आशुतोष दिवाण ह्यांचा घटत्कोच  श्रीधर तिळवे नाईक


आशुतोष दिवाण ह्यांचे घटोत्कच हे नाटक कित्येक महिने पाहीन पाहीन म्हणून चालले होते मी अकादमी ऑफ थिएटर च्या वसंत महोत्सवाच्या निवडप्रक्रियेत कधी भाग घेत नाही अपवाद फक्त  कोपेनहेगेन व आत्ताचे घटोत्कच त्यांची मात्र मी जोरदार शिफारस केली होती कारण मला तर उत्सुकता होतीच पण विध्यार्थ्यांनाही उत्सुकता होती ह्याशिवाय च प्र देशपांडे व संजय पवार  ह्यांच्या नाटकांचा महोत्सव आपण करावा व समुद्र, सावित्री  व आर्टिफिशियल इंटिलिजिन्स  हीही नाटकं करावीत असं  मी सुचवलं  होतं  पण यासंदर्भात अद्याप काही घडलेले नाही

ह्यातील आशुतोष दिवाण ह्यांचे नाटक सिलेक्ट केल्याची खबर मंगेश बनसोड ह्याने मला दिली तेव्हाच वेळ काढून नाटक बघायचे हे ठरवलं होतं

भारतात सर्वात प्राचीन दृष्टिकोनांपैकी एक अनुकृतिवाद हा लोकप्रिय वाद आहे ह्यात रामायण महाभारत व पुराणे ह्यांच्यातील आशयकृतींची अनुकृती करून नाटक लिहिले जाते उदा कालिदासाचे महाभारतातील  कथानकावर आधारित अभिज्ञानशाकुन्तलम  भवभूतीचे रामायणावर आधारित महावीरचरित व उत्तर रामचरित  नवजाग्रणाचा काळ सुरु झाल्यावर पुन्हा एकदा ह्या पौराणिक व महाकाव्यिक आशयसूत्रांची अनुकृती निर्माण करणे सुरु झाले अनेकांनी तर मूळ संस्कृत नाटकांची अनुकृती निर्माण करणे सुरु झाले व मराठी अनुकृतिवाद जन्मला

पुढे भूतकाळाला बघण्याची ऐतिहासिक नजरच बदलली त्यातून नवअनुकृतिवाद जन्मला खाडिलकरांचे संगीत  कीचकवध संगीत द्रौपदी ही त्यातील दोन गाजलेली नाटके ! नवअनुकृतिवादात पौराणिक वा लोककथीय वा महाकाव्यिक  आशयबंध कथानक व काळ न बदलता  अर्वाचीन आशय रचत सादर केला जातो उदा कीचकवधात  कीचक हा करझन डोक्यात ठेऊन सादर केला गेला  होता ह्या प्रवाहातील सर्वोत्तम   नाटके म्हणून विद्याधर पुंडलिक ह्यांचे माता द्रौपदी , रत्नाकर मतकरींचे आरण्यक  व विठो रखमाय , धर्मवीर भारती  ह्यांचे अंधा युग  व दिलीप धोंडो कुलकर्णी ह्यांचे उत्तररामचरित ह्यांचा उल्लेख करता येईल अर्थात इतिहासाचा अभ्यास करून पूर्ण नवे नाटकही लिहिले गेले आहे उदा मोहन राकेश ह्यांचे आषाढका एक दिन इंग्लिश व फ्रेंचमध्ये सार्त्र चे फ्लाईज ज्यां अनुईचे अँटिगणी व काम्यूचें कॅलीगूला ही गाजलेली उदाहरणे

१९६० नंतर युरोअमेरिकेत उत्तर अनुकृतिवाद जन्मला ज्याच्यावर पोस्ट मॉडर्न एथॉसचा संस्कार होता मराठीत अशाप्रकारची पोस्टमॉडर्न उत्तरानुकृतिवादी नाटके फार कमी लिहिली गेलीत उत्तरानुकृतिवादी कला ही पौराणिक वा लोककथीय वा महाकाव्यिक  प्लॉट कायम ठेवते पण काळाचे बंधन पाळत नाही त्यामुळे अचानक पौराणिक व्यक्तिरेखा ह्या उत्तराधुनिक (पोमो )काळात दाखल होतात मात्र त्यांचा मूळ ढाचा बदलत नाही उदा थोर ही हॉलिवूड सिरीज आपल्याकडे ह्याची सुरवात मकरंद साठे ह्यांच्या चारशे  कोटी विसरभोळे ह्या नाटकाने केली

आशुतोष दिवाण ह्यांचे घटोत्कच हे नाटक ह्या दोन्हीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करते आणि त्यात बऱ्याच अंशी यशस्वी होते अभिजीत झुंझारराव ह्यांनी नाटकात संगीत टाकून नाटकाचा पोमोपणा वाढवला आहे 

नाटककार महाभारतीय महाकाव्यिक पात्रे व कथावस्तू अनुकृतीय करतो पण त्यांचे अंतरंग पूर्ण बदलतो त्यामुळे महायुद्धात बळी जाणाऱ्या सबाल्टर्न लोकांचा प्रतिनिधी म्हणून घटोत्कच सादर केला जातो पण लेखक फक्त घटोत्कचाला बळी म्हणून सादर करत नाही तर तो कर्ण , अभिमन्यू ह्यांनाही राजकारण व सत्ताकारणाचे बळी म्हणून सादर करतो आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष बळी असलेला बळी हा इथे वेगळाच राजा म्हणून सादर होतो

सनातनी प्रेक्षकांच्या मनातील पात्रांना लेखक उध्वस्त करतो हे योग्यच त्यामुळे टीका सहन करावी लागणे हेही अटळ पण हे करतांना सातत्यभंग परिणामकारकपणे न वापरल्याने परिणाम थोडा उणावतो नाटकाचा शेवट प्रचारकी वाटण्याचे कारण नाटकातील तोपर्यंतच्या भाषेच्या डौलाला अचानक बाजारू पोलिटिकल भाषेचा तडका दिला गेल्याने ट्विस्ट पातळ होतो प्रचारकीऐवजी इथे कलाकारी अधिक आवश्यक होती तो पर्यंत नाटक भाषेचा पौराणिक डौल मस्तपणे मिरवत न्हेतं तत्वचिंतनात्मक भाषेचे अनेक प्रभावी तामझाम दिवानांनी मस्त खेळवले आहेत  शेवटचा सिन त्यांनी पुन्हा हा तामझाम कायम राखत लिहावा नाटक शेवटीही प्रभावी होईल

पात्रांची अंतरंगे ही पोस्टमॉडर्न एथॉसशी जुळवण्यात अनेक ठिकाणी दिवाणानां यश आलेले आहे आणि त्यामुळे घटोत्कच अर्जुन कर्ण अभिमन्यू ह्यांचे बळी जाणे ठसते व ठसठसते युद्धजन्य परिस्थितीतील क्रूरता दिवाणांनी उत्तम लिहिलीये व झुंझाररावांनी ती इफ्फेक्टिव्हली खोलून मांडलिये मुख्य म्हणजे युद्धाला तात्विक मुलामा देणारे
मुखवटे परिणामकारकरित्या पोहचतात 

उत्तरअनुकृतिवादी नाटक डिकन्सट्रक्शन एक मेथड म्हणून वापरते  व मूळ कथानकाची संरचना बदलून टाकते
पीटर ब्रुक ह्यांनी महाभारत ह्या सादर केलेल्या उत्तरानुकृतिवादी नाटकात ह्याचा अतिशय प्रभावी वापर केला होता ह्या नाटकाच्या सादरीकरणावर ब्रुक ह्यांचा प्रभाव जाणवला तरी मुळात नाटककाराचा घटोत्कचकेंद्री एप्रोचने हे नाटक ब्रूकपेक्षा वेगळे व स्वतंत्र केलं दुर्देवाने खुद्द लेखकालाच हा आपला वेगळेपणा नीट कळलेला तरी नाही किंवा पेललेला तरी नाही आपण घटत्कोचावर नाटक लिहितोय महाभारतयुद्धावर  नाही हेच काहीवेळा लेखक स्वतः विसरल्याने  काहीवेळा घटोत्कच साईडलाईन होतो फक्त घटत्कोचच्या पॉईंट ऑफ व्हू ने हे नाटक लिहिले गेले असते तर हे नाटक अधिक टाईट व प्रभावी झाले असते

ओव्हरऑल दिवाणांनी पहिल्याच बॉलवर चौकार मारला आहे त्यामुळे ते पुढे कसे खेळतात हे पाहण्यास मी उत्सुक आहे

उत्तम दृश्यचौकटीचा सतत वाहणारा प्रभाव हे पिटर ब्रुक ह्यांच्या नाटकाचे वैशिष्ट्य ! अभिजित झुंझाररावांनीही ह्यात उत्तम यश मिळवलंय चौकटी कुठेही अवाजवी सांडत नाहीत व सौंदर्यतोल मेंटेन करतात सैनिकांचा व दासी पहारेकरांचा रंगमंचावरचा प्रभावी वापर व वावर फार क्वचित मी पाहिला होता तो ह्या नाटकात रापचिक जमलाय फाईट सिक्वेन्सही  चांगले जमलेत  अपवाद कर्ण व घटोत्कोच ह्यांची फाईट ती मेजर फाईट असल्याने तिच्यावर अजून मेहनत हवी घटत्कोचचे मायावी रूप कुठेच सादर झाले नाही ते व्हायला हवे होते त्यासाठी शॅडो प्ले वाढवायला हवा होता

अशा नाटकात अभिनयाचा दर्जा अव्वलच लागतो तो अनेक ठिकाणी जमलाय पण ते पुरेसे नाही हे नाटक अथपासून इतिपर्यंत प्रभावी अभिनय मागतंय आणि ही गरज ८० टक्के पूर्ण झालीये संगीत उत्तम आणि लाईटही

एकंदर ह्या नाटकाचे सर्वांनी स्वागत करायला हवे अभिजित झुंझारराव व आशुतोष दिवाण ह्यांचे उत्तम नाटक दिल्याबद्दल मनापासून अभिनंदन !

श्रीधर तिळवे नाईक












Comments

Popular posts from this blog