साठोत्तरी लेखकांची समीक्षा करताना केवळ त्यांची स्तुती करणे ह्याला काय अर्थ आहे ? ह्यांच्या मर्यादाही दाखवायला नकोत काय ? समीक्षेचे काम जे झाले ते सांगणे एवढेच नसते तर काय झाले नाही हेही सांगणे असते . ऐंशोत्तरीनी नुसती फॅनगिरी केली म्हणून तर ह्यांचे लेखन साठोत्तरीत अडकून पडले जागतिकीकरणाचा रेटा आला नसता तर हे लेखक फक्त साठोत्तरीचे बांडगुळ म्हणूनच वाढले असते .  नव्वदोत्तरीत   चौथ्या नवतेचे  बंड आकांतून व्हायला होते पण  काहींनी स्वतःच्या स्वार्थासाठी ही चळवळ दिलीप चित्रेंच्या आणि इतरांच्या गळ्यात बांधली एडजस्टमेंटवादी प्रवृत्तीनी मराठी साहित्यिक चळवळीचा नेहमीच घात केला आहे . क्रांतिकारक म्हणून श्रेय हवे आणि ऍडजस्टमेन्टचा मेवा पण खायला मिळायला हवा अशी ही वृत्ती ! हिचे काय करायचे हाच खरा प्रश्न आहे .


Anand Thatte ह्यांनी हे कुठल्याही काळाला लागू नाही का? असा प्रश्न विचारला म्हणून आणि राजेंद्र बाणाईत ह्यांनी त्यांच्या ह्या प्रश्नाला सहमती दर्शवली म्हणून ह्या प्रश्नाला हे माझ्या अल्प कुवतीनुसार दिलेले उत्तर 

प्रत्येक कालखंड स्वतःची नवता घेऊन येतो जसे कि
१८२० ते १८६० = सुधारणावादी नवता
 १८६० ते १८९० = प्रबोधनवादी नवता
१८९० ते १९४० = स्वच्छन्दवादी नवता
१९४० ते १९६०= आधुनिकतावादी नवता
१९६० ते १९८५ == देशी नवता
ह्यातील प्रत्येक नवतेबाबत त्या त्या नवतावादी मंडळींनी कट्टरपणे मांडणी केली आणि आधीच्या नवंतांवर जोरदार हल्ले केले महात्मा फुलेंनी ब्राह्मणी सुधारणावादी नवतेवर जोरदार हल्ला केला .   केशवसुतांनी सुधारणावादी व प्रबोधनवादी  नवतेने  कवितेच्या नावाने प्रचंड  संख्येने  समाज समाज पुढे येतोय  म्हणून  स्पष्टपणे  व्यक्तिवादाला वाव देणारा सौन्दर्यवाद मांडला आणि कविता ही वीज असते आणि ती ९९% लोकांना पकडता न आल्याने खाक करते असे म्हणून त्याकाळी बोकाळलेल्या ९९% कवडे लोकांच्या कानाखाली वीज काढली  पुढे मर्ढेकरांनी नवे सोंदर्यशास्त्रच मांडले आणि रोमँटिक मांडणी मोडीत काढली . पुढे सत्यकथीय आधुनिकतेला पूर्ण मोडीत काढत नेमाडे ,   चंद्रकांत पाटील ह्या  दोघांनी देशीवाद  मांडला .तर ढाले ढसाळांनी आंबेडकरवाद
फुल्यांनी कधीही ब्राह्मणी सुधारणावादी साहित्याशी तडजोड केली नाही आणि केशवसुत कधीही फुलेवादाच्या दारात आले नाहीत  . मर्ढेकरांनी कधीही केशवसुतांच्या सौन्दर्यवादी टोळीत बसण्याचा प्रयत्न केला नाही कि शहाणे , नेमाडे , ढाले , ढसाळ  आणि पाटील हे भूमिका स्पष्ट झाल्यावर सत्यकथेच्या कंपूत शिरले नाहीत  आधीच्या लोकांच्यावर लिहितांना त्यांच्या मर्यादा ह्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केल्या .
प्रत्येक काळखंडात काही अभिजातवादी कलावंत असतात त्यांना हे नवता जूनता  प्रकरण मान्यच नसते असे लोक स्वतःला क्रांतिकारक म्हणवून घेत नाहीत आणि कुठल्या नवतेची मांडणीही करत नाहीत त्यांची कसोटी एकच असते चांगले , वाईट आणि अभिजात (क्लासिक ) . मला असेही लोक आवडतात कारण ते ढोंगी नसतात . ते क्रांतिकारकत्वाचा आव आणत नाहीत कि नवतेचा मॅनिफेस्टोही काढत नाहीत . ते क्रांतीचे श्रेय पण घ्यायला येत नाहीत उदा पु शि रेगे पु ल देशपांडे रवींद्र लाखे ज्ञानदा  चंद्रशेखर सानेकर सौमित्र
पण काही लोक असे असतात कि त्यांना क्रांतीचे श्रेयही हवे असते आणि आधीच्या नवतावाल्यांच्याकडून मलिदाही खायचा असतो मराठीत ह्याची सुरवात दिलीप पुरुषोत्तम  चित्रेंनी केली चित्र्यांचा मूळ पिंड अभिजातवादी पण का कुणास ठाऊक त्यांना नेमाडेंच्या चळवळीचे श्रेय खायचा मोह झाला आणि तिसरी  नवता आम्हीच सुरु केली असा आव त्यांनी आणायला सुरवात केली वास्तविक त्यांचा पहिला कवितासंग्रह  आणि त्यावेळच्या त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या सर्वच कविता ह्या पूर्ण मर्ढेकरी आधुनिकवादी  संवेदनशीलतेच्या ! त्यांचे लघुअनियतकालिकही सर्वसमावेशक !  ते देशीवादी झाले ते नेमाडेंच्यानंतर ! पॉप्युलर प्रकाशनाने आयोजित केलेल्या चर्चेत फक्त नेमाडेच  देशीवादाच्या बाजूने दणकून बोलतांना दिसतात आणि त्यांना थोडीफार साथ देतायत चंद्रकांत पाटील गो मा पवार चंद्रशेखर जहागीरदार ! ह्या चर्चासत्रात चित्रेंनी लिहिलेल्या  कवितेवरील निबंधात कुठेही देशीवाद नाही . मग देशी नवतेचे श्रेय कुणाचे तर ते नेमाडेंचे ! दिलीप चित्रें कवितेत वा लिखाणात आयुष्यात कधीही आपला हा पूर्ण अभिजातवादी पिंड सोडत नाहीत आणि त्यांनी तो सोडला नाही हे बरेच झाले अन्यथा देशीवादाच्या नावाने त्यांनी कविता बिघडवून घेतली असती आणि देशी आणि मार्गीच्या अफलातून समतोलाला ते मुकले असते विलास सारंग नको तितके कवितेत मार्गीकडे कलले आणि व्याप्ती गमावून बसले  तसे चित्रे  देशीकडे कलून व्याप्ती गमावून बसले असते . चित्र्यांची नंतरची कविता देशीवादी असली तरी तिचा मूळ पिंड अभिजातवादाचा आहे जशी  पु शि रेग्यांची कविता किंवा सावित्रीसारखी कादंबरी रोमँटिक असली तरी तिचा पिंड अभिजातवादाचा आहे . किंवा जी ए कुलकर्णींच्या कथा आधुनिकता वादी असल्या तरी त्यांचा  पिंड अभिजातवादाचा आहे

माझे म्हणणे इतकेच जर तुमचा पिंड अभिजातवादाचा  असेल तर तो निमूट स्वीकारा की ! जी नवता तुम्ही मांडलीच नाही ती पुढे आत्मसात करून पुन्हा ती आम्हीच मांडली असा तोरा कशाला ? दोन्हीकडून श्रेय उपटण्याचे कारस्थान कशाला ? आणि नवतेकडून उभे राहणार असाल तर पूर्ण उभे राहा . खरेतर नवतेकडून उभे राहणाऱ्यांना अभिजात म्हणजे काय ते नीट माहीत असते पण नवे अभिजात निर्माण होण्यासाठी जुन्या अभिजातच्या मर्यादा दाखवून देणे गरजेचे आहे हेही त्यांना पटलेले असते त्यामुळेच नवतावादी लोक जुन्या नवतावादी लोकांवर  जेव्हा श्रद्धांजलीपर लिखाण करतात तेव्हा ते अनेकदा सार्थ गौरव करतात . ही श्रद्धांजली त्यांच्या कलाकृतींमधून किंवा श्रद्धांजलीपर लिखाणातून प्रकट होत असते . किंबहुना ज्याला जूनता नीट कळलेली असते  त्यालाच नवता नीट कळते . ज्याला न्यूटन नीट कळलेला असतो तोच आईन्स्टाईन होऊ शकतो ज्याला न्यूटनच नीट कळलेला नाही तो आईन्स्टाईन काय घंटा होणार ?
आता न्यूटनच्या फिजिक्समध्ये बसून ज्यांना आईन्स्टाईन व्हायचे आहे त्यांचे काय करायचे ? थत्ते म्हणतात तसे संधीसाधू लोक सर्वच काळात असतात पण साहित्य अजरामर होते ते अभिजाततेमुळे  पण पुढे सरकते ते नवतेमुळे आणि नवता पुढे सरकते ती महात्मा फुले , मर्ढेकर , नेमाडे , ढाले , ढसाळ ह्यांच्यासारख्या जहाल लोकांच्यामुळे प्रत्येक नवतेत असे लोक असावे लागतात आणि असतात
 १९८५ ते आत्तापर्यंत जी चौथी नवता अवतरली तिला असे किती जहाल लोक लाभले आणि जे जहाल लोक लाभले ते का संघटित झाले नाहीत ? आणि जर संघटित झाले तर तो जहालपणा कुणी बिघडवला आणि का बिघडवला ? मुख्य म्हणजे ह्या जहालांनी सरड्यांना का कवटाळले कि हे जहाल जहाल न्हवतेच आणि फक्त जहालतेचे दलाल होते ? कि ह्या जहालांना सरडे ओळखताच आले नाहीत ? कि सरडे होण्यालाच पोस्टमॉडर्निझम म्हणतात ?माझे प्रश्न हे आहेत . देविदास चौधरी ह्या आमच्या जुन्या  प्रेमळ मित्राने अजून बोल असे म्हंटले आहे म्हणून ते मी प्रस्तुत करत आहे

श्रीधर तिळवे नाईक





Comments

Popular posts from this blog