गहारांच्या चर्चेनंतर आता आपण कालिक मितीकडे वळू ही मिती म्हणजे नवतार होय नवताराला तीन चेहरे असतात
१  ताजा
२ नवा
३ नवतारी

सर्वसाधारणपणे चांगली कलाकृती ही कमीत कमी ताजी फ्रेश असावी लागते अनेकदा पारंपारिक लिहिणारे लोक शिळेच लिहीत असतात पण काही बहाद्दर असे असतात कि ते पारंपारिक आशय ताजा करून सांगतात मराठीत व भारतात  रोमँटिक आशय वापरून वापरून गुळगुळीत झालाय पण तरीही प्रत्येक पिढीत त्याला ताजे बनवणारे कलावंत जन्मत असतात उदा गुलज़ार , सौमित्र , गणेश दिघे , चंद्रशेखर सानेकर किंवा आधुनिक नवतेत दासू वैद्य , वर्जेश सोळंकी

ह्या रोमँटिसिझम मध्ये पूर्णतः नवा आशय आणणारे काही कलावंत असतात उदा ग्रेस वा पु शि रेगे ह्यांची राजपुत्र आणि डार्लिंग वा पुष्कळा ह्या कविता किंवा आधुनिक नवतेत वसंत डहाकेंची योगभ्रष्ट व विलास सारंगाची सर्वच कविता ,  किंवा देशी नवतेत मंगेश काळे , प्रफुल्ल शिलेदार , प्रवीण बांदेकर , कविता महाजन , नितीन कुलकर्णी , भ्रमिष्टाचा जाहीरनामानंतरचा संतोष पवार ,

सध्याच्या काळात नवतारी कविता ही चौथ्या नवतेच्या कवींनी लिहिली आहे उदा  सलील वाघ ह्यांची ट्रॅफिक किंवा संतोष पवार ह्यांची भ्रमिष्टाचा जाहीरनामा श्रीधर तिळवे , सलील वाघ  , मनोज जोशी , सचिन केतकर , निवी कुलकर्णी  २००० नंतरचे अरुण काळे , भुजंग मेश्राम , हेमंत दिवटे , प्रणव सुखदेव , सत्यपालसिंग राजपूत ,ओंकार कुलकर्णी , अशा अनेकांनी एका बाजूला आधुनिक व देशी  नवतेच्या ताज्या वा नव्या आणि दुसऱ्या बाजूला चौथ्या नवतेच्या नवतारी कविता लिहिलेल्या आहेत

प्रत्येक नवता कालांतराने जूनता होते आणि प्रत्येक पिढीत काही कलावंत माजी नवतेला  ताजी आणि नवी बनवत राहतात कधी कधी मात्र समाजात एखादा विचार ताजा आणि नवा होऊनही साहित्यात त्याचे पुरेसे प्रतिबिंब पडत नाही .मग  कधीकधी अचानक तो केंद्रस्थानी येतो  उदा .  हिंदुत्ववादासारखा सावरकरी विचार साहित्यात पुरेसा सेटल  झाला  नाही कलाक्षेत्रात त्याला पुरेशी मान्यता मिळाली नाहीआणि मग अचानक एकविसाव्या शतकात तो नवा बनून आला   मराठी  साहित्यात रोमँटिक नवतेचा ब्राह्मणी हिंदुत्ववाद सावरकर पु भा भावे  व गोविंद आधुनिक हिंदुत्ववाद  मनमोहन आणि देशी तिसऱ्या नवतेचा ओबीसी  हिंदुत्ववाद नेमाडे असा नवतारलेला दिसतो  मोदींची पूर्वतयारी नेमाडेंनी साहित्यात आधीच केली होती मराठी समीक्षकांना ती कळाली नाही कारण बहुतेक समीक्षक सेक्युलॅरिझमने असे काही झिंगले होते कि पायाखाली काय जळत येणार ह्याचा अदमास त्यांना आलाच नाही नेमाडे गर्वसे कहो हिंदू हैं ह्याचा अत्यंत प्रगल्भ पण सूक्ष्म असा अविष्कार करत होते / आहेत   त्याची राजकीय परिणीती हिंदुत्ववादी भाजपला सत्तेवर आणण्यात होणार आहे हे आम्ही खूप वर्षांपूर्वी सांगितले होते एडवर्ड सैदच्या ओरिएंटॅलिझमची परिणीती शेवटी अनेक देशात  इस्लामिक राजवटी आणण्यात झाली तसेच काहीसे नेमाडेंच्या देशीवादाबाबत झाले आहे नितीन रिंढेंसारख्या आमच्या मित्रांना हे कळत नाही हे दुर्देव !

श्रीधर तिळवे नाईक


Comments