सांगितला जातो कधी कधी ह्या अर्बन लिरिकॅलीटीतल्या कविता लाफ्टरही वसूल करतात एक प्रकारचा सॅटायरिकल टोन ह्या कवितांना असतो मन्या आणि सलील ह्यांच्याबाबतीत हे तीव्रतेने जाणवते त्यांचे अर्बन सेटिंग अनेकदा त्यांना मान्यतेपासून वंचित ठेवते कारण देशीवादामुळे रुरल लिरिकॅलीटीची वाढलेली दादागिरी ! ना धो महानोर वैग्रेंची लिरिकॅलीटी हीच खरी लिरिकॅलीटी अर्बन लिरिकॅलीटी म्हणजे एलिट लोकांची क्लुप्ती असा काही गैरसमज पसरला आहे काय असाही प्रश्न ह्यामुळे निर्माण होतोय वास्तविक आपण सारे भारतीय आहोत आणि लिरिकॅलीटी आपल्या नसानसांत भिनलेली आहे आणि तिच्यावर अर्बन लोकांचाही तेवढाच हक्क आहे . लिरिल कवितेला ना धो , इंद्रजित भालेराव , प्रकाश होळकर ह्यांची जितकी गरज आहे तितकीच अरुण कोल्हटकर , मन्या ओक ह्यांचीही आहे 

श्रीधर तिळवे कोल्हापूर मुंबई मन्या जोशी मुंबई आणि सलील वाघ पुणे अशी तीन शहरे लिरिकल पद्धतीने आम्ही आणली प्रश्न आहे आत्ताचे अर्बन कवी लिरिकॅलीटी कशी पेलतात ते ! ह्याबाबत प्रणव सखदेवसारखे काही कवी अर्बन लिरिकॅलीटी उत्तम पेलताना दिसतायत मात्र आजही अर्बन कवी अर्बन  लिरिकॅलीटी फार कमी वापरतात अनेकदा तर बॉलिवूडची गाणी ही ह्या लोकांच्यापेक्षा परवडली असं म्हणायची पाळी येते असो 

श्रीधर तिळवे नाईक 


लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटीलिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी लिरिकॅलीटी

Comments

Popular posts from this blog