स्टेटस , फूटपट्ट्या आणि जगणे १ श्रीधर तिळवे नाईक 

आपण कशासाठी जगतो का जगतो कुणासाठी जगतो काय जगतो केव्हा जगतो हे प्रश्न कायमच माणसाचा पाठलाग करत असतात त्यातूनच माणसाने स्वतःचे मूल्यमापन स्वतःच्या व्हॅल्यू व स्टॅन्डर्डनं करावं कि इतरांनी दिलेल्या फूटपट्ट्या वापराव्यात ? हे प्रश्न निर्माण होतात व स्वमूल्यमापनाचाही  प्रश्न निर्माण होतो व  माणसाच्या आयुष्यातला एक महत्वाचा प्रश्न बनतो 

जगण्याचे चारच प्रकार असतात 

मोक्षिक : ह्या प्रकारात तुम्ही फूटपट्ट्या फाट्यावर मारून फूटपट्ट्या नाकारून जगता 

आत्मिक : जिथे तुम्ही स्वतःच्या फुटपट्ट्यानी जगता 

आर्थिक : जिथे तुम्ही समाजाच्या फुटपट्ट्यानी जगता 

कामिक : जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या फुटपट्ट्यांप्रमाणे स्टॅण्डर्डप्रमाणे जगता 

फूटपट्ट्या म्हणजे तुमचे फूट कुठे उभे आहेत कुठल्या मूल्यात उभे आहेत त्याची पट्टी म्हणजे इलाका म्हणजे क्षेत्र ! ही पट्टी हे क्षेत्र आपल्या अंतःकरणात तयार होत असते वावरत असते ते स्थावर आणि जंगम असे दोन्ही असते आपण आपला मोबाईल कॅरी करावा तसे हे क्षेत्र ही पट्टी कॅरी करत असतो आपली कुठल्याही विषयाबाबतची पोझिशन त्यामुळे प्रज्वलित होत असते आणि त्या प्रज्वलनाच्या प्रकाशात आपण आपल्या भूमिका सांडत असतो मांडत असतो आणि वेळप्रसंगी त्यासाठी भांडतही असतो ही सांडणी मांडणी आणि भांडणी अथकपणे आपली पोझिशन एक्सप्लेन करत असतात 

आपण कुठे उभे आहोत हे माहित नसले कि आपण फूटपट्ट्या उधार घेतो अन्यथा आपण आपल्या फूटपट्ट्या तयार करतो 

ज्यांना आपण कुठे उभे आहोत हे माहीत नसते असे अनेक लोक समाज आणि कुटुंब ह्यांनी दिलेल्या व्हॅल्यू आणि स्टॅण्डर्डप्रमाणे जगत असतात माणूस कुटुंबासाठी जगत असला किंवा समाजासाठी जगत असला कि हमखास असं जगतो आणि माणूस स्वतःच्या फुटपट्ट्यानी जगायला स्वतंत्र असतो काय असा प्रश्न निर्माण होतो आपण निरंतर स्वतःचं आणि इतरांचं मूल्यमापन करत असतो आणि हे मूल्यमापन अनेकदा अंतिम होतच नाही स्वतःबाबत आपण कायम सेमीफायनलमध्ये असतो 

ह्यातूनच अलीकडे चौथ्या नवतेत जीला  स्टेट्स अन्गझायटी म्हणतात तिचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि करोनाने तो वाढवला आहे स्टेट्स कोण ठरवतो ? आपण कि इतर ? आणि इतरांनी आपलं ठरवलेलं स्टेटस आपण का स्वीकारतो ? आणि अनेकदा समाजाने स्टॅण्डर्ड ठरवलेलं स्टेट्स आपण अचिव्ह करायला का धडपडतो ? आपली इंटरनल स्टॅण्डर्ड बाजूला ठेऊन ही पॅरासाईट असणारी एक्स्टर्नल स्टॅन्डर्डची साईट आपण का निवडतो ?

कुठलाही प्रश्न हा इंटर्नल एक्स्टर्नल सेमीइंटर्नल आणि सेमीएक्सटर्नल स्टँडर्ड घेऊन आपल्या भवताली वावरत असतो आपल्या स्वतःकडून अपेक्षा असतात आणि त्या आपल्या आकांक्षातून निर्माण झालेल्या असतात ह्या अपेक्षा आणि आकांक्षा खाज , खुजली स्पर्श आणि च्यूल (हा शब्द बादशहाच्या लडकी ब्युटीफुल कर गयी च्युल मध्ये मस्त वापरला आहे खाज, खुजली आणि स्पर्श ह्यांच्या दरम्यान जे होत असतं ते च्यूल  ) निर्माण करतात कारण वर्थ चा दबाव ! ज्याची अपेक्षा केली ते वर्थ होतं कि नाही ते मिळाल्याशिवाय कळत नाही अनेकदा वर्थ वाटणारं नंतर व्यर्थ वाटू शकतं तर अनेकदा मिळत नाही म्हणून ते वर्थ न्हवतंच असा खोटा दिलासा स्वतःला दिला जाऊ शकतो 

जी व्यक्ती स्वतःच्या स्टॅण्डर्डप्रमाणे जगते तिच्या वाट्याला कमी दाहकता येते का ? शक्यताय कारण आपण काय आहे ते ओळखणारा मनुष्य आपल्या मर्यादा ओळखूनच स्वतःचं स्टेट्स स्टॅण्डर्ड डिझाईन करतो स्वतःच्या स्टेटला तो ओळखून असतो आणि बाजारातील आपली पत त्याला माहित असते त्यामुळेच स्टेट कडून स्टेट्सकडे जाणे त्याला सोपे जाते कारण स्टॅटिस्टिक्स आणि टॅक्टीस ह्याबाबत स्पष्टता असते ज्ञान पाजळणे आणि ज्ञान व्यक्त करणे ह्यातला फरक त्याला माहीत असतो दुसऱ्यांच्या चड्ड्या उतरवण्यापेक्षा स्वतःच्या नाड्या ओळखणे आणि नीट बांधणे त्याला आवश्यक वाटते स्वतःविषयीच्या कल्पना ठरवण्याचा अधिकार तो आपल्याकडे ठेवतो इतरांना तो हा अधिकार देत नाही आदरचिन्हांच्या प्राप्तीसाठी तो धडपडत नाही आदर अनेकदा खोटे असतात हे त्याला माहीत असते स्टेट्स हिसकावून घेता येते स्टेट नाही ह्याची त्याला जाण असते त्यामुळे तो आपली स्टेट मेंटेन करतो स्टेट्स नाही समाज स्टँडर्डच्या शिड्यांनी बनलेला असतो आणि वरचा खालच्याला बिलो स्टॅण्डर्ड समजत असतो आणि वरच्याला अपस्टॅंडर्ड ! खालच्याला एकतर लाथ घातली जाते किंवा हाथ दिला जातो जो सर्वोच्च असतो त्याला कुणाच्या हाथाची गरज नसते किंवा लाथ पडण्याची शक्यता कमी असते शक्यता फक्त आख्खी शिडी कोसळण्याची असते ही शिडी कोसळू न देण्याचा विवेक त्याच्याकडे असला तर उत्तम नसेल तर त्याच्याकडे फक्त लाथा उरतात आणि तो सतत फक्त लाथा मारायला लागला कि गाढवासारखा दिसायला लागतो आणि मग अख्खा खेळ गाढवबगीचा होऊन जातो 

शिडीच्या सर्वोच्च स्थानी सत्ता असते सत्ता ही नेहमी इतरांच्यावर अवलंबून असते आणि सत्ताधारी लोकांना अनेकदा हे दिसत नाही त्यांना वाटते आपण म्हणजे शिडी आणि मग अचानक कुणी शिडीचा जमीनगड उध्वस्त केला कि ही सत्ता खाली येते काँग्रेसला शिडी खाली पडल्यावरच कळलं आणि आता भाजपची वाटचाल त्या दिशेने सुरु आहे पंतप्रधानपद हे ह्या देशातले सर्वोच्च स्टेट्स आहे ते स्टेट नाही ह्या स्टेटसला अनेकदा शिडीवर काय चाललंय माहीत नसतं शिवाय वर हवा जरा जास्तच लागते अनेकदा खालची माणसं मुंग्यासारखी दिसायला लागतात पंतप्रधान आत्मिक प्रकारे जगत असेल आणि त्याला आपण जे काही करतोय ते योग्य व दूरदर्शीपणाचे वाटत असेल तर त्याच्या एककल्ली व्हिजनवर विश्वास ठेवायचा कि संशय घ्यायचा असा प्रश्न निर्माण होतो बिग हाऊस इकॉनॉमी वर विश्वास ठेवून चाललेला मनुष्य स्वतःला द्रष्टा समजायला लागला कि निर्णय ताठर होतात आणि माघार नामुष्कीचे स्वगत म्हणायला लावणार म्हणून घेतली जात नाही 

स्टेट्स अन्गझायटी तुमच्याकडून काहीही करवून घेऊ शकते मर्डर सामूहिक हत्याकांड काहीही ! जेवढं स्टेट्स मोठं तितकी स्टेट्स अन्गझायटी व तिची क्रिमिनल टेंडन्सी मोठी म्हणूनच सर्वोच्च स्टेटस असणाऱ्यांनी फार काळजीपूर्वक ही स्टेटस अन्गझायटी हाताळायला हवी अहंकार आणि स्टेटस अन्गझायटी हे मिश्रण विषारी आहे आणि ह्या विषाचा फणा पृथ्वी आणि देश कवेत घेऊ शकतो 

जेव्हा अवघे राष्ट्र मार्केट बनते तेव्हा कार्पोरेट जगत ह्या स्टेटसला नियंत्रित करू पाहते  ते मतदारांना कमोडिटी बनवतं आणि राजप्रतिनिधींना कन्झ्युमर आणि स्टेटस ! एकदा का मतदार कसा कंझ्यूमेट होतो हे कळलं कि मग त्यावर इमोशनल नियंत्रण मिळवण्याचे बाजरी फ़ंडे उदयाला येतात भांडवलदार काय किंवा कार्पोरेट जगत काय दोघेही स्वार्थाने आंधळे असतात अशावेळी राजकीय पक्ष हेच नैतिकतेचे व जनतेचे आधार व डोळे असतात साहजिकच कार्पोरेट जगताला प्रस्थापित नैतिकता अडचणीची भासली कि ते तिला व ती धारण करणाऱ्या नेत्यांना गिळायला बघत असते  अशावेळीच नेत्यांची खरी कसोटी असते जे गिळले जातात ते कार्पोरेटशाहीचे भडवे वा दलाल बनतात तर जे स्वतःला गिळू देत नाहीत ते द्रष्टे नेते बनतात ह्याउलट कधीकधी असेही कार्पोरेट नेते असतात ज्यांना नैतिक कणा असतो असे कार्पोरेट नेते राजकीय शुद्धतेचा आग्रह धरतात जसे टाटा ,बजाज गांधीजींनी अशा कार्पोरेट नेत्यांची एक धाराच निर्माण केली होती ही धारा आता लुप्त होते कि काय अशी शंका यायला लागली आहे महाराष्ट्रात शरद पवार बहुदा ह्या धारेतले शेवटचे ! 

स्टेटसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते स्पर्धा निर्माण करतं आणि मूल्यमापनाच्या कसोट्या गणिती करतं त्यामुळे दर्जापेक्षा प्राप्तीगणन स्टेटसगणन महत्वाचे ठरते म्हणजे किती मतं किती टीआरपी किती फॉलोअर्स ? ह्या स्टेटसप्राप्तीगणनेचा दर्जा आणि नैतिकता ह्यांच्याशी संबंध असेलच असे नाही वरकरणी हे लोकशाहीच्या मॉडेलला पूरक स्टॅटिस्टिक्स असल्याने ह्याला विरोध करणेही अवघड जाते आणि नैतिक लोच्या वाढत जातो भ्रष्टाचाराचा लोंढा वाढत जातो अनेकदा दुसऱ्याचे स्टेटस ढासळवण्याची कारस्थाने रचली जातात त्यातून शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न होतो सचिन तेंडुलकरचे स्टेटस न वाचताच त्याला झोडपण्याचा  आणि त्याच्या शतकांवर थुंकण्याचा प्रयत्न होतो आणि असे थुंकणे पुरोगामी असल्याने त्याला मानही मिळतो अलीकडे राजकारणाचा अर्थच स्वतःचे स्टेटस सांभाळणे वाढवणे आणि प्रतिस्पर्धी विरोधी समोरच्याचे स्टेटस ढासळवणे असा झाला आहे डिजिटॅलिटीमुळे हे आता सोपेही झाले आहे गुंडांचे राजकारण आता  झुंडांचे राजकारणही बनले आहे आणि गुंड आणि झुंड ह्या दोघांना हाताळू शकणारा माणूसच आता राजकारणात यशस्वी होतो आहे ट्रोलिंग ही ह्या राजकारणाची केवळ प्रकट पद्धत आहे 

कुठल्याही समाजाचा आधार हा दंडनीती असतो पण जेव्हा ही दंडनीती गुंडनीती आणि झुंडनीती बनायला लागते तेव्हा एकाधिकारशाहीचा उदय होणे ती मजबूत होणे अटळ बनते आणि संपूर्ण समाजाचे भवितव्य एका व्यक्तीच्या वा पक्षाच्या ताब्यात जाते तो एकाधिकार शिवाजी महाराजांसारखा असेल तर कल्याण होते पण तो औरंगजेब हिटलर स्टॅलीन ह्यांच्यासारख्या असेल तर तो समाज रसातळाला न्हेतो ह्या संदर्भात औरंगजेबाच्या मुलाने औरंगजेबाला लिहिलेले पत्र उत्तम प्रकाश टाकते 

"बाबा, तुमचेच उदाहरण मी नेहमी डोळ्यांपुढे ठेविले आहे. इतके चांगले उदाहरण दुसऱ्या कुणाचे सापडणार? राजपुतांनी अकबर, जहांगीर, शहाजहान यांस मनापासून साह्य केले, त्यांचा आश्रय मी केला, यात वाईट ते काय केले? जशवंतसिंग तुमच्या भुलथापांस भुलला नसता तर तुम्ही आज हिंदुस्थानचे बादशहा नसता. असे हे राजपूत लोक आपल्या राज्याचे खांब होते. पूर्वी फौजेत राजपूत शिपाई पाहिजे असले म्हणजे एकाचे ठिकाणी शंभर उमेदवार पुढे येत. हल्ली तुम्ही तीन तीन वर्षे डांगोरा पिटूनही दहा पाच माणसे देखील जमा होत नाहीत, हा परिणाम कशाचा? आज तुमचे अंमलदार इतके आहेत, पण एकाची तरी तुमच्यावर खरी भक्ती आहे काय? फौजेतील सर्व लोक दरिद्री झाले आहेत. कोणापाशी हत्यार नाही. एक कवी किंवा ग्रंथकार तुमच्या अमदनीत निपजला नाही. व्यापारी व धनिक म्हणून जे आहेत त्यांची दिवसाढवळ्या लूट होते, त्यांचे खून पडतात. रयत तर धुळीस मिळाली. विजापूर गोवळकोंडा येथील राज्यांचा दक्षिणचा प्रदेश जो पूर्वी तुम्हांसच अत्यंत संपन्न आणि स्वर्गतुल्य वाटत होता, तो आता ओसाड, कंगाल आणि निर्धन बनला आहे. विजापूर, औरंगाबाद वगैरे शहरे केवढी धनाढ्य, विस्तृत व शोभिवंत होती, पण हल्ली तिथे धुळीशिवाय जास्त काय आहे तुम्हीच सांगा. ह्या सर्वांचे कारण काय तर तुमचा परधर्मद्वेष. तुम्ही हिंदूंवर जिझिया बसविला, त्याने लोक सर्व तुमच्यावर उठले. जाळपोळ व लूट करू लागले, त्यानेच देश धुळीस मिळाला.

शाहजादा अकबरचे औरंगजेबास पत्र १ 

ह्या पत्रावरून स्पष्ट होते कि औरंगजेबाचे स्टेटस ढासळत होते तेव्हा त्याला ते कळले न्हवते मोदींची अशी काही अवस्था आहे का ह्याचा मोदींनी परखड विचार करायला हवा आत्मपरीक्षण करायला हवे निवडणुकीत विजय मिळवून देणारे नेतृत्व आणि देशाला विकासाच्या दिशेने न्हेणारे नेतृत्व ह्या नेतृत्वाच्या दोन भिन्न तऱ्हा आहेत मनमोहनसिंगांना , नरसिंहरावांना निवडणुकीत विजय मिळवून देणारे नेतृत्व म्हणता यावयाचे नाही पण दोघांच्याही ठायी देशाला विकासाच्या दिशेने न्हेणारे नेतृत्व होते  मोदींच्या ठायी दोन्ही नेतृत्व एकवटलेत असा विश्वास संघाला होता पण प्रत्यक्षात हे खरे आहे असे आता वाटत नाही मोदी हे भाजपचे इंदिरा गांधी आहेत विजय मिळवता येतो पण विकास साधता येत नाही मग एकच पर्याय उरतो निवडणुकीप्रमाणे खोटा प्रचार करणे विरोधकांची टवाळी करणे आणि इमोशनल शो सादर करणे ह्याने टीआरपी वाढतो निवडणूक जिंकता येते पण विकासाचे मातेरे होते मोदी असे मातेरे करत आहेत कि ते दोन्ही नेतृत्वे ज्यांच्या ठायी एकवटलेत असे द्रष्टे आहेत हे अजूनही स्पष्ट झालेले नाही मोदींना असे वाटते कि ते द्रष्टे आहेत आणि आत्मविश्वास तर त्यांच्या ठायी आहेच आपण बिग हाऊस इकॉनॉमी आणून भारताचे कल्याण करत आहोत असे त्यांना वाटते आणि त्यांचे शेती धोरणही त्यांच्या ह्या दृष्टीचे फलित आहे कार्पोरेट हाऊसेसच्या ताब्यात शेती दिली तर ती सुधारेल अशी त्यांना खात्री वाटते शेतकऱ्यांची त्याला तयारी नाही कारण टाटा सोडले तर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा अशी विश्वासार्हता कुणीही कमावलेली नाही अंबानी आणि अडानी ह्यांनी तर बिलकुलच नाही मोदींचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ते थेट निर्णय घेतात आणि त्यांच्या ज्यांच्याशी चर्चा होतात त्या ते जनतेत आणत नाहीत लोकशाहीला हे धरून नाही मुळात गांधी घराण्याची ही सवय थेट ब्रिटिश व्हाइसरॉयांच्यापासून , महात्मा गांधींच्यापासून सुरु होते ह्याला छेद दिला होता तो पंडित नेहरूंनी पण इंदिरा गांधींनी ह्या व्हॉइसरॉयी सवयीचे पुनर्जीवन केले अगदी आणीबाणीचा निर्णयसुद्धा मंत्रिमंडळातल्या अनेकांना माहित न्हवता भारतातील ही संसदीय एकाधिकारशाही लोकांनी आणीबाणीत व २०१४ साली अशी दोनदा पराभूत केली ह्याचा विसर मोदींना पडलेला आहे प्रश्न असा आहे कि पुढे काय ? माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे कि मोदींनी अहंकार बाजूला करून पूर्ण माघार घ्यावी व तिन्ही कायदे रद्द करावेत आणि त्यातील आशयावर संपूर्ण खुली चर्चा घडवून आणावी अन्यथा शेतकरी आंदोलन जालियनवाला बाग बनू शकते आणि जालियनवाला ब्रिटिशांचे स्टेटस किलिंग होते हे आपण जाणतोच . 

(क्रमश:)

श्रीधर तिळवे नाईक 


स्टेटस , फूटपट्ट्या आणि जगणे २ शेतवस्तूचे व शेतकऱ्याचे स्टेटस श्रीधर तिळवे नाईक 

जगात स्टेटस ठरवण्याच्या ज्या काही अटी आहेत त्यात एखादा मनुष्य जगण्यासाठी काय करतो आणि समाज जगवण्यासाठी काय करतो ह्या आहेत ह्यातही काय करतो ह्याचे टाईप असतात त्यातही स्तर असतात 

शेतकरी पीक निर्माण करतो आणि त्यामुळेच समाज जगतो हे सर्वश्रुत आहे प्रश्न आहे शेतकरी पीक निर्माण करतो म्हणजे काय ? 

निसर्गयुगात शेती ही फक्त स्वतःसाठी वा टोळीसाठी केली जाई आणि सारा भर पेरणीवर होता टिकली तर टिकली नाहीतर नाही टिकली भारतात ह्या काळात फक्त शैव धम्म होता शैवांच्या मते शंकर हाच पहिला शेतकरी आणि त्रिशूळ हा पहिला नांगर ! रडत बसलेल्या भक्ताला नीट शेती करता यावी म्हणून सुरवातीला शंकराने काठी दिली पण तिने काम भागेना म्हणून स्वतःचा त्रिशूळ नांगर म्हणून दिला आश्चर्याची गोष्ट अशी कि मूळ कथेत कोकणात व देशावर हा त्रिशूळ लाकडी होता कारण पार्वतीला तसा दृष्टांत झाला होता त्याउलट विदर्भ मराठवाड्याकडे कथा सारखी असली तरी नांगर धातूचा आहे पीक हे पार्वतीचे देणे आहे कारण ती सुजला सुफळा आहे तिच्या नऊ  शक्तीतून ते निर्माण होते ह्यातील सात शक्ती सात मातृदेवता सात आसरा आहेत ज्यांची शेतकरी समाज पूजा करतो आसरा म्हणजे अप्सरा न्हवेत तर आश्रय देणाऱ्या आधार देणाऱ्या आसरा देणे म्हणजे आश्रय व आधार देणे साहजिकच शेतवस्तू प्रथम दैवी होत्या त्यांच्या आधारे स्त्रीराज्ये चालू होती हे मुद्दामच सांगतोय कारण जे शेतकऱ्याचा अपमान करतात ते शंकराचाही अपमान करतात हे हर हर महादेव म्हणणाऱ्यांनी लक्ष्यात घ्यावे 

पुढे श्रध्दायुगात पेरणीबरोबर लावणीचा उदय झाला आता थोडे शिस्तीने काम सुरु झाले शेतवस्तू आणि श्रद्धा एकत्रच वावरले ह्या काळात वस्तुविनिमयाने व्यवहार चालत होता ह्या काळात शेतवस्तू ह्या हस्तवस्तू म्हणून वावरत होत्या म्हणजेच माणसाचा हात वस्तूत उतरायला लागला 

पुढे धर्मयुगात  लावणीचे रूपांतर लागवडीत झाले कल्टिव्हेशन परवली बनले शेतवस्तू ह्या शेतमाल झाल्या मल नाहीसा करून निर्मळ करून शेतवस्तू बाजारात आणल्या जाऊ लागल्या  शेतीसाठी इतर टोळ्यांना जिंकून त्या टोळ्यांच्या सदस्यांना गुलाम वा दास बनवणे सुरु झाले त्यासाठी युद्धे लढली जाऊ लागली ज्याच्याकडे जेव्हढे गुलाम तेव्हढा तो श्रीमंत अशी धारणा रूढ झाली गुलांमांचा छळ सुरु झाला  वाढला  अनेक गुलाम ह्या वस्तू कलेक्टिव्हली तयार करू लागले घाणे तयार झाले गुलामगिरी व सर्फडम ह्यांच्या आधारे जमीनदारी व्यवस्था तयार झाली आणि जमीन ही मुख्य प्रॉपर्टी झाली माणूस हाही माल झाला त्याची खरेदी विक्री सुरु झाली धर्म दिवसा राबवून घ्यायचा आणि रात्री प्रवचनात दिलासा द्यायचा त्यामुळे गुलामांना आपल्या गुलामगिरीची जाणीवच व्हायची नाही एका अर्थाने धर्म अफूसारखा काम करायचा 

मोक्षयुगाने धर्मयुगाला आव्हान दिले धर्माच्या आधारे दास निर्माण करण्याला विरोध केला पण मोक्षयुगात भक्ती शिरली तिने पुन्हा धार्मिक अफू जिवंत केली पुढेपुढे तर मोक्ष व समाज ह्यांची फारकत करून संन्यासव्यवस्था बळकट करण्यात आली जेणेकरून संन्याशाने सामाजिक अन्यायाविरुद्ध बोलू नये संन्याश्यांचे स्वतंत्र संघ निर्माण केले गेले जेणेकरून त्यांनी राज्यकर्त्यांच्यावर नैतिक दबाव निर्माण करू नये ह्या काळात नांगर नव्याने तयार झाले आणि लागवडीचे नवे तंत्र तयार झाले सुधारले  पुढे इस्लामने उत्तरधर्मवादाची सुरवात करून धार्मिक गुलामगिरी पुन्हा रिस्टोर केली आणि ज्याच्याकडे जेव्हढे गुलाम तेव्हढा तो श्रीमंत अशी धारणा पुन्हा रूढ झाली गुलांमांचा छळ वाढला सरंजामशाही तयार झाली ह्या काळात शेतवस्तू ही माल न राहता उत्पादन बनली प्रॉडक्ट बनली आणि शेतकरी प्रोड्युसर बनला 

ह्या चारी युगात शेतकऱ्याचा आब टिकून होता कारण शेतवस्तू निर्माण करणे हे सर्वाधिक आदराचे काम होते मात्र शेतमजूर कायमच गुलामांच्या व्यवस्थेत राहिला भविष्यातील भांडवलदार आणि कामगार ह्यांच्यासारखेच हे संबंध होते शेतकरी आणि शेतमजूर स्वामी आणि दास मालक आणि गुलाम उच्च आणि शूद्र ब्राम्हणक्षत्रिय आणि शूद्र !

विज्ञानयुगाने साकारलेल्या प्रबोधनात शेतकऱ्याचा हा आब फाटायला सुरवात झाली त्याने शेतकऱ्याचा कणा काढून घ्यायला सुरवात केली शेतीविज्ञानाने जीवविज्ञानाने वनस्पतिविज्ञानाने मुळातच वनस्पतींचे  पावित्र्य काढून घेतले व त्यांना शास्त्रीय ज्ञानाच्या कक्षेत आणले निसर्गाला मशीन समजणारे हे युग होते साहजिकच निसर्ग हाच दुय्यम नागरिक बनला आणि त्याबरोबर शेतकरीही ! ह्यामागे देकार्तचे जमिनीला मन नसते  रादर मनुष्याखेरीज इतर कुणालाच मन नसते हे तत्व होते आतापर्यंत शेतकरी जमिनीला मन असते असं मानायचा देकार्तने जमीन निर्जीव आहे असे सांगितले व पुढे मार्क्सने निसर्गाला जमिनीला मशीन म्हणायला सुरवात केली पारंपरिक ख्रिश्चन धर्मात सबस्टन्स व ऍक्सिडन्ट असे दोन भाग होते म्हणजे माणसाचे केस हा सबस्टन्स पण त्या केसाचा बदलणारा रंग हा अक्सिडन्ट ! बेकनने विचार व मनुष्य केंद्रस्थानी आणला देकार्तने विचार करण्याची क्षमता ही माणसाच्या मनात असते असे सांगून माणसाला निसर्गापासून वेगळे काढले त्यामुळे माईंड आणि बुद्धी हे माणसाचे वैभव ठरले हे वैभव जमीन व वनस्पती ह्यांच्याकडे नसल्याने निसर्ग माणसाचा विस्तारित अवयव झाला 

रोमॅण्टिसिझमने बुद्धिप्रामाण्य नाकारून शेती व शेतकऱ्याला वैभव देण्याचा प्रयत्न केला खरा पण शेतीमागे जी जमीनदारी व्यवस्था होती ती अडथळा बनून वावरू लागली शेतवस्तू ही ह्या काळातच एक क्रयवस्तू म्हणून उदयाला यायला सुरवात झाली आणि इथूनच शेतकऱ्याचे स्टेट्स ढासळायला सुरवात झाली कारण तो जो शेतवस्तू पुरवत होता ती आता केवळ कच्चा माल होती अन्न नावाच्या पक्क्या मालाचे आणि हे अन्न आता हॉटेलात विकले जाणार होते विज्ञानयुगात प्रबोधनात उदयाला आलेली सर्वात मोठी इंडस्ट्री ही हॉटेल फूड इंडस्ट्री होती मांसाहार हाही तिचा एक भाग होता दूध मार्केटमध्ये उतरले गेले डेअऱ्या उभारल्या गेल्या मोक्ष काळातील खाणावळींचे व अतिथी देवो भवचे वैभव लयाला जाऊ लागले खाणारा पाहुणा न राहता गिऱ्हाईक कस्टमर बनू लागला 

प्रतिसृष्टीय औद्योगिक युगात शेतकऱ्याचा आब पुरताच गेला तो केवळ कच्चा माल पुरवणारा कच्चा खेळाडू बनला ज्याचा पक्क्या मालाशी सम्बन्ध तुटत गेला शेतवस्तू अगदी दूधही महानंदा अमूल्य गोकुळ असं कम्पन्यांच्यामार्फत उचललं  जाऊ लागलं आणि त्यांचा शिक्का पडून विकलं जाऊ लागलं शेती कंत्राटी पद्धतीने केली जाऊ लागली बैल गेले ट्रॅकटर आला आणि गिऱ्हाईक (कस्टमर) ग्राहक म्हणजे कन्झ्युमर बनले दुकानदार व गिऱ्हाईक ह्यांच्यात जो वैयक्तिक जिव्हाळा होता तो जाऊन हा जिव्हाळा कमर्शियल झाला व्यापारी नगदी पीकं घेतली जाऊ लागली शेतकरी ग्राहकांना दिसेनासा झाला त्यांना मॅकडोनाल्ड , ताज , कामत , आशीर्वाद , बेडेकर , कुबल , एमडीएच हल्दीराम अशी चेन दिसू लागली ताटातलं अन्न कुठल्या शेतकऱ्याकडून आलंय ह्यापेक्षा कुठल्या ब्रॅंडकडून आलंय हे महत्वाचं ठरू लागलं हीच अवस्था खाणमालकांची व खाणकामगारांची होती कार्सनां लागणारे धातू कुठल्या खाणीतून आलेत  ह्यापेक्षा ते कुठल्या कम्पनीकडून आलेत व कार कुठल्या ब्रॅण्डची आहे हे महत्वाचे झाले आज कच्चा माल पुरवणारे सर्वच अदृश्य स्थितीत गेलेत आणि त्यामुळेच हे लोक लोकशाहीला दिसत नाहीत नेत्यांना दिसत नाहीत अगदी शेती करणाऱ्या किंवा शेतकरीपुत्र असलेल्या नेत्यांनाही दिसत नाहीत शेतं ही अनेक शहरी लोकांच्या दृष्टीने आता फार्म हाउसेस झाली आहेत फार्म हाऊसेसमध्ये जाऊन निसर्ग हाही एखाद्या वस्तुप्रमाणे भोगायचा ही वृत्ती बोकाळली आहे ह्यांना शेतावर जाऊन पार्ट्या करायच्या असतात शेतकऱ्यांविषयी आस्था शून्य असते 

शेतकऱ्याच्या आणि शेतीच्या स्टेटसचं क्रमशः होत गेलेलं अधःपतन आणि मग लग्नासारख्या सभारंभात उत्सवी आभासी काल्पनिक स्टेटस कमवून स्वतःचं खाली गेलेलं स्टेटस पुन्हा रिस्टोर करण्याची मूर्ख आकांक्षा ह्यांच्यामुळे शेतकऱ्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत शेतमजूर परवडत नाहीत म्हणून स्वतःची लोकसंख्या वाढवणे हाही असाच एक मूर्ख उपाय त्यामुळे अंतिमतः शेतकरी नाही तर शेतमजूर निर्माण होतो ह्याचीही जाणीव नाही वस्तुस्थिती अशी आहे कि आज शेतकरी अस्तित्वातच नाहीत. अस्तित्वात आहेत ते  फार्म ओव्हनर्स किंवा शेतमजूर ! ह्यातील काही शेतमजुरांची जमीन त्यांची स्वतःची आहे एव्हढंच ! बाकी प्राप्ती शेतमजुराएव्हढीच ! त्यामुळे अंतिमतः शेतकरी मागतो काय तर पूर्वीचे वैभवी स्टेटस त्या स्टेटसमुळे प्राप्त होणारी इज्जत आणि किमान आवश्यक असे शेतमजुरीचे वेतन ज्याला शेतवस्तूचे भाव असे गोंडस नाव दिले गेले आहे प्रत्यक्षात मालकी आहे पण मालकी हक्काचे फिलिंग नाही ही शेतकऱ्याची मानसिक स्थिती आहे ही परात्मता ( मी ह्याला ऍग्रिकल्चरल एलिनेशन म्हणतो )टोकाची वाढत गेली आणि हतबलता हताश होत अंतःकरणात दम तोडायला लागली कि शेतकरी आत्महत्या करतो 

श्रीधर तिळवे नाईक 

स्टेटस , फूटपट्ट्या आणि जगणे  ३ शेतकऱ्याचा अविश्वास आणि मोदी श्रीधर तिळवे नाईक 

शेतकऱ्याची परात्मता ही केवळ आत्मिक नाही तर राजकीयही आहे त्याला कुठलेच सरकार शासन व प्रशासन आपले वाटत नाहीये कारण ह्या तिन्ही गोष्टींनी त्याने टाकलेल्या विश्वासाचे लचके तोडलेले आहेत आताची १० टक्के सुरक्षितता ही भविष्यातील अस्तित्वात नसलेल्या १०० टक्के सुरक्षिततेपेक्षा त्याला अधिक महत्वाची वाटते त्याला वाटते कि हे शहरी बाशिंदे कायमच वेगवेगळ्या सरकारी योजनांसाठी धरणासारख्या प्रकल्पासाठी माझी जमीन हिसकावतात आणि जमीन एकदा का हाती लागली कि वाऱ्यावर सोडून देतात अशावेळी सरकारने प्रथम स्वतःविषयी विश्वासार्हता निर्माण करायला हवी होती पण मोदींनी हे केलेलं नाही उलट आंदोलनजीवी खलिस्तानी सारखे स्टॅम्प मारून संशयच वाढवला आहे मुळात सरकारचा हेतू खरोखरच चांगला आहे ह्याच्या खाणाखुणा निर्माण झालेल्या नाहीत मोदींच्याविषयी एक सार्वत्रिक संशय निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झालेत मोदींना ह्या बदललेल्या वातावरणाची जाणीव नाही मी मागच्या दोन्ही लोकसभात मोदी निवडून येतील असे सांगितले होते पण तिसऱ्या लोकसभेबाबत असे वातावरण नाही जर असाच माहोल राहिला तर मोदी पुढची निवडणूक हरतील असा माझा अंदाज आहे शिवाय पक्षांतर्गत बंडाळी माजण्याचीही शक्यता आहे विशेषतः नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाभिलाषी असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली हे घडण्याची शक्यता आहे 

मोदींनी १८ महिन्यासाठी स्थगिती देण्याची व चर्चेची तयारी दर्शवली होती तेव्हा व नंतर सर्वोच्च न्यायालयाने पॅनेल निर्माण करून स्थगिती आणली होती त्यावेळी अशा दोन्ही वेळी हे आंदोलन तात्पुरता विश्राम घेऊन स्थगित करता आले असते (मी बंद म्हणत नाहीये हे लक्ष्यात घ्यावे ) पण हे घडले नाही त्याचे कारण मी वर उल्लेख केलेला सरकारविषयीचा अविश्वास ! आपली बहुजनांची सरकारला दुरुस्त करण्याची व ताळ्यावर आणण्याची ताकद कुठेतरी अंडरएस्टिमेट केली गेली भारतात दत्ता सामंतांचे आंदोलन व हे आंदोलन ह्यांची जी तुलना झाली त्याचे कारण शेतकरी नेत्यांचा ह्यावेळचा आडमुठेपणा ! सर्वोच्च पॅनेलवर अर्धे आमचे अर्धे तुमचे अशी मागणी करता आली असती आणि सरकार मानेपर्यंत रेटता आली असती पण हे घडले नाही कुठल्याही आंदोलनात समाजवादी, साम्यवादी आणि नवबौद्धवादी रोमँटिक क्रांतिकारक फिलिंग निर्माण करत असतात त्यांना जनतेचा निवडणुकीत पाठिंबा नसला तरी ! ह्या आंदोलनातही हे फिलिंग ह्या लोकांनी आणले आहे पण त्या फिलिंगचा आदर ठेऊन त्याच्यावर रियॅलिटी चेक ठेवण्याची जबाबदारी शेतकरी नेत्यांच्यावर विशेषतः फुलेआंबेडकरवादी  बहुजनवादी नेत्यांच्यावर आहे माझा अंदाज चुकला नाही तर मोदी पुन्हा वाटाघाटीची संधी निर्माण करतील कारण त्यांचाही मतदार ह्या आंदोलनात त्यांच्याविरुद्ध गेला आहे हे कळण्याइतपत त्यांच्याकडे इन्साइट आहेच आणि ही त्यांच्याकडे नसेल तर मोदी पुढची निवडणूक हरल्यात जमा आहे . 

भाजपमधील अनेक मध्यमवर्गीयांनी शेतकऱ्याला उद्योगपती ठरवून त्याच्या उत्पादनाचे उत्तरदायित्व त्याने घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे इतर उत्पादक असे करत असतील तर शेतकऱ्याने असे करायला काय हरकत आहे असा प्रश्न आहे इथे शेतकऱ्याचे स्टेट्स उत्पादकाचे आहे असे गृहीत धरले आहे ज्यात तथ्य आहे पण उत्पादक आपले उत्पादन व्यापाऱ्याकडे देई कार्पोरेट हाऊसकडे नाही ह्याचा विसर पडला आहे मोदींना शेतकरी उत्पादक म्हणून नको आहे उत्पादकशाही मग ती भांडवलवादी असो वा  समाजवादी  भांडवलदारांचे वा समाजवादातील भांडवल अधिकाऱ्याचे  व्यापाऱ्यांशी व शेतकऱ्यांशी काही तरी संबंध असत कार्पोरेटशाहीत कार्पोरेटला वैयक्तिक चेहरा नाही अनेकदा तर कायदेशीर जबाबदाऱ्या नाहीत मोदींना बिग हाऊस इकॉनॉमी उभी करायची आहे आणि बिग हाऊस इकॉनॉमी ही दहा ते वीस कार्पोरेट हाऊसेसपूरती मर्यादित असते मोदींच्याकडे किती कार्पोरेट हाउसेस आहेत ? आणि ते त्यांना कसे वागवणार आहेत ?अलीकडेच रामदेव बाबांनी जरा विरोधी आवाज उठवला तर मोदींनी त्यांचे नाव घेणे बंद केले हिटलरचा जसा समाजवाद होता स्टॅलिनचा जसा साम्यवाद होता तसा मोदींचा हा कार्पोरेटवाद नसेल हे कशावरून ? आर्यन ब्राह्मण्य आर्थिक सत्तानियंत्रणाच्या मागे आहे एकदा अन्नच स्वतःच्या नियंत्रणात आणले कि जनतेला हवा तसा डान्स करायला लावता येतो हे आपण इंग्रजांच्या राजवटीत अनेकदा पाहिले आहे जे अन्न भारतीयांनी पिकवले होते आणि ज्याच्यावर प्रथम भारतीयांचा हक्क होता ते अन्न ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धात भारतीयांना उपाशी ठेऊन इंग्लंडवासीयांना दिले आहे अन्नाचा हक्क हा कधीही परक्यांच्या ताब्यात द्यायचा नसतो कार्पोरेट हाऊस इकॉनॉमीमध्ये हा अन्नाचा हक्क ब्रिटिशांच्याप्रमाणे मोजक्या हातात एकवटला जातो आणि उद्या समजा चायनाने पद्धतशीर राजकारण खेळून  शेयर्सच्यामार्फत ह्या कम्पन्या बळकावल्या आणि भारतीय अन्नच आपल्या ताब्यात घेतले आणि युद्ध पुकारले तर --? चायना हे करू शकतो मोदींना हे दिसत नाहीये मी शेतीबाबत कट्टर देशी आहे तर औद्योगिक बाबतीत मार्गी त्याचे कारण अशा शक्यता ! शेतवस्तू ह्या कायमच जीवनावश्यक ह्या कॅटेगरीत आल्या पाहिजेत आणि आवश्यक असेल तर शेतकऱ्याला वाटेल त्या सबसिड्या द्यायला हव्यात सबसिडीमुक्त शेती हे अजून तीस वर्षे तरी दिवास्वप्न आहे 

श्रीधर तिळवे नाईक 

स्टेटस , फूटपट्ट्या आणि जगणे  ४ शेतकऱ्याचा कृषी उत्पन्न समितीवरचा विश्वास आणि मोदी श्रीधर तिळवे नाईक 

शेतीवर मला खरंतर लिखाण करावयाचे न्हवते कारण १९९० पासून मी शेतीत उतरलेलो नाही आणि शेतीविषयीचे शेवटचे काम मी २००४ साली केले होते तेही धान्यवाळवणीचे ते पण आई आजारी पडली होती आणि घरात कोणी न्हवते म्हणून ! २००४ नंतर शेतीत काय बदल झाले ह्याचा मला थेट अनुभव नाही त्यामुळे ह्या विषयावर लिहिण्याचा आपणाला काही अधिकार नाही असे समजून मी गप्प होतो पण काही मुद्दे चर्चेला आले नाहीत म्हणून हे लेख लिहायला बसलो आहे 

दिलीप चव्हाण ह्यांची एक पोस्ट पुढीलप्रमाणे होती 

हिमाचल प्रदेश मध्ये सफरचंद हे सर्वाधिक पिकवले जाते.

सफरचंद आहेत म्हणजे छोटी-छोटी गोदामे देखील आहेत छोटे-मोठे व्यापारी आहेत अडते आहेत.

लालडू मध्ये असाच एक बाजार होता. पण तो छोटासा होता. त्याचा उद्धार करण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतला. तेथे एक प्रचंड मोठे गोदाम बनवले गेले.

पहिल्यांदा सफरचंद 20 रुपये किलो व्यापाऱ्यांना मिळायचे. धन्ना सेठ आले त्यांनी पहिल्याच वर्षी 22 रुपये किलो भाव दिला. छोटे व्यापारी आणि गोदाम वाले भयंकर परेशान झाले. पुढच्या वर्षी शेटजींनी 23 रुपये किलो भाव दिला. व्यापार्यांनी आणि गोदाम वाल्यांनी आपल धंदापाणी तेथे बंद केला.

तिसऱ्या वर्षी धन्ना सेठ एकटेच खरेदीदार उरले त्यांनी दर काढला सहा रुपये किलो

सफरचंद उत्पादन करणारे शेतकरी मालामाल झाले. पैसा ठेवायला जागा नाही अशी त्यांची अवस्था झाली.

ही सत्य कि असत्य मला माहीत नाही पण हिच्यातला तथ्यांश सावध करणारा आहे आणि ह्याचा पुरावा म्हणून आपण विजेबाबत काय झाले ते पाहू शकतो कार्पोरेट हाउसेस कडे वीज गेल्यावर ज्या तऱ्हेने बिले वाढली त्यापेक्षा वेगळे काही अन्नाबाबत घडणार नाही ही तीन चार कार्पोरेट हाउसेस संगनमताने दर ठरवून लोकांना लुटायला लागतील ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही ह्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यालाच पडणार कारण शेतकरी हा काही फक्त उत्पादक नाही तो ग्राहकही आहे 

वीजेबाबत समाजवाद गेला खरा पण विजेचे प्रश्न सुटले का एनरॉनसारख्या कम्पन्यांचा भ्रष्टाचार आपले किती पैसे बुडवून गेला ? भांडवलदार आणि कार्पोरेट हाऊसेस सज्जन नसतात ते प्रॉफीटजीवी असतात आणि हा प्रॉफीटजीवीपणा जेव्हा शोषणजीवी बनतो तेव्हा आंदोलनजीविंना आंदोलन करावे लागते विजेच्या बिलांबाबत जो विलक्षण सावळा गोंधळ झाला आहे तो बघितला कि आंदोलनजीविंची आवश्यकता पटते 

ह्याबाबत एक उलट युक्तिवाद असाही करता येऊ शकतो कि वीज टिकाऊ असते तसा शेतमाल टिकाऊ नसतो तो नाशवंत असतो व शेतकऱ्याला तो पुन्हा शेतात न्हेता येत नाही  त्यामुळे कार्पोरेटसनांही तो ताबडतोब विकावा लागेल प्रत्यक्षात कार्पोरेट्स निर्जलीकरणाची आधुनिक तंत्रज्ञाने घेऊन आल्याशिवाय राहणार नाहीत किंबहुना त्यामुळेच मला त्यांची बाजारात आवश्यकता वाटते किंबहुना शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी आणि कार्पोरेट्स ह्यांची एक सलग साखळी आणि प्रत्येकाचा ह्या साखळीतील डिफाइन्ड रोल ही आजची गरज आहे निर्माता, उत्पादक , मालसंकलक ,किमंतनिर्णयक , व्यापारी , कार्पोरेट्स , दुकानदार (ह्यात मॉलही येतात )व ग्राहक अशी चेन सर्वच क्षेत्रात आणणे आणि ती भ्रष्टाचारमुक्त चालवणे ह्यालाच मी सम्यक शैव अर्थशास्त्र म्हणतो व्याप्याराच्या कार्पोरेट्सच्या व भांडवलदारांच्या हातात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सोपवणे हे परवडणारे नाही किंमतनिर्णयक त्यामुळेच महत्वाचा आहे पण त्याबरोबर हेही तितकेच खरे कि किंमतनिर्णयकाने स्वतः खरेदी करू नये तर मिनिमम किंमत ठरवावी मॅगझिमम  रिटेल प्राईस व मिनिमम होलसेल प्राईस ह्या दोन्ही किंमतीबाबत किंमत निर्णयकाने आपला अधिकार बजावणे आवश्यक आहे ह्यातील MRP आपणाला माहीत आहे MHP माहीत नाही शेतमालाबाबत ही MHP महत्वाची आहे दुधाच्या संकलनाचे जसे जाळे आहे तसे पिकाच्या संकलनाचे जाळे निर्माण व्हायला हवे आज शेतकरी स्वतःच बाजार समितीच्या दारात आपल्या शेतवस्तू घेऊन जातो व व्यापारी खरेदी करतो वास्तविक बाजार समिती वा व्यापारी शेतकऱ्याच्या दारात दुधाप्रमाणे  पीक गोळा करायला त्याच्या दारात गेले  पाहिजे व तिथल्या तिथे शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजेत पण असे घडलेले नाही जमीन हीच जर आपण शेतकऱ्याचे दुकान मानले तर आपली ह्याबाबतीतली मानसिकता बदलेल व दूध संघासारखे पीक संघ निर्माण होतील असो 

शेतवस्तूबाबत काय घडले ? भांडवलशाहीत भांडवलदारांच्या हातात सूत्रे एकवटतात म्हणून समाजवादाचा पर्याय स्वीकारला गेला पण तिथे काय झाले ? कृषी उत्पन्न बाजार समित्या निर्माण केल्या गेल्या आणि समाजवादात सगळ्या गोष्टी पॉलिटिकल बनतात तशा ह्याही समित्या पॉलिटिकल बनत गेल्या मी कॉलेजमध्ये असतांना त्यांना खोळम्बलेल्या समाजवादाचा अडकित्ता म्हणायचो कारण समाजवाद मोजक्या लोकांच्या हातात सत्ता एकवटत जातो तेच ह्या समितींच्याबाबत घडले शेतकऱ्याला स्वतःच्या शेतवस्तू स्वतःच विकण्याचा अधिकार मिळाला खरा पण तो त्याने बाजार समित्यांच्या दारात व दरात  विकाव्यात असा दबावही निर्माण झाला म्हणजेच किंमतनिर्णयक हाच संकलक  बनला पण हा निर्णयक अंतिमतः माल कुणाला विकणार होता बहुतांशवेळा हा माल पुन्हा व्याप्याऱ्यांनीच खरेदी केला साहजिकच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्यावर व्याप्याऱ्यांनी आपला दबाव निर्माण केला आणि अटी डिक्टेट करायला सुरवात केली शेतकऱ्याला ह्यात काय फायदा होता तर त्याला भावाची हमी मिळाली आणि २४ तासात पैसेही ! पण ही हमी योग्य भावाची मायभूमी ठरली नाही कारण समितीलाच शेतवस्तू विकावयाची सक्ती ! एका अर्थाने समिती ही सरकारी भांडवलशाही होती, एकाधिकारशाहीही होती व एकपेठशाहीही होती आणि हिने शेतकऱ्यांना योग्य भाव दिला नाही अपवादात्मकवेळा व्याप्याऱ्यांनी शेतकऱ्यालाच त्याचा माल विकून उलट त्यालाच तुझ्याकडे देणे आहे असे सांगितले हा विनोदी दुर्विलास होता 

त्यातच ह्या समित्या ग्रामीण राजकारणाच्या अड्डे बनल्या आणि राजकारण कुठल्याही घरात शिरलं कि सर्वात प्रथम चुलीत जाते माणुसकी आणि सद्सदविवेक ! शेतकऱ्याकडे बघतांना समितीकडे ह्या दोन्ही गोष्टींची आवश्यकता होती राजकारणामुळे हे पीक थांबले . 

श्रीधर तिळवे नाईक 









Comments

Popular posts from this blog