पुस्तक दिनानिमित्त श्रीधर तिळवे नाईक

पुस्तकांशी असलेले माझे नाते हे काहीसे पिढीजात आहे जतन केलेल्या आजोबांच्या प्राचीन ग्रंथापासून ते आताच्या ईबुकपर्यंत माझा एक विलक्षण प्रवास झाला आहे दुर्देवाची गोष्ट इतकीच कि माझ्या मावशीला कधीही ह्या पुस्तकांचे महत्व कळाले नाही आणि माझ्या वडिलांची पेंटिंग्स आणि आजोबांची पिढीजात पुस्तकं सारख्याच प्रेमाने पाणी तापवायला वापरली गेली त्यामुळे पुस्तकप्रेम आणि पुस्तकद्वेष अशा दोन्ही गोष्टी मी एकत्रच पाहिल्या

अगदी आझाद चौकातल्या गुंडगिरीच्या वातावरणातही माझ्या बहिणीने प्रकाश राणे ह्यांच्या श्रीकृष्ण वाचनालयातून आणलेल्या पुस्तकांच्यावर माझी गुजराण झाली आहे गुरुनाथ नाईक हेमंत कर्णिक सुहास शिरवळकर कर्नल रंजित पासून ते आताच्या युवल हरारी पर्यंत मी वाचत राहिलो आहे . ग्रंथालय मला मोहात टाकत राहिली होती आणि आजही पुस्तकांच्याबद्दल मला आदर आहे मात्र आता कागदापेक्षा मला ईकागद अधिक बरा वाटतो .

एकेकाळी माझ्या वाचनाचा स्पीड तासाला १०० पाने मराठी ३० पाने इंग्लिश असा  होता (दिवसाला १००० पानांचा फडशा मी अनेकवेळा पाडलेला आहे ) त्यामुळे माझ्या कॉलेज जीवनातच मी बसवेश्वर , फुले ,विवेकानंद,  रसेल ,रजनीश ,जे . कृष्णमूर्ती , रमण, रामकृष्ण ,सावरकर ,आंबेडकर ,मार्क्स ,मानवेन्द्रनाथ रॉय ,राधाकृष्णन , दोन्ही कोसंबी ,इरफान हबीब ,आर सी मुजुमदार ,एल मुखेंर्जी ,छाब्रिया ,भांडारकर ,भातखंडे ,ठाकरे ,राजवाडे ,ताराचंद ,केन्स ,ड्यूई ,फ्रान्सिस बेकन,  हायडेगर ,सात्र ,बिपीनचंद्र पाल ,टिळक ,गांधी ,नेहरू ,नित्शे ,प्लेटो  ,आईन्स्टाईन ,शंकराचार्य, अभिनवगुप्त, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव ,रुमी ,कबीर , वाल्मिकी , व्यास वैग्रे मंडळी मी अक्षरशः ५ दिवसात किंवा १५ दिवसात किंवा महिनाभरात (उपलब्ध )समग्र अशा वेगाने संपवलेली आहेत गालिब ते फिराक गोरखपुरी टागोर केशवसुत ते गजानन माधव मुक्तिबोध नेमाडे चित्रेढसाळ  असे वाचन मला आठवते मी तीन महिन्यात केले होते किंबहुना एखादा लेखक (उपलब्ध )समग्र संपवायचा माझा खाक्या हा २०१३ पर्यंत अबाधित होता त्यामुळे पुढेही देरिदा , फुको ,  याकोबसन हॉकिंग्ज  वैगरे मंडळी मी अशीच (उपलब्ध )समग्र हाणली होती

२०१४ च्या अपघातानंतर आलेल्या आजारपणामुळे हाच स्पीड तासाला १० -२० पाने एव्हढा घसरल्याने आणि त्याचाही त्रास होत असल्याने मी वाचनाविषयी बोलणे सोडून दिले त्यातच माझ्या द्विपाठी स्मरणशक्तीनेही धोका द्यायला सुरवात केल्याने वाचलेले नीट लक्ष्यात ठेवणे हे प्रयत्न करून साध्य करावे लागते लोकांच्या दृष्टीने मी आता नॉर्मल माणूस झालो आहे सुदैवाने आता पूर्वीइतका नाही पण बऱ्यापैकी रिकवर झाल्याने कदाचित पूर्वीचा स्पीड व द्विपाठीपणा गाठेनही .!

माझ्या सुदैवाने माझ्या वाचनाचे लाड पुरवणारी मंडळी व वाचनालये मला कायमच  भेटली श्रीकृष्ण वाचनालय , भास्करराव जाधव , करवीर नगर वाचन मंदिर , न्यू कॉलेज , शिवाजी विद्यापीठ , मुंबई विद्यापीठ ते रमेश कुलकर्णी सरोजिनी वैद्य राजकुमार यादवपर्यंत सर्वांनीच माझे  वाचनलाड पुरवले . अपवाद फक्त एशियाटिक सोसायटीचा त्यांनी मात्र मला सपशेल नकार दिला कारण मला आजतागायत कळलेले नाही

मी एरव्ही निर्व्यसनी मनुष्य पण वाचन हे मात्र माझे व्यसन होते असे आता दिसते आणि हे व्यसन आहे हे लक्ष्यात आल्याने मी व्यसनमुक्तीचेही प्रयोग केले जे यशस्वीही झाले जगातल्या प्रत्येक गोष्टीत रस असल्याने मी कधीही कुठला विषय वर्ज्य मानला नाही अगदी रांगोळी वरची पुस्तकेही मी हौसेने  वाचली आहेत

माझे वाचन मराठी हिंदी आणि इंग्लिश ह्या तीन भाषांतून होते अपवादात्मक कोंकणी माझ्या वडिलांना ह्यांच्याशिवाय कन्नड व पोर्तुगीज येत होत्या  मला त्या येत नाहीत ह्यावरून माझ्या मर्यादा स्पष्ट व्हाव्यात

पुस्तकांची सुरवात हस्तलिखित ग्रंथांच्यापासून झाली दुर्देवाने भारतीय ग्रंथालयांची झालेली होळी किती हस्तलिखितांना जाळून गेली हे अनभिज्ञ आहे आश्रमांची व  मठांची व्यवस्था हि मुळात ग्रांथिक गरजेतून निर्माण झालेली आहे ही एका अर्थाने प्राचीन हस्तलिखितांची स्टोरहाउसेस होती मी ह्या प्राचीन हस्तलिखितांत हवा तितका रस दाखवला नाही ही माझ्या वाचनाची गंभीर मर्यादा आहे .वैचारिक ऑडिओही मी जितके ऐकायला हवे होते तितके मी ऐकले नाहीत असे आता स्पष्ट दिसते अपवाद भारतीय फिल्म संगीत व काही प्रमाणात क्लासिकल संगीत व्हिएतनाम आणि कोरियन थिंकर्सही मी नीट वाचले नाहीत असं आता दिसतंय आफ्रिकन बाबतही नॉर्थ आफ्रिकन वाचन बरे झाले पण साऊथ आफ्रिकाखंडाबाबत माझ्या वाचनाची बोंब आहे (युनेस्कोने काढलेले इतिहास मात्र मी वाचले आहेत ) यूरोपबाबतही जो भर पोर्तुगाल , रशिया , ग्रीस , जर्मनी , इटली , इंग्लड , तुर्कस्तान , इस्त्रायल , फ्रान्सवर आहे तसा इतरांच्यावर नाही हे आता तीव्रतेने जाणवते

उत्तर भारतातील हरयाणा व हिमाचल प्रदेशातले साहित्यिक मी वाचलेले नाहीत सर्वात लाजिरवाणे प्रकरण तेलगू बाबत आहे माझे तेलगूंचे फारसे वाचन नाही माझ्या तेलगू मित्रांच्या शिव्या मी हॉस्टेलपासून निमूट ऐकतो आहे पूर्व भारतात बंगाली आणि आसामीइतकं इतरांचे वाचन असायला हवे होते असं वाटतं विशेषतः नेपाळी व त्रिपुरी संगीत ऐकताना हे तीव्रतेनं जाणवते

शेवटी जे वाचले त्याने तरी काय झाले ?

मोक्षाला ह्या वाचनाचा काडीचाही फायदा नाही हे कळालं आणि मी ढेपाळलो

वाचणाऱ्या माणसाला माणसे वाचता येतात हा एक गैरसमज आहे

मोक्षाविषयीची पुस्तके फक्त एकच सत्य सांगतात ते म्हणजे मोक्ष आहे बाकी त्यांचे मार्ग उपाय निदान वैग्रे निरूपयोगी आहे हे कळायलाही उशीर लागला एका अर्थाने बुद्धाने भटकवले असंही म्हणता येईल

ज्यांना ऐहिक आयुष्य जगायचे आहे त्यांना मात्र माहितीसाठी पुस्तकं उपयोगी आहेत किंबहुना पुस्तकं माहिती म्हणूनच वाचावीत त्यातून ज्ञान मिळवावे दृष्टी मिळवावी पण एक गोष्ट लक्षात ठेवावी पुस्तकं शहाणपण आणि कौशल्य देऊ शकत नाहीत ह्या दोन्ही गोष्टी  जगतानाच कमवाव्या  लागतात  आणि अनुभवातून प्रॅक्टिस करून प्राप्त कराव्या  लागतात

मी आता पुस्तकांच्याबाबत तटस्थ झालो आहे

श्रीधर तिळवे नाईक

















Comments

Popular posts from this blog