प्रजासत्ताकदिनी थोडे चिंतन व्हावे म्हणून श्रीधर तिळवे नाईक

भारतीय प्रजासत्ताक हे कधीच सर्व भारतीयांनी पाठिंबा दिलेले प्रजासत्ताक न्हवते तर बहुसंख्याक भारतीयांनी पाठिंबा दिलेले प्रजासत्ताक होते . हा बहुमताचा पाठिंबा काँग्रेसला होता आणि काँग्रेसने तिला अभिप्रेत असलेले प्रजासत्ताक निर्माण करण्यासाठी संविधानाची निर्मिती केली जिला बाबासाहेब आंबेडकरांचाही पाठिंबा होता किंबहुना ह्या संविधान निर्मितीत त्यांचा सिंहांचा वाटा होता काँग्रेस आणि आंबेडकर ह्यांच्यात सहमतीचे मुद्दे तब्बल ९० % होते आणि जिथे सहमती न्हवती अशा मुद्द्यांची चर्चा बाबासाहेबांनी नंतर केली

काँग्रेसने तयार केलेलं हे संविधान हिंदुत्ववाद्यांच्या सहमतीने तयार करण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी ह्या काळात संविधानाबाबत हिंदुत्ववादी गोंधळलेले होते स्मृतींच्या परंपरेकडे सरकणे शक्य नाही आणि आधुनिकता पेलत नाही अशी त्यांची गोची होती साहजिकच जिला ते आता भीमस्मृती म्हणतात आणि परंपरेत बसवू पाहतात तिच्याशी तडजोड करण्यावाचून त्यांच्याकडे ह्या काळात तरी पर्याय न्हवता असे दिसते त्यांना अभिप्रेत असलेले हिंदू राष्ट्र हा एक भावनिक परंपराबद्ध खेळ होता आणि त्याला वास्तवात आणण्यासाठी नेमके काय करायचे ह्याची योजना त्यांच्याकडे न्हवती आणि सरतेशेवटी आता आहे ती भीमस्मृती स्वीकारून आधी बहुमत आपल्या बाजूने वळवू आणि तिच्या आधारेच हिंदू राष्ट्राच्या दिशेने काही पाऊले टाकू अशी योजना त्यांनी आकारली आणि मग जनसंघाचा त्याग करून भाजपची निर्मिती केली 

फार पूर्वी काँग्रेस हीही चार  अवस्थेतून गेली होती 
१ परगमी व्यवस्था काँग्रेसची स्थापनाच मुळात अॅलन ह्यूम  ह्या परगमीन्नी  केली होती हे लोक ब्रिटिशवादी होते आणि ब्रिटनवादाच्या चौकटीत देशी लोकांना नागरिक अधिकार मिळाले पाहिजेत असे त्यांना वाटत होते कलोनाइज्ड मानसिकतेचे ते प्रतिनिधित्व करत होते मात्र त्यांचा विवेक मानवतावादी चौकटीत जिवन्त होता सोनिया गांधींच्यामुळे मधल्या काळात काँग्रेस सायचोलॉजिकली ह्या अवस्थेत आली होती आणि शरद पवारांना ही अवस्था मान्य नसल्याने ते काँग्रेसबाहेर पडले होते जी माझ्या मते पॉलिटिकल ब्लँडर होते खरंतर पवारांनी आता पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करावा हे उत्तम असो 

२ निगमीं व्यवस्था : निगमी व्यवस्था ही वैदिक , ब्राम्हणी , वैष्णव आणि हिंदू ह्या चार धर्मांनी बनते फार पूर्वी काँग्रेस ही त्यांच्याच ताब्यात आली होती आणि बाल लाल पाल  व अरबिंदो घोष ही नेतृत्व चौकडी ह्यातूनच पुढे आली होती  लोकमान्य टिळक ,  अरबिंदो घोष आणि लाला लजपत रॉय हे पुढारी सौम्य हिंदुत्ववादीच होते ह्यातील अरबिंदो , बाल आणि लाल बद्दल मराठी लोक जास्त जाणतात पण पाल ह्यांच्याबद्दल नाही . 
 बिपीनचंद्र पाल हे  तत्कालीन आसाम प्रांतातले सिल्हेटी होते ज्यांची वर्णव्यवस्था त्याकाळात चक्क रंगावर आधारित होती जिच्या मते श्वेत वर्णीय ब्राम्हण , रक्तवर्णीय क्षत्रिय , पीतवर्णीय वैश्य जे शेती व्यापार व पशुपालन करतात आणि कृष्णवर्णीय शूद्र जे दास वा श्रमिक काम करतात ( माझ्या एका सिल्हेटी प्रेयसीने मी कृष्णवर्णीय असल्याने शूद्र असून तिच्याशी लग्न करण्याचा मला अधिकार नाही असे सांगितले होते ) मुस्लिम राजवटीत ब्राम्हण क्षत्रिय ह्यांचा मिळून अश्रफ वैश्यांचा अजलफ आणि शूद्रांचा अरझल असे सिल्हेतींचे तीन वर्ण झाले (हो वर्णच झाले वर्ग नाही कारण ते जन्मजात होते किंबहुना भारतीय इस्लाम हा बहुतांशी वर्णवादीच होता . ) भारतातला पहिला डायस्पोरा करण्याचे श्रेय सिल्हेतींना जाते आणि आज अवस्था अशी आहे कि तब्बल ९०% सिलहेटी भारताबाहेर राहतात आसामकड आपलं लक्ष्य नसतं म्हणून ही माहिती देतोय पाल ह्यांचे आणखी एक महत्वाचे योगदान म्हणजे समकालीन चायनाकडे लक्ष्य असलेले ते पहिले भारतीय नेते होते सन येत सेन ह्यांच्याप्रमाणे भारतातही चळवळ उभा करता येईल असे त्यांना वाटत होते 

ह्या व्यवस्थेच्या व नेत्यांच्या मते काँग्रेसची स्थापना ही दादाभाई नौरोजींनी केली होती ते अॅलन ह्यूमला फार श्रेय द्यायला तयार न्हवते त्यांनी प्रथम स्वदेशी आणि स्वराज्य ह्यांचा पुरस्कार केला आणि बॉयकॉटचे तंत्र प्रथम विस्तारपूर्वक त्यांनी मांडले नाहीतरी जातीव्यवस्थेत निगमांना सामाजिक बहिष्काराची सवय प्राचीन काळापासून होते बॉयकॉट हा वाळीत टाकण्याचा आधुनिक प्रकार होता जो जातिवर्णापासून मुक्त होता कारण शत्रू आता बाहेरचा होता आणि त्याला विशेषतः त्याच्या मालाला वाळीत टाकून वठणीवर आणणे गरजेचे होते टिळकांच्या भाषणात (१९०७ साली दिलेल्या )ह्याचे स्पष्ट प्रतिबिंब आहे ते म्हणतात ,

"We shall not give them assistance to collect revenue and keep peace. We shall not assist them in fighting beyond the frontiers or outside India with Indian blood and money. We shall not assist them in carrying on the administration of justice. We shall have our own courts and when time comes we shall not pay taxes. Can you do that by your united efforts? If you can, you are free from tomorrow"

असे ठणकावून सांगणे हे काबिलेतारिफ आहे आणि त्याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे ह्या नेत्यांनी परगमी अवस्थेतून भारताला बाहेर काढले आणि स्वराज्याची दिशा दाखवली . 

ह्या निगमीं अवस्थेने  काँग्रेसला दिलेला हिंदुत्ववादी  चेहरा गांधींच्या आगमनाने नष्ट झाला 

३ देशीवादी  अवस्था : गांधी स्वतःला हिंदू म्हणवून घेत असले तरी ते हिंदुत्ववादी न्हवते . सुरवातीला ते कट्टर वैष्णव असल्याने निगमीं अवस्थेशी जुळवून घेत होते पण पुढे पुढे  ते  सर्वधर्मसमभाववादी होत गेले  ते सतत उत्क्रांत होत जाणारे होते मात्र ते समाजवादी न्हवते तर ट्रस्टीय भांडवलवादी होते निगमीय व्यवस्थेतून त्यांनी काँग्रेस बाहेर काढली आणि सेक्युलर राष्ट्रवादात आणून सोडली ते पहिले देशीवादी होते जे देशी अटींच्यावर आधुनिकता सामावून घेत होते दुर्देवाने त्यांची हत्या झाल्याने हा फिनॉमिना पूर्ण झालाच नाही 

४ लोकशाही समाजवादी अवस्था : काँग्रेसला ही अवस्था प्राप्त झाली ती रॉय , बोस , पटवर्धन आणि नेहरू ह्यांच्यामुळे  ! हे तत्कालीन तरुण तुर्क होते डावे होते पण त्यांचा हात लोकशाहीवादी होता ते गांधीजींच्या देशीवादाच्या जितक्या प्रेमात होते त्यापेक्षा मार्गी समाजवादाच्या प्रेमात अधिक होते साहजिकच ह्या लोकशाहीवादी हाताशी शेकहॅण्ड करणे आंबेडकरांना जास्त सोपे होते कारण खुद्द आंबेडकर लोकशाही समाजवादी होते 

भारतीय संविधान ह्या चारही अवस्थांची सामूहिक निर्मिती आहे त्यातले परस्परविरोध हे ह्या चारही अवस्थांतील परस्परविरोध आहे त्यातील पहिल्या अवस्थेतूनच पुढे अलिप्त राष्ट्र परिषद जन्मली आहे तर दुसऱ्या अवस्थेने समान नागरी कायदा होऊ दिलेला नाही तिसऱ्या अवस्थेमुळेच 
सर्वधर्मसमभाव टिकून आहे आणि तिनेच शाहबानोला ट्रिपल तलाकला नकार दिला होता तर चौथ्या अवस्थेने लोकशाही आणि मिश्र अर्थव्यवस्था टिकवली आहे 

साहजिकच भाजप अलिप्त राष्ट्र परिषदेला नकार देऊन अमेरिकेकडे झुकतो समान नागरी कायदा आणण्याची घोषणा करतो सर्वधर्मसमभाव नाकारून हिंदुत्ववादाची आणि हिंदूपणाची धोरणे राबवू पाहतो आणि लोकशाही समाजवादाकडून लोकशाही भांडवलवादाकडे अर्थव्यवस्था न्हेण्याची धडपड करतो ( आधिक माहितीसाठी मी अर्थशास्त्रावर दिलेली सात व्याख्याने गुगल प्लसवर पाहावीत ) 

भाजपने असे करू नये म्हणून अपेक्षा करणारे लोक बाळबोध आहेत हे म्हणजे काँग्रेसने सत्तेवर आल्यावर काँग्रेसचे  धोरण राबवू नये असे म्हणणे आहे  . भाजप तेच करतोय ज्यासाठी लोकांनी भाजपला निवडून दिलंय हे संविधानविरोधी आहे कि नाही ह्यावर वाद होऊ शकतो आणि तो घालायलाच हवा पण भाजपला त्याचे धोरण त्याने राबवू नये असे म्हणणे म्हणजे हातात मोबाईल दिलेल्या माणसाला तू फोनवर बोलू नको असे सांगणे आहे हे शक्य नाही आणि मुख्य म्हणजे लोकांनी त्यांना हे करण्यासाठी सत्ता दिली आहे हे मूलभूत सत्यच नाकारणे आहे

काँग्रेसप्रमाणे भाजपमध्येही हिंदुत्ववादाच्या चार अवस्था आहेत

१ सावरकरी हिंदुत्ववादी हा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडणारा विज्ञान प्रमाण मानणारा सामर्थ्याला आणि हिंसेला आवश्यकता मानणारा व्यवहारवादी असा हिंदुत्ववाद आहे जो मॅझिनीच्या जर्मन राष्ट्रवादापासून प्रेरणा घेऊन आला आहे
२ संघीय हिंदुत्ववाद हा कट्टर ब्राम्हण्यवादी जातवर्ण व्यवस्थेचा समर्थक आहे
३ नवसंघीय गांधीय हिंदुत्ववाद हा नानाजी देशमुख , दीनदयाळ उपाध्याय ह्यांनी जन्माला घातला आहे हा आर्थिक पातळीवर गांधीवादी आहे पण इतर बाबतीत सावरकरवादी आहे गांधींचा समावेश हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या तत्वज्ञानात करावा हे अजिबोगरीब आहे पण वैदिक उत्क्रांत होण्यात नेहमीच वाकबगार होते म्हणून तर वैदिक , ब्राम्हणी , वैष्णव आणि हिंदू असे चार चार धर्म स्थापन करू शकले . आणि आता हिंदुत्ववादी तत्वज्ञान लवचिक करून सत्तेवरही आले
४ वाजपेयीं हिंदुत्ववाद : हा सॉफ्ट हिंदुत्ववाद हा भाजपचा आताचा चेहरा आहे तो अधिक सर्वव्यापक आहे मात्र तो सेक्युलर नाही तर हिंदूंच्या उदारमतवादी धारेचा धारक आहे 

हे संविधान काँग्रेसने तयार केले होते  आणि त्याला तत्कालीन ९० टक्के लोकांचा पाठिंबा होता ही वस्तुस्थिती ! प्रश्न असा आहे कि लोकांनी भाजपला संविधान बदलण्यासाठी सत्ता दिली आहे का? तर नाही ! जोवर भाजपला देशात व दोन तृतीयांश भारतीय राज्यात दोन तृतीयांश बहुमत मिळत नाही तोवर भाजपला हा अधिकार पोहचत नाही असं मला वाटतं .  भाजपने संविधान बदलण्याच्या फ़ंदात पडू नये असंही  मला वाटतं  कारण संविधानाच्या आहे त्या चौकटीत भाजपला जे बदल घडवायचे आहेत ते शक्य आहेत  आणि भाजपच्या समान नागरी कायदा च्या मागणीला आणि आर्टिकल ३७० मध्ये बदल करायला माझा पूर्ण पाठिंबा आहे काँग्रेस ३७० रद्द करेल किंवा समान नागरी  कायदा आणेल असा विश्वास मला वाटत नाही काँग्रेसने माझ्या ह्या विश्वासाला उध्वस्त केले तर मला आनंदच होईल कायद्यापुढे सर्व समान असलेच पाहिजेत असे माझे ठाम मत आहे  भाजपवर माझा राग हा आहे कि भाजपने ३७० साठी किंवा समान नागरी कायदा आणावा म्हणून काहीही केलंल  नाही जर हे असे राहिलं तर भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक काय उरतो ? 

एक गोष्ट मात्र नक्की झालीये ती म्हणजे भारतातील एकविचारप्रणालीय लोकशाही पद्धत भाजपला मिळालेल्या सत्तेमुळे नष्ट झालीये त्यामुळे पूर्वी सत्तेवरही सर्मधर्मसमभावी लोकशाही समाजवादी आणि विरोधातही सर्मधर्मसमभावी लोकशाही समाजवादी अशी जी अवस्था होती ती जाऊन हिंदुधर्मसमभावी लोकशाही एकचालकीय भांडवलशाहीवादी विरुद्ध सर्मधर्मसमभावी लोकशाही समाजवादी अशी द्विविचारप्रणालीय द्विध्रुवीय लोकशाही राजकीय व्यवस्था प्रथमच आली आहे . काही पुरोगाम्यांच्या अजूनही हे पचनी पडलेलं नाहीये पण सर्वांनी आता ही वस्तुस्थिती स्वीकारावी आणि पचवावी हे उत्तम ह्यामुळे पूर्वी सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या कलावंतांना पक्षीय भूमिका न घेण्याची जी सोय उपलब्ध होती ती ह्यापुढे कितपत राहील ह्याची शंका वाटते सामाजिक बांधिलकी मानणारे कलावंत ह्यापुढे राजकीय पक्षांतही विभागले जाणे अटळ त्याची स्पष्ट चुणूक साहित्य संमेलनात दिसली होती खुद्द भाजपला कलावंतांच्या स्वातंत्र्याबाबत काही ठाम भूमिका घ्यावीच लागेल आत्तापर्यंत जी अळमटळम चाललेली होती ती परवडणार नाही अन्यथा झुंडशाहीच्या हातात कलात्मक सत्ता जाऊन कलावंताचा वर्ग विरोधात जाणे अटळ आहे . परंपरेला आधुनिक बनवायचं कि आधुनिकला पारंपरिक बनवायचं हा भाजपपुढचा पेच आहे आणि त्यांना तो आज ना उद्या सोडवावाच लागेल आधुनिकला पारंपारिक बनवलं कि कसा सत्यानाश होतो ते शेजारच्या पाकिस्तानने सिद्ध केले आहे जर भाजपला देश ह्या मार्गाने न्ह्यायचा असेल तर देशाचा सत्यानाश अटळ आहे आणि जर वाजपेयींच्या प्रमाणे परंपरेला आधुनिक बनवायचे असेल तर फार इंनोवेटिव्ह काम करावे लागणे अटळ आहे भाजपमध्ये प्रमोद महाजनांच्यापासून त्याची जी सुरवात झाली होती त्याचा प्रचंड विस्तार होणे गरजेचे आहे 


अलीकडे नवयानी आंबेडकरवाद्यांनी संविधान खतरेमे नावाची एक चळवळ उभी केली आहे जी माझ्या मते आवश्यकच आहे कारण त्यामुळे भाजपमधील जे जहाल हिंदुत्ववादी आहेत त्यांना चाप लागतो भारतातीलच का जगातल्या कुठल्याही विचारप्रणालींत जहाल आणि मवाळ असे दोन गट असतात खुद्द टिळकांनी ह्याबाबत जे म्हंटले होते ते सत्य आहे टिळक म्हणतात," Two new words have recently come into existence with regard to our politics, and they are Moderates and Extremists. These words have a specific relation to time, and they, therefore, will change with time. The Extremists of today will be Moderates tomorrow, just as the Moderates of today were Extremists yesterday....."

काँग्रेसमध्येही मणिशंकर अय्य्यरासारखे जहालवादी आहेतच भाजपमध्येही जहाल हिंदुत्ववाद्यांचा एक गट आहे ज्याला मनुस्मृतीवाद आणायचा आहे जो गुरुजींचा समर्थक आहे त्याचे काय करायचे हे भाजपला कळत नाहीये माझ्या मते मवाळ हिंदुत्ववाद्यांनी एक ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे मनुस्मृती ही कालबाह्य आहे असे स्पष्टपणे सांगणे आता आवश्यक झाले आहे किंबहुना भाजपचा खरा अजेंडा काय आहे हे आता ओपन करावे लागणे अटळ आहे तुम्ही सर्वकाळ लोकांना बेवकूफ बनवू शकत नाही अन्यथा भाजपला संविधान बदलून स्मृतिप्रधान  ब्राम्हणी राजवटच आणायची आहे हा समज बळावत जाईल येत्या निवडणुकीत भाजप काय काय बोलतो ह्याकडे विचारवंतांना त्यामुळे बारकाईने लक्ष्य ठेवावे लागेल कारण निवडणूक जिंकण्यासाठी हिंदूंच्या भावनांना हात घालणारी भाषणे करणे आता पुरेसे नाही विकास प्रत्यक्ष घडवावा लागेल नाहीतर पराभव पत्करावा लागेल उजव्या लोकांना धन तळझिरपणी (डाउन ट्रीकलिंग थेरी) वर विश्वास ठेवावा लागतो पण प्रत्यक्षात भारतासारख्या देशात तो खरोखर प्रत्ययाला येतो का ?

जर तळाला काही ट्रीकलिंग झालं असेल तर भाजप ह्या निवडणुकीतही विजयी होईल अन्यथा भाजपचा पराभव अटळ आहे 

आता पुन्हा संविधान खतरेमे बद्दल

भारतीय संविधान हे ना समाजवादी होतं ना भांडवलवादी ! इंदिरा गांधींनी ते समाजवादी केलं जी चूक होती पण त्याजागी ते भांडवलवादी बनवणं हीही चूकच ठरेल समाजवादी हा शब्द काढून टाकणे बरोबर पण त्याऐवजी भांडवलवादी शब्द टाकणे हे चूक भारतासाठी मिश्र व्यवस्थाच सध्यातरी बरोबर आहे त्यामुळे समाजवादी  शब्द काढून मिश्र अर्थवाद ही शब्दयोजना किंवा सम्यक अर्थवाद ही शब्दरचना योग्य ठरावी

भाजपने ३७० रद्द करावे आणि समान नागरी कायदाही  आणावा आणि हे जर जमणार नसेल तर उगाच हिंदूंना मूर्ख बनवू नये मुस्लिमांना त्रास द्यावा ही हिंदूंची मागणी नाहीये तर  ३७० रद्द करावे आणि समान नागरी कायदाही  आणावा ही हिंदूंची खरी मागणी आहे पण हे करणे सोडून भलत्याच गोष्टी होत आहेत आणि हे बरोबर नाही.

भाजपने आणखी एक इमोशनल इश्यू राजकारणात आणला त्याबद्दल ! गोमाता !

गावातल्या माणसाला गाईविषयी वाटणारे प्रेम माझ्या घराण्यातही आहे पूर्वी शैव घरांत प्रत्येकासाठी एक गाय असायची आणि आईबरोबर तिचे दूध पिऊनच ती व्यक्ती मोठी व्हायची साहजिकच ती गाय दुसरी आई व्हायची माझ्या आईची अशी जी कल्याणी नावाची गाय होती तिचे माझ्या आईवर इतके प्रेम होते कि तिला जेव्हा रोग झाला तेव्हा ती मरण येणार हे उमजून स्वतःहून घराबाहेर गेली आणि माझ्या आईची वाट पाहत राहिली तब्बल तीन महिने तिने आजारपण झेललं ती माझ्या आईची वाट बघत राहिली आणि माझी आई जेव्हा कोल्हापूरहून नागेशी बांदिवडेला आली तेव्हा तिला आपल्या गाईबद्दल जेव्हा कळले तेव्हा ती धावत आपल्या गाईकडे गेली त्या गाईने माझ्या आईला डोळाभरून पाहिले आणि ती शेवटची हंबरली आणि आईला डोळाभरून पहात तिने प्राण सोडला शहरी बाशिंद्यांना हे प्रेम समजणे अवघड आहे आणि त्यांनी गोमातेची उडवलेली खिल्लीही सहन करण्याजोगी ! ज्यांचा शेतीशी आणि पशुपालनाशी संबंध नाही आणि कत्तलखाना हाच ज्यांना दृश्यम आहे त्यांच्याशी संबंध जोडणे अवघड पण गोमातेच्या रक्षणासाठी माणसाची हत्या हे चूक आणि चूकच आहे

जर तुम्हाला गोमातेविषयी खरे प्रेम असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला जर्सी न्हवे तर भारतीय प्रजातीची गोमाता आणि तिच्या चाऱ्यासाठी चराऊ कुरण द्या पण हे करण्याऐवजी आहेत ती कुरणेही बिल्डरांच्या आणि कम्पन्यांच्या खिशात जाणार असेल तर गोमातां गोमाता म्हणून टाहो फोडण्यात काय हशील ? आहेत ती चराऊ कुरणे वाचवा आणि वाढवा गोमाता वाचली तर त्यामुळं वाचेल आणि वाढेल .आणि भाजपचे गोमातेविषयीचे प्रेम प्रामाणिक आहे असे सिद्ध होईल

राममंदिराबाबत विवादास्पद जागी संशोधन केंद्र वा हॉस्पिटल किंवा शाळा व्हावी असे माझे वैयक्तिक मत आहे पण आता मात्र मी हिंदूंच्या मानसिकतेचा आग्रह बघून राम मंदिर व्हावे ह्या निष्कर्षाला पोहचलो आहे सगळेच पक्ष राम मंदिरच्या फेव्हरमध्ये आहेत असं आता स्पष्ट दिसतंय फारूक अब्दुल्ला जर राम मंदिरच्या फेव्हरमध्ये असतील तर बाकीच्या लोकांनी विरोध करण्यात फार काही अर्थ नाही रामाच्या नावाने आता हिंसाचार नको

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

****************************************************

















Comments

Popular posts from this blog