सत्य किती ? सत्ये किती?श्रीधर तिळवे नाईक 

गेले कित्येक लेख आपण सत्याविषयी चौथी नवता काय म्हणते याचा शोध घेत आहोत.

पुरोगामी वाद आणि आधुनिक वाद यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर काही असेल तर ते म्हणजे दोघेही एकच एक सत्य मानत होते आणि तशी मांडणी करत होते. याला शह देण्यासाठी म्हणून उत्तराधुनिकतेने सत्य अनेक असतात असा सिद्धांत मांडला आणि संपूर्ण आधुनिक वाद मोडीत काढला .

यामागे नेमके काय कारण होते? यामागे कारण होते उत्तराधुनिक ज्ञानाची quantam प्रक्रिया जी मुळातच ऑब्जेक्टिव्ह कडून सब्जेक्टिव्ह कडे आली. सर्वसाधारणपणे पुरोगामी युग हे ऑब्जेक्टिव्ह सत्य शक्य आहे असे मानत होते तर आधुनिक युग ऑब्जेक्टिव्ह सत्य एक आहे हे स्वीकारत होते परंतु ते वेगवेगळ्या ठिकाणी फॅक्चर झालेले आहे अशी मांडणी करत होते त्यामुळेच फ्रॅक्चरड सब्जेक्ट फ्रॅक्चरड माईंड फ्रॅक्चरड सोसायटी हे आधुनिकतेचे एक फार मोठे समीकरण उदयाला आले. उत्तर आधुनिकतेने याही पुढे जाऊन अनेक सत्ये असतात असा सिद्धांत मांडला आणि सब्जेक्ट इज डेड असे जाहीर केले . त्यातूनच मग बहुविध दृष्टिकोन आणि बहुविध multiple सत्ये यांचा सिद्धांत स्वीकारला गेला यातला ज्ञानात्मक पातळीवरचा सर्वात मोठा घोळ असा होता की एका बाजूला उत्तर आधुनिकता सब्जेक्ट इज डेड असे घोषित करीत होती आणि दुसरीकडे सत्य सब्जेक्टिव्ह आहे असे मांडत होती आता जर सब्जेक्ट डेड असेल तर मग त्याला सत्य कसे काय दिसणार ? सत्य दिसायला किंवा जाणवायला मुळातच चित्त आणि जाणीव जिवंत असायला लागतात . या विरोधाभासाचा युरोपियन विचारवंतांनी फारसा विचार केला नाही हे माझ्या हळूहळू जेव्हा लक्षात आले तेव्हा माझ्या लक्षात हेही आले की आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. चौथ्या नवतेची सुरुवात जिथून झाली त्यामध्ये ज्ञानासंदर्भातल्या या विरोधाभासाचा फार मोठा वाटा होता दुर्दैवाची गोष्ट अशी होती की पोस्टमॉडननिझम यासंदर्भात फार चर्चा करत नव्हता . आणि युरोप शिवाय यांचे पान सुद्धा हलत नाही अशा लोकांना त्यामुळे भारतात काही सुचणे शक्य नव्हते.

आता बहुविध सत्ये असतील तर साहजिकच एकाच सत्याच्या आधारे उभे राहणारे महासिद्धांताचे प्रारुप स्वीकारता येणे शक्यच नव्हते त्यामुळे साहजिकच याचे पुढचे पाऊल म्हणून उत्तराधुनिकतेने महा सिद्धांत नाकारायला सुरुवात केली. ज्यामध्ये मार्क्सवाद हा सुद्धा महासिद्धांत आहे म्हणून नाकारण्यात आला मुळात याची सुरुवात ग्रामसीच्या लेखनामध्येच होती कारण ग्रामसीने कार्ल मार्क्सचे एक मॉडेल जे इकॉनोमिक मॉडेललाच प्रमाण मानत होते ते नाकारून संस्कृती आणि संकल्पना यांचा विचार वर्गसंघर्षाच्या केंद्रस्थानी आणला तर लुक्यासने इकॉनॉमिक मॉडेलच्या जागी म्हणजे कोंशसनेस consciousness म्हणजे जाणीव केंद्रस्थानी आणायला सुरुवात केली इथेच स्पष्ट झाले की आता मार्क्सवादात सुद्धा एकच एक मॉडेल असणार नाही आणि याचा परिणाम उत्तर आधुनिकतेवर असा झाला की शेवटी सर्वच प्रकारची महा सिद्धांतता नाकारण्यात आली मुळात झाले असे की हायझनबर्गच्या सिद्धांतामध्ये तुम्ही कुठे उभे आहात हे फार महत्त्वाचे झाले. तुमच्या क्षेत्रामधूनच तुम्ही सत्य पाहत असता अशी ही संकल्पना होती आणि ती वैज्ञानिक संकल्पना असल्याने नाकारणे फार कठीण गेले . सत्य फक्त सापेक्ष झाले नाही तर ते positional झाले . त्यामुळे जगभर देशीवादाचा आणि लोकल संस्कृतीचा मोठ्या प्रमाणामध्ये विचार सुरू झाला आणि हा विचार हळूहळू सर्व राष्ट्रांच्या मध्ये उदयाला येत सर्व प्रदेशांच्या मध्ये उदयाला येत राष्ट्रीय आणि प्रादेशिक ओळख आणि अस्मिता केंद्रस्थानी आणायला लागला. आपल्याकडे Positional चा देशीयता असा अर्थ घेतल्याने आपल्याकडे देशीवाद कमालीचा प्रभावी झाला . पोझिशन मध्ये पोझिशन फार महत्त्वाची असते परंपरा नाही आणि देशीयतेमध्ये परंपरा महत्त्वाची असते हा दोन्हींच्या मधील फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. Position ही नेहमीच काळ आणि अवकाश यांनी युक्त असू शकते पण ती मुक्तही असू शकते यातील युक्ततेची शक्यता कायमच उत्तर आधुनिकतेने शोधली कारण युरोपियन विचार प्रणालींच्या मध्ये मोक्षाचा विचार नाही परंतु भारतात मात्र मुक्ततेचा विचार असल्याने आपण पोझिशन मुक्त सुद्धा बघू शकतो तो फरक लक्षात न घेतल्यानेच पुढे येणाऱ्या धार्मिक संकटाची जाणीव अनेक पुरोगामी लोकांना आणि देशीवादी लोकांना झाली नाही . सापेक्षता ही अनेकदा पोझिशनमधून पाहण्यात आलेली निरपेक्षता असते . आणि निरपेक्षता जर का परंपरेमध्ये अडकली तर ती सत्य नीट पाहू शकत नाही. परंपरेमधले सगळे पूर्वग्रह ती कॅरी आऊट करते आणि त्यामुळेच मग हे परंपरेचे वहन शेवटी वाहन बनून धर्मामध्ये विलीन होते .

पुरोगामी लोकांचे जे काही महा सिद्धांत होते त्यामधला एक महासिद्धांत म्हणजे समाज हा सतत प्रगती करत असतो आणि प्रगतीच्या दिशेने जात असतो . जेव्हा उत्तर आधुनिकतेने महा सिद्धांतांना नकार दिला तेव्हा साहजिकच तिला प्रगतीच्या महासिद्धांतालाही नकार द्यावा लागला आणि त्या जागी मग प्रगती आणि विकास या दोन गोष्टी अतिशय गुंतागुंतीच्या असतात आणि त्या सतत समाजाला पुढे घेऊन जातील याची कसलीही खात्री नसते असा सिद्धांत स्वीकारावा लागला याचा एक परिणाम असा झाला की प्रगती करणारे आणि मानणारे सिद्धांत नाकारण्याची सोय प्रतिगामी लोकांना , महाश्रद्धा( religion)वान लोकांना आणि धर्मांना उपलब्ध झाली. प्रगती आणि विकास अनिश्चित झाले आणि निश्चितता गायब झाल्यामुळे साहजिकच ज्या ज्या विचारप्रणालींना निश्चितता नकोच होती त्यांना आपले वर्चस्व निर्माण करता आले जेव्हा तुम्ही पृथ्वीवरच्या सर्व निश्चितता नाकारता तेव्हा मग त्याच्या जागी साहजिकच धर्मामधल्या काल्पनिक निश्चितता आणि निश्चिततेच्या फॅन्सी फॅन्टॅसीज केंद्रस्थानी यायला सुरुवात व्हायला लागते . दुर्दैवाने उत्तराधुनिक लोकांच्या हे लक्षात आले नाही आणि साहजिकच यामध्ये सर्वात जास्त फायदा इस्लामचा झाला कारण इस्लाम हा एक महा सिद्धांत होता आणि तो असा महा सिद्धांत होता जो विस्तारवादी होता आणि प्रचंड निश्चितता देत होता आणि ही निश्चितता काल्पनिक होती आणि आहे. उत्तर आधुनिक अनिश्चिततेने भांबावलेल्या अनेक लोकांना त्यामुळे इस्लाम आणि हिंदू यासारख्या धर्मांच्या मध्ये दिलासा सापडायला लागला . याचे कारण काय होते? याचे कारण होते माणसाला मुळात जगण्यासाठी उद्याच्या निश्चिततेची गॅरंटी लागते . माणसाची सायकॉलॉजीच अशी आहे की जी काही काळ अनिश्चितता स्वीकारू शकते परंतु आयुष्यभराची अनिश्चितता स्वीकारणे माणसाला जवळजवळ अशक्य होऊन बसते . त्यामुळेच तो जर का खरीखुरी निश्चितता मिळाली नाही तर काल्पनिक निश्चितता पुरवणाऱ्या सर्व घटकांच्या कडे वळायला लागतो . आमच्या काळामध्ये नेमके हेच घडले आणि त्याचा मुकाबला करण्याची वेळ चौथ्या नवतेवर आली .

उत्तराधुनिकतेने त्यामुळेच मांडलेली स्वभावाची संकल्पना ही पूर्णपणे वेगळी होती तिच्या मते मानवी स्वभाव हा विविधतेने नटलेला असतो . या स्वभावाला केंद्र नसते म्हणून सब्जेक्ट ही नसतो आणि या स्वभावाला अनेक घटक सतत प्रभावित करत असतात आणि तो कोणत्या घटकांच्यामुळे प्रभावित होईल हे निश्चित करणे अत्यंत अवघड जाते. त्यामुळेच मग अनिश्चित प्रभावांची संख्या प्रचंड वाढत गेल्यामुळे त्यांचे गणन करणे अवघड जाते. 

अशावेळी मग जे व्हायचे ते होते सत्य धर्माकडे जाते आणि वास्तव माणसाकडे येते आणि हे वास्तव मीडिया चालवायला लागतो म्हणजेच हे वास्तव चिन्हवास्तव होते आणि चिन्ह वास्तव म्हणून फंक्शन करायला लागते. त्यातून मग मॅन्युप्यूलेशनच्या, मनीप्यूलेशनच्या आणि मॅन्युफिलेशनच्या अनेक तऱ्हा उदयाला येतात .यातला प्रत्येक फॅक्टर प्रत्येक चॅनेल संपूर्ण समाज नियंत्रित करण्याचा प्रयत्न करायला लागतो किंवा स्वतःचा गट नियंत्रित करायला लागतो. प्रत्येक जण कंट्रोल फ्रीक होतो . त्यामुळेच मग जाहिरातींचा प्रचंड गवगवा सुरू होतो कारण वास्तव आपल्या हातातून निसटून चाललेले आहे याची कल्पना अनेकांना यायला लागते आणि मग त्याला कंट्रोल करण्यासाठी अधिकाधिक मीडियाबाज पावले उचलली जातात. जाहिरात म्हणजे दुसरे तिसरे काही नसून नियंत्रणाचे साधन असते . माध्यम असते. अस्तित्व वादाने चॉईस थेरी मांडली होती पण उत्तर आधुनिक वादामध्ये तुमचा हा चॉईस जाहिरातींच्या साह्याने आणि मीडियांच्या साह्याने पूर्णपणे मॅनेज आणि manipulate केला जाऊ लागला . म्हणजेच यु डोन्ट हॅव choice बिकॉज each and every choice इज स्पॉन्सड बाय मीडिया हे सत्य उदयाला येते. चौथ्या नवतेमध्ये मीडियाची जागा संपूर्ण चिन्ह सृष्टीने घेतली त्यामुळे संपूर्ण वास्तवच चिन्हसृष्टीच्या ताब्यात गेले आणि जय जय वास्तव म्हणण्याचे दिवस संपले . डिजिटल वास्तव हे फक्त चिन्ह सृष्टीच्या वास्तवाचे एक भाग आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे .

मुळात चॉईस खूप असत नाहीत ते मर्यादित असतात आणि बहुतेक सर्व चॉईस बाजार निर्माण करत असतो उत्पादन व्यवस्था निर्माण करत असते . त्यामुळेच अस्तित्ववादाची चॉईस थेरी ही चॉईसला जितकी स्वतंत्र समजत होती तितका चॉईस स्वतंत्र नाही हे लक्षात आले . त्यामुळेच उत्तरआधुनिक जग हे विविधता, संदिग्धता, अनिश्चितता आणि भेदाभेद मंगल समजणारी धार्मिकता यांनी भारावून गेले .

साहजिकच या सगळ्याला नकार देण्याची वेळ आमच्या पिढीवर आली म्हणजे निदान माझ्या पुरती आली . मुळातच मला जाणवलेली गोष्ट म्हणजे सत्य एक नाही आणि सत्ये अनेकही नाहीत सत्ये दोन आहेत शून्य आणि अनंत ! माझ्या सत्याच्या सर्व सिद्धांतांच्या मध्ये ही कॉमन गोष्ट आहे जी मी सातत्याने मांडत आहे . हे कॉसमॉस हा संसार फक्त शून्याच्या आधारे किंवा फक्त अनंताच्या आधारे चाललेला नाही . तो दोन्हींच्या रतीक्रियेतून चाललेला आहे .० @ ∞ हे त्याचे समीकरण आहे . त्यामुळे तो कवेत येणे फार अवघड होऊन बसतो . 

माझी ही परिभाषा समजण्यास अवघड असल्याने किंवा काही लोकांना समजणे अवघड झाल्याने मी शेवटी झिरो साठी शिव आणि इन्फिनिटीसाठी शक्ती हे शब्द वापरायला सुरुवात केली . 

एकदा सत्यविषयीचा सत्य हे दोन असतात हा महा सिद्धांत स्वीकारला की मग त्याच्या आधारे एक संपूर्ण महाकार्यजाल मेगानेटवर्क उभा करता येणे शक्य होते आणि त्याचबरोबर पुरोगामी आणि आधुनिक यांचा सत्य हा एक असतो हा सिद्धांत नाकारता येतो आणि त्याचबरोबर सत्ये अनेक असतात हा उत्तर आधुनिक सिद्धांत सुद्धा नाकारता येतो . मानवी जीवनात संदिग्धता इतकी बहुविध वाढवता येत नाही की मानवी जीवनच अशक्य व्हावे तिला दोन सत्यामध्ये रूपांतरित करता येणे शक्य असते असा हा सिद्धांत आहे कारण सत्य हे नेहमी एक किंवा बहु नसते ते दोन असते याला तुम्ही द्विसत्यीय सिद्धांत असेही म्हणू शकता .

श्रीधर तिळवे नाईक 



चिन्हसृष्टीकरण आणि स्थानिकता

चिन्हसृष्टीकरणाचा जागतिक कालखंडाचा काळ अद्याप संपलेला नसला तरी आज ना उद्या तो संपणे अटळ आहे विशेषतः कलेच्या संदर्भात . हा काळ सृजनात्मक गर्दीचा काळ आहे आणि त्यामुळेच एडिटर ची गरज आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत आहे कि रसिक गुदमरून जावा साधा इतिहास लिहायला जावा तर काळ आणि अवकाश ह्यांच्या विविधतेचा एव्हढा प्रचंड भडीमार होत आहे कि केवळ डाटा बघून हबकून जायला होते साध्या मराठी आदिवासी संस्कृतीचा अभ्यास किंवा महारांचा वा कोकणस्थ ब्राम्हणांचा अभ्यास करायला जावा तर प्रचंड डाटा उपलब्ध आहे . म्हणजे इथे अवकाशातील केवळ एक जात निवडली तरी संशोधनातील चार वर्षे सहज जावीत साहजिकच जगातील कोकणस्थ ब्राम्हण वैग्रे तर आणखी कठीण

हा जो डाटाचा महासागर आपल्यावर आदळतोय त्याचं करायचं काय ? मी ह्यावर शोधलेला उपाय म्हणजे अवकाशाबाबत नागेशी बांदिवडे हे गाव कोल्हापूर हे माझे शहर आणि मुंबई ही महानगरी ही घालून घेतलेली मर्यादा काळाबाबत इसवीसनपूर्व ५००० ते आत्ताचा काळ , दर्शनाबाबत शैव , विचारप्रणालीबाबत विवेकानंद , शिवाजी , बसवेश्वर , फुले , गांधी , आंबेडकर आणि विरोधी पक्ष म्हणून सावरकर , संघ वैग्रे  कार्यसंस्कृतीबाबत , कला , अध्यात्म , धर्म ही तीन क्षेत्रे आणि संदर्भक्षेत्रे म्हणून भारत , महाराष्ट्र , आशिया ,आणि शेवटी जग ,  विज्ञान , तंत्रज्ञान व चिन्हतंत्रज्ञान एव्हढी निवड केली खरेतर हेही हेवी आहे पण अटळ आहे

भविष्यात भूगोल अधिकाधिक चिन्हीय पातळीवर व्यापक पण ज्ञान व कलेबाबत अधिकाधिक स्थानिक होत जाणे अटळ आहे दुर्देवाची गोष्ट अशी कि मराठीत ह्याची जाण फारच कमी आहे देशीवाद आणि स्थानिकवाद  ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि स्थानिकवादाला परंपरेशी फार देणे घेणे नाही त्याचा भर स्थानिक अवकाशावर आहे तो देवदासी प्रथा वैज्ञानिक पातळीवर तपासेल आणि ती कालबाह्य म्हणून नाकारेल उगाच परंपरेचे गोडवे गाणार नाही शाहू महाराजांचे काम तो स्थानिकवादाच्या आधारे पुराव्याच्या आधारे तपासेल उगाच इमोशनल होणार नाही . 

Comments

Popular posts from this blog