मेल्यानंतर फेसबुक - श्रीधर तिळवे नाईक
मेल्यानंतर माझं फेसबुक अकौंट उरेल तेव्हा
रोज पोस्ट टाकून त्याला जिवंत ठेव
मी सुमारे पांच हजार कविता लिहिलेत
रोज एक कविता टाक
आणि बारा वर्षांनी पुन्हा रिपीट करत जाशील तेव्हा
कोणालाही ती जुनी कविता आहे हे ओळखता येणार नाही
कारण बारा वर्षांनी कवींची एक नवी जनरेशन उदयाला आलेली असेल
चौथ्या नवतेवर माझी चार हजार क्वोटेशनस निघतील
जी तुला दहा वर्षे पुरतील
आणि दहा वर्षांनी पुन्हा पहिले रिपीट करत जाशील तेव्हा
कोणालाही ते ओळखता येणार नाही
कारण दहा वर्षांनी समीक्षकांची
एक नवी पिढी उदयाला आलेली असेल
कविता आणि समीक्षा पुरत नसेल तर
मी
'' अ डॉ हॉ का बा ना सु ना '' '' धर्म '' '' अर्थ '' ''मोक्ष '' '' ची ''
अश्या महाकृतींची वीस हजार पाने मागे सोडली आहेत
आणि दिवसाला पाच पाने टाकलीस तरी
चार हजार दिवस पुरतील
आणि चार हजार दिवसांनी
पुन्हा पांच पाने रिपीट करत जाशील तर
कोणालाही ते कळणार नाही
कारण चार हजार दिवसांनी
वाचकांची एक नवी पिढी उदयाला आलेली असेल
शिवाय पन्नास कथा , दोनशे संगीत रचना , शंभर फिल्मस्क्रिप्ट्स , दहा नाटके , एक अध्यात्मिक सिरीज
असे काहीबाही लोणच्यापापडासारखे टाकता येईल
शेवटी तूही मरून जाशील तेव्हा
तुझ्या मुला मुलींना हे संचित पुरेल
आणि एक दिवस असा येईल
जेव्हा फेसबुकच मरून जाईल
जेव्हा हे घडेल
तेव्हा ते ही कविता वाचतील
आणि म्हणतील
'' श्रीधर तिळवे नावाचा आमचा पूर्वज
फारच खमका निघाला
साला फेसबुकलाही पुरून उरला ''
Comments
Post a Comment