भीमसंवेदनशीलता आणि नितीन वाघ ह्यांची बुद्धाइतकं स्वार्थी नाही होता येत ही कविता श्रीधर तिळवे नाईक

बाबासाहेब आंबेडकर हा भारतातील प्रबोधनाचा सर्वोच्च बिंदू आहे आणि त्यांनी जी संवेदनशीलता निर्माण केली ती भीमसंवेदनशीलता होय जय भीम ही घोषणा ही ह्या भीमसंवेदनशीलतेचा जयजयकार आहे

तिचा प्रारंभबिंदू शैव आहे आणि त्याचे नाव महात्मा फुले आहे फुले दाम्पत्याच्या शैवपणावर मी दीर्घ लिखाण इतरत्र केले आहे खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबा फुलेंना गुरु मानल्याचे सर्वश्रुत आहे

बाबासाहेबांनी हा प्रारंभबिंदूतून एक प्रचंड मोठा कॅनव्हास निर्माण केला आणि त्याची अंतिम परिणीती नवबौद्धपणात झाली आंबेडकर हे ह्या भीमसंवेदनशीलतेचे मुख्य प्रवर्तक आहेत त्यांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म हा आत्तापर्यंत चालत आलेला बौद्ध धर्म नाही तो पूर्णपणे वेगळा असा बौद्ध धर्म आहे ज्याची चर्चा मी इतरत्र केली आहे भीमसंवेदनशीलतेचा हा दुसरा टप्पा आहे आणि तोच मुख्य टप्पा आहे

१९९० नंतर जगात सर्वत्र चौथी नवता अस्तित्वात आली आणि ह्या नव्या बदलाला सामोरे कसे जायचे हा एक क्रुशियल प्रश्न बनला आणि मग ह्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्नही चालू झाला ह्यातून भीमसंवेदनशीलतेचा चिन्हसृष्टीय तिसरा टप्पा हळूहळू आकार घेतो आहे ह्या तिसऱ्या टप्प्यातील अतिशय महत्वाचे नाव म्हणून मी नितीन वाघ ह्यांच्याकडे पाहतो त्यांची व्हर्जिन ही कादंबरी चौथ्या नव्तेतील एक महत्वाची कादंबरी आहे तिच्यावर पुढे कधीतरी लिहण्याची इच्छा आहे इथे त्यांच्या "बुद्धाइतकं स्वार्थी नाही होता येत" ह्या कवितेचा विचार करायचा आहे

नितीन वाघ ह्यांनी अलीकडे झेन आणि प्रतीत्यसमुत्पाद असे दोन बौद्ध ग्रंथ लिहिले आहे ह्यावरूनच त्यांची बौद्धनिष्ठा प्रतीत व्हावी इथे त्यांच्या बुद्धावरच्या एका कवितेची चर्चा करायची आहे अर्थात इथे बुद्धाइतकाच निवेदकही महत्वाचा आहे

सुरवातीला आपण प्रमेयसंहिता पाहू ती पुढीलप्रमाणे आहे




बुद्धाइतकं स्वार्थी नाही होता येत.

नितिन भरत वाघ

बुद्धाइतकं स्वार्थी होता येत नाही मला
नाही सोडून जाता येत
माझ्या कायम शाश्वत असण्याच्या निरंतर भरोश्यावर 
पाठमोऱ्या निजलेल्या निश्चिंत बायकोला सोडून
माझ्या छातीवर पाय ठेऊन झोपलेल्या निवांत
दहा वर्षाच्या मुलाचे पाय काढून अलगद
सोडवून बेडी
नाही चालू शकत मी मुक्ती शोधाच्या दिशेने

जर का असता माझाही बाप
कुणा एका परगण्याचा राजा
मालक एखाद्या कंपनीचा
गेल्याबाजार नगरसेवक वार्डाचा
किंवा बायको जरी असती एखाद्या सरकारी नोकरीत पर्मनंट
तरी बुद्ध होण्याचे डोहाळे मीही करू शकलो असतो पूर्ण
निघून गेलो असतो बस्तरच्या रानात नाही तर
गंगेच्या त्रिभूज प्रदेशात
हिमालयाच्या कुशीत
आरवलीच्या घनगर्द सावलीत किंवा
लोहीतच्या पाण्यात श्वास बुडवून ठेवले असते
माझं मलाच शोधत
पण नाही होता येत मला बुद्धाइतकं स्वार्थी

बायको पोराच्या गरजा आपत्ती
नाही करू देत नजर स्थिर
घराचे हफ्ते, जगण्याचं वाणसामान
लागू देत नाही ध्यान आनापानसती
अडकून राहतं चित्त विचलित संसाराच्या
संभाव्य शक्यतांमध्ये, विपुल जाणीव
मुबलक पैश्यांवाचून परवडत नाही बुद्ध होणं
आत येणारा श्वास गुदमरतो
पट्कन पडतो बाहेर आल्यावाटेने
सापडत नाही त्याला क्षणभर विश्रांती
घेण्याचं कारण
आसन्न संसार मुक्तीचं

कारणच सर्व कारणांचं मूळ आहे अकारण
हे सकारण कळतं
म्हणून आधी शोधून काढलं असतं
दु:ख –
मग दु:खाचं मूळ कारण
नसतं दु:ख तर निर्माण केलं असतं
कुरवाळून कुरवाळून
आवडेलसं गोड हळवं दु:खं
करुणेचं केलं असतं राजकारण
ज्ञानप्राप्तीचं नाटकही
बुद्धाचा जाम हेवा वाटतो मला
मला बुद्धाइतकं स्वार्थी होता येत नाही म्हणून

यशोधरेचा विचार केलाही असेल त्याने क्षणभर
राहुलचा विचार मौनभर लांब
लोभाची बेडी कारणीभूत पाशाला
शेवटी तोडून निघून गेला गयेच्या वाटेने
आणि इथं कितीही गयावया केली तरी
माया काही सुटत नाही
बेडी काही तुटत नाही
म्हणून म्हणतो बुद्धाइतकं स्वार्थी होता येत नाही मला

बुद्धं होणं परवडत नाही खरंतर
झेपतही नाही
म्हणून माझ्या ओंजळीत मावतील
इतकीच दु:खे सांभाळून ठेवतो
फार मोठी दुनियाभरची दु:खे आपल्याला पेलायची नाहीत
म्हणून भार वहावा चिमणीच्या जीवाइतका चिमूटभर
सिसिफससारखं नाही फसू आपणच
निर्माण केलेल्या दु:खाच्या कोशात


बुद्ध होण्यासाठी घर सोडून जायची काय गरज होती?
सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेल्या बुद्धालाही
यशोधरेच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही
इतका तो बुद्धोत्तर प्रश्न निरुत्तर
मी सोडवत बसलोय
पण मग बुद्ध बनण्यासाठी
त्याच्याइतकं स्वार्थी बनायची काय गरजये?

खरं तर बुद्धाइतकं स्वार्थी नाही होता येत मला
कारण सोडावासा नाही वाटत संसारात रमलेला
दु:खप्रिय जीव
शरणतो दु:खालाच शेवटी
आकळलेल्या मुक्तीचं काय करावं कळत नाही
आणि रेंगाळत नाही मन फार काळ निर्वाणाच्या
महामायेत
म्हणून नाही होता येत बुद्धाइतका स्वार्थी




ह्या प्रमेयसंहितेचे टायटलच मुळात दचकवणारे आहे कारण त्यात बुद्धाला चक्क स्वार्थी म्हंटले आहे आणि वर पुन्हा बुद्धाइतकं स्वार्थी होता येणार नाही मला असं म्हंटल आहे साहजिकच टायटलमधूनच एक उत्सुकता जागी होते 

(क्रमशः )

भीमसंवेदनशीलता आणि नितीन वाघ ह्यांची बुद्धाइतकं स्वार्थी नाही होता येत ही कविता श्रीधर तिळवे नाईक
 भाग २

माझ्या वडिलांनी मी लहान असतांना मला जेव्हा त्यांनी घर आणि गाव एकाचवेळी सोडलं तेव्हा त्यांना झालेल्या दुःखाविषयी एकदा सांगितलं होत पोटापाण्यासाठी घर सोडणारे माझे वडील काही एकटे न्हवेत नंतर मीही जेव्हा कोल्हापूरचं घर सोडलं तेव्हा त्यावर एक कविता लिहिली होती पुढे भूमिगत होतांना व नंतर लाईफ पार्टनरचं घर सोडतांना त्यावरही कविता झाल्या होत्या एकंदरच हा घर सोडण्याचा आकृतिबंध माझ्या मनात रुंजी घालून बसलाय

भारतात घर सोडण्याचा पारपांरिक आकृतिबंध आठ  प्रकारे येतो
१ सैनिक घर सोडतात तेव्हा
२ बायका लग्न झाल्यावर घर सोडतात तेव्हा
३ नैसर्गिक आपत्तीत माणसे घर सोडतात तेव्हा म्हणजे दुष्काळ भूकंप पूर
४ यात्रेसाठी घर सोडतांना
५ व्यापारासाठी घर सोडतांना
६ नोकरीसाठी घर सोडतांना
७ विद्येसाठी घर सोडतांना
आणि शेवटचा
८ मोक्ष निर्वाण मुक्ती कैवल्यप्राप्तीसाठी घर सोडतांना

म्हणजेच प्राचीन काळापासून किमान ७५ टक्के लोक किमान एकदा तरी दीर्घकाळासाठी घर सोडतात ह्याचा अर्थच आपण भारतीय लोक स्वतःला जितके घरेलू समजतो तितके नाही आहोत पुरोहितांनी विद्वानांनी  विद्येसाठी योद्धे सैनिकांनी युद्धासाठी व्यापारी  व भटक्यांनी व्यापारासाठी शेतकरी श्रमिकांनी व आदिवासींनी  दुष्काळ व तत्सम आपत्तीत व तीर्थयात्रेसाठी व जत्रेसाठी सर्वांनी घर सोडण्याची आपली परंपरा आहे

ह्यातील सर्वात गुंतागुंतीचे घर सोडणे हे मोक्ष निर्वाण मुक्ती कैवल्यप्राप्तीसाठी घर सोडणे आहे ह्यातील काही घरसोडण्या फार प्रसिद्ध आहेत म्हणजे मराठीत ज्ञानेश्वरांच्या वडिलांची आणि रामदासाची लग्नमंडपामधून केलेली अशीच एक सर्वप्रसिद्ध घरसोडणी आहे गौतम बुद्धाची सिद्धार्थची  कवितेच्या आरंभातच ही घरसोडणी येते आणि कविता घरसोडणीसंदर्भात आहे हे स्पष्ट होते कवी म्हणतो

बुद्धाइतकं स्वार्थी होता येत नाही मला
नाही सोडून जाता येत
माझ्या कायम शाश्वत असण्याच्या निरंतर भरोश्यावर 
पाठमोऱ्या निजलेल्या निश्चिंत बायकोला सोडून
माझ्या छातीवर पाय ठेऊन झोपलेल्या निवांत
दहा वर्षाच्या मुलाचे पाय काढून अलगद
सोडवून बेडी
नाही चालू शकत मी मुक्ती शोधाच्या दिशेने

ह्यावरून दोन पक्ष स्पष्ट होतात
१ बुद्धाच्या घरसोडणीचा समर्थक पक्ष
२ आणि कवीचा पक्ष

कवीलाही सिद्धार्थाप्रमाणे यशोधरेसारखी बायको आहे जी कवी घर सोडणार नाही म्हणून निश्चिन्त आहे राहुलप्रमाणे मुलगाही आहे जो कवीच्या छातीवर पाय ठेऊन झोपलाय म्हणजे सिच्युएशन सेम आहे पण निष्कर्ष नेमका उलटा आहे निष्कर्ष आहे मी मुक्ती शोधाच्या दिशेने ही बेडी सोडवून जाऊ शकत नाही असा !

(क्रमशः )

भीमसंवेदनशीलता आणि नितीन वाघ ह्यांची बुद्धाइतकं स्वार्थी नाही होता येत ही कविता ३
श्रीधर तिळवे नाईक

पुढे कवीचा पक्ष सुरु होतो

जर का असता माझाही बाप
कुणा एका परगण्याचा राजा
मालक एखाद्या कंपनीचा
गेल्याबाजार नगरसेवक वार्डाचा
किंवा बायको जरी असती एखाद्या सरकारी नोकरीत पर्मनंट
तरी बुद्ध होण्याचे डोहाळे मीही करू शकलो असतो पूर्ण
निघून गेलो असतो बस्तरच्या रानात नाही तर
गंगेच्या त्रिभूज प्रदेशात
हिमालयाच्या कुशीत
आरवलीच्या घनगर्द सावलीत किंवा
लोहीतच्या पाण्यात श्वास बुडवून ठेवले असते
माझं मलाच शोधत
पण नाही होता येत मला बुद्धाइतकं स्वार्थी


बुद्धाला मिळणाऱ्या आडवांटेजविषयी कवी बोलतो पण हा आडवांटेज फक्त बुद्धापुरता मर्यादित नाहीये तो अख्ख्या व्यवस्थेचा ज्यांना फायदा मिळतो त्यांच्याविषयी आहे त्यामुळेच कम्पनीचा मालक ,नगरसेवक ह्यांचे उल्लेख येतात बायको एखाद्या नोकरीत पर्मनन्ट असती तरी हा फायदा मिळालाच असता आणि मग मीही मलाच शोधत निघालो असतो असं कवी म्हणतो भगवान रजनीश ह्यांनी श्रीमंतीचा वा राजा असण्याचा वा राजपुत्र असण्याचा फायदा स्वशोधासाठी कसा मिळतो हे अनेकदा सांगितलं आहे प्रश्न असा आहे कि ज्यांना हा फायदा मिळत नाही त्यांचे काय कवी त्यांच्या बाजूने उभा आहे ज्यांना ह्या व्यवस्थेचा फायदा मिळत नाही अध्यात्मिक शोध घेणे ही चैन आहे असं कवीला सुचवायचं आहे काय ?

कवी स्वतःची स्थिती पुढीलप्रमाणे मांडतो


बायको पोराच्या गरजा आपत्ती
नाही करू देत नजर स्थिर
घराचे हफ्ते, जगण्याचं वाणसामान
लागू देत नाही ध्यान आनापानसती
अडकून राहतं चित्त विचलित संसाराच्या
संभाव्य शक्यतांमध्ये, विपुल जाणीव
मुबलक पैश्यांवाचून परवडत नाही बुद्ध होणं
आत येणारा श्वास गुदमरतो
पट्कन पडतो बाहेर आल्यावाटेने
सापडत नाही त्याला क्षणभर विश्रांती
घेण्याचं कारण
आसन्न संसार मुक्तीचं


बायका पोरांच्या गरजा नजर स्थिर करू देत नाहीत घराचे हफ्ते जगण्याचे वाणसामान  ध्यान आनापानसती लागू देत नाही आणि कवी निष्कर्ष देतो मुबलक पैश्यावाचून बुद्ध होणं परवडत नाही क्षणभर विश्रांती न मिळालेल्या माणसाचे हे कथन आहे 



कारणच सर्व कारणांचं मूळ आहे अकारण
हे सकारण कळतं
म्हणून आधी शोधून काढलं असतं
दु:ख –
मग दु:खाचं मूळ कारण
नसतं दु:ख तर निर्माण केलं असतं
कुरवाळून कुरवाळून
आवडेलसं गोड हळवं दु:खं
करुणेचं केलं असतं राजकारण
ज्ञानप्राप्तीचं नाटकही
बुद्धाचा जाम हेवा वाटतो मला
मला बुद्धाइतकं स्वार्थी होता येत नाही म्हणून

ह्या ओळीत बुद्धाची प्रक्रिया आहे दुःख शोधून काढणे मग दुःखाचं मूळ कारण शोधून काढणे पण मग छेद आहे दुःख नसतं तर निर्माण केलं असतं जो अजिबोगरीब आहे बुद्धाने दुःख निर्माण केले असं कवीला म्हणायचंय काय ? आणि मग पुढे नवयांनी मांडणी येते ती म्हणजे बुद्धाने करुणेचं राजकारण केलं मग पुन्हा छेद ज्ञानप्राप्तीचं नाटक बुद्धाने ज्ञानप्राप्तीचं नाटक करून करुणेचं राजकारण केलं असं कवीला म्हणायचं आहे काय ? कवीच्या इतर पुस्तकांवरून तसं वाटत नाही पण कवितेत तसं वाटतं मग कवीला नेमकं म्हणायचंय काय ?

(क्रमशः )

Comments

Popular posts from this blog